Showing posts with label New Year Resolutions. Show all posts
Showing posts with label New Year Resolutions. Show all posts

Sunday, June 14, 2026

स्वतःवरील एका प्रयोगाविषयी

यावर्षी जानेवारी महिन्याच्या लिखाणात नवीन वर्षात करायचे संकल्प आणि प्रेरणा याविषयी मी सविस्तर लेखन केले होते. जेम्स क्लियर च्या ॲटोमिक हॅबिटस या पुस्तकात दिल्याप्रमाणे आपण आपल्या स्वतःमध्येच रोज जर फ़क्त १ % ची भर घातली तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व किती उन्नत होईल याविषयी विवेचन केलेले होते. आदर्शवाद बाळगून आपण जर रोज अशी भर आपल्या व्यक्तिमत्वात घालत गेलोत तर. पण रोजच्या कामाच्या धबडग्यात आणि मनुष्य मात्रांना प्राप्त झालेल्या आळस, क्रोध, मत्सर इत्यादि षडरिपुंचा सामना करत करत आपण किती निष्ठेने हा आदर्शवाद सांभाळू शकतो ? याविषयी शंका सुद्धा उपस्थित केलेली होती. आणि नुसती शंकाच नाही तर त्यावर मात करून किती सकारात्मक विचाराने पुढे जावे याचेही मार्गदर्शन मी या लेखात केलेले होते.


पण मनात विचार आला की नुसता उपदेश कशाला ? आपणच या सकारात्मकतेने स्वतः आधी जगून बघूयात. आणि सुरूवात झाली आपलाच उपदेश जगून बघण्याची.


एका एक्सेल शीटवर तारखा लिहील्यात. रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण दिवसभराचा आढावा घ्यायचा. संपूर्ण दिवसभरात जर आपण आपल्या वागण्यात, मनोवृत्तीत, जगण्यात कालपेक्षा आज काही प्रगती केली असेल तर त्या दिवसाला तो जेम्स क्लियरचा फ़ॉर्म्युला वापरून आपले मूल्यांकन करायचे. 1.01x. 


आणि जर कालपेक्षा आज आपली काहीच प्रगती झालेली नसेल किंबहुना थोडी अधोगतीही झाली असेल, आपण कुठेतरी चिडलो, रागावलो असू, अकारण वाद केलेला असेल, कुणाला काही लागेल असे बोललो असेल तर आपल्याला त्या जेम्स क्लियरच्या फ़ॉर्म्युलाप्रमाणेच 0.99‌x . स्वतःशी अत्यंत प्रामाणिक राहून हे मूल्यमापन करायचे. आदर्श जगणे हे सगळ्यांनाच शक्य नसते तरीही त्या मार्गावरचा प्रवास सर्वथा टाळायचा नसतो, या शहाणपणाच्या विचाराने मी हा प्रयोग सुरू केला.




आज जवळपास अर्धे वर्ष उलटत आलेले आहे. मी थोडा संख्याशास्त्रामध्ये रमणारा माणूस असल्याने आज मी सहज गेल्या १६४ दिवसांमध्ये मी जेम्स क्लियर ने सुचवलेल्या आदर्श मार्गावर जर चाललो असतो तर आज कुठे असतो आणि रोजच्या माझ्या मूल्यमापनानंतर आज कुठे आहे ? याचा तौलनिक अभ्यास केला. तसे ग्राफ़्स काढलेत.



मग लक्षात आले की आदर्शवादाला अगदी चिकटून आपण जरी प्रगती करू शकलो नाही आणि कभी खुशी, कभी गम अशा रोजच्या वास्तविक जीवनात आपण जगलोत तरी आपला फ़ारसा तोटा झालेला नाही. अगदी उणे बाजूला तो ग्राफ़ गेलेला नाही. उलट आदर्शापेक्षा थोडी कमी का होईना, आपली प्रगतीच झालेली आहे. आणि आता तो ग्राफ़ पण अगदी एक्स्पोनेन्शियल पद्धतीने वर वर जातोय. यात गेल्या १६४ दिवसांमध्ये एखाद्या दिवशी अगदी आदर्श जीवन जगता आले नाही तरी उद्या तसे जगण्याचा आपला आग्रह मुख्यतः कारणीभूत आहे असे लक्षात आले. एखाद्या वाईट दिवसाच्या अनुभवानंतर चांगल्या दिवसाची वाट बघणेच आपण विसरायला नको हा अट्टाहास, हा सकारात्मक दृष्टीकोन कारणीभूत आहे हे लक्षात आले.


मग रहायचे असे सकारात्मक ? उद्यापासून आपल्या वर्षात बरोबर २०१ दिवस राहिलेत. आजवर १६४ दिवसांमध्ये जे झाले नाही ते उरलेल्या २०१ दिवसांमध्ये करायचा संकल्प करायचा ? मध्ये मध्ये अडथळे येतील, अगदी आदर्श जीवन एखाद्या दिवशी जगू शकणार नाही हे सुद्धा खरे. अशावेळी आपणच आपल्याला माफ़ करीत उद्याचा दिवस तरी आजच्यापेक्षा छान जाईल या दुर्दम्य आशावादाने जगले पाहिजे. जगता आले पाहिजे. हीच खरी जीवनातली प्रगती.


प्रगती म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी आदर्शवत असणे नव्हे तर अनेकदा आदर्शांमध्ये अडथळे येऊनही त्यावर मात करू शकतो, आज नाही तर उद्या आदर्श जगू शकतो ही आशावादी मनोवृत्ती सतत बाळगणे.


काय म्हणताय या माझ्या प्रयोगाविषयी ?


- विनोबांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या जीवनावर अनेक प्रगतीशील, आशावादी प्रयोग करून बघणारा धडपड्या आणि आनंदी मनुक्ष, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


Friday, January 2, 2026

नववर्षाचा संकल्प: घडणारी आणि बिघडणारी एक मज्जा

दरवर्षी १ जानेवारी आली की अनेक लोकांच्या मनाला एक नवी उभारी मिळते. वर्षभर मनात घोळत असलेल्या अनेक चांगल्या गोष्टी १ जानेवारी पासून करण्याचे संकल्प सुटतात. मला वाटतं १ जानेवारी ला जागतिक संकल्प दिवस म्हणूनच घोषित करायला हवे. पुढल्या काळात जर मानवी समूहाच्या मनातील चांगुलपणा, मनाचा आदर्शवादीपणा वगैरे मोजण्याचे यंत्र आलेच आणि त्याने आपण मोजमाप केलेच तर १ जानेवारीला हा चांगुलपणाचा, आदर्शवादीपणाचा सामूहिक इंडेक्स वर्षभरातला सर्वात जास्त निघेल.


पण १ जानेवारी ला जर जागतिक संकल्प दिवस म्हणून घोषित केले तर मग लगेच २ जानेवारीला किंवा साकल्याने (फ़ार दिवसांनी हा शब्द माझ्या लेखनात वापरला.) तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्याला जागतिक संकल्प मोडता दिवस किंवा सप्ताह घोषित करावा लागेल. १ जानेवारी चे संकल्प २ जानेवारीला किंवा फ़ार फ़ार तर आठवडाभरात मोडीत निघतात. त्या मोडलेल्या संकल्पांची घरी, मित्रमंडळींच्या कंपूमध्ये चेष्टा सुद्धा होते. "छे ! छे ! आता यानंतर जीवनात कधीही कुठलाही संकल्प सोडणार नाही बुवा / बाई मी." असा नवीन संकल्प जन्म घेतो. पण अर्थात हा सुद्धा संकल्प फ़ार फ़ार तर ११ महिने टिकतो. त्याच वर्षी डिसेंबर आला की नववर्षाच्या वेधांबरोबरच नवीन संकल्पांचे वेध लागतात. पुन्हा पुढच्या वर्षीच्या १ जानेवारी ला नवीन संकल्प केले जातात.


मला हे संकल्प मोडण्याच्या प्रक्रियेपेक्षाही दरवर्षी संकल्प मोडूनही १ जानेवारी ला नवीन उत्साहाने संकल्प घेण्याच्या जिद्दीचे खूप कौतुक वाटते. अर्थात असेही वाटून जाते की गेल्यावर्षी आपला छान संकल्प का मोडला गेला ? याचेही विवेचन मनात होत असेल तर किती चांगले. "Never be afraid of being slow in movement, be alert of getting stalled at one place."  असे कुणातरी विचारवंताचे मत आहेच ना. म्हणजे संकल्प मोडला गेला या दुःखापेक्षा "पुढल्या वर्षी किंवा यानंतर जीवनात अजिबात संकल्पच करायला नको" ही मनंस्थिती होणे हे जास्त दुःखदायक आहे. आपला अतिशय उत्तम, अत्यंत चांगल्या हेतूने, आत्मकल्याणाच्या, क्वचित जगाच्या कल्याणाच्या हेतूने घेतलेला संकल्प मोडला. ठीक आहे. तो का मोडला ? याचे विवेचन मनात झाले आणि तो न मोडण्यासाठी आता नेमके काय करायला हवे ? याचे आराखडे मनात तयार केलेत की झालेच की काम. संकल्प पूर्णत्वाइतकेच आपण जीवनाकडून घेतलेले हे शिक्षण महत्वाचे आहे. पडत, अडखळत पुढे जाण्याला महत्व आहे. पडलो तरी पुन्हा उठून मार्ग चालण्याची जिद्द आपण गमावता कामा नये हे मनुष्यमात्रांनी तरी लक्षात ठेवण्यासारखे आहे. जगाचा इतिहास हा अशाच धडपड्या व्यक्तींचा इतिहास आहे.


जरा थोडा विचार केल्यानंतर "आपण अगदी अशक्य संकल्प केला होता का ? हा संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी लागणारे शारिरीक आणि मानसिक बळ आपल्यात होते का ? नव्हते तर ते बळ आपण पुढल्यावेळी त्याच संकल्पपूर्तीसाठी कसे मिळवू शकू ? आपण हा संकल्प गाठायला टप्प्याटप्प्यांचे नियोजन करायचे का ? की पुढल्या ५ वर्षात हा संकल्प पूर्णत्वाला नेऊ शकू ?" असे विचार मनाने करायला हवे आणि खचून न जाता त्यावर कृती करायला हवी.


त्याचबरोबर आपण केलेला संकल्प हा सहजसाध्य होता, अगदी आपल्या शक्तीबाहेरचा वगैरे नव्हता मग तरीही केवळ आपल्या आळसामुळे, अनकष्टीपणामुळे तो मोडला गेला असेल तर तसे कठोर आत्मपरिक्षण सुद्धा व्हायला हवे आणि त्यातून शिकून असा आळस कसा टाळता येईल ? यावर मनातल्या मनात विचारमंथन झाले तर ती सुद्धा उपलब्धीच आहे की. त्यानुसार पुढल्या वेळी कृती घडावी हीच आपली आपल्याकडून अपेक्षा.


आपल्या लक्षात येईल की संकल्प घेण्याची, तो मोडण्याची कुणीही कितीही चेष्टामस्करी केली तरी घेतलेला संकल्प पूर्णत्वाला गेला तरीही आणि तो मोडून पडल्यानंतर तो संकल्प का मोडला ? याचे ज्ञान आपल्याला मिळाले तरीही आपला, आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास आहे आणि म्हणून विजय आहे. फ़क्त आत्मपरिक्षण प्रांजळ आणि प्रामाणिक व्हायला हवे आणि आत्मपरिक्षणानंतर स्वतःमधल्या त्रुटी सुधारण्याचे मनोमन प्रयत्न व्हायला हवेत. 


मग करणार ना आपला यावर्षीचा संकल्प पूर्ण ?


- या सगळ्या संकल्प घेण्या - मोडण्याच्या चक्रातून मधून बरीच वर्षे गेलेलो असल्याने आणि काहीकाही अशक्य संकल्प (सलग ११ वर्षे रोज रात्री रोजनिशी लिहीणे, रो्जच्या खर्चाचा ताळमेळ लिहीणे आणि गेली ४३ वर्षे केलेल्या सर्व प्रवासांचा सर्व प्रकारचा अगदी बारीक सारीक तपशील लिहीणे) पूर्णत्वाला जाताना मिळवलेल्या धन्यतेचा अनुभव घेतल्याने आज ह्या लिखाणरूपी उपदेशाचा अधिकारी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


२ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६ 


Sunday, January 15, 2023

नववर्ष, नवनवे संकल्प आणि गणितातला एक फ़सलेला प्रयोग.

 नववर्ष सुरू झाले की अनेक मंडळी नवनव्या उत्साहाने नवनवे संकल्प करीत असतात. बरीच मंडळी ते संकल्प मस्तपैकी तडीला नेतातही. 1989 मध्ये मी दररोज डायरी लिखाणाचा संकल्प सोडला होता. तो चांगला 12 वर्षे चालला. तसाच रोजचा खर्च लिहून ठेवण्याचा संकल्पही माझी विद्यार्थी दशा होईपर्यंत नियमित टिकवला होता. आम्ही कराड अभियांत्रिकी महाविद्यालयात हॉस्टेलला रहायचोत. वडील दर महिन्याला आपल्या पोटाला चिमटा घेऊन, आई संसारातल्या इतर गरजांमध्ये काटकसर करून पैसे पाठवायचेत. आई वडीलांनी रक्ताचे पाणी करून मिळवलेल्या पैशाचे आपण फ़क्त ट्रस्टी आहोत. त्याचा हिशेब त्यांनी कधीही मागितला नाही तरी आपल्या खर्चावर आपलेच नियंत्रण रहावे हा हेतू या खर्च लिखाणामागे होता. त्यामुळे शिक्षण पूर्ण होऊन चांगली नोकरी लागेपर्यंत हा हिशेब लिखाणाचा संकल्प टिकला.


2014 मध्ये जानेवारीत असाच एक संकल्प मी सोडला होता. तेव्हा मी सांगोला येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य विभागप्रमुख म्हणून कार्यरत होतो. ही जबाबदारी पर्यवेक्षकीय स्वरूपाची होती. महाविद्यालय आणि आमचा विभाग नवीनच अस्तित्वात आल्याने खूप कामांचे नियोजन करणे, आणि त्यांची अंमलबजावणी करणे या स्वरूपाची ही जबाबदारी होती. 2012 पासूनच डायरीची पाने नियोजन आणि त्याची अंमलबजावणी यात गुंतलेली होती. रोज आखलेली सगळीच कामे पूर्णत्वास जातात असे नाहीच. रोज आखलेल्या कामांपैकी कधी 50 % कामे, कधी 100 % कामे तर कधी 0 % सुद्धा कामे व्हायचीत. पण अशा कामांचे सगळे पुनर्नियोजन पुन्हा दुस-या दिवशी  करावेच लागते हे शहाणपण तोपर्यंत आलेले होते. त्यामुळे 0 % कामे झालीत तरी खचून न जाता पुन्हा नवी मांडणी करायची हा निर्धार होता. एकंदर मोठी मौजच होती. जबाबदारी मनापासून एंजॉय करणे सुरू होते.


1 जानेवारी 2014 पासून मी डायरीत रोज नियोजन केलेल्या कामांपैकी किती टक्के कामे झालीत याचा आढावा घ्यायला आणि रोज त्यांची टक्केवारी काढायला सुरूवात केली. सहज चाळा म्हणून एक्सेलमध्ये रोजच्या कामांची टक्केवारी लिहायला सुरूवात केली आणि त्यांची रोज बदलत जाणारी सरासरी रेषा काढायला सुरूवात केली. महिन्यातले जास्तीत जास्त दिवस आपण त्या सरासरी रेषेच्या वर काम करायचे की आपण यशस्वी झालो असा गणिती निष्कर्ष आपण काढू असा माझा प्रयोग होता.


पहिल्या दिवशी उत्साहात आपण नियोजन केलेल्यापैकी 100 % कामे करतोच हा सगळ्यांचाच अनुभव आहे. तशी ती पहिल्या दिवशी झालीही. दुस-या दिवशी काही अनाकलनीय कारणाने नियोजन केलेल्यापैकी 0 % कामे झालीत. सरासरी एकदम 50 % वर आली. मग 2 जानेवारीला सरासरीपेक्षा 1 दिवस वर आणि 1 दिवस खाली अशी कार्यक्षमता आली.


तिस-या दिवशी 80 % कामे पार पाडलीत. मग सरासरी 60 % आली. 2 दिवस सरासरीपेक्षा जास्त आणि 1 दिवस कमी. चौथ्या दिवशी 70 % कामे पार पाडलीत मग 4 दिवसांची सरासरी 62.5 % म्हणजे मग 1 जानेवारी, 3 जानेवारी आणि 4 जानेवारी असे तीन दिवस सरासरीपेक्षा जास्त काम आणि 2 जानेवारी रोजी सरासरीपेक्षा कमी काम असे चित्र झाले.

मी हा उपक्रम जानेवारी 2014 ते एप्रिल 2014 असा चार महिने चालवला. त्यातली गणितीय गंमत लक्षात आल्यानंतर मात्र हा उपक्रम थांबवला. गणितीय गंमत अशी की जितक्या जास्त कार्यक्षमतेने रोज आपण कामे करू तितकी ती सरासरी रेषाही वाढत जाते आणि काही दिवसांपूर्वी एखाद्या दिवसाची सरासरी त्या रेषेवर असेल ती काही दिवसांनी सरासरी रेषा वर गेल्याने सरासरीपेक्षा खाली जाते. 120 दिवसांनंतर 60 दिवस सरासरीपेक्षा जास्त आणि 60 दिवस सरासरीपेक्षा कमी असे चित्र निर्माण झाले. आणि नंतर हिशेब मांडल्यानंतर लक्षात आले की कितीही दिवसांनंतर 50 % दिवस सरासरी रेषेवर आणि उरलेले 50 % सरासरी रेषेखाली हेच चित्र कायम राहणार. रोज अगदी 100 % कामे केलीत तर सरासरी 100 % राहील आणि रोजच्या कामांएव्हढी सरासरी गाठली जाईल. रोज 100 % कामे करणे म्हणजे निव्वळ आदर्श व्यवस्था.

मग त्या निष्कर्षानंतर हा प्रयोग थांबवला. संशोधनातून आपण मांडलेले प्रमेय सिद्ध करण्याचा अट्टाहास नसावा कधीकधी आपला hypothesis सिद्ध झाला नाही तरी alternate hypothesis सिद्ध होतोच हे ज्ञान पी. एच. डी. पूर्वीच मिळाले. हे ही नसे थोडके.

- प्रत्येक फ़सलेल्या प्रयोगांमधून नवनवीन शिकवण घेणारा विद्यार्थी, कुमार राम प्रकाश किन्हीकर, इयत्ता बिगरी. (हे असे कायम शिकत राहिल्याने आपली गणना बिगार भरतीत होत नाही याचा आनंद मानणारा एक चांगला विद्यार्थी.)

Sunday, January 9, 2022

संकल्प, तो घेणे, मोडणे, त्याची पूर्ती : एक सहज प्रक्रिया.

दरवर्षी ३० किंवा ३१ डिसेंबर ही तारीख आली की बहुतांशी संवेदनशील माणसांच्या मनात नववर्षात घेण्याच्या संकल्पांचा विचार सुरू होतो. १ जानेवारीपासून आचरणात आणण्याचे अनेक संकल्प योजिले जातात. 

बरे हे संकल्प तरी काय काय असतात ते बघूयात. 

१. नियमीत व्यायाम करणे, अमूक एक अंतर रोज फ़िरायला जाणे.

२. रोज डायरी लिहून त्यात दिनचर्या लिहीणे.

३. रोजचा खर्च कसोशीने लिहीणे. महिन्याअखेर, वर्षाअखेर त्याचा आढावा घेऊन खर्चात अनावश्यक खर्च ओळखणे आणि त्यावर योग्य ते  उपाय करणे.

४. रोज एखाद्या तरी ग्रंथाचे वाचन करणे

वगैरे वगैरे. काही काही व्यसनी मंडळी ते ते व्यसन सोडण्याचाही संकल्प करतात.

१ जानेवारीला थाटात संकल्पांना सुरूवात होतेही. यातील ब-यापैकी संकल्प पहिल्या आठवड्यातच कोलमडतात. मग निराशा मनी दाटून राहते. "पुढल्या वर्षी संकल्पच नको" अशी मनोधारणा मनात उमळून येते.

काही काही संकल्प मात्र अगदी पूर्वीपासून मनात योजिल्या जातात. आणि ते सुद्धा अगदी अपघाताने. उदाहरणार्थ. आपल्या ऑफ़िसमध्ये काम करणारी एखादी व्यक्ती नोव्हेंबरमध्ये एखाद्या कार्यालयीन चर्चेत सहज बोलून जाते, "आजपर्यंत या वर्षात आपल्या ऑफ़िसमध्ये माझा एकही लेटमार्क झालेला नाही." झालं. मन एकदम उसळी खातं. "पुढल्या वर्षी आपलाही एकही लेटमार्क नको." असा मनातल्या मनात संकल्प घेतल्या जातो. 

बरे, या अगदी निरूपद्रवी संकल्पाला सुरूवात छान होते. २ जानेवारी, ३ जानेवारी आपण अगदी वेळेच्या १५ मिनीटे आधी आपल्या ऑफ़िसमध्ये पोहचतोही. (जशी नवीन सायकल घेतली की पहिल्या दिवशी आपण तिचे स्पोक्ससकट टायर पुसतो. तसेच या नव्या संकल्पाचे लाड होतातही) ४ जानेवारीला आपल्यालाच घरून निघायला फ़क्त ५ मिनीटे उशीर होतो. मध्येच एका ठिकाणी ट्रॅफ़िक जॅम लागतो. आपण ऑफ़िसमध्ये फ़क्त १ मिनीटेच लवकर पोहोचतो. तोपर्यंत रोज पंधरा मिनीटे लवकर पोहोचण्याचा आपला दंडक (फ़क्त मागल्या २ दिवसांचाच हं) ) आपल्याला आज फ़क्त १ मिनीटेच लवकर पोहोचणे हा आपला पराभव वगैरे वाटतो.

५ जानेवारीला मात्र आपल्याला घरून निघायला चक्क दहा मिनीटे उशीर होतो. कालचा अनुभव लक्षात घेऊन आपण मनातल्या मनात गृहीतक मांडतो की आज तर आपल्याला नक्की उशीर होणारच. मग आपला संकल्प आज मोडणारच अशा भितीपोटी आज सुट्टी टाकण्यापर्यंत आपला विचार जातो. सुट्टी घ्यायची की संकल्प मोडू द्यायचा ? या मानसिक व्दंव्दात आपण अडकतो. अशावेळी आपली चिड्चिड होते. एकदा असा संकल्प मोडला तर "संकल्पच नको" अशी नकारात्मक मनोधारणा व्हायला सुरूवात होते. 

हे सगळे मी आज इथे विषद करतोय कारण मी स्वतः या सगळ्या व्दंव्दांमधून बरीच वर्षे गेलेलो आहे. पण त्यातून परमेश्वरी शक्तीने मानसिक शक्ती दिली. त्या व्दंव्दांवर मात करण्याची बुद्धी दिली. आज संकल्प मोडला तर चिडचिड आटोक्यात आणून "संकल्प का मोडला ?" याच्या कारणांचा शोध घेण्याची बुद्धी, स्वतःचे कठोर आत्मपरिक्षण करण्याची शक्ती आणि काहीकाही गोष्टींमध्ये स्वतःला माफ़ करण्याची सोपी युक्ती त्या ईश्वरीसत्तेनेच दिली. अनेक वेळा स्वतःचे संकल्प मोडलेत तरी पुनर्विचार करून नव्या जोमाने ते संकल्प पूर्णत्वास गेलेले मी बघितले आहे. पुलंच्या "तुझे आहे तुजपाशी" त जगण्याचा नवा दृष्टीकोन सापडलेले आचार्य शेवटी काकाजींना म्हणतात ना, की "काकाजी, तुम्ही शांतीचा उपदेश करताय कारण तुम्हाला तो अधिकार आहे. जगण्यातली सगळी मजा अनुभवून तुम्ही ती शांती मिळवली आहे." तसा अनेक संकल्प मोडलेत तरी नव्याने संकल्प करून ते चांगले तप तप भर चालवण्याचा अनुभव असलेला मी सुद्धा या क्षेत्रातल्या उपदेशाचा अधिकारी "काकाजी"च म्हटला पाहिजे.  

आज संकल्प मोडला तर पुढचा मुहूर्त शोधून ठेवूयात. मागचा संकल्प का मोडला ? याचे आत्मपरिक्षण करूयात, झालेल्या चुका दुरूस्त करूयात. आपला संकल्प तर अगदी आपल्या आवाक्याबाहेरचा, क्षमतेबाहेरचा तर नाही ना ? याचाही प्रांजळपणे शोध घेऊयात. आवाक्याबाहेरचा संकल्प असेल तर आपल्या आवाक्यातला संकल्प घेऊयात. आणि हळूहळू आपला आवाकाही विस्तारत नेऊयात. म्हणजे यावर्षीचा संकल्प पुढल्या वर्षी आपल्या खरोखर आवाक्यातही येईल आणि पूर्णत्वासही जाईल.

दरवर्षी एकदाच १ जानेवारी येते पण अशी मनोवृत्ती असलेल्या व्यक्तींसाठी १ जानेवारीनंतर येणारा प्रत्येक नवा मुहूर्त (मग तो १ जानेवारीनंतर येणा-या दुस-या आठवड्यातला सोमवार सुद्धा असू शकतो. १२ जानेवारीचा युवक दिवस असू शकतो, आपला गणराज्य दिवसही असू शकतो, मकर संक्रांत, रथसप्तमी, काहीही असू शकतो. अहो आपल्याला मुहूर्तांना काय कमी असते का कधी ?) नवा संकल्पदिवस ठरेल नाही का ?

- नववर्षींच्या संकल्पांबाबत सरळसाधा उपदेश करण्याचा अधिकार कमावलेला काकाजी, रामूभैय्या नागपूरकर.