Wednesday, April 6, 2022

Data analytics आणि उपयोजित कला

 मुळात स्थापत्य अभियंता आणि गेल्या २७ वर्षांपासून अभियांत्रिकी अध्यापन क्षेत्रात असलो तरीही गेल्या ४ - ५  वर्षातल्या बदलांची मनोमन नोंद घेत Data analytics  शिकायला सुरुवात केलीय. तशीही मला डेटा स्वरूपात माहिती जमवायला आणि त्याचे विश्लेषण करायला मनापासून आवडतेच. १९८३ पासून माझ्या स्वतःच्या प्रवासाचा डेटा मी जमवलाय . दरवर्षाअखेर त्या त्या वर्षीच्या प्रवासाच्या डेटाचे विश्लेषण मी वर्षाअखेर जवळपास पाच सहा तास खपून करीत असतोच. 



Data analytics शिकण्यापूर्वीच आजच्या युगात त्या विषयाची व्याप्ती अनुभावाला आलेली होती. आपण काय खरेदी करतो, ? कुठे खरेदी करतो ? काय खातो ? किती वेळा खातो ? ही सगळी आपल्या दृष्टीने निरुपद्रवी माहिती आजच्या जागतिकीकरणाच्या युगात अनेक कंपन्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असते आणि त्या माहितीचे विश्लेषण करून अनेक विविध उद्दिष्टे ह्या कंपन्या साध्य करीत असतात. 

पण हे शिकताना जाणवले की आज आपण हे सगळे ज्ञान आणि त्याचे उपयोजन अभियांत्रिकी क्षेत्रापुरते मर्यादित ठेवलेले आहे. १९६० च्या किंवा १९७० च्या दशकात भारतीय समाजात कला क्षेत्राला  जे स्थान उपयोजित अंगाने होते ते आता नष्ट  होत चाललेले आहे. आता Data analytics मधल्या एखाद्या गोष्टीत कला क्षेत्रातली मंडळी काही मदत करू शकतील ही दृष्टी अभियंत्यांनी तारा गमावलीच आहे पण खुद्द कलाक्षेत्रानेही त्याविषयी संपूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. जणू Data analytics हा संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विशेषाधिकार आहे आणि आपण तिथे काही लक्ष घातले तर त्या अभियंत्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण होईल अशीच भावना बाळगून कला क्षेत्र या सगळ्या बाबींपासून दूर राहिलेय. 

साधी गोष्ट आहे. एखाद्या सुपर बाजारात एखादे विशिष्ट साबण जास्त खपतेय म्हटल्यावर त्या माहितीचे विश्लेषण करून अभियंते काही निर्णय घेऊ शकतील. पण ग्राहकांच्या मनोभूमिकेचा मानसशास्त्रीय दृष्ट्या विचार करून सुपर मार्केट मध्ये शिरल्याबरोबर प्रथमदर्शनी कुठल्या वस्तू असाव्यात ? शेवटी कुठल्या वस्तू असाव्यात ? त्या सुपरमार्केटच्या कपाटामध्ये नजरेच्या पातळीवर काय असावे ? कपाटात गुडघ्याच्या पातळीवर कुठल्या वस्तू ठेवाव्यात ? या सगळ्या गोष्टीसाठी ग्राहकाच्या आणि त्यातल्या त्यात एखाद्या देशाच्या, प्रांताच्या, शहराच्या, शहरातील विभागाच्या पातळीवरील ग्राहकाच्या मनोवृत्तीचा  कला शाखेतील तज्ञाने  अभ्यास करून त्यावर मांडलेल्या मतांचे उपयोजन व्हावे. आपल्या रोजच्या जीवनाशी नुसते विज्ञान आणि तंत्रज्ञानच निगडीत नाही तर कला शास्त्रही अशा उपयोजित स्वरूपात निगडीत व्हावे. केवळ पुस्तकी अभ्यासाच्या आणि आचार्य पदवी Ph. D. मिळवण्यासाठीच्या  पातळीवर मर्यादित ना राहता अशा लोकोपयोगी कार्यात उपयुक्त व्हावे.

- विज्ञान तंत्रज्ञान शाखेचा विद्यार्थी असला तरी कलासक्त असलेला आणि उपयोजित कलाशाखेबद्दल कळकळ असलेला अभियांत्रिकी प्राध्यापक, राम प्रकाश किन्हीकर.  

No comments:

Post a Comment