विदर्भातल्या काहीकाही फ़लाटांना मात्र वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व आहेत. शेगावचा फ़लाट धार्मिक आहे. संतश्रेष्ठ श्रीगजानन महाराजांच्या पावन पदस्पर्शानेही असेल, पण इथे उतरणा-या प्रत्येकाच्या डोळ्यात एक उत्सुकता आणि आशा असते आणि इथून चढणा-यांच्या डोळ्यांतील तृप्तता आणि धन्यता वाचता येते.
अकोल्याचा फ़लाट हा नागर संस्कृतीत जायला उत्सुक असलेल्या सुशिक्षित अनागर तरूणासारखा भासतो. तर मूर्तिजापूर म्हणजे संत गाडगेबाबांसारखाच भोळा, सरळ पण रोखठोक वाटतो. ’ज्ञानेश्वरी’, ’आझाद हिंद’ ’गीतांजली’ सारख्या सुपर एक्सप्रेस गाड्या तिथे थांबत नाहीत पण त्याचं त्याला सुखदुःख नसतं. न थांबणा-या गाड्यांविषयीची नैसर्गिक असूया इथल्या फ़लाटांमध्ये अजिबात नाही.
बडनेरा स्टेशन मात्र ख-या अमरावतीकरांसारखं आतिथ्यशील आणि अघळपघळ. कधीही "क्या बडे! उतर जा ना! जा ना कल सुबे!" अशी मैत्रीपूर्ण साद देइल असं वाटत.
धामणगावचा फ़लाट हा माझा मित्रच आहे. नोकरीनिमित्त एक वर्षासाठी तेथे असताना रोज त्याची भेट व्हायचीच. रात्री फ़लाटावरच जमवलेला आम्हा नाट्यकर्मींचा गप्पांचा फ़ड आमच्या नाट्यविषयक जाणिवा फ़ार समृध्द करून जायचा. नाटकाचा रंगमंचीय प्रयोग सादर होण्यापूर्वी त्यावर करून पाहण्याच्या निरनिराळ्या ’प्रयोगां’ची संहिता याच फ़लाटावर तयार झालेली आहे.
वर्धा स्टेशन मात्र जुन्या गांधीवाद्याप्रमाणे तत्वनिष्ठ वाटतं. ३१ जानेवारी १९४८ ला गांधीजी प्रदीर्घ मुक्कामासाठी वर्धेला येणार होते हा फ़लाटावरचा उल्लेख वाचला की मन गलबलून येतं. पण त्या फ़लाटावरचा सर्वोदयी साहित्याशेजारचा फ़िल्मी मासिकांचा स्टॊल विचित्र वाटतो. तसा फ़िल्मी मासिकांचा स्टॊल फ़लाटाला निषिध्द नाही, पण ’स्टारडस्ट’,’फ़िल्मफ़ेअर’ हे नेमके ’महर्षी अरविंदकी वचनें’ च्या मांडीला मांडी लावून बसलेली बघायला अस्वस्थ होतं खरं.
यवतमाळ ला रेल्वे येते हे आता खुद्द यवतमाळवासियांच्या स्मृतीतून नाहीसे झालेले आहे. आता भरपूर उपलब्ध असलेल्या एसटी बसेसमधून भर्रकन दारव्हा, कारंजा , मूर्तिजापूरला जाता येत असताना त्या शकुंतला "एक्सप्रेस"ची वाट पाहून कोण डुगडुगत जाईल ? आता वर्धा - नांदेड या नव्या मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर यवतमाळ बायपास वर शहराच्या बाहेर यवतमाळचे नवे रेल्वेस्थानक आकार घेते आहे. आणि हे काम पूर्ण होईस्तोवर यवतमाळ शहरात असलेले जुने रेल्वेस्थानक सगळ्यांच्या विस्मृतीत नक्की जाणार.
यवतमाळ वरून अकोल्याला रस्तामार्गे जाताना दारव्हा, मोतीबाग, कारंजा, कारंजा टाऊन वगैरे नॅरो गेज वरील स्टेशन्स आता केवीलवाणी वाटतात. पण विदर्भाच्या एकेकाळी समृद्ध कापूसपट्ट्यातल्या या भागातल्या एस टी चे थोडेसे भाडेही न भरू शकणा-या गोरगरीब शेतक-यांसाठी, शेतमजुरांसाठी, कष्टक-यांसाठी ही शकुंतला एक्सप्रेस एकेकाळी प्रवासाचे एकमेव साधन होती.
या मार्गावर स्वातंत्र्यापूर्वी दारव्हा मोतीबाग हे एक जंक्शन होते. इथून दारव्हा - पुसद हा नॅरो गेज रेल्वे मार्ग होता. दुस-या महायुद्धात राजस्थानातील पोखरण वरून "डी" या आद्याक्षराच्या कुठल्या तरी स्टेशनापर्यंत जाणारा "डी - पी" रेल्वेमार्ग उखडा ही सूचना रेल्वेविभागाला प्राप्त झाली आणि "डी - पी" म्हणजे दारव्हा - पुसद असे समजून हा नॅरो गेज रेल्वेमार्ग दुस-या महायुद्धापूर्वी उखाडला गेला अशी वंदता आहे. आजही दारव्ह्यावरून पुसदला रस्ता मार्गे जाताना या जुन्या रेल्वेमार्गाचे अवशेष अनेक ठिकाणी भरावाच्या रूपाने आपल्याला दिसतात. खरेतर आज भरावाचे काम झालेले आहे. वर्धा - नांदेड या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाला यवतमाळ ते मूर्तिजापूर हा फ़ाटा ब्रॉडगेजरूपात जोडला जाऊ शकतो. आणि दारव्हा ते पुसद मार्गावर असलेल्या भरावावर पुन्हा ब्रॉडगेज मार्गाचे काम करून हा मार्ग शेंबाळपिंप्री - हिंगोली असा अकोला - पूर्णा या सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वेमार्गाला जोडल्या जाऊ शकतो. ब्रिटिशांची चूक आपण भारतीय सुधारू शकतो.
बाकी विदर्भातल्या सगळ्या दुर्लक्षित रेल्वे मार्गांचे नाव "शकुंतला" च का असावे ? हा मला पडलेला फ़ार जुना प्रश्न आहे. माजरी - वणी - पिंपळखुटी या एकेकाळी असलेल्या दुर्लक्षित मार्गाचे नाव "शकुंतला", यवतमाळ - मूर्तिजापूर हा मार्ग पण शकुंतला आणि अचलपूर - मूर्तिजापूर पण शकुंतलाच. दुष्यंताने झिडकारलेल्या शकुंतलेसारखी अवस्था भारतीय रेल्वेने या रेल्वेमार्गांना झिडकारून केलेली आहे म्हणून शकुंतलेच्या नशिबी जशी उपेक्षा आली तशी या मार्गांच्या नशीबी आलीय की काय ? असे वाटून जाते. पण शकुंतलेच्या पोटी जन्मलेल्या भरताने अपार पराक्रम केला आणि आपल्या मातेला पुनश्च सन्मान प्राप्त करून दिला तसा एखादा भूमिपुत्र या मातीत उपजावा आणि विदर्भाची रेल्वेबाबत उपेक्षा संपवावी याची ही भूमी खूप वर्षांपासून वाट बघते आहे.
त्यातल्या त्यात माजरी - वणी - पिंपळखुटी मार्गाचे भाग्य उजळले म्हणायचे. हा मार्ग पिंपळखुटी - आदिलाबाद - मुदखेड मार्गे हैदराबादशी, नांदेडशी जोडला गेलाय. पण हे भाग्य अजूनही अकोला - अकोट - वान रोड - तुकईथड - खांडवा मार्गाला लाभलेले नाही. वन खात्याच्या नसलेल्या तरतुदी काढून विदर्भाचा विकास होऊ नये असे वाटणा-या, पर्यावरणाचे खोटे उमाळे येणा-या, विदर्भद्वेषी, जुन्या नाकर्त्या राज्यकर्त्यांनी हा मार्ग उगाचच अडवून धरलेला होता. आता महाराष्ट्रात आलेल्या नव्या सरकारकडून या मार्गाला योग्य ही गती मिळण्याची अपेक्षा आहे.
परवा माहूरवरून शेगावला जाताना रस्त्यात वाशिम स्टेशन लागले. पण वैदर्भिय असूनही त्याने मला फ़ारशी ओळख दाखविली नाही. "आपण बरे की आपले काम बरे". "ना कुणाच्या अध्यात ना मध्यात" अशा खाक्याच्या मराठवाड्यातल्या एखाद्या तरूणाने विदर्भात नोकरीनिमित्ताने स्थायिक व्हावे आणि अलिप्तपणाने रहावे असा तो वाशिमचा फ़लाट मला अलिप्त वाटला.
आणखी असाच एक अलिप्त वाटलेला फ़लाट म्हणजे चंद्रपूरचा "चांदा फ़ोर्ट" स्टेशनचा फ़लाट. वास्तविक माझा जन्म चंद्रपूरचा, बालपणी शाळांच्या सुटीत, महिनोनमहिने आमचा मुक्काम आजोळी, चंद्रपूरला असायचा. पण चंद्रपूर मुख्य रेल्वे स्थानकाच्या फ़लाटाइतकी आपुलकी या फ़लाटाने मला कधीच दाखविली नाही. बंगाल - नागपूर रेल्वे (सध्याचे दक्षिण - पूर्व रेल्वे) नॅरो गेज मधून ब्रॉड गेज मध्ये गेल्यावर देखील हे स्टेशन चंद्रपूर शहरात आपले स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व दाखवतच राहिले. मुख्य धारेशी जुळवून घेण्याचे नाकारतच राहिले. याचे व्यक्तित्व विदर्भातल्या शहरांमध्ये राहूनही छत्तीसगढ, बिहार, ओरिसा इथल्या आपल्या मूळस्थानांशी जोडलेले राहून विदर्भातल्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे नाकारणा-या छत्तीसगढी मजुरासारखेच हे चांदा फ़ोर्ट स्टेशन मला वाटत राहिले.
भंडारा रोड (वरठी) स्टेशन हे तसे मुख्य रेल्वे मार्गावर आहे खरे पण इथून कुणी रेल्वेमार्गाने नागपूरला जात असेल असे मला वाटत नाही. भंडारा शहरातून या स्टेशनवर पोहोचून तिकीट काढून गाडी येण्याची वाट बघेपर्यंत रस्तामार्गे आपण नागपूरला पोहोचलेलो असतो. हो पण दूरवर हावडा, मुंबई किंवा पुण्याला वगैरे जायचे असेल तर मात्र या स्टेशनशिवाय पर्याय नाही. आपण स्लो गाडीत असलो आणि गाडी या स्टेशनवर थांबली की फ़ारसे कुणी पॅसेंजर न चढणा-या, उतरणा-या या स्टेशनचा राग येतो आणि आपण सुपरफ़ास्ट गाडीत असलो की या स्टेशनची कीव येते. मनुष्यस्वभाव, दुसरे काय ?
- विदर्भातल्या रेल्वे मार्गांविषयी कळकळ बाळगणारा रेल्वेप्रेमी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.