Friday, April 17, 2026

पुल ते जे के रोलिंग: आमच्या वाचनाचा एक प्रवास

आमचे घराणे नकलाकारांचे, नाट्य कलावंतांचे, कीर्तनकारांचे. त्यामुळे अगदी बालपणापासूनच नकला, नाट्य, कीर्तन यात मनसोक्त मुशाफ़िरी करायला मिळाली. चित्रपट वेड हे तर किन्हीकर घराण्यातल्या वय वर्षे १५ ते २५ वर्षे वयोगटातल्या सर्व तरूणांचे अगदी व्यवच्छेदक लक्षण (खूप दिवसांनी हा शब्द वापरायला मिळाला.) आहे. आमचे वडील, काका, आत्या इत्यादींच्या चित्रपट वेडावर एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल इतके या सगळ्यांचे चित्रपट वेड गहिरे होते.


माझे वडील हे अत्यंत विचक्षण वाचक होते. बालपणापासूनच त्यांनी आम्हाला अत्यंत चांगल्या वाचनाची गोडी लावली. चांगले साहित्य म्हणजे काय आणि टुकार साहित्य म्हणजे काय ? याची त्यांनी अगदी बालपणापासूनच आम्हाला ओळख करून दिली. बरे माझे वडील शाळेत नोकरी करत असल्याने आमच्या शाळेच्या वाचनालयात आम्हाला मुक्त प्रवेश असायचा आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही अक्षरशः पोत्याने पुस्तके वाचून काढायचोत. इयत्ता ४ थी पर्यंत माझे समग्र पुल, समग्र वपु आणि समग्र द.मा. मिरासदार वाचून झालेले होते. नंतर सुहास शिरवळकर वगैरेंचा नंबर लागला. अर्थात पुल, वपु यांची तीच पुस्तके, त्याच कथा मी नंतर अनेकवेळा वाचल्यात. बालपणी न लागलेले संदर्भ नंतरच्या प्रत्येक वाचनात एक एक करून लागत गेलेत. दरवेळी वाचनात नवा आनंद मिळत गेला. आजही एका तासात मराठीतल्या एखाद्या पुस्तकाची १०० पाने वाचण्याइतका आमचा मराठी वाचनवेग दांडगा आहे. बाकी शाळेतल्या एखाद्या व्रात्य मुलासारखा वाचनाचा वेग "दांडगा" का असतो? हे मला तरी न उलगडलेले कोडे आहे.


पण आमचे इंग्रजी वाचन मात्र फ़ार मर्यादित होते. इंग्रजी फ़र्डे बोलायला किंवा अचूक लिहायला जरी काही अडचण नसली तरी इंग्रजी वाचन मात्र फ़ारसे झाले नाही. गेल्या १०-१२ वर्षांमध्ये इंग्रजी साहित्यातल्या काही अभिजात कलाकृती वाचण्याचा योग आला पण मराठीच्या मानाने आमचे इंग्रजी वाचन तसे अगदी नगण्यच.


चांगल्या इंग्रजी कलाकृतींवरचे हॉलीवुडचे सिनेमे हा तर एक आणखी अगम्य प्रकार आहे. सगळेच हिरो आणि व्हिलन सारखेच दिसत असल्याने आणि ते तोंडातल्या तोंडात इंग्रजीसदृश भाषेत काहीतरी बोलत असल्याने आम्हा तर्खडकरी इंग्रजीवर विसंबून राहणा-यांना हॉलीवुडचे सिनेमे कळायलाच कठीण. गॉडफ़ादर सारखा सार्वकालिक श्रेष्ठ सिनेमा आम्ही गॉडफ़ादर कादंबरी वाचून पूर्ण झाल्यावरच बघितला तेव्हा आम्हाला कळला. आणि त्याचसोबत एकट्या गॉडफ़ादर सिनेमाने आणि त्याचा लेखक मारियो पुझो ने किती बॉलीवुडवाल्यांना आजवर जगवले आहे हे सुद्धा कळले. बरेचसे चांगले हिंदी सिनेमेसुद्धा गॉडफ़ादर मधल्या एका किंवा अनेक दृश्यमालिकांची फ़्रेम टू फ़्रेम कॉपी करूनच मोठे झाल्याचे कळले.


पण गेल्या दोन तीन वर्षात आमचे कन्यारत्न वाचनाकडे वळलेले आहे हे जाणवले. तिचे वाचन मुख्यतः इंग्रजी भाषेतले. आजकालच्या युवकांप्रमाणे तिनेही जे. के. रोलिंगने लिहीलेली हॅरी पॉटर सिरीजमधली सगळी पुस्तके वाचून काढलेली आहेत. इतकेच नव्हे तर तिच्या वैयक्तिक संग्रहात हॅरी पॉटर वर बनलेल्या सिनेमांचे सगळे भागही आहेत. खूप दिवसांपासून ती आग्रह करतेय की बाबा तू हॅरी पॉटर कलेक्शन वाच. पण कधी वेळ अपुरा तर कधी इंग्रजी वाचनाचा अंगभूत कंटाळा यामुळे ते वाचन मागेच पडत गेले.


गेल्या आठवड्यात मात्र ती अगदी खनपटीलाच बसली. बाबा, वाचन नाही झाले तरी तू हॅरी पॉटरवरचे सिनेमे नक्की बघू शकतोस. ते तरी बघ. मग तिचे मन राखायचे म्हणून रोज फ़क्त अर्धा ते पाऊण तास वेगळा काढून मी हॅरी पॉटरवरचे सिनेमे बघायला लागलो. आणि काय आश्चर्य ! पहिल्याच सिनेमापासून त्या लिखाणाने, त्या दृश्य मिश्रणाने आणि त्यातल्या पात्रांनी माझ्या मनावर अक्षरशः गारूड केले. आजवर हॅरी पॉटर हे इंग्रजाळलेल्या आधुनिक तरूण पिढीचे एक काहीतरी फ़ॅड आहे असे मी समजत होतो पण त्यांना हे लिखाण इतके का आवडलेय? आणि त्यांनी ते इतके का डोक्यावर घेतलेय? याची प्रतिती आली. त्यातल्या ब-याचशा पात्रांचा मी फ़ॅन झालो. त्या परिकथेच्या जगात मी रमलो.


Expecto Patronum 🪄

मी असा हॅरी पॉटर मध्ये रमल्याचे बघितल्यानंतर लेकीच्या चेहे-यावर आपण आपल्या बाबाला योग्य ते "मार्गदर्शन" केल्याचे समाधान बघायला मिळाले. ते समाधान मला जास्त महत्वाचे वाटले.


काल अचानक कृत्रिम बुद्धीमत्ता साधनांचा उपयोग करून आपल्या स्वतःच्या फ़ोटोंना हॅरी पॉटर सिरीजमधल्या पात्रांमध्ये बदल करण्याचा "प्रॉम्प्ट" तिला गवसला. मग पहिला प्रयोग बाबावरच. बाबाला हॅरी पॉटर आणि त्याचा तो साधाभोळा मित्र रॉन विझली या रूपात तिने बदलून दाखवले. बाय द वे मला सुद्धा हॅरी पॉटर इतकाच तो रॉन विझली आणि त्याची मैत्रिण हरमॉयनी ग्रेंजर आवडते हे इथे कबूल केलेच पाहिजे. थोडक्यात रॉन विझली चे रूपांतरण राम विझली मध्ये करण्यात ती यशस्वी झाली.

Ron Weasley❎ 

Ram Weasley ✅


- लहान मुलांसारखाच अजूनही परिकथांमध्ये रमलेला, चांगले लिखाण, चांगला चित्रपट आवडणारा एक साधा मनुष्य, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


No comments:

Post a Comment