Tuesday, September 23, 2025

भांडण देवाशी

कधी कधी देवाशी भांडावं पण लागतं. आपल्याला काही मिळालं नाही म्हणून नाही, आपल्या क्षमतेच्या बाहेर आपल्याला काही मिळावं म्हणूनही नाही. देवाचे देवपण, त्याच्या देवपणातली शक्ती या गोष्टींचा त्या देवालाच कधी विसर पडलाय का ? हे त्याला बजावून सांगण्यासाठी. 


"एखाद्या दुस-या भक्ताच्या अशा भांडण्याने, दुरावण्याने मला काही फ़रक पडत नाही" अशी त्या देवाची मनोवृत्ती झालेली आहे का ? हे पडताळून बघण्यासाठी सुद्धा.


एकीकडे माणूस देवत्वाकडे वाटचाल करीत असताना देवाने मात्र असे माणसांचे गुणधर्म आत्मसात करायला सुरूवात केलीय का ? याचा जाब त्याला विचारायला नको ? उद्या देवाने असेच माणसासारखे वागायचे ठरवले तर माणूस देवत्वाकडे वाटचाल कशाला करील ? जशी मनुष्याला देवाची गरज आहे तशी त्यालाही ख-या भक्तांची गरज आहेच ना ?


मला श्रीगुरूचरित्रातला पहिला अध्याय आठवतो आणि त्यातली त्या भक्ताने भगवंताला केलेली आळवणी आठवते. 


दिलियावांचोनि । न देववे म्हणोनि ।

असेल तुझे मनी । सांग मज ॥३॥

 

समस्त महीतळी । तुम्हा दिल्हे बळी ।

त्याते हो पाताळी । बैसविले ॥४॥

 

सुवर्णाची लंका । तुवा दिल्ही एका ।

तेणे पूर्वी लंका । कवणा दिल्ही ॥५॥

 

अढळ ध्रुवासी । दिल्हे ह्रषीकेशी ।

त्याने हो तुम्हासी । काय दिल्हे ॥६॥

 

सृष्टीचा पोषक । तूचि देव एक ।

तूते मी मशक । काय देऊ ॥८॥


घेऊनिया देता । नाम नाही दाता ।

दयानिधि म्हणता । बोल दिसे ॥१३॥

 

सेवा घेवोनिया । देणे हे सामान्य ।

नाम नसे जाण । दातृत्वासी ॥१६॥


आणि मग अगदी तशाच आविर्भावात विठ्ठलाशी भांडणारे आमचे नामदेव महाराजही आठवतात


घेसी तेव्हा देसी देवा,ऐसा असशी उदारा l

काय जाऊनियां तुझे कृपणाचे नाचे द्वारा ll 


नामा म्हणे देवा तुझे न लगे मज काही l

प्रेम असो द्यावे कीर्तनाचे ठायी ll 


म्हणून देवाशी असे मधेमधे भांडण उकरून काढायला हवे. मला वाटतं त्याशिवाय त्यालाही मजा येत नसावी. किंवा त्याची भक्ती आपल्या मनात किती खोलवर रूजलेली आहे याची पडताळणी तो असे भांडणाचे प्रसंग आणून आपल्या मनातला त्याच्या भक्तीचा खुंटा हलवून बळकट करत असावा.


- देवांशी, सदगुरूंशी कायम आत्मनिवेदन भक्तीत रहात असल्याने त्यांच्याशी भांडणारा एक भोळा भक्त, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment