Tuesday, May 8, 2018

मी ओळखीले मला पूर्ण आता ?.....

स्थळ : दोसा प्लाझा नागपूर

वेळ : सायंकालीन भुकेची

आम्ही आपला ऑर्डर देऊन पुढ्यात खाद्यपदार्थ येण्याची वाट बघतोय. बाजुच्या टेबलवर दोन विशीच्या आसपास असलेल्या कन्यका आणि त्यांच्या मोठ्या बहिणीसारखी दिसण्याची पराकाष्ठा करत असलेली त्यांची आई. आमचा ऑर्डर आत देऊन वेटर त्यांच्यापुढे उभा. 

मेन्युकार्डवर डोस्यांचेच १०४ प्रकार. इतरही १०० पदार्थ. प्रत्येकाचे १० प्रकार निराळेच. या तिघींचा प्रचंड गोंधळ चाललेला. आत्ता काय खावे ? त्यांची चर्चा अलिप्त राष्ट्र चळवळींच्या चर्चेसारखी, कुठल्याही निष्कर्षाप्रत न येता, त्याच त्याच मुद्यांभोवती गोलगोल फ़िरतेय. वेटर आता खरोखर "वेट"र वाटतोय. वाट पाहून पाहून तो कंटाळतोय आणि आमचा ऑर्डर आणायच्या निमित्ताने त्या कंपूपासून तात्पुरती का होईना सुटका करून घेतोय.

आमचा ऑर्डर आलाय. आम्ही खायला सुरूवातही केलीय. पण शेजारच्या टेबलवरचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये. मुद्दाम म्हणून लक्ष असे नाही पण ही मंडळी एव्हढ्या जोराजोरात बोलतायत की त्या २० बाय २० च्या जागेतली इतरही मंडळी त्यांच्याकडेच बघताहेत. 

बर पैशांचा प्रश्न नसावा. आम्ही आमच्या महाविद्यालयीन जीवनात (घरून अगदी मोजके पैसे येत असल्यामुळे) एखाद्या वेळी असे हॉटेलमध्ये गेलो, की उर्दू पद्धतीने मेन्युकार्ड वाचायचो. उजवीकडल्या किंमती अगोदर वाचून मग डावीकडे पदार्थाचे नाव वाचायचे आणि खिशाला परवडेबल तेच मागवायचे. पण असला प्रकार इथे नव्हता.

मग माझ्या लक्षात आले. हा सगळा प्रकार त्या अतीप्रचंड मेन्युकार्डमधील सर्वोत्तम पदार्थ मागवण्यासाठी होता. मग निवडीत गोंधळ उडणारच. कारण प्रत्येक पदार्थ त्या त्या वर्गवारीत सर्वोत्तमच होता. आपल्याला नक्की काय खायचे आहे ? याची कल्पना मनात निश्चित नसल्याने असला गोंधळ उडणे स्वाभाविक होते. मग अशावेळी रॉंग नंबर लागून भलताच पदार्थ पानात येण्याची नामुष्की होण्याची शक्यताच जास्त. शेजारच्यांना हे सगळे समजावून सांगण्याची इच्छा होती पण असला चोंबडेपणा तिथल्या मॅनर्स आणि एटीकेटसना विसंगत ठरला असता म्हणून गप्प बसलो.



जीवनातही असे प्रसंग खूपदा येतात. साधी कपड्यांची खरेदीच घ्या ना. मला अमुक अमुक रंगाचा, अमुक पॅटर्नचा शर्ट, पॅण्ट (किंवा पॅण्ट शर्टचे कापड) हवा ही धारणा मनात पक्की असली की खरेदी पंधरा मिनीटात आटोपते. 

पण "यापेक्षा दुस-या पॅटर्न मधे नाही का हो ?", "गुलाबीत अजून थोडा फ़िक्का शेड नाही का ?", "राणी कलरमधे अजून थोडा मॅजेंटा शेडवाला दाखवा ना." (हे आणि असले प्रश्न नक्की कुणाकडून येतात ? याचा अंदाज जाणकार वाचकांना आला असेलच) असली खरेदी तासभर तरी संपत नाही हे निश्चित. एव्हढही होऊनही बाहेर पडताना मनासारखा कपडा मिळाल्याचे समाधान क्वचितच मिळते. रंग, पोत, कापड छान असेल तर किंमतीत फ़सवले गेल्याची भावना, किंमत वाजवी असेल तर "आपण नक्की कॉटनच घेतल ना ? की कॉटनसारख दिसणार सिंथेटिक मटेरीयल त्या दुकानदारान माथी मारलय ?" अशी कुठली ना कुठली रुखरूख मनात असतेच असते. दुकानातली सर्वोत्तम वस्तू सगळ्यात कमी किंमतीला आपल्याला मिळालीय हे समाधान अती अती दुर्मीळ असत.

लग्नाच्या व्यवहारातही असेच अनुभव येतात. आपण भलेही सर्वगुण संपन्न, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा नसू पण मुलगी मात्र रतीप्रमाणे सुंदर, व्यवहारचतुर, कमावती आणि नम्र स्वभावगुणांची हवी असते. उलट बाजूनेही तसेच. सध्या अविवाहित असलेल्या मुलामुलींपैकी सगळ्यात उत्तम मुलगी / मुलगा मला मिळालीच पाहिजे या १०० टक्क्याच्या अट्टाहासापायी अनेक ९९-९८-९७ टक्केवाल्यांना नकार जातो आणि मग वास्तवाची जाणीव झाली तोपर्यंत फ़ार उशीर झालेला असतो. मग ६०-६५ टक्केवाल्यामध्ये (टक्केवालीमध्ये) ही ९०-९५ टक्के गुण शोधले जातात आणि लग्नाच्या गाठी बांधल्या जातात.

मी कोण ?, माझी कौटुंबिक पार्श्वभूमी काय ?, मला नक्की कुठल्या प्रकारचा जोडीदार आयुष्यभरासाठी हवाय ? या कल्पना स्वतःच स्वतःच्या स्पष्ट नसल्या, की असे घोळ होत असतात. मग ते खाण्याच्या पदार्थात काय ? किंवा कपड्यांच्या निवडीत काय ? किंवा आयुष्याच्या जोडीदार निवडीत काय ? तत्व एकच.

जगातले सर्वोत्तम ते मला मिळाव यापेक्षा मला काय मिळाल की माझ्यासाठी सर्वोत्तम होईल ? हा थोडा स्वार्थी विचार जास्त महत्वाचा नाही का ? शेवटी कवी सांगूनच गेलेले आहेत,

"मी ओळखीले मला पूर्ण आता, कशाला मला पाहणे आरसे ?
माझ्यापुढे नित्य आत्मानुभूती, पटावे दुजे तर्क आता कसे " 



4 comments:

  1. सुंदर लेख... वृत्तपत्रात पाठवा

    ReplyDelete
  2. पण अशा माणसांबरोबर खरेदीला जाण्यात मजा असते! अर्थात थोडा वेळ आणि पेशन्स असेल तर. १५ वर्ष्यांच्या वाटचालीनंतर आता ती माझ्या सारखी बनत चाललीय. आणि मीच उलट तिला अजून काही पाहायचा आग्रह करत असतो!! अर्थात, तिथे आलेल्या काही "मोरपंखी" सुध्दा त्याला कारणीभूत असतात, का नाकारा?
    मजा आली लेख वाचताना. धन्यवाद.

    ReplyDelete
  3. मस्त .. सोप्या सरळ भाषेत योग्य विश्लेषण ...

    ReplyDelete