Showing posts with label संत नामदेव महाराज. Show all posts
Showing posts with label संत नामदेव महाराज. Show all posts

Tuesday, September 23, 2025

भांडण देवाशी

कधी कधी देवाशी भांडावं पण लागतं. आपल्याला काही मिळालं नाही म्हणून नाही, आपल्या क्षमतेच्या बाहेर आपल्याला काही मिळावं म्हणूनही नाही. देवाचे देवपण, त्याच्या देवपणातली शक्ती या गोष्टींचा त्या देवालाच कधी विसर पडलाय का ? हे त्याला बजावून सांगण्यासाठी. 


"एखाद्या दुस-या भक्ताच्या अशा भांडण्याने, दुरावण्याने मला काही फ़रक पडत नाही" अशी त्या देवाची मनोवृत्ती झालेली आहे का ? हे पडताळून बघण्यासाठी सुद्धा.


एकीकडे माणूस देवत्वाकडे वाटचाल करीत असताना देवाने मात्र असे माणसांचे गुणधर्म आत्मसात करायला सुरूवात केलीय का ? याचा जाब त्याला विचारायला नको ? उद्या देवाने असेच माणसासारखे वागायचे ठरवले तर माणूस देवत्वाकडे वाटचाल कशाला करील ? जशी मनुष्याला देवाची गरज आहे तशी त्यालाही ख-या भक्तांची गरज आहेच ना ?


मला श्रीगुरूचरित्रातला पहिला अध्याय आठवतो आणि त्यातली त्या भक्ताने भगवंताला केलेली आळवणी आठवते. 


दिलियावांचोनि । न देववे म्हणोनि ।

असेल तुझे मनी । सांग मज ॥३॥

 

समस्त महीतळी । तुम्हा दिल्हे बळी ।

त्याते हो पाताळी । बैसविले ॥४॥

 

सुवर्णाची लंका । तुवा दिल्ही एका ।

तेणे पूर्वी लंका । कवणा दिल्ही ॥५॥

 

अढळ ध्रुवासी । दिल्हे ह्रषीकेशी ।

त्याने हो तुम्हासी । काय दिल्हे ॥६॥

 

सृष्टीचा पोषक । तूचि देव एक ।

तूते मी मशक । काय देऊ ॥८॥


घेऊनिया देता । नाम नाही दाता ।

दयानिधि म्हणता । बोल दिसे ॥१३॥

 

सेवा घेवोनिया । देणे हे सामान्य ।

नाम नसे जाण । दातृत्वासी ॥१६॥


आणि मग अगदी तशाच आविर्भावात विठ्ठलाशी भांडणारे आमचे नामदेव महाराजही आठवतात


घेसी तेव्हा देसी देवा,ऐसा असशी उदारा l

काय जाऊनियां तुझे कृपणाचे नाचे द्वारा ll 


नामा म्हणे देवा तुझे न लगे मज काही l

प्रेम असो द्यावे कीर्तनाचे ठायी ll 


म्हणून देवाशी असे मधेमधे भांडण उकरून काढायला हवे. मला वाटतं त्याशिवाय त्यालाही मजा येत नसावी. किंवा त्याची भक्ती आपल्या मनात किती खोलवर रूजलेली आहे याची पडताळणी तो असे भांडणाचे प्रसंग आणून आपल्या मनातला त्याच्या भक्तीचा खुंटा हलवून बळकट करत असावा.


- देवांशी, सदगुरूंशी कायम आत्मनिवेदन भक्तीत रहात असल्याने त्यांच्याशी भांडणारा एक भोळा भक्त, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Sunday, January 14, 2018

श्री तुकोबांची गाथा -३




शुक सनकादिकी उभारिला बाहो , परिक्षिती लाहो दिसा साता II
उठाउठी करी स्मरणाचा धावा,  धरवत देवा नाही धीर  II
त्वरा झाली गरूड टाकियला मागे,  द्रौपदीच्या लागे नारायणे II
तुका म्हणे करी बहुच तातडी , प्रेमाची आवडी लोभा फ़ार II

जगात अध्यात्ममार्गाचे अत्यंत अधिकारी पुरूष शुकमुनी, सनत्कुमार आदिंनी बाहू परमेश्वराकडे पसरून त्याच्या कृपेची याचना केली,  प्रार्थना केली आणि त्यांच्य़ा मनीचा प्रेमभाव पाहून तो त्यांना प्रसन्न झाला. त्यांना तो मिळाला. परिक्षिती राजाने शुकमुनींकडून केवळ सात दिवस शुध्द आणि प्रेमळ मनाने श्रीमदभागवतकथा श्रवण केली आणि त्याला तो भगवंत सात दिवसातच प्राप्त झाला. त्याला जन्ममरणाचे शुद्ध आत्मज्ञान सात दिवसातच प्राप्त झाले आणि तो मुक्त झाला. नामदेव महाराजांनी "विठ्ठल आवडी प्रेमभावो" जे  लिहीलेले आहे त्याचे प्रत्यंतर देणारी ही उदाहरणे.

भगवंत हा भक्तहृदयातल्या ख-या भावाचा भुकेला असतो. त्याला इतर उपचारांची गरज फ़ारशी भासत नाही. आणि त्या सर्वेश्वराला आपला पैसा, संपत्ती आदि आपण काय देणार ?  "काय मागावे परी म्या ? आणि तू ही कैसे काय द्यावे ? तूच देणारा जिथे अन, तूच घेणारा स्वभावे."  ही भक्ताची भावना आहे. ही भावना या कलियुगात दुर्मिळ झालेली आहे आणि भगवंत तर त्याचाच भुकेलेला आहे. 

श्री तुकाराम महाराज म्हणतात की द्रौपदीच्या आर्त हाकेला उत्तर देताना भगवंत एव्हढे उतावीळ झाले की गरूड वाहनावरून तिच्या हाकेला जाण्याच्या वेळापेक्षा ते स्वतःच तडक तिथे रवाना झालेत. गरूडाच्या वेगालाही त्यांनी भक्तहाकेसाठी मागे टाकले. भगवंत हा भक्तहृदयीच्या अंतरीचा भावाचा फ़ार लोभी आहे. त्याला आपले खरे प्रेम दिले तर आपण त्याच्यासाठी एक पाऊल टाकले तर तो हजार पावले धावत येतो हा भक्ताचा अनुभव आहे. आणि आपला अनुभव असा आहे की या युगात आपण सगळ्या भौतिक गोष्टी परमेश्वराला अर्पण करू पण शुद्ध मन त्याला अर्पण करणे ही दुर्मीळ गोष्ट आहे.


निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
जय तुकोबा माऊली.
प्रा. राम प्रकाश किन्हीकर  (१४०१२०१८)