Monday, October 31, 2022

देवाचिये द्वारी - ११४

 


नष्टासी नष्ट योजावे I वाचाळासी वाचाळ आणावे I

आपणावरी विकल्पाचे गोवे I पडोंच नेदी II


कांटीने कांटी झाडावी I झाडावी परी ते कळों नेदावी I

कळकटेपणची पदवी I असो द्यावी II


न कळता करी कार्य जें ते I ते काम तत्काळचि होते I

गचगचेत पडतां तें I चमत्कारे नव्हे II


समाजात मोठे कार्य करताना दुष्ट दुर्जन लोकांचे मन वळवून, त्यांना संपूर्ण नष्ट न करता आपल्यासोबत बाळगावे आणि दुस-या दुष्टांशी लढताना त्यांचा वापर करावा. आपल्या कार्याचा फ़ार गवगवा करू नये आणि आपण मात्र बाह्य वेषाने साधे, क्वचित गबाळे असावे म्हणजे कुणाला आपल्या महान कार्याचा फ़ार मागमूस लागू देऊ नये असे श्रीसमर्थांचे आग्रही प्रतिपादन आहे.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध सप्तमी शके १९४४ , दिनांक ३१/१०/२०२२)


Sunday, October 30, 2022

देवाचिये द्वारी - ११३

 


ज्यासी उपाधी आवरेना I तेणे उपाधी वाढवावीना I

सावचित्त करूनिया मना I समाधाने असावे II


लोक बहुत कष्टी जाला I आपणहि अत्यंत त्रासला I

वेर्थचि केला गल्बला I कायसासी II


ज्या साधकाला आपण केलेल्या कार्याची उपाधी कशी आवरावी ? हे कळत नाही त्याने उपाधी वाढवूच नये असे श्रीसमर्थांना वाटते. अशी उपाधी न आवरता येता वाढवली तर लोकही कष्ती होतील आणि साधकही त्रासून जाईल आणि मुख्य कार्य मागे पडेल.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध षष्ठी शके १९४४ , दिनांक ३०/१०/२०२२)


Saturday, October 29, 2022

देवाचिये द्वारी - ११२

 


अभ्यासे प्रगट व्हावे I नाही तरी झाकोन असावे I

प्रगट होऊन नासावे I हे बरें नव्हें II


मंद हळुहळु चालतो I चपळ कैसा आटोपतो I

अरबी फ़िरवणारा तो I कैसा असावा II


हे धकाधकीची कामें I तिक्षण बुद्धीची वर्मे I

भोळ्या भावार्थे संभ्रमे I कैसे घडे II



या जगात विशेष मोठे काम करू इच्छिणा-या साधकाने स्वतःची तशी पूर्ण तयारी करायला हवी. मोठे काम करण्यासाठी मोठा अभ्यास हवा, अनेक गुणसमुच्चय अंगी हवा, तीक्ष्ण बुद्धी हवी. सर्वसामान्य भाविकांच्या भोळ्याभाबड्या स्वभावाने हे मोठे कार्य घडणार नाही असे श्रीसमर्थांना वाटते.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध चतुर्थी / पंचमी, पांडवपंचमी  शके १९४४ , दिनांक २९/१०/२०२२)


Friday, October 28, 2022

देवाचिये द्वारी - १११

 


राखावी बहुतांची अंतरे I भाग्य येते तदनंतरे I

ऐसी हें विवेकाची उत्तरे I ऐकणार नाही II


कांही नेमकेंपण आपुलें I बहुत जनासी कळों आलें I

तेंचि मनुष्य मान्य जालें I भूमंडळी II


याकारणें अवगुण त्यागावे I उत्तम गुण समजोन घ्यावे I

तेणे मनासारिखे फ़ावें I सकळ कांही II



आपले काही वेगळेपण, नेमकेपण जगाच्या लक्षात आल्याशिवाय जग आपल्याला मान्यता देणार नाही. यासाठी सर्वसामान्य साधकांनी अवगुण टाकून देऊन सदगुण अंगी बाणवून खूप लोकांना प्रिय होण्यासाठी विवेकाने प्रयत्न केले पाहिजेत असे श्रीसमर्थांना वाटते.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध तृतीया शके १९४४ , दिनांक २८/१०/२०२२)


Thursday, October 27, 2022

देवाचिये द्वारी - ११०

 


करंट्यास आळस आवडे I यत्न कदापी नावडे I

त्याची वासना वावडे I अधर्मी सदा II


जनासी मीत्री करीना I कठीण शब्द बोले नाना I

मूर्खपणे आवरेना I कोणीयेकासी II


कोणीयेकास विश्वास नाही I कोणीयेकासीं सख्य नाही I

विद्यावैभव काहींच नाही I उगाचि ताठा  II



ग्रंथराज श्रीमददासबोधाच्या करंटलक्षण नामक समासात श्रीसमर्थांनी करंट्या मनुष्यांची लक्षणे सांगितलेली आहेत. जो विचाराने, विवेकाने आणि संयमित वागत नाही त्यात सगळी करंटेपणाची लक्षणे आपल्याला दिसून येतील.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध द्वितीया शके १९४४ , दिनांक २७/१०/२०२२)


Wednesday, October 26, 2022

देवाचिये द्वारी - १०९

 


हेत समजोन उत्तर देणे I दुस-याचे जीवीचे समजणे I

मुख्य चातुर्याची लक्षणे  I तें हें ऐसी II


जगामध्ये जगमित्र I जिव्हेपासी आहे सूत्र I

कोठेतरी सत्पात्र I शोधून काढावे II


कथा होती तेथे जावे I दुरी दीनासारखे बैसावे I

तेथील सकळ हरद्र घ्यावे I अंतर्यामी II


चतुर मनुष्यांनी दुस-या व्यक्तीचे अंतर जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे दुस-या व्यक्तीचे हेतू लक्षात येतील. जगात सर्वांशी मैत्रीने वागण्याचे सूत्र मनुष्यमात्रांच्या जिभेत आहे. गोड, मधूर, दुस-यांच्या मनाला न दुखावणारे बोलण्याने माणसे जोडली जातील .


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध प्रतिपदा / द्वितीया, बलीप्रतिपदा / भाऊबीज शके १९४४ , दिनांक २६/१०/२०२२)


Tuesday, October 25, 2022

देवाचिये द्वारी - १०८

 


ऐसा ग्रंथ जपोनी ल्याहावा I प्राणीमात्रांस उपजे हेंवा I

ऐसा पुरूष तो पहावा I म्हणती लोक II


काया बहुत कष्टवावी I उत्कट कीर्ती उरवावी I

चटक लावूनी सोडावी I कांही येक II


ग्रंथलेखन कसे करावे, समास किती सोडावा याबद्दल श्रीमददासबोधाच्या १९ व्या दशकाच्या पहिल्या समासात श्रीसमर्थांनी मार्गदर्शन केलेले आहे. इतका सुंदर ग्रंथ लिहावा की सगळ्या लोकांना त्या ग्रंथकर्त्याला भेटण्याची ओढ लागायला हवी असे श्रीसमर्थांना वाटते. समजात काही विशेष काम करू इच्छिणा-या मनुष्यमात्रांनी आपले शरीर कष्टवून आपल्या इहलोकातून प्रयाणानंतरही आपली कीर्ती कायम राहील असे कार्य करून जावे.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन अमावास्या शके १९४४ , दिनांक २५/१०/२०२२)