Monday, April 11, 2022

नवम सरल सब सन छलहीना




आज श्रीरामनवमी. राष्ट्रपुरूष श्रीरामांचा जन्मदिवस. आज इथे आणि सर्वत्रच वातावरण श्रीराममय झालेले दिसत आहे.

श्रीराम कुणाला भेटतील ? गोस्वामी बाबा तुलसीदासांनी आपल्या दोन दोह्यांमध्ये याचे सुंदर वर्णन केलेले आहे.
"जिन्हके कपट दंभ नही माया, उन्हके हृदय बसहु रघुराया."
आणि
"नवम सरल सब सन छलहीना."
जो मनुष्यप्राणी सरळ साध्या स्वभावाचा आणि कपट, दंभ रहीत आहे त्याला प्रभू नक्कीच भेटतील.
"जगात वागताना थोडा वाकडेपणा, थोडा कपटीपणा आवश्यक आहेच" असे प्रतिपादन कुणी करू लागले की महाभारत युध्दापूर्वीची कथा आठवते.
भगवान श्रीकृष्णांनी आपली नारायणी सेना कौरवांना देऊन स्वतः मात्र निःशस्त्र होण्याची प्रतिज्ञा करीत पार्थाच्या रथाचे निव्वळ सारथ्य केले होते. पण प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या बाजूने असल्यामुळे पांडवांचाच अंतिम विजय झाला होता.
आपल्याला आज ठरवायचे आहे. आपल्याला भगवंत स्वतः हवाय ? की त्याने निर्माण केलेली सगळी विलोभनीय माया हवी आहे ? भगवंत हवा असेल तर आपल्याला कपटरहित, दंभरहित आणि स्वभावाने सरळ व्हावे लागेल. आणि ही प्रक्रिया काही एका दिवसात होणारी नक्कीच नाही. प्रत्येकाच्या स्वभावधर्मानुसार, पात्रतेनुसार त्याला वर्षे, दोन वर्षे लागतीलही. पण त्यादृष्टीने अथक आणि जागरूक प्रयत्न केलेत तर आपण हे सहज साध्य करू शकू हा माझा आत्मानुभव आहे.
प.पू. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात "भगवंताचा एक खास दागिना 'समाधान' म्हणून आहे. आपल्या खास भक्तांना तो हा दागिना देतो. इतरांना तो पैसा, मान, प्रतिष्ठा आदि गोष्टी देतो."
ठरवायचे मग आजच्या शुभदिनी ?
- प्रभूंचे नाम धारण केलेला हा एक साधा जीव, राम प्रकाश किन्हीकर.

1 comment: