Sunday, May 13, 2018

श्रीतुकोबांची गाथा - ८पाहतोसी काय I आता पुढे करी पाय II
वरी ठेऊ दे मस्तक I ठेलो जोडूनि हस्तक II
वरवे करी सम I नको भंगो देऊ प्रेम II
तुका म्हणे चला I पुढती सामोरे विठ्ठला II

श्रीतुकोबांचे विठ्ठलाशी एक वेगळेच नाते आहे. या अभंगात ते सख्यत्वाच्या भावनेने त्याच्याशी संवाद साधताहेत. ज्या विठ्ठल चरणांची आस तुम्हा आम्हा सर्व वारक-यांना असते, त्याची आस श्रीतुकोबांनाही आहे पण इथे सख्यत्वाच्या भावनेने ते त्याला आज्ञाच करताहेत, की "पाहतोस काय रे विठ्ठला ? चल, आता मी आलोय ना ? मग पाय पुढे कर पाहू. "

श्रीगजाननविजय ग्रंथात संत दासगणू महाराजांनी लिहील्याप्रमाणे महाराजांचे परम भक्त असे खंडू कडताजी पाटील ह्यांचे श्री गजानन महाराजांशी अशाच प्रकारचे संभाषण होत असे. "गण्या, गज्या म्हणे वाणी, परी प्रेम उपजे अंतःकरणी" असे वर्णन संतकवी दासगणूंनी केलेले आहे. ज्याठिकाणी प्रेम आहे त्याच ठिकाणी अशा स्वरूपाचा "अरे, तुरे" चा संवाद होत असतो हे दासगणू महाराजांनी सोदाहरण पटवून दिलेले आहे. आणि श्रीतुकोबांचे काय ? त्यांच्या तर सत्कर्माच्या खात्यात अगणित सत्कर्मे होती आणि त्यांनी त्या खात्याचा चेक कधीही फ़ाडला नव्हता. (आपल्या प्रापंचिक गोष्टींसाठी आपल्या इष्ट देवताला साकडे घालून सत्कर्माचा वापर केलेला नव्हता.) अशा धनवान ग्राहकासमोर त्या बॅंकरला नम्र व्हावे लागणे स्वाभाविक आहे हो.

श्री तुकोबा तसलाच हक्क विठ्ठलावर दाखवतायत. ते विठ्ठलाला त्याच्या सांप्रत अवताराची आठवण करून देताहेत. "बा विठ्ठला, तू गेल्या अवतारात त्रिभंग अशा स्वरूपाचा श्रीकृष्ण असशील. पण या अवतारात तू आम्हा भोळ्या भाबड्या वारक-यांचा विठू आहेस. त्यामुळे कृष्णावतारात असलेले तुझे वक्र पाय आता सरळ कर. तुझ्या या चरणांवर मला मस्तक ठेवू दे. मी तुझ्यासमोर हात जोडून उभा आहे. तुझे हे आमच्याठायी असलेले प्रेम भंगू न देण्याची जबाबदारी तुझीच आहे."

श्री तुकोबा देवाला तर सख्य भावनेने आवाहन करतायत. पण आजच्या काळात परमेश्वरापासून विन्मुख होऊन, अशाश्वत अशा प्रपंचात रममाण झालेल्या तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिकालाही आवाहन करताहेत की बाबांनो या अध्यात्ममार्गाच्या बारीत पुढे चला आणि काही वेळ तरी प्रपंचाला विन्मुख होऊन विठ्ठलाला सामोरे जा. चारशे वर्षांनंतर माणसे देवळात जाऊनही प्रपंच्याच्याच गोष्टी बोलत बसतील हे श्रीतुकोबांना त्याकाळीच उमजले होते एकंदरीत.

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
जय तुकोबा माऊली.

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर  (१३०५२०१८)  

No comments:

Post a Comment