दरवर्षी १ जानेवारी आली की अनेक लोकांच्या मनाला एक नवी उभारी मिळते. वर्षभर मनात घोळत असलेल्या अनेक चांगल्या गोष्टी १ जानेवारी पासून करण्याचे संकल्प सुटतात. मला वाटतं १ जानेवारी ला जागतिक संकल्प दिवस म्हणूनच घोषित करायला हवे. पुढल्या काळात जर मानवी समूहाच्या मनातील चांगुलपणा, मनाचा आदर्शवादीपणा वगैरे मोजण्याचे यंत्र आलेच आणि त्याने आपण मोजमाप केलेच तर १ जानेवारीला हा चांगुलपणाचा, आदर्शवादीपणाचा सामूहिक इंडेक्स वर्षभरातला सर्वात जास्त निघेल.
पण १ जानेवारी ला जर जागतिक संकल्प दिवस म्हणून घोषित केले तर मग लगेच २ जानेवारीला किंवा साकल्याने (फ़ार दिवसांनी हा शब्द माझ्या लेखनात वापरला.) तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्याला जागतिक संकल्प मोडता दिवस किंवा सप्ताह घोषित करावा लागेल. १ जानेवारी चे संकल्प २ जानेवारीला किंवा फ़ार फ़ार तर आठवडाभरात मोडीत निघतात. त्या मोडलेल्या संकल्पांची घरी, मित्रमंडळींच्या कंपूमध्ये चेष्टा सुद्धा होते. "छे ! छे ! आता यानंतर जीवनात कधीही कुठलाही संकल्प सोडणार नाही बुवा / बाई मी." असा नवीन संकल्प जन्म घेतो. पण अर्थात हा सुद्धा संकल्प फ़ार फ़ार तर ११ महिने टिकतो. त्याच वर्षी डिसेंबर आला की नववर्षाच्या वेधांबरोबरच नवीन संकल्पांचे वेध लागतात. पुन्हा पुढच्या वर्षीच्या १ जानेवारी ला नवीन संकल्प केले जातात.
मला हे संकल्प मोडण्याच्या प्रक्रियेपेक्षाही दरवर्षी संकल्प मोडूनही १ जानेवारी ला नवीन उत्साहाने संकल्प घेण्याच्या जिद्दीचे खूप कौतुक वाटते. अर्थात असेही वाटून जाते की गेल्यावर्षी आपला छान संकल्प का मोडला गेला ? याचेही विवेचन मनात होत असेल तर किती चांगले. "Never be afraid of being slow in movement, be alert of getting stalled at one place." असे कुणातरी विचारवंताचे मत आहेच ना. म्हणजे संकल्प मोडला गेला या दुःखापेक्षा "पुढल्या वर्षी किंवा यानंतर जीवनात अजिबात संकल्पच करायला नको" ही मनंस्थिती होणे हे जास्त दुःखदायक आहे. आपला अतिशय उत्तम, अत्यंत चांगल्या हेतूने, आत्मकल्याणाच्या, क्वचित जगाच्या कल्याणाच्या हेतूने घेतलेला संकल्प मोडला. ठीक आहे. तो का मोडला ? याचे विवेचन मनात झाले आणि तो न मोडण्यासाठी आता नेमके काय करायला हवे ? याचे आराखडे मनात तयार केलेत की झालेच की काम. संकल्प पूर्णत्वाइतकेच आपण जीवनाकडून घेतलेले हे शिक्षण महत्वाचे आहे. पडत, अडखळत पुढे जाण्याला महत्व आहे. पडलो तरी पुन्हा उठून मार्ग चालण्याची जिद्द आपण गमावता कामा नये हे मनुष्यमात्रांनी तरी लक्षात ठेवण्यासारखे आहे. जगाचा इतिहास हा अशाच धडपड्या व्यक्तींचा इतिहास आहे.
जरा थोडा विचार केल्यानंतर "आपण अगदी अशक्य संकल्प केला होता का ? हा संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी लागणारे शारिरीक आणि मानसिक बळ आपल्यात होते का ? नव्हते तर ते बळ आपण पुढल्यावेळी त्याच संकल्पपूर्तीसाठी कसे मिळवू शकू ? आपण हा संकल्प गाठायला टप्प्याटप्प्यांचे नियोजन करायचे का ? की पुढल्या ५ वर्षात हा संकल्प पूर्णत्वाला नेऊ शकू ?" असे विचार मनाने करायला हवे आणि खचून न जाता त्यावर कृती करायला हवी.
त्याचबरोबर आपण केलेला संकल्प हा सहजसाध्य होता, अगदी आपल्या शक्तीबाहेरचा वगैरे नव्हता मग तरीही केवळ आपल्या आळसामुळे, अनकष्टीपणामुळे तो मोडला गेला असेल तर तसे कठोर आत्मपरिक्षण सुद्धा व्हायला हवे आणि त्यातून शिकून असा आळस कसा टाळता येईल ? यावर मनातल्या मनात विचारमंथन झाले तर ती सुद्धा उपलब्धीच आहे की. त्यानुसार पुढल्या वेळी कृती घडावी हीच आपली आपल्याकडून अपेक्षा.
आपल्या लक्षात येईल की संकल्प घेण्याची, तो मोडण्याची कुणीही कितीही चेष्टामस्करी केली तरी घेतलेला संकल्प पूर्णत्वाला गेला तरीही आणि तो मोडून पडल्यानंतर तो संकल्प का मोडला ? याचे ज्ञान आपल्याला मिळाले तरीही आपला, आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास आहे आणि म्हणून विजय आहे. फ़क्त आत्मपरिक्षण प्रांजळ आणि प्रामाणिक व्हायला हवे आणि आत्मपरिक्षणानंतर स्वतःमधल्या त्रुटी सुधारण्याचे मनोमन प्रयत्न व्हायला हवेत.
मग करणार ना आपला यावर्षीचा संकल्प पूर्ण ?
- या सगळ्या संकल्प घेण्या - मोडण्याच्या चक्रातून मधून बरीच वर्षे गेलेलो असल्याने आणि काहीकाही अशक्य संकल्प (सलग ११ वर्षे रोज रात्री रोजनिशी लिहीणे, रो्जच्या खर्चाचा ताळमेळ लिहीणे आणि गेली ४३ वर्षे केलेल्या सर्व प्रवासांचा सर्व प्रकारचा अगदी बारीक सारीक तपशील लिहीणे) पूर्णत्वाला जाताना मिळवलेल्या धन्यतेचा अनुभव घेतल्याने आज ह्या लिखाणरूपी उपदेशाचा अधिकारी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
२ जानेवारी २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६
No comments:
Post a Comment