Monday, July 11, 2011

पावसातली तू

लावू नकोस बोल मला तो पावसाचा दोष होता,
आषाढघन बरसताना खरंच तुलाही होष होता?

पावसात भिजावे तू हा अनामिक आदेश होता,
मदनाने पावसाचा फ़क्त घेतला वेष होता.

नभात मेघ दाटले अन धरती ही तृणबावरी,
सांग फ़ुलून आली कशी मुलुखाची तू लाजरी.

नितळ धारांसारखे प्रेम तुझे हे उचंबळे,
मग हातांवरील मेंदी नेत्रात का गं साकळे?

खरंच का नेत्रात तुझ्या, अश्रु डोकावून गेला?
की पावसाचा थेंब हा मार्ग वेडावून गेला?

सांग केला का कधी, मी मर्यादाभंग होता?
वेडे अग सगळाच तो पावसाचा रंग होता.

-प्रा. राम प्रकाश किन्हीकर.

(ही कविता दै. तरूण भारत, नागपूर मध्ये दि. २० ऒगस्ट २००० रोजी प्रकाशीत झालेली आहे.)



(ही कविता ब्लोगवर खास सुधीर गोखले (नाना) साठी टाकली. बुंदींच्या दिवसांची आठवण अजूनही आहे म्हणून.)

कवितेची थोडी पार्श्वभूमी:

माझ्या जीवनात रेल्वेचे अनन्यसाधारण स्थान आहे. मला रेल्वे प्रवासही भरपूर घडला आहे. रेल्वे माझी पहिली प्रेयसी आहे. त्यामुळे माझ्या बहुतेक लेखनात बस किंवा रेल्वे चा संदर्भ येतोच येतो.

वास्तविक ही एक प्रेमकविता. आमचे लग्न दि. ०७/०२/२००० (नाथबीज) रोजी जमले. दि. १२/०३/२००० ला चंद्रपूरला साक्षगंध झाले. लग्नाची तारीख मात्र फ़ार लांबची निघाली.(माझ्याच आग्रहावरून) तारीख निघाली ती ०२/१२/२०००. तब्बल आठ साडेआठ महिन्यांचा कालावधी आम्हाला एकमेकांना समजून घ्यायला मिळाला.

दरम्यानच्या काळात मी नागपूरला आलो की वैभवी चंद्रपूरवरून नागपूरला यायची. आम्ही मग मनसोक्त भटकायचो. थोडी लांब सुटी आली की मी चंद्रपूरला जायचो. तसही चंद्रपूर माझं आजोळ असल्याने बालपणापासूनच मला चंद्रपूरची ओढ होतीच.

अशाच एका पावसाळी दिवशी आम्ही खूप भटकलो. थोडे ओलेही झालोत. त्याच दिवशी रात्रीच्या सेवाग्राम एक्सप्रेसने मी मुंबईला परत जायला निघालो होतो. दिवसभर भटकूनही तिच्याविषयी वाटणारी ओढ कमी झाली नव्हती. सारखा डोक्यात तिचाच विचार चालला होता. (या ओढीलाच राधा-कृष्णाची ओढ म्हणतात हे सौ. मंदामावशींनी सांगितल्यानंतर तर अशी ओढ वाटण्यात आम्हा दोघांनाही धन्यता वाटायला लागली होती.)

ती आत्ता काय करीत असेल? आठवणींमध्ये गुंग असेल की दुसर्या कामांमध्ये तिने स्वत:ला गुंतवून घेतले असेल? असलेच असंख्य विचार. सारखी बेचैनी, अनामिक हुरहुर बस्स.

अशातच गाडी सुटली. मधला बर्थ होता. रात्रीचे नऊ वाजत होते. आजुबाजुच्या पासिंजरांनी आपापले बर्थस लावून घेतेलेत. मला झोप येत नसतानाही मधला बर्थ पकडून आडवे व्हावे लागले. हुरहुरीतूनच या कवितेचा जन्म झाला. तेव्हा गाडीने ८० कि.मी. अंतर कापून वर्ध्यात आगमन केलेले होते. रेल्वेच्या बर्थ वर केलेली कविता.

6 comments: