Showing posts with label ज्ञानेश्वरी एक्सप्रेस. Show all posts
Showing posts with label ज्ञानेश्वरी एक्सप्रेस. Show all posts

Sunday, July 24, 2011

अजनी स्टेशनवरचा अर्धा तास.

फ़ारा दिवसांनी अजनी स्टेशनवर गेलो होतो. व.पुं. प्रमाणे, या स्टेशनची, मी गाडीत असताना माझी गाडी थांबली की मला चीड येते आणि मी या स्टेशनवर गाडी पकडायला किंवा कुणाला आणायला गेलो की कीव येते. पण यावेळेस अजनी स्टेशनवर गेल्याबरोबर माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे तिथली स्वच्छता. कदाचित छोटं स्टेशन असेल म्हणुनही असेल पण नजरेत भरण्याजोगी स्वच्छता पाहून मन प्रसन्न झाले. बरेच नवीन बदल झालेले सुद्धा मी टिपले. फ़लाटाची लांबी २४ डब्यांच्या गाड्यांसाठी वाढली. फ़लाटाच्या बहुतांशी भागात छप्पर आले. प्रवाशांना बसण्यासाठी ग्रेनाइटचे ओटे आलेत. एकंदर प्रगती होती.




माझी आत्या आणि आतेबहीण फ़ार दिवसांनी नागपूरला येणार होत्या. अकोल्यावरून महाराष्ट्र एक्सप्रेस ने निघणार म्हणून कालच त्यांचा फोन आला होता. घरून निघताना मी रेल्वेच्या चौकशी संकेतस्थळावर बघितलं तर बडने-याला महाराष्ट्र एक्सप्रेस चक्क १५ मिनिटे लवकर आलेली दिसत होती. साधारण दुपारी ३ च्या सुमारास आत्याला फोन लावला तेव्हा गाडी वर्धेत होती. आता काय फ़क्त एकच तास. भराभर आवरलं आणि स्टेशनवर पोहोचलो.

सुरुवातीला पाच मिनिटे काहीच चहलपहल नव्हती. आम्ही तिघे आणि रेल्वेचे आवश्यक सेवेतले एक दोन कर्मचारी याशिवाय कोणीही नव्हते. अचानक नागपूरकडून काहीतरी हालचाल जाणवली.




एक डिझेल एंजिन गरीब रथच्या काही डब्यांना घेऊन येत होते. पहिल्यांदा ते डबे गरीब रथचेच आहेत की नाही यावर सुपत्नीचा आणि माझा एक "लडिवाळ संवाद" झाला. (त्याच काय आहे, माझ्या या रेल्वे विषयक प्रेमाची लागण सुपत्नी आणि सुकन्येला झालेली आहे.) पण गाडी जवळ येताच माझी सरशी झाल्याचे माझ्या लक्षात आले. पुणे नागपूर गरीब रथ आज नागपूरात आला असेल आणि त्याचेच चार डबे घेऊन ते कटनी शेड चे डिझेल एंजिन अजनीच्या यार्डात जात होते. गाडी थोडी दूरवरून म्हणजे प्लॆटफ़ॊर्म ३ वरून जात होती.




नेमकी त्याचवेळी खापरीच्या दिशेनेही काहीतरी हालचाल जाणवली. एक लालागुडा शेडचे WAG 9 एंजिन गॆस टॆंकरचा रेक घेऊन नागपूरकडे येत होतं. सुकन्येच्या अचानक लक्षात आलं आणि ती म्हणाली की " बाबा गरीब रथ आणि या एंजिनचा रंग किती सारखा आहे नं!" मलाही ते पटलं आणि मी गरीब रथला WAG 9 लावलं तर कसं दिसेल या मनोराज्यात दंग झालो.




त्यादरम्यान ती गाडी आमच्या अगदी जवळून प्लॆटफ़ॊर्म १ वरून हळूहळू नागपूरकडे गेली.



आता जवळपास दुपारचे चार वाजत होते त्यामुळे ह्या मालगाडीच्या मागेच महाराष्ट्र एक्सप्रेस असणार याविषयी आम्हाला आशा वाटु लागली होती.

दरम्यान नागपूरवरून येणारी आणखी एक मालगाडी दिसली.



रूळांवर टाकण्यासाठीची गिट्टी (खडी) घेऊन जाणार्या वाघिणी घेऊन पुन्हा एक WAG 9 एंजिन (अजनी शेड) ब-यापैकी वेगात वर्धेच्या दिशेने निघाले होते. अचानक ती मालगाडी अजनीला थांबली आणि पाचच मिनिटांत पुन्हा सुरू झाली आणि बघता बघता तिने वेगही घेतला.




आता मात्र गाडीची वाट पहाणे जरा गांभिर्याने सुरू झाले. चि. मृण्मयीचा गाण्याचा वर्ग साडेचारला सुरू होणार होता. आमच्या नियोजनाप्रमाणे चार सव्वाचार पर्यंत गाडी आल्यानंतर आम्ही तिला तिच्या गाण्याच्या वर्गात सोडणार होतो. आता सव्वाचार तर इथेच वाजत होते.

पुन्हा एका गाडीचा आवाज ऐकू येऊ लागला. अजनी स्टेशनवर गाडी येण्याबद्दल उदघोषणा होणार की नाही याविषयी मी साशंकच होतो त्यामुळे ही गाडी महाराष्ट्रच असणार याविषयी मला आशा वाटु लागली पण दूरवरून डिझेल एंजिन दिसले आणि जाणवले की अरे ही तर नंदीग्राम. चोवीस तासांपूर्वी बिचारी मुंबईवरून निघालेली. लांबच्या रस्त्याने नागपूर गाठणारी ही गाडी मात्र वर्धेनंतर दादागिरी करते. महाराष्ट्र एक्सप्रेसला सिंदी स्टेशनवर मागे टाकून नागपूरला आधी येते. आजही ती तशीच आली. पुणे शेड्चे WDM 2 18612 या गाडीला घेऊन येत होते. मनमाड पासून या एंजिनाने याच गाडीची सोबत केली असणार आणि उद्या हेच एंजिन पुन्हा या गाडीला मनमाड पर्यंत सोबत करणार.




पहिला डबा हा मुंबई-पुणे-मुंबई मार्गावर धावणार्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी या गाड्यांच्या रेक मधला होता. त्याचा टिपीकल रंग.




अनपेक्षितपणे गाडी अजनीला थांबली. गाडीत अजिबात गर्दी नाही. थोडावेळ थांबून गाडी हलली. गाडीच्या मागचा X मला माझ्या टिपीकल स्वप्नाची आठवण देऊन गेला. (माझं पेट स्वप्न म्हणजे स्टेशनवर जातोय गाडी पकडण्याचा प्रयत्न करतोय (यादों की बारात फ़ेम) पण गाडी निघून जातेय आणि शेवटचा X मला खिजवून हळूहळू माझ्यापासून दूर जातोय) आज ते सगळं आठवलं आणि नकळत हसु आलं.





पुन्हा एकदा खापरी दिशेकडून गाडीचा आवाज आणि आमची उत्सुकता चाळवली जाणे हे आपसूक घडले. यावेळी त्या दिशेकडून एक WAP 4 एंजिन गाडी घेऊन येताना दिसले. ही महाराष्ट्र एक्सप्रेस असण्याची शक्यता नाकारता येण्याजोगी नव्हती. कधीकधी महाराष्ट्र एक्सप्रेसला भुसावळ शेड्चे WAP 4 एंजिन लागतेही.

पण ती गाडी जशीजशी जवळ येत होती तसतसा तिचा वेग कमी होण्याऐवजी वाढतच गेला आणि शेवटच्या क्षणी जाणवलं की अरे ही तर मुंबई-हावडा ज्ञानेश्वरी सुपर डीलक्स एक्सप्रेस.



२८ मे २०१० मध्ये नक्षलवाद्यांनी जो घातपात केला त्यानंतर ह्या मार्गावरच्या गाड्या वेळेवर कधी धावतच नाहीयेत. सकाळी साडेनऊला नागपूरला येणारी ही गाडी तब्बल वर्षभरापासून दुपारी चार साडेचार वाजता येतेय. (नक्षलवाद्यांना घाबरून एवढ्या महत्वाच्या मार्गावरच्या गाड्यांच्या वेळा बदलणारे धन्य ते रेल्वे प्रशासन आणि धन्य त्या ममता दीदी. बंगाली लोकांचे शतशः धन्यवाद की त्यांनी ममतांना मुख्यमंत्री बनविले आणि समस्त देशवासियांना त्यांच्या तावडीतून सोडविले. पु. लं. च्याच भाषेत सांगायचे झाले तर "बाई असेल मोठी हो. पण आमच्या लेखी तिचे मोठेपण कुठल्या खात्यात मांडायचे ते सांगा बघू?")

गाडी भरवेगात प्लॆटफ़ॊर्मवरून जाताना जाणवलेली नवीन गोष्ट म्हणजे या गाडीला आता पूर्ण वातानुकूल प्रथम वर्ग डबा जोडलेला आहे.(H-1). पूर्वी अर्धा प्रथम वर्ग आणि अर्धा द्विस्तरीय वातानुकूल शयनयानाचाच डबा असायचा. (HA-1).


आता चार वाजून चाळीस मिनिटे झालेली होती. आत्याला फोन लावावा म्हटल. फोन केल्यावर कळले की महाराष्ट्र एक्सप्रेसला सिंदीला मागे टाकून या दोन्ही गाड्या पुढे काढल्या होत्या आणि आता महाराष्ट्र एक्सप्रेस खापरीवरून निघते आहे. बस आता फ़क्त दहाच मिनिटे.

महाराष्ट्र एक्सप्रेसच्या दयनीय अवस्थेविषयी मनात अपार करूणा दाटून आली. सद्यस्थितीच्या महाराष्ट्राचे ही गाडी प्रतीक आहे असे वाटले. महाराष्ट्रात भाव नाही, दिल्लीत कुणी विचारत नाही. खरतर आंध्रप्रदेश एक्सप्रेस हैद्राबाद-नवी दिल्ली, तामिळनाडू एक्सप्रेस चेन्नई-नवी दिल्ली, केरळ एक्सप्रेस तिरूअनंतपुरम-नवी दिल्ली, कर्नाटक एक्सप्रेस बंगलोर-नवी दिल्ली, मग महाराष्ट्र एक्सप्रेस मुम्बई-नवी दिल्ली का नको? असो.

शेवटी एकदाची पावणेपाच वाजता उदघोषणा झाली. (अजनी स्टेशनवर उदघोषणा होते ही एक नवीन भर माहितीत पडली). नेहमीचे भुसावळ शेडचे WAM 4 महाराष्ट्र एक्सप्रेसला घेऊन येताना दिसले. प्रतिक्षा संपली.