साधारण २५ - ३० वर्षांपूर्वी, जेव्हा आजच्याइतक्या कार्स घरोघरी झालेल्या नव्हत्या किंवा खाजगी गाड्या भाड्याने घेऊन देवदर्शनाला - पर्यटनाला जाण्याची आजच्याइतकी टूम नव्हती, आम्ही माहूरला आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला नागपूरवरून बसनेच जायचोत. तेव्हा नागपूरवरून माहूरसाठी थेट जायला पहाटे ३:४५ ची नागपूर - उमरखेड ही टपाल गाडी, लगेचच पहाटे ५:३० ची नागपूर - उमरखेड ही जलद गाडी, सकाळी १०:४५ ची रामटेक - माहूर ही जलद गाडी, दुपारी १:४५ वाजताची तुमसर - माहूर ही जलद बस आणि दुपारी ४:०० वाजताची नागपूर - किनवट ही जलद बस अशा मोजक्याच गाड्या होत्या.
एक संपूर्ण दिवसभर जाण्याचा प्रवास. त्यादिवशी आमच्या माहूरच्या आत्याकडे मुक्काम. दुस-या दिवशी सकाळी माहूर बस स्थानकावरून ८:०० वाजता सुटणा-या माहूर - रेणुकादेवी - दत्तशिखर - माहूर या एस. टी. ने गडावर जाऊन जगदंबेचे दर्शन आणि दत्त शिखर, अनसुया शिखर दर्शने आटोपून दुपारी याच बसने माहूर गाव गाठणे असा आमचा आणि इथे येणा-या अनेक यात्रेकरूंचा क्रम असायचा.
आता नितीन गडकरी साहेबांच्या खास लक्ष देण्यामुळे नागपूर ते माहूर हा रस्ता अत्यंत छान झालाय. पोटातले पाणीही न हलता फ़क्त ३ ते ३:१५ तासात माहूर गाठता येते. गडावर जाण्याचा रस्ता सुद्धा आता मस्त झालाय त्यामुळे आता बहुतांशी भाविक मंडळी आपापल्या खाजगी वाहनांनी इथे येतात. एस. टी. बसेसवरची अवलंबिता कमी झालेली आहे. पण त्यामुळे गडावर गाड्यांची गर्दी फ़ार होते. इतक्या गाड्या पार्किंग करायला इथे जागाच नाही. मग गाड्या दत्तशिखर मार्गावर दूर कुठेतरी लावून भाविक आपली तात्पुरती सोय करतात. इथे पार्किंगवरून झालेली भांडणे ताजीच आहेत. इथे जे विक्रेते आहेत त्यांचा आणि गाड्या घेऊन येणा-या भाविकांचा वाद हा नित्याचाच झालेला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून जगदंबेचे सोप्या रितीने दर्शन घेण्यासाठी लिफ़्ट, रॅम्पचे काम गडावर सुरू झालेले आहे. त्यामुळे आधीच अरूंद असलेल्या जागेत पार्किंगसाठी आणखीनच कमी जागा उरलेली आहे. या कामांसाठी होणारी वृक्षतोड आणि दररोज वाढत्या संख्येने येणा-या वाहनांचे प्रदूषण यामुळे गडावर हळूहळू प्रदूषणाचा प्रश्न बिकट होत जाणार आहे.
हे सगळे टाळण्यासाठी, किमान कमी करण्यासाठी आपल्या एस. टी. ने पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपल्या एस. टी. कडे ९ मीटर लांबीच्या आणि साधारण ३० प्रवाशांची एकावेळी वाहतूक करू शकणा-या वातानुकूल मिडी इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत त्यातल्या फ़क्त ६ बसेस माहूर डेपोला देऊन माहूर - रेणुकाशिखर - दत्त शिखर - अनसुया शिखर - माहूर या मार्गावर जर दर दहा मिनीटांनी पाठवल्यात तर गडावर जाणारी ७५ % खाजगी वाहने कमी होतील. पार्किंगचा आणि प्रदूषणाचा प्रश्न सुटेल. माहूर बस स्थानकावरून सुटल्यावर रस्त्यात माहूर गावातले एक दोन थांबे घेऊन बस थेट गडावर जाऊ शकेल.
आंध्र प्रदेश मार्ग परिवहन महामंडळ आपल्या गाड्यांनी तिरूपती ते तिरूमला या प्रवासासाठी भाविकांना एका दिवसाचा पास देत असते. त्या पासात आपण त्या दिवसभरात कितीही वेळा आणि कुठूनही तिरुपती ते तिरूमला प्रवास आंध्र प्रदेश मार्ग परिवहनच्या बसेसने करू शकतो. ती युक्ती जर इथे अवलंबिली तर भाविकांचा वारंवार तिकीट काढण्याचा त्रास वाचेल. एकदा दिवसभराचा पास घेतला की एका बसने रेणुका गड गाठणे, तिथे आपल्या पूजा अर्चनेसाठी जितका वेळ घ्यायचा तितका देऊन पुन्हा पुढच्या प्रवासाला दुस-याच बसने दत्त शिखर गाठणे. तिथली दर्शने निवांत आटोपून लगेच येणा-या पुढल्या बसने अनसुया शिखरला जाणे. तिथे वर चढून दर्शन वगैरे घेतल्यानंतर पुन्हा पुढल्या बसने माहूर गाव गाठणे हे भाविकांसाठी सुकर आणि सुखद होईल यात शंका नाही. दर दहा मिनीटांनी बसेस या मार्गावर चालणार असतील आणि दरवेळी तिकीट काढण्याचा व्याप नसेल तर या बसेस भाविकांसाठी स्वतःच्या वातानुकूल कार्स सारख्याच असतील. फ़क्त पार्किंग शोधण्याचे कष्ट नाहीत, पार्किंगसाठी अव्वाच्या सव्वा भावाने ओटी किंवा तत्सम सामान विकत घेण्याचे बंधन नाही.
एका बसच्या या एकूण प्रवासाला साधारण ५० मिनीटे लागतील असा हिशेब धरला तरी एका तासात फ़क्त ५ बसेस वापरून ही सेवा सुरू ठेवता येईल. एखादी बस रिझर्व म्हणून ठेवावी लागेल. एखाद्या फ़ेरीला गर्दी जास्त असली तर ही बस जादा म्हणून सोडता येईल. दुपारच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी जर पुरेशी वाहतूक नसेल तर या बसेस दर अर्ध्या तासाने सुद्धा सोडता येतील. तसे या बसेसचे चार्जिंगचे वेळापत्रक ठरवता येईल.
परिस्थितीवर मात करण्यासाठी कल्पना आहेत, संसाधने आहेत फ़क्त हे लक्षात घेऊन तशी उपाययोजना करू इच्छिणारे योजकस्तत्र दुर्लभः
- पिढ्यानुपिढ्या ज्यांच्या कुळावर आई जगदंबेचा वरदहस्त आहे अशा एका कुळात जन्म घेतलेला एक भगवतीचा साधक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर
माहूरवर लिहीलेले यापूर्वीचे ब्लॉग्ज

No comments:
Post a Comment