Tuesday, May 31, 2022

सातूचे पीठ, माया आणि सुख वगैरे...

सातूचे पीठ. एक अत्यंत पौष्टिक खाणे. विशेषतः उन्हाळा दिवसात तर पोटासाठी थंड म्हणून याचे महत्व अजूनच.

सकाळी सकाळी काॅलेजला जाताना एक वाटी सातूचे पीठ दूध आणि साखर मिसळून खाल्ले की १ वाजता करीत असलेल्या दुपारच्या जेवणापर्यंत निचंती (निश्चिंती) झाली.
पण कधीकधी मधल्यावेळेचे खाणे म्हणूनसुध्दा हा पदार्थ रूचकर, पोटभरीचा आणि पौष्टिक ठरतो. उन्हाळ्यातल्या एखाद्या सुटीच्या दिवशी सकाळी मस्त आंब्याचा रस आणि कांद्याचे भजे हा टिपीकल वैदर्भिय बेत जमला असावा. (पुल बहुधा हिवाळ्यातच नागपूरला आले असावेत. उन्हाळ्यात आले असते तर त्यांच्या लिखाणात उपरोल्लिखित बेताचा नक्की उल्लेख असता.)
भरगच्च जेवणानंतर पानबिन जमवून दुपारी डेझर्ट कुलर मध्ये चांगली वामकुक्षी झालेली असावी आणि दुपारी उठल्यानंतर तांब्याभरून थंड पाणी पिल्यानंतर आपली पचनशक्ती किती मजबूत आहे याची जाणीव व्हावी, भूक लागावी.
भर उन्हाळ्यात दुपारी अशावेळी मग याच सातूच्या पीठात तेल, मीठ टाकून कच्चीच काकडी पेरून एक अप्रतिम चवीचा पदार्थ होतो.



बालपणी आजोळी चंद्रपूरला आज्यांच्या हातचा खाल्लेला पदार्थ जवळपास तीन तपांनी घरी केला आणि अनंत आठवणीत रमलो.
खरेतर एखादा पदार्थ म्हणजे भौतिकदृष्ट्या त्यात असलेली सामग्री, त्यांचे प्रमाण (इथे आजीच्या काळचा पदार्थ. म्हणजे "तेल एवढंएवढं, मीठ थोडंसच आणि काकडी एवढी" असे प्रमाण. उगाच ग्रॅम, मिलीग्रॅम मध्ये सामग्री घ्यायला तो काय भौतिकशास्त्रातला प्रयोग आहे ?) एव्हढाच नसतो. त्यात असते ती वडीलधार्यांच्या सुरकुतलेल्या हातांमधून ओघळलेली, जिभेवर अनंतकाळ रेंगाळत राहणारी आणि मनात कायम घर केलेली माया आणि खूप सगळ्या आठवणी.
मायापाशांमधून मुक्त व्हायला हवं ही आपल्या सगळ्या धर्मग्रंथांची शिकवण. पण कधीकधी खरंच असं वाटून जातं की वडीलधार्यांनी केलेली ही माया जर आयुष्यातून वजा केली तर आयुष्य नुसते पासबुकं, गुंतवणूक, नफा - तोटा इतक्यापुरतेच उरेल.
- नातेसंबंधात कसल्याही नफातोट्याशिवाय झोकून देणारा अव्यवहारी गृहस्थ पण अंती सुख लाभलेला माणूस, राम किन्हीकर.

(सगळेच सदरे सध्या धुवायला टाकलेले आहेत. सबब 'सुखी माणसाचा सदरा' मागायला येणार्यांनी पूर्वपरवानगीनेच व भेट ठरवून यावे ही नम्र विनंती.)

Monday, May 16, 2022

मुंज एक संस्कार : आधुनिक युगाचे चिंतन

 ४० वर्षांपूर्वीचा फोटो. १४ मे १९८२.




मी आणि माझ्या धाकट्या भावाची मुंज एकत्रच लागली.
त्यावेळेच्या साधेपणात पण भरपूर नातेवाईकांच्या गोतावळ्यात.
अगदी माझ्या म्हातार्या आज्यांनी बटूचे चरणतीर्थ घेणे, सौ. आईने चुरमुर्याच्या, शेंगदाण्याच्या आणि दाळ्यांच्या गूळमिश्रित मोठमोठ्या लाडवांची भिक्षावळ घालणे, बटूच्या काशीयात्रेची लुटुपुटूची तयारी, आदल्या दिवशी रात्री दंडात बेडकी भरतात या भीतीने महिनाभर आधीपासून सावध झालेली झोप (न जाणो, आपण झोपेत पार निसूर झालो आणि घात झाला तर या भावनेने) या सगळ्या गोष्टी तत्कालीन प्रथेप्रमाणे अगदी साग्रसंगीत पार पडल्यात.
अहेरात दादांच्या दोनतीन मित्रांनी संध्येची पुस्तके दिलेली होती. (तसा आजोळहून सोन्याच्या जानव्याचाही अहेर झाला होता म्हणा.) पण आमचे मातामह संध्या देवपूजा आदिंचे अगदी कर्मठ उपासक असल्याने मुंजेच्या दिवशी सायंकाळपासूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली संध्यावंदन सुरू झाले.
१९८९ ला कराडला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकायला जाईपर्यंत घरी माझी सकाळ संध्याकाळ संध्या सुरू होती. कराडला हाॅस्टेलला रहायला गेल्यानंतर त्यात सुरूवातीला काही महिने खंड पडला खरा पण हाॅस्टेलला समविचारी, समान कौटुंबिक, सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी असणारे मित्र मिळालेत. भीड बुजली. आणि काही महिन्यानंतर प्रातःसंध्या आणि रोजची उपासना, पोथ्यापुराणे पुन्हा सुरू झाले ते आजतागायत.
आजकाल मुलांच्या मौंजीबंधनांनंतर ती मुले त्यादिवशी संध्याकाळची सुध्दा संध्या करीत नाहीत, दुसर्या दिवशी सकाळी बनियनसोबत जानवेही जे धुवायला जाते ते मग कुठल्यातरी धार्मिक प्रसंगाआधी एकदिवस पुन्हा असेच घातले जाते. जानवे बदलण्याचा, परिधान करण्याचाही एक विधी आहे, त्याचे मंत्र आहेत हे सुध्दा कुणाच्या गावी नाही.
याचा खोलात जाऊन विचार केला तर आपल्या लक्षात येईल की याला कारण तो बटू नसून त्याला मार्गदर्शन करण्यास उपलब्ध नसलेली आपली पिढी आहे. मला माझ्या मातामहांचे मार्गदर्शन लाभले आणि आईवडिलांनी त्या दंडकाचे पालन होतेय की नाही यावर कडक लक्ष दिले. आज किती पालक आपल्या पाल्यांना संध्यावंदन, त्याचा संपूर्ण विधी त्यामागील वैज्ञानिकता,त्यामुळे होणारे लाभ (आजकाल outcomes based education चा जमाना आहे, बाबा.) समजावून सांगायला तयार आहेत ? रोज सूर्योदय समयाला १५ मिनीटे आणि सूर्यास्ताला १५ मिनीटे देऊन आपल्या आणि आपल्या पाल्यांकडून संध्यावंदनासारखा अत्यंत प्रासादिक विधी करवून घेण्याची किती पालकांची तयारी आहे ? त्यासाठी पालकांना आणि त्यांच्या पाल्यांना मार्गदर्शन करण्याची किती ज्ञात्या ब्रम्हवृंदांची तयारी आहे ?
आपल्याला प्राप्त झालेला हा सांस्कृतिक वारसा पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात आपण अपयशी ठरतोय हे आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीये का ?
- काळानुसार जगण्याचा परीघ अगदी जरूर विस्तारत जावा पण ज्या संस्कृतीला आपण केंद्रबिंदू मानून आपला परीघ विस्तारतोय त्यातली अत्यंत चांगली मूलतत्वे आपल्या आचरणातून सोडली तर गडबड होईल अशी ठाम धारणा असलेला,
आणि
ऊंच आकाशात विहार करताना आपल्या जमिनीशी नाते घट्ट ठेवायला हवेच या मूलतत्ववादी विचारसरणीचा, किन्हीकरकुलोत्पन्न रामभाऊ प्रकाशात्मज.

Friday, May 13, 2022

तव्यावरल्या पोळीचे चटके

तव्यावरून पानात आलेली पोळी हा एकदम आवडणारा पदार्थ असला तरी तो एक खास वैदर्भिय / मराठवाडीय मालगुजारी सरंजामी मनोवृत्तीचा परिपाक आहे हे माझे आजवरचे निरीक्षण आहे. तव्यावरची पोळी सरळ पानात येताना खाणारा 'एकटाच नालोब्या' असेल तर ते अत्यंत सुखावह आहे पण चारपाच जणांना जोराची भूक लागलीय, हे सर्व जण पंक्तित वाट बघत बसलेयत आणि घरातली एकटीच गृहिणी दरवेळी तव्यावरच्या ताज्याताज्या पोळीचे चारपाच तुकडे करून सगळ्यांना वाढतेय, या उपद्व्यापात एकाचीही भूक पूर्ण भागत नाही आणि घरातल्या गृहिणीचाही पिट्टा पडतो तो निराळाच.

मग एकदोन पोळ्यांनंतर एकदोन समजूतदार मेंबर्स मग बाकीच्यांना वाॅक ओव्हर देतात. "होऊद्या तुमचे निवांत. आम्ही थांबतो." असे म्हणत भुकेलेल्या पोटांनी हात वाळवत ताटावर बसून अक्षरशः ताटकळत राहतात. ही स्थिती आपल्या घरी आलेल्या एखाद्या अतिथी / अभ्यागतावर येणे हे यजमान म्हणून माझ्यासाठी तरी दुःखदायक असते.
त्यात महालक्ष्म्या आणि इतर महत्वाच्या कुळाचारांच्या साठीच्या स्वयंपाकात पुरणपोळीचा बेत असेल, यजमान असा मालगुजारी / सरंजामी थाटाचा असेल आणि वाढणार्या स्त्रियांमधली एकजरी गृहिणी फक्त "माझा नवरा आणि मुलगा" एवढ्याच ताटांकडे लक्ष देणारी व पंक्तिप्रपंच करणारी असेल तर मात्र पंक्तितल्या इतर अभ्यागतांवर अगदी अनवस्था प्रसंग गुदरतो आणि यजमानाला ओशाळवाणे व्हायला होते. पंगत पूर्ण होण्याचा कालावधी वाढतो तो निराळाच. या ओशाळवाण्या प्रसंगांचा दोनतीन वेळा अनुभव घेतल्यामुळे मी अधिकारवाणीने बोलतोय.
म्हणून "तव्यावरून पानात" ही संकल्पना कितीही गोड वगैरे असली तरी ती खाजगीत, एकास एक राबवण्याची पध्दत आहे. "एक किंवा दोन पुरेत" ही एकेकाळी कुटुंबनियोजनाच्या जाहिरातीची टॅगलाईन होती. ती टॅगलाईन "तव्यावरून पानात" या संकल्पनेसाठीही लागू पडते, ५ - १० लोकांच्या पंक्तिसाठी लागू पडत नाही हे माझे अनेक शोचनीय अनुभवांती बनलेले मत आहे.
श्रीक्षेत्र गाणगापूरला एकदा तिथल्या क्षेत्रोपाध्यांकडे प्रसाद भोजन करण्याचा योग आला होता. नेमके त्यादिवशी त्या उपाध्यांचा मंदिरातल्या प्रत्यक्षात गुरूमूर्तीच्या प्रसादसेवेचा दिवस होता. त्यादिवशी त्यांनी तिथल्या प्रथेविषयी जे सांगितले ते प्रत्येक गृहस्थाश्रमी माणसाने काळजावर कोरून ठेवण्यासारखे आहे.
ते म्हणालेत, " गुरूमहाराजांना पंक्तिप्रपंच अजिबात चालत नाही. गुरूमहाराजांच्या नैवेद्याच्या ताटात जितके पदार्थ असतील तितके सगळे पदार्थ, अगदी मीठ, लिंबू, कोशिंबिरींसकट, सगळ्या अतिथी / अभ्यागतांना वाढल्या जायला हवेत हा स्वतः गुरूमहाराजांचा दंडक आहे. त्यात चूक झालेली गुरूमहाराजांना चालत नाही."
आपणही या गोष्टीचा सूक्ष्मातून विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण भोजनाचे निमंत्रण देऊन आपल्या घरी आणलेला अभ्यागत असो किंवा तिथी न कळवता (पूर्वसूचना न देता) अचानक भोजनासाठी आलेला अतिथी असो, यांच्यासाठी पंक्तिप्रपंच टाळता येणे आपल्यासाठी कठीण असले तरी अशक्य नक्कीच नाही.
मग ही "तव्यातून पानात" संकल्पना कितीही आकर्षक वाटत असली तरी ती खाजगीत आचरण करून सार्वजनिक जीवनात याबाबतीत चांगले दंडक पाळण्याचा आपण निश्चय करून, अतिथी अभ्यागतांना तृप्त करून पाठवणे हे आपल्याला सहज शक्य आहे.
- "तव्यावरून पानात" या व्यर्थ अट्टाहासात फजित पावलेला एक यजमान आणि पंक्तिप्रपंचाचे अनेक कटू अनुभव आलेला एक अभ्यागत, राम.

Thursday, May 12, 2022

सलूनची भिती बसविणारे हत्यार.

आमच्या बालपणी अनेक लहान मुलांच्या मनात सलूनची भिती बसविण्याचे काम या एका हत्याराने केलेले आहे.



आज ब-याच कंपन्यांनी electronic trimmer वगैरे आणलेत त्यामुळे एखादा स्मार्ट "वेदांत" किंवा "ऋग्वेद" किंवा "मिहीर" आपल्या तितक्याच स्मार्ट बाबांसोबत सलोन (सलून नाही हं) मधे छान हसत हसत जाताना पाहून आम्हाला आमच्या बालपणाचे रडके दिवस आठवलेत.
केस वाढविणे म्हणजे एक गुन्हा अशी आमच्या जन्मदात्यांची समजूत त्याकाळी होती. त्यामुळे कटिंग करायला गेल्यावर "बारीक" हा एकच शब्द उच्चारून आमची डोई सलूनवाल्याच्या हातात सोपविली जाई. (तो दंडक आम्ही अजूनही पाळतोय.)
मग थोडावेळ कानामागे कैची चालवल्याचा आवाज येत असे आणि नंतर मग हे मशीन केसांवर चालत असे. दरवेळी डोईवरचे ५ - ५० केस याच्या कचाट्यात येऊन ओढले जात. मग होणार्या वेदनांमुळे रडारड. काहीकाही आक्रस्ताळ्या कार्ट्यांची रडारड खूप वेळ सुरू राही. किंवा पुढल्या वेळी सलूनमध्ये दाखल होताक्षणी सुरू होत असे.
- छोट्या छोट्या मुलांच्या डोळ्यातून एकेकाळी एखादी नदी वाहेल इतके पाणी वाहवणारे हे हत्यार आता इतिहासजमा झाले याचा अपार आनंद होणारा, कायम कमी केस राखणारा, राम. 

Tuesday, May 10, 2022

व्रतवैकल्ये आणि मनुष्यमात्रांचा पिंड

 अनेक सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींतूनही आपला पिंड घडत जातो असे म्हणतात. जीवन जगण्याचे अनेक आदर्श डोळ्यांसमोर असतात. त्यांच्यातल्या काही गुणांचा समुच्चय आपल्यात व्हावा असे आपल्याला वाटत असते. तसेच जीवनात काही काही अनुभव असेही येतात की "नको बाबा आपण असे बनायला." असे वाटून तसा मनाचा निश्चय पक्का होत जातो.


बालपणापासूनच अतिशय धार्मिक वातावरणाचे संस्कार झालेत. आमचे आईवडील, दोघेही, अतिशय धार्मिक, व्रतवैकल्ये करणारे. नित्यनेम करणारे. पापभिरू. त्यामुळे माझाही पिंड साहजिकच तसा घडला. हाॅस्टेलला असूनही हाॅस्टेलच्या खोलीत रोज संध्यावंदन करणारा, पोथीपुराणे वाचणारा आणि यथामिलीत उपचारद्रव्यैः रोज आर्ती वगैरे करणारा म्हणून मी प्रसिध्द होतो.

अंतिम वर्षात असताना आम्ही पुलं चं "तुझे आहे तुजपाशी" करायला घेतलं होतं. अगदी बालपणापासून पुल हे दैवत आणि "तुझे आहे तुजपाशी" हे त्यांच संपूर्णतः स्वतंत्र नाटक. (कुठल्याही परदेशी किंवा देशी नाट्यकृतीवर न बेतलेले म्हणून 'स्वतंत्र') त्या नाटकात, आमच्या तत्कालीन किडकिडीत शरीरयष्टीमुळे की काय, मला "आचार्य" ही भूमिका मिळाला. नाटकातला मुख्य Ante Hero.

नाटकाच्या तालमीत मी त्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात जितका पडलो त्याहूनही अधिक पुलंनी "काकाजी" या मुख्य व्यक्तिरेखेच्या व्यक्तिचित्रणात जे तत्वज्ञान ओतले होते त्याच्या प्रेमात पडलो. आपले अध्यात्म, आपली व्रतवैकल्ये ही आपल्यापुरते असावीत. आपल्यासोबत वावरणार्‍या कुटुंबियांना, समाजाला ती त्रासदायक ठरू नयेत याची काळजी आपण घेतली पाहिजे असा आमचा पिंड त्यावेळी घडला. अर्थात बालपणापासून अत्यंत धार्मिक वातावरणात वाढलेलो असल्याने आणि अनेक अध्यात्मिक अनुभव प्रत्यक्षात घेतले असल्याने पुलंप्रमाणे नास्तिकतेकडे मी वळलो नाही, व्रतवैकल्ये सुटली नाहीत पण व्रतवैकल्यांमधला अट्टाहास कमी झाला. उपवासातली कट्टरता कमी झाली. अपवादात्मक परिस्थितीत एखादा नियम मोडला तर मनाला लागणारी बोचणी कमी झाली. अशी थोडीथोडकी नाहीत २८ वर्षे गेलीत.

पण आताशा लक्षात यायला लागले की आपद्धर्म हा शाश्वतधर्मात बदलतो आहे. कुणाचेही मन दुखावू नये म्हणून आपण कुणाच्याही घरी केव्हाही खाणेपिणे करतोय त्याचा शारिरीक आणि मानसिकही त्रास आपल्याला होतोय. थोडं सुक्ष्मात जाऊन स्वतःचा विचार केला तेव्हा कळले की याला कारण आपणच आहोत. आपणच थोडे निग्रही झाले पाहिजे. कुणालाही त्रास होता कामा नये हे जरी खरे असले तरी आपल्या व्रतवैकल्यांचा इतर जगाला त्रासच होत असेल ही आपली भावनाही बरोबर नाही. आपण जसे इतरांच्या भावनांचा विचार करतो तसाच इतरांनीही आपण करीत असलेल्या व्रतांचा मान ठेवला पाहिजे ही अपेक्षा अनाठायी नाही. शेपुटतुटक्या कोल्ह्यांच्या कोलाहलात शेपूट शाबूत असलेल्या कोल्ह्याने बहिरेपणा स्वीकारून प्रवाहपतित होणे नाकारणेच इष्ट होय.

या गुढीपाडव्यापासून काही शुभसंकल्पांना सुरूवात केलीय. त्यातला महत्वाचा संकल्प आणि व्रत म्हणजे परान्न वर्ज्य.

परीक्षा बघावी तशी परान्न भक्षणाचे प्रसंग समोर येत गेलेत आणि व्रतस्थ भावनेने आणि निर्धाराने ते नाकारले गेलेत. त्याबद्दल टीकाही सहन केली. पण परान्न वर्ज्य केल्याने आपल्या अंतरात आणि शरीरात होत जाणारे सूक्ष्म बदल अनुभवता आले हा आनंद खूप मोठा होता. तसेही कुठल्याही बदलाचा अनुभव घेण्यासाठी ती कृती सतत ४० दिवस करून बघायला हवी हे आपले आधुनिक विज्ञान सांगते. (आपल्या पुराणांनी हेच माप सव्वा महिना सांगितले होते. म्हणजे जवळपास ४० दिवसच की.)

मग जाणवले की ही व्रत वैकल्ये तुमच्या पिंडाला घडवतातच आणि तुमचा निर्धारही वाढवितात. एकप्रकारचे character building च ही व्रते वैकल्ये करत असतात. अगदी आद्य काळापासून, कुठलाही गाजावाजा, जाहिरात न करता अनेक समाजघटकांना घडविण्याचे काम यांनी केलेले आहे.

स्वतःविषयी, आपल्या संस्कृतीच्या उद्देशांविषयीच्या अनेक "युरेका' क्षणांपैकीचा हा एक क्षण. ज्ञानाचा, समाधानाचा, तृप्ततेचा.

- आयुष्याच्या पन्नाशीनंतरच्या या टप्प्यात आपल्या संस्कृतीत वर्णन केलेली अधिकाधिक व्रते आचरणात आणून त्यांचा अनुभव घेऊ इच्छिणारा, व्रतस्थ राम

Sunday, May 8, 2022

झाडे, पाने, फुले, फळे आणि सावली

 परवा आमच्या सौभाग्यवती माझ्या मेव्हणीशी बोलत होत्या. बोलता बोलता त्या आमच्या गॅलरीत गेल्यात. घरासमोर तीनचार झाडांची घनगर्द सावली आहे. अनेक पक्षांचा किलबिलाट तिथे दिवसभर अविरत सुरू असतो. माझ्या मेव्हणीला फोनवरूनच तो किलबिलाट खूप भावला. "ताई, हा किलबिलाट किती छान वाटतोय गं ! किती छान पाॅझिटिव्ह वाटत होतं" अशी दादही तिने दिली.


रोज आम्हाला पहाटे पहाटे त्यांच्यापैकीच एका पक्षाच्या अतिशय सुमधूर आणि लयबध्द गाण्याने येते आणि आमची खरोखरच सुप्रभात होते हे आमचे अहोभाग्यच.


आई गेल्यानंतर श्री. किशोरजी (Kishor Paunikar) समाचारासाठी घरापर्यंत आलेले होते. ते पण म्हणाले होते की ही झाडे नुसती सावलीच देत नाहीत तर ती स्वतःमध्येच एक परिपूर्ण इकोसिस्टीम असतात. अनेक पक्षांना आधार असतात, अनेकांची घरटी एकतर त्यांच्यात असतात किंवा घरटी बांधण्यासाठी उपयुक्त साहित्य ही झाडे पुरवितात.


आमच्याही घरासमोर अशीच चार मोठी झाडे आहेत. आम्हाला ती सुंदर सावली देतात. यांच्या सावलीमुळे गेली ५ वर्षे खालच्या मजल्यावर भर उन्हाळ्यातही छान थंडावा असतो. कूलर लावावा लागत नाही. त्यातली दोन झाडे तर फुले, फळे काहीही देत नाहीत. फक्त सावली देतात. ही झाडे लावताना आपण कुठल्या विचाराने ही झाडे लावलीत ? असा स्वार्थी विचार मनात येतोही पण त्यांचे असे उपकार स्मरले की मनातला हा संभ्रम नाहीसा होतो.


जुन्याकाळी एकत्र कुटुंबांमध्ये अशी फुले फळे न देणारी माणसे असायचीत. एखादा ब्रम्हचारी किंवा मुलेबाळे नसलेला विधूर काका, मामा, आत्येभाऊ, मामेभाऊ, चुलतभाऊ. एखादी बालविधवा असलेली, मुलेबाळे नसलेली आत्या, मामी वगैरे. आजच्या व्यावहारिक जगात ही सगळी फुले फळे नसलेली झाडेच. पण तत्कालीन एकत्र कुटुंबात त्यांचा सांभाळ व्हायचा. त्यांच्या अन्न पाण्याची, औषधांची, कपड्यालत्त्यांची यजमान कुटुंबाच्या आहे त्या परिस्थितीत पूर्तता व्हायची. त्या झाडांचीही त्याहून अधिक अपेक्षा नसे. घरात पडेल ते काम करणार्‍या आणि आपली उपयुक्तता या ना त्या मार्गाने पटवून देण्याची कमाल कोशिस करणार्‍या ह्या व्यक्ती. त्यांच्या घरातील उपयुक्ततेपेक्षा त्यांची सावली घराला हवीहवीशी असायची. मग घरातलं कर्तेधर्ते कुणी वडीलधारे देवाघरी गेलेत तर ह्याच व्यक्ती घरादारावर आपली शीतल छाया धरायच्यात. आपण फळाफुलांनी उपयुक्त ठरू शकत नाही याची खंत यांना कायम मनात बोचत असेलही पण त्याची कमतरता या आपल्या स्नेहपूर्ण वागणुकींनी आणि घरात सगळ्यांवरच  निरपेक्ष अकृत्रिम प्रेम करून भरून काढू पहायच्यात.


कालचक्रात ही झाडे हळुहळू वठायचीत आणि एकेदिवशी कालवश व्हायचीत. आपल्यामागे एखाद्या कापडी पिशवीत असलेली एखादी धोतरजोडी (एकदोन पातळे), एखादा अडकित्ता, एखादी पानाची, काथचुन्याची डबी एव्हढाच स्थावर जंगम ऐवज ही मंडळी सोडून जायचीत तरीही कुठलासा भाचा, पुतण्या यांचे दिवसवार करायचेत. "जिजीमावशी काय वाती करायची ? एकसारख्या आणि सुंदर." किंवा "सुधाच्या हातच्या शेवया म्हणजे काय विचारता ? केसांसारख्या बारीक आणि लांबसडक तरी किती ?" "विलासकाकाला किती आर्त्या पाठ असायच्यात ना ! तो गेला आणि तशी मंत्रपुष्पांजली कुणीही म्हणत नाही." अशा आठवणी यांच्यामागे कायम निघत रहायच्यात. खर्‍या श्राध्द कर्मापेक्षा आपल्यामागे असा आपला गौरव झालेला पाहूनच यांच्या आत्म्यांना समाधान लाभत असावे, मुक्ती मिळत असावी. शेवटी श्राध्द म्हणजेही श्रध्देने केलेली आठवणच की नाही ?


आज मुळातच एकत्र कुटुंबे दुर्लभ झालीत. त्यात अशा व्यक्तींना कोण सांभाळणार ? आज झाडे लावतानाच "आजोबांनी लावलेल्या आंब्याची फळे नातू खाईल." यावर आपला विश्वास नाही. आम्ही लावलेल्या आंब्याला पुढल्या ५ - ७ वर्षात फळे लागली पाहिजेत हा आपला अट्टाहास. अशात दूरचा काका, दूरची आत्या हिला कोण विचारतो ? 


फळे देणार्‍या झाडांचीच आपण निगा राखतोय, त्यांनाच खतपाणी देतोय. पण अशा फळे फुले नसलेल्या झाडांचा सावली देऊन आपल्या जीवनात थंडावा देण्याचा गुण आपण पारच दुर्लक्षित करतोय का ?


- सगळ्या फळे फुले देणार्‍या आणि क्वचित नुसतीच सावली देणार्‍या समस्त जीवसृष्टीविषयी कृतज्ञ असलेला मनुष्यमात्र, राम प्रकाश किन्हीकर.

Thursday, May 5, 2022

स्मशानवैराग्य

तीर्थरूप आईच्या पार्थिव देहाचे अवशेष जलसमर्पण झाले. पंचमहाभूतांपैकी बाकी चौघांना तो देह आधीच समर्पित झाला होता.

आपली भारतीय संस्कृती ही फार उदात्त तत्वांनी आणि विचारपूर्वक विकसित झालेली आहे. पंचमहाभूतांपासून बनलेला हा देह पंचमहाभूतातच विलीन होताना पाहून स्वतःच्या मूळ स्वरूपाची जाणीव पुन्हा जागृत होते. संसाराच्या रगाड्यात या मूळ स्वरूपाच्या जाणीवेवर अहंकाराची, देहाभिमानाची जी राख जमलेली असते ती या जळजळीत वास्तवाने झटकली जाते.
भरपूर पैसे कमावले, स्वतःसाठी खूप आलिशान घरे बांधलीत तरीही
"दौलत अजमत महल खजाना,
सबही थाट रह जाएगा"
असेच होते.
आणि इतर अनेक जिवांनी वापरलेल्या ३ फूट x ४ फूट आकाराच्या अंतिम विश्रामस्थळावरच आपल्या देहाचा अंतिम पत्ता असणार हे निश्चित होत जाते तसे मन परमतत्वाच्या जवळिकेच्या जाणिवेने आश्वस्त होत जाते. महादेव शंकरांचा वास म्हणूनच स्मशानात असावा. सर्व चर आणि अचर सृष्टीचाच विलय ज्यांच्या ठायी होणार आहे असे देवांचे देव, महादेव त्या स्मशानातच वास करून आपण सगळ्या जिवांना महादेवांच्या शाश्वततेची आणि समस्त सृष्टीच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव अखंड करून देत असतात.
मृत देहाला चितेवरच्या अग्नीचे चटके जाणवतही नसतील पण तिथल्या संवेदनशील मनांना ही आत्माभिमानाची, देहाच्या शाश्वत असण्याची वृथा राख झाडली गेल्याने आत्म्याचे जे स्फुल्लिंग चेतल्या जाते त्याचे चटके नक्कीच जाणवतात.
यालाच स्मशानवैराग्य म्हणत असावेत. हे स्मशानवैराग्य फार काळ टिकत नाही असेही जाणकार सांगत असतात. एकदा संसाराच्या मोहात, रोजच्या रामरगाड्यात माणूस रमला की तो हे सगळे विसरतोच. बरोबरच आहे. मनुष्यमात्रांनी हे स्मशानवैराग्य विसरायलाही हवे. त्याशिवाय जगाचे रहाटगाडगे चालणारच नाही. निवृत्त मनाची वाटचाल प्रवृत्ती कडे करायलाच हवी तरच जगात मनुष्य कार्यप्रवण राहील.
पण जगात वावरताना सतत इतर कार्यात गुंतल्यासारखे दाखवून मनात हे वैराग्याचे स्फुल्लिंग जागृत ठेवणार्या आणि इतर कशाचीही नसली तरी देहाच्या क्षणभंगुरत्वाची खात्री असणार्या आणि तसे वर्तन करणार्या व्यक्तींनाच संतत्व प्राप्त होत असावे, नाही ?
समर्थांनी तर लिहूनच ठेवलेय,
"मरणाचे स्मरण असावे
हरीभक्तीस सादर व्हावे."
- वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर २५ वर्षांनी आईच्याही देवाघरी जाण्यामुळे या जगात खर्या अर्थाने पोरका झालेला राम.