Sunday, May 28, 2023

साध्या सरळ (जगाच्या दृष्टीने अव्यावहारिक) असलेल्या माणसांना होणारे लाभ.





श्रीकृष्णशिष्टाई अयशस्वी ठरल्यानंतर यादवांच्या पाठिंब्यासाठी अर्जुन आणि दुर्योधन दोघेही एकाच वेळी श्रीकृष्णाच्या महाली पोहोचलेत. भगवान त्यांच्या मंचकी निद्राधीन होते. निद्रा कसली ? केवळ या दोघांची परीक्षा बघायची म्हणून भगवंत निद्रेचे नाटक करीत होते. महालातल्या सेवकाने दोघांनाही शयनकक्षापर्यंत नेले आणि तिथे बसून भगवंत जागे होण्याची वाट बघत बसण्यास सांगितले. दुर्योधन मनात चरफ़डला. हस्तिनापूरच्या युवराजाला असे वाट वगैरे बघत बसणे मंजूर नव्हतेच मुळी. पण करतो काय ? यादवांचा पाठिंबा मिळाला असता तर भावी महाभारत युद्धाचे पारडे त्याच्या बाजूने झुकले असते. अर्जुन मात्र आपल्या निकट मित्राचा सहवास लाभतोय म्हणून मनातून आनंदित झाला होता. ज्याच्या सगळ्याच लीला माधुर्याने भरलेल्या आहेत, त्याचे "शयनम मधुरम" असलेच पाहिजे. तो झोपला असतानाही मोठा गोड दिसत असलाच पाहिजे.


श्रीकृष्णाच्या शायिकेशेजारी दोन आसने होती. दुर्योधनाने उशाकडील आसन निवडले. पायाकडल्या आसनावर बसायला तो सामान्य नागरिक थोडाच होता ? तो अत्यंत हुशार, युद्धनिपुण असा हस्तिनापूरचा युवराज होता, भावी सम्राट होता. अर्जुन मात्र पायाकडे बसला आणि मनातल्या मनात आपल्या मित्राचे, त्याच्या असंख्य लीलांचे, त्याने पांडवांवर केलेल्या उपकारांचे स्मरण करू लागला. वारंवार त्याचे नेत्र डबाबून येऊ लागलेत.


भगवंतांनी आपली लीलारूपी निद्रा आवरती घेतली. डोळे उघडताच त्यांना पायापाशी बसलेल्या आपल्या आतेभावाचे, आपल्या परम मित्राचे, भक्ताचे दर्शन झाले. 


"मित्रा, पार्था, कधी आलास रे ? मला उठवले का नाही ?" त्यांनी हर्षभराने विचारले.


दुर्योधनाने थोडे खाकरून स्वतःकडे भगवंताचे लक्ष वेधून घेतले. 


"मी सुद्धा आलोय म्हटलं. म्हणाल तर या अर्जुनापेक्षा अंमळ काही पळ आधीच." 


भगवंताला स्वतःच्या स्वार्थासाठी भेटायला आलेल्या दुर्योधनाची आढ्यता भगवंताच्या दर्शनानेही जात नव्हती.


"अरे वा ! सुयोधन महाराज, आपण स्वतः ? काय काम काढलंत ?" भगवंत उदगारलेत.


"कृष्णा, आता युद्ध तर अटळ आहे हे तू ही जाणतोस. याप्रसंगी यादवांचा आम्हाला पाठिंबा असावा ही कांक्षा घेऊन मी आलोय." दुर्योधनातला राजनितिज्ञ पटकन म्हणाला.


"अरेरे ! सुयोधन महाराज. आपण येण्यापूर्वीच ’या युद्धात मी शस्त्र हाती घेणार नाही’ अशी प्रतिज्ञा करून बसलोय. काय करायचे शस्त्र हाती घेऊन ? दोन्हीही नाजूने आपलेच भाऊबंद लढतायत. म्हणून मी अशी प्रतिज्ञा केलेली आहे. आता काय करायचे ?"


अर्जुन आणि दुर्योधन दोघांच्याही सचिंत मुद्रा बघून भगवंत म्हणाले.


"मी जरी शस्त्र हाती घेणार नसलो तरी माझी नारायणी सेना मात्र या युद्धात लढेल. बोला कुणाला हवीय ती सेना आपल्या बाजूने लढायला ?"


"भगवंता मी इथे काही पळ आधी आलोय. निर्णयाचा अधिकार मला पहिल्यांदा मिळायला हवाय." दुर्योधनातला व्यावहारिक पुरूष भगवंताचे अस्तित्व विसरून सर्वसामान्य माणसाशी चर्चा करताना बोलल्यासारखे अधिरतेने म्हणाला.


"ठीक आहे, सुयोधना. नितीप्रमाणे तुझा अधिकार पहिला आहे. तू माग." भगवंत हसून म्हणाले.


"कृष्णा, मला तुझी सगळी सेना हवी." दुर्योधन हव्यासाने उदगारला.


"तथास्तू" भगवान उदगारले.


"आणि मित्रा, अर्जुना, तुला काय हवेय ?" भगवंतांनी अर्जुनाला थोडे थट्टेतच विचारले.


"भगवंता, मला तूच पाहिजेस." अर्जुन सदगदित कंठाने उत्तरता झाला.


"अरे, पण मी युद्धात शस्त्र हातात घेणार नाही ही माझी प्रतिज्ञा तू ऐकलीयस ना ?" भगवंत स्मित करीत अर्जुनाकडे बघत म्हणालेत.


"भगवंता, फ़क्त तू आमच्या बाजूने अस. बाकी आम्हाला काही नकोय." अर्जुनाचा कंठ भरून आला. 


बाजूला उभा असलेला दुर्योधन मात्र मनातल्या मनात अर्जुनाच्या या अव्यावहारिक मागणीला हसत होता. इतकी मोठी नारायणी सेना एकीकडे आणि निःशस्त्र भगवान एकीकडे. त्याच्या व्यावहारिक दृष्टीने युद्धाचा निकाल लागल्यातच जमा होता. अर्जुन आणि इतर पांडव केवळ भावनेच्या भरात जाऊन, श्रीकृष्णाशी आपले नाते जपायचे म्हणून त्याला सोबत घेत आहेत याविषयी त्याला शंका नव्हती.


त्यानंतरचा इतिहास आपणा सर्वांना माहिती आहेच. ही गोष्ट इथे आठवण्याचे कारण म्हणजे काल मी साध्या सरळ स्वभावाच्या माणसांविषयी लिहीलेला हा लेख. भगवंत अशा माणसांच्या कायम पाठीराखा असतोच. अशी माणसे, त्यांचे साधे सरळपण तोच जपत असतो. जगाच्या दृष्टीने असा माणूस अव्यावहारिक, मूर्ख असू शकेल पण भगवंत जवळ असल्याचे अत्त्युच्च दर्जाचे समाधान केवळ अशी व्यक्तीच अनुभवू शकते. इतरांकडे जगाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सगळ्या गोष्टी कदाचित असतीलही पण खरे सुख काय असते ? हे अशी साधी सरळ व्यक्तीच अनुभवू शकते. जीवनातल्या इतर सगळ्या लढाया ही व्यक्ती कदाचित हरत असेलही पण जीवन नावाच्या युद्धात भगवंत त्याला हरू देत नाही. अंतिम विजय त्या व्यक्तीचाच होतो.


ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर म्हणतात, "भगवंताचा ’समाधान’ म्हणून एक दागिना आहे. तो दागिना त्याच्या ख-या भक्तांनाच तो देतो. इतरांना तो लौकिक धन, सुखे, संपत्ती आदि देतो."


- प्रभातचिंतन, वैभवीराम प्रकाश किन्हीकर (280523) 


Saturday, May 27, 2023

साधी, मनमोकळी माणसे

 मनमोकळ्या, साध्या स्वभावाच्या, अंतरात डावपेच नसलेल्या व्यक्तीला चार प्रकारची माणसे भेटतात.


१. या प्रकारच्या माणसांचा ही समोरची व्यक्ती इतकी साधी सरळ आहे यावर विश्वासच बसत नाही. त्यात त्या प्रकारच्या माणसांचा दोष नसतो. त्यांना आजवरच्या आयुष्यात वरवर साधेपणाचा आव आणून अंतिमतः गंडवणार्या व्यक्तीच भेटलेल्या असतात. त्यामुळे या प्रकारच्या व्यक्ती या साध्या सरळ व्यक्तीकडे थोड्या संशयाने आणि बर्याचशा अविश्वासानेच बघत असतात.


२. या दुस-या प्रकारच्या व्यक्तींना समोरची व्यक्ती साधी सरळ आहे याचा विश्वास पटलेला असतो. तिच्या साधेपणाचा त्या व्यक्तीला किती फायदा होतोय हे ही त्यांनी अनुभवलेले असते. क्वचित एकेकाळी या दुसर्या प्रकारच्या व्यक्तीही तशा साध्यासरळ असतात आणि कालांतराने त्यांना तसेच साधे सरळ, मनमोकळे जगणे जगरहाटीचा भाग म्हणून जगण्यासाठी मनाविरूध्द सोडून द्यावे लागलेले असते. अशा प्रकारच्या व्यक्ती त्या साध्या सरळ व्यक्तीविषयी थोडी असूयाच बाळगून असतात. काही व्यक्ती तर ती साधी व्यक्ती त्याचा साधेपणा टाकून जगरहाटीप्रमाणे आपल्या गटात कशी सामील होईल याचे चिंतन व कृती करायला सुरूवातही करतात.


३. या तिस-या  प्रकारच्या व्यक्तींनाही त्या साध्या सरळ व्यक्तीच्या तसे असण्याबाबत खात्री असते. याच्या स्वभावाचा फायदा घेऊन याला कसे गंडवता येईल ? या खटाटोपात या गटातील व्यक्ती असतात. तसे गंडवता आले तर "साधे सरळपणा असणे म्हणजे कसा मूर्खपणा आहे हे जगासमोर सिध्द करायला या तिसर्या गटातील व्यक्ती एकदम तयार असतात. आणि ती व्यक्ती यांच्या गंडवण्याला फसली नाही तर "अरे तो दिसतो तेवढा साधा वगैरे नाही बरं का. चांगला बनेल आहे." वगैरे लेबल्स लावायला हीच मंडळी हिरीरीने आघाडीवर असतात.


४. या गटातल्या माणसांनाही त्या व्यक्तीच्या साधे सरळ पणाबद्दल खात्री असते. क्वचित या गटातल्या मंडळींनीही तसे साधे सरळ वागण्याचा एकेकाळी प्रयत्न केलेला असतो. त्यात ते काही काळ यशस्वी / अयशस्वी झालेले असतात. पण ही समोरची व्यक्ती मात्र या त्याच्या साधेपणाचे आयुष्य जगण्यात यशस्वीच झाली पाहिजे असे त्यांना वाटत असते आणि त्यादृष्टीने ते त्या व्यक्तीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदतही करीत असतात.


कुठल्या प्रकारची व्यक्ती किती परसेंटेज ने जीवनात याव्यात हे मात्र त्या साध्या सरळ व्यक्तीचे नशीब आणि थोड्याफ़ार प्रमाणात कर्म ठरवते.


- As you write more and more personal, it becomes more and more universal या आंग्ल उक्तीवर विश्वास ठेवणारा, एक साधा सरळ, मनमोकळा जीव, वैभवीराम प्रकाश किन्हीकर. (चिंतन 27/05/’23)


Wednesday, May 24, 2023

फ़जिता. कधीही फ़जित न पावलेला एक टिपीकल मराठी बेत.

आजकाल आंब्याच्या रसासोबत "फजिता" उर्फ पाण्यातला रस होत नाही का ? विदर्भात तरी आमच्या बालपणी ही प्रथा होती.

४० - ५० माणसांच्या पंक्तीला आमरसाचा बेत असल्यावर आंबे माचवायला आणि रस काढायला बसलेली मंडळी रस काढून झाल्यावर आंब्याच्या कोयी आणि सालं शेजारच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात टाकत असत. मग कोयींना, सालींना लागलेला आमरस त्या भांड्यातल्या पाण्यात मिसळल्यावर त्याचा पातळसर, अगोड आमरस तयार होत असे. फ्रुटी, माझा वगैरे पेय आमच्या आयुष्यात फार उशीरा आलीत त्यापूर्वी तत्सम "फजिता" च आला.
काही कुटुंबांमध्ये याला तूप जिर्याची फोडणीही दिली जात असे. त्यात चवीपुरते मीठही घातले जात असे.
पुरवठ्याला यावा म्हणून केला गेलेला हा पदार्थ बर्याचदा इतका फक्कड जमून जात असे की पंक्तीत मूळ आमरसापेक्षा या "फजित्या"चीच मागणी जास्त रहात असे.
त्याकाळी आमरस केलेल्या मोठ्ठ्या पातेल्यात मुद्दाम एखादी आंब्याची कोय तशीच ठेवली जाई. मोठ्या वाढण्याने वाढताना ज्याच्या वाटीत ती कोय आली त्याच्या घरी सगळ्या पंक्तीसाठी त्या उन्हाळ्यातला पुढला आमरसाचा बेत होणार हा एक टिपीकल वैदर्भी मालगुजारी मनोवृत्तीचा अलिखित संकेत असे. अशा पंक्तींमध्ये अर्धा पुरूष उंचीच्या आणि तेवढ्याच रूंदीच्या मोठाल्या गंजांमध्ये आमरस केल्या जात असे आणि पंक्तीत वाढण्यासाठी तो बादल्या बादल्यांमध्ये भरून आणला जात असे. साधारण तीस एक वर्षांपूर्वी मी अशा पंक्तीत जेवलेलो आहे.
आज तशा ताटापाटावरच्या पंक्तीही नाहीत, ४० - ५० माणसांना पुरेल असा आमरस करणेही नाही आणि तो फजिताही नाही.
बाय द वे, गुजराती किंवा राजस्थानी थाळी हाॅटेल्समध्ये मिळणारा आमरस म्हणजे भोपळ्यासारख्या स्वतःची चव नसलेल्या पदार्थाच्या रसात आंब्याची चव व साखर घातलेला रस असतो हा माझा चांदा ते बांदा अनुभव आहे.
- मिक्सरमधून काढून सपक, गिळगिळीत केलेल्या आमरसापेक्षा आमरसातल्या गुठळ्या गुठळ्या अती आवडीने खाणारा, आमरस खायला चमच्यापेक्षा उजव्या हाताची चारही बोटे वापरून ओरपून खाणारा अस्सल देशी वाणाचा आणि हल्ली विस्मृतीत गेलेला फजिता मनापासून आवडणारा, एकेकाळचा मालगुजार (आमचे पणजोबा अकोला {सध्या वाशिम} जिल्ह्यातल्या कारंजा (लाड) जवळील किन्हीराजा गावचे वतनदार होते म्हटलं. काय समजलेत ?) वैभवीराम प्रकाश किन्हीकर.