Tuesday, May 22, 2018

श्रीतुकोबांची गाथा - ९




ते माझे सोयरे सज्जन सांगाती I  पाय आठविती विठोबाचे II
येरा मान विधी पाळणापुरते I  देवाची ती भूते म्हणोनिया II
सर्वभावे झालो वैष्णवांचा दास I करीन त्यांच्या आस उच्छिष्टाची II
तुका म्हणे जैसे आवडती हरिदास I  तैशी नाही आस आणिकांची II

संतांना खरेतर आपपर भाव नसतो. हा माझा, हा परका ही धारणा त्यांच्या ठायी अगदीच नसते. पण या ठिकाणी श्रीतुकोबा आपणा सर्वांना त्या ईश्वराच्या नादी लागण्यासाठी हा कृतक कोप करताहेत. श्रीतुकोबा म्हणताहेत की जे लोक माझ्या विठोबाचे पाय आठवतात तेच माझे नाते्वाईक आहेत. इतरांशी श्रीतुकोबांचे नाते आहे ते केवळ ती सगळी भूते देवाचीच लेकरे आहेत म्हणून. श्रीतुकोबा सर्वाभूती भगवदभाव ठेवताहेत पण विशेष ममत्व मात्र वैष्णवांबद्दलच बाळगताहेत. याठिकाणी "वैष्णव" कोण ? तर संत नरसी मेहतांनी म्हटल्याप्रमाणे "वैष्णवजन तो तेणे कहिये, जे पीड परायी जाणे रे", दुस-यांचे दुःख आत्मौपम्य वृत्तीने (स्वतःलाच दुःख झाल्याप्रमाणे) जे जाणून घेतात ते वैष्णव.

श्रीतुकोबा पुढे म्हणतायत की असे जे वैष्णव आहेत त्यांचा मी सर्व भावाने दास झालो आहे. त्यांच्या उष्ट्याची आस मला आहे. साधू संत यांच्या मुखातून जे ज्ञान येत ते त्यांच उष्टच असत आणि ते ज्ञान मनुष्यमात्राला करे मार्गदर्शन करून त्याला भवपार करत असा श्रीतुकोबांचा सिध्दांत आहे. आणि म्हणूनच श्रीतुकोबांना अशा वैष्णवांची जशी आस आहे तशी इतरांची नाही.

तुमच्या माझ्या संसारात, व्यवहारात, आचरणात आपल्याला व्यवहारात जो उपयोगी पडेल तो आपला सोयरा हे आपले धोरण असते. पण या अभंगातून श्रीतुकोबा आपल्याला आपले खरे सोयरे कोण याचे मार्गदर्शन करताहेत.

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम

जय तुकोबा माऊली.

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर  (२२०५२०१८)  

No comments:

Post a Comment