Wednesday, May 23, 2018

मनाचे श्लोक - ९


मना वीट मानू नको बोलण्याचा
पुढे मागुता राम जोडेल कैचा
सुखाची घडी लोटता सूख आहे
पुढे सर्व जाईल काही न राहे II २५ II


आजकाल आपण बघतोय की निःस्वार्थ बुध्दीने कुणाच्या हिताचे कुणाला सांगायला गेलो तर प्रथम त्या उपदेशकर्त्याच्या हेतूबद्दलच शंका उपस्थित लोक करतात. ज्या माणसाला हा उपदेश केला जातो त्याचा अहंकारही उपदेश ऐकण्याच्या व त्याला आचरणात आणण्याच्या आड येतो. उपदेशकर्त्याबद्दल "हा कोण लागून गेला टिक्कोजीराव ? याला काय कळणार ? ज्याचे जळते त्यालाच कळते." आदि विचार साधकाच्याही मनात येणे स्वाभाविक आहे. अशावेळी आपल्या हिताचे पण वेळप्रसंगी कटू बोलणे करणा-या हितचिंतकाचा साधकाला वीट येऊ शकतो. 

पण समर्थ परमार्थ मार्गावरील साधकांना सावधान करताहेत. ते सांगताहेत की अशा बोलण्याचा वीट येऊन उपयोग नाही. उलट अंतर्मुख होऊन त्या बोलण्याचा साधकाने विचार करावा आणि आपले हित साधून घ्यावे. आपल्या हिताचे आपण केले तर श्रीमदभगवद्गीतेत सांगितलेल्या स्वधर्मपालनाकडे आपली वाटचाल अधिक सुकर होत जाईल आणि राम जोडला जाईल. आपणच आपल्या अविचारी वागण्याने आपले अहित करण्याचे ठरविले तर आपल्यासोबत परमेश्वर कसा बरे जोडला जाईल ? समर्थांचा "विचार" , "विवेक" या शब्दांवर फ़ार भर आहे. साधकाने विचारांची, विवेकाची कास कधीही सोडू नये याबद्दल त्यांना फ़ार कळवळा आहे.

समर्थ पुढे साधकांना सांगताहेत की बाबांनो, या भौतिक सुखांसाठी विवेकाचा त्याग करून अप्रिय पण हितकर अशा उपदेशाचा वीट मानू नका. कारण या भौतिक जगातली सुखे क्षणभंगूर आहेत. सुख आणि दुःख यांचा सतत पाठशिवणीचा खेळ या जगतामध्ये सुरू असतो. त्यामुळे आजच्या क्षुद्र सुखासाठी विचारांचा, विवेकबुध्दीचा त्याग करू नका कारण तात्पुरत्या अशा भौतिक सुखांना काही कालावधीनंतर शून्य किंमत प्राप्त होत असते. 

आपण सर्वांनी हा प्रयोग करून पाहण्यासारखा आहे. गेल्या ३ ते ५ वर्षांपूर्वी ज्या एखाद्या गोष्टीची आपल्या स्वतःला प्रकर्षाने ओढ होती आणि ती वस्तू आपल्याला प्राप्त झाली याचे आज आपल्या लेखी सुख किती आहे ? याचा ठोकताळा प्रत्येकाने मांडावा म्हणजे समर्थांच्या वाक्याचा पडताळा येईल.


देहेरक्षणाकारणे यत्न केला
परी सेवटी काळ घेवोनी गेला
करी रे मना भक्ती या राघवाची
पुढे अंतरी सोडी चिंता भवाची II २६ IIआपण सर्वच जण आपल्या देहाची किती काळजी घेत असतो. त्याचे रक्षण व्हावे म्हणून सतत प्रयत्नरत असतो. पण देह कशासाठी ? मला लाभलेला देह हा साध्य आहे की साधन आहे या विवेकाचे आपल्याला विस्मरण होत असते. आजकाल तर आपण सर्वच चार्वाकाचे इतके अनुयायी झालो आहोत की त्याच्या "खाओ, पियो, ऐश करो" या उपदेशाला आपण फ़ारच गांभीर्याने घेतलेय. "देह चांगला टिकावा म्हणून देहाचे लाड" ही समजूत दृढ झालीय. "देश, देव आणि धर्मासाठी या देहाचा पुढे उपयोग होईल म्हणून देह चांगला टिकवला पाहिजे" ही समर्थांची शिकवण तर आपण विस्मृतीतच ढकलली आहे. पण आपण देहाचे कितीही लाड करा, त्या काळापुढे आपले काहीच चालत नाही. काळा, गोरा, खुजा, उंच, देखणा, कुरूप आदि सर्व देहांना कालाधीन होऊन पंचमहाभूतांमध्येच विलीन व्हावे लागते. तर मग या देहाचा सदुपयोग होण्यासाठी याच्या रक्षणाचा विचार का होऊ नये ? 

बरं, "देहाची उत्तम जोपासना केली की माणूस चिंतामुक्त झाला" असे म्हणता येईल का ? खचितच नाही. उलट सुंदर स्त्री पुरूषांनाच त्यांचे सौंदर्य चिरकाल कसे टिकेल याची चिंता सतावत असते. काही काळाने कुठे आपल्या सौंदर्यात उणेपणा तर येणार नाही ना ? ह्या चिंतेत ते बिचारे कायम असतात आणि पुन्हा त्यासाठी अपार प्रयत्न करीत असतात. अशा सर्व लोकांना समर्थ उपदेश करताहेत की "देह कशासाठी ?" "देह साध्य की साधन ?" हा विवेक पक्का झाला की देहाच्या जोपासनेसाठी प्रयत्न जरी केला तरी श्रीरामरायावर सर्व सोपवून भवाच्या चिंतेतून मुक्त व्हा. कसाही देह असला तरी तो साधन म्हणून जनसेवेत, ईश्वरसेवेत झिजवला तर या जन्माचे सार्थक आहे. देहाचे कौतुक नाही. तो काळाचा आहे. त्याच्याकडूनच घेतलाय, त्यालाच अर्पण व्हायचाय हे लक्षात ठेवून जगात वावरा.

भवाच्या भये काय भीतोसी लंडी
घरी रे मना धीर धाकासी सांडी
रघूनायकासारिखा स्वामी शिरी
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी II २७ II


काही काही साधक या भवसागराची कायम भीती बाळगत असतात. अशा प्रसंगी मनमोकळेपणे जगणे, आपले नियत कर्म उत्कृष्टपणे पार पाडणे त्यांच्याकडून होणे दुरापास्तच. अर्जुनाची महाभारत युध्दाच्या वेळी जी अवस्था झाली तीच अवस्था. (वेपथुश्च शरीरे मे...)

अशावेळी समर्थ अगदी भगवान गोपालकृष्णांचाच अवतार धारण करून साधकांना समजावतात. याठिकाणी समजावताना समर्थांनी शिवीचाही वापर केलाय. भगवंत आपल्या लेकरांचा सदैव सांभाळ करतच असतो. कासवी जशी केवळ नजरेनेच आपल्या पिलांचे पालन पोषण करीत असते त्याप्रमाणे श्रीराम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाहीत असा विश्वास ते साधकांना देताहेत. असा विश्वास एकदा असला म्हणजे साधकाची भीती कमी होईल, कालांतराने दूर होईल आणि साधक त्याचे नियत कर्म निःशंक मनाने आचरू शकेल असा समर्थांना विश्वास आहे.

                                                                        II जय जय रघुवीर समर्थ II

No comments:

Post a Comment