Sunday, June 22, 2014

एक ऐनवेळी आखलेला पण सुंदर प्रवास.

पूर्वपीठीका : जून महिना नुकताच सुरू झालेला. उकाडा, उकाडा आणि उकाडा. चि. मृण्मयीची शाळा १६ जून पासून सुरू होणार. सुट्टीचे दोन तीन दिवसच उरलेलेत. माझीही सुट्टी बाकी होती. मग एके दिवशी सकाळी उठल्यावर अचानक चर्चा केली आणि बासरब्रम्हेश्वर क्षेत्रासाठी निघण्याचे ठरले. 

जाण्यासाठी रस्ता सगळ्यात जवळचा म्हणजे मंगळवेढा-सोलापूर-तुळजापूर-लातूर-शिरूर ताजबंद-बिलोली हा. पण लातूर-नांदेड रस्त्याची मी थोडी धास्तीच घेतल्यासारखी आहे. हा रस्ता कधी सुधारणार हे कोणीही सांगू शकत नाही. त्यात माझ्या महाविद्यालयीन सहका-याने (अवधूत कुळकर्णी) सांगितले की " सर, एकवेळ लातूर-नांदेड (शिरूर ताजबंद पर्यंत) परवडला पण त्यानंतरचा राज्य महामार्ग खूपच खराब आहे." मग काय ? गुगलबाबाला शरण जात पर्यायी मार्गाचा शोध सुरू झाला आणि पर्यायी मार्गपण सापडला.


सांगोला ते शिरुर ताजबंद (मार्गे प्रमुख राज्य मार्ग क्र. ३ - आताचा राष्ट्रीय महामार्ग क्र. २०४). या रत्नागिरी ते नागपूर (बुटीबोरी) महामार्गाच्या डागडुजीचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आलेले आहे. सांगोला-मंगळवेढा-सोलापूर हा भाग तर अतिशय गुळगुळीत करण्यात आलेला आहे. मिरज-सांगोला मार्गाचेही रुंदीकरण आणि अस्तरीकरण सुरु आहे. लातूर-नांदेड ह्या भागाची मला काही शाश्वती नाही. जर ह्या भागाची डागडुजी आणि नवीन अस्तरीकरण झालेच तर सांगोला-नागपूर प्रवासासाठी हा सगळ्यात जवळचा आणि योग्य रस्ता आहे. (फ़क्त ६९० किमी)
शिरुर ताजबंद - बिलोली आणि पुढे आंध्र प्रदेश (तेलंगणात) जाणारा हा राज्य महामार्ग २२५. याविषयी अवधूतने मला आधीच सांगून फ़ार घाबरवले होते. पण प्रत्यक्षात ह्या रस्त्याचे नवीनीकरण झालेले दिसले. खूपच मस्त रस्ता होता आणि मुख्य म्हणजे एकच टोल (५ रु. फ़क्त) आणि तोही महाराष्ट्र - तेलंगाणा सीमेवर बिलोली येथे. (टोलनाके २ जागी उभारलेले आहेत पण अजून टोलवसुली सुरु झालेली नाही.)बिलोली ते धर्माबाद ते बासर. हा ३०-३५ किमीचा रस्ता मनःशांतीची कसोटी पहाणारा होता. त्यातल्या त्यात धर्माबाद ते बासर या १२ किमी साठी जवळपास १ तास लागला. परतताना हा रस्ता कुठल्याही परिस्थितीत टाळायचा हे आम्ही ठरवले. त्यातल्या त्यात बिलोली वरून बोधन मार्गे बासर ला गेलो असतो तर बरे झाले असते असे वाटू लागले आणि नंतर परतताना कळले की बिलोली-बोधन-बासर हा रस्ता खूप छान आहे. १०-१५ किमी जास्त फ़ेरा पडला तरी परवडण्याजोगा.

दिनांक १२/०६/२०१४ : 

सकाळी निघायचे ठरले खरे पण महाविद्यालयात ऐनवेळी महत्वाचे काम निघाले. ते आटोपून, सूचना देऊन निघायला दुपारचे ११.४५ झाले. आजच्या दिवसभरात बासरला काही पोहोचत नाही हे निश्चित झाले. आज एका नवीनच मार्गाने वाटचाल करायची होती. तेव्हा कुठे थांबायचे आहे याची अनिश्चितता होती. म्हटलं "चला, त्यातही मजा आहे. एक नवा थरार अनुभवून बघूयात."दि. १२/०६/२०१४ चा मार्ग. भालकीवरून थेट बासरला जायला कर्नाटकातून मार्गच नाही. नाईलाजाने उदगीर मार्गे जावे लागले पण थोडा महाराष्ट्र हद्दीतला रस्ता सोडला तर इतर रस्ता (अगदी कर्नाटकाच्या ग्रामीण भागातला सुद्धा, छान होता.)

सांगोल्यावरून निघाल्यावर थोडे ढगाळ वातावरण होते. असे वातावरण मला आणि आमच्या सर्व प्रवासी मंडळींना फ़ार आवडत. यात छायाचित्रेही छान येतात असा नित्याचा अनुभव. काही सुंदर बसेसचे काढलेले फोटोज. सर्व फ़ोटोज सौ. वैभवीने काढलेले आहे. मी ड्रायव्हिंग सीटवर असताना बाजुला बसून ती फोटोज काढते.


ही पंढरपूर दर्शन बस. महाराष्ट्र एस. टी. ने ही विशेष बस काही वर्षांपूर्वी सुरू केली आहे. विशेष रंगसंगती हे या बसचे पहिल्यापासूनच वैशिष्ट्य आहे. पूर्वी लालभडक रंगात असलेली ही बस आत्ता आत्ताच नव्या रंगसंगतीत रंगवून घेतलेली आहे. आज ही सोलापूर-ति-हे-कामती पंढरपूर मार्गावर साधारण बस म्हणून जरी धावत असली तरी शनिवार-रविवार आणि इतर सुट्ट्यांच्या दिवशी पंढरपूर-नारायण चिंचोली- तुळजापूर-अक्कलकोट-सोलापूर-पंढरपूर अशी सेवा ही बस देत असते. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून पंढरीत आलेल्या वारक-यांना अल्प दरात सोलापूर आणि आसपासच्या तीर्थेस्थळांचे दर्शन ही बस घडवते.
प्रवास तसा हळूहळू चालत असल्यामुळे सोलापूरला पोहोचायला दुपारचे १४.३० झालेत. रस्ता छान आहे पण आम्हीच जरा रमत गमत चाललेले होतो. भैय्या चौकापाशी सांगोल्याकडे निघालेल्या या दोन बसेस.


सोलापूर महापालिकेच्या ताब्यात जे.एन.एन.यु.आर.एम. अंतर्गत नव्यानेच दाखल झालेल्या वॉल्व्हो बसच्या ताफ़्यातली एक बस. सोलापूर महापालिकेची बस सेवा खूप जुनी आहे. १९७८ मध्ये मी ही बससेवा बघितली आहे. चांगली चालत असावी कारण पी.एम.टी., नागपूर स्टारबस यांसारखी यावर टीका होताना मी गेल्या दोन वर्षात ऐकली किंवा वाचली नाही.


वोल्व्हो पाठोपाठ लगेचच एक पुरातन बस.

सोलापूर शहरात जाउन पोटोबा करण्याचा मार्ग आम्ही मुद्दामच टाळला. आतल्या वाहतुकीमुळे उगाच वेळ जाइल त्यापेक्षा सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर छान ढाबे असतील तिथे जेवू असा आमचा बेत. तसाही सौ. चा उपवासच (वटपौर्णिमा) होता त्यामुळे जेवणारे मी आणि चि. मृण्मयीच होतो. सोलापूर-हैद्राबाद महामार्ग हा पुणे-सोलापूर महामार्गाप्रमाणेच ६ पदरी असेल अशी माझी आशा होती पण या दुपदरी आणि अत्यंत खराब अवस्थेत असलेल्या महामार्गाने माझी निराशा केली. मुंबई ते सोलापूर हा ४-६ पदरी असणारा महामार्ग सोलापूर नंतर दुपदरी होतो.

सोलापूरनंतर ब-यापैकी ढाबेही नाहीत. सोलापूर शहराच्या बाहेर साधारण १० किमी अंतरावर आम्ही दुपारी ३ च्या सुमारास थांबलो. एक जरा ब-यापैकी ढाबा दिसला. पण आत शिरताच तिथे सगळ्याच गि-हाईकांचे एकसाथ "दारूकाम" सुरू असलेले दिसले. लगेच काढता पाय घेतला. भूकेच्या तीव्र जाणीवेतच नळदुर्ग शहरात शिरल्या शिरल्या एका ढाब्यावर थांबलो आणि यथातथाच असला तरी जेवण मागवून वाट बघत बसलो.

सोलापूर जिल्ह्यातून जसा आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश केला तसे खराब रस्त्याने आमचे स्वागत केले. उस्मानाबाद जिल्यातला नळदुर्ग ते उमरगा हा रस्ता खूप खराब आहे. मराठवाड्यात सार्वजनिक बांधकाम खाते अस्तित्वात आहे किंवा नाही अशी शंका यावी अशी मराठवाड्यातील रस्त्यांची अवस्था आहे. त्यातून राष्ट्रीय महामार्गही सुटलेले नाहीत.अपेक्षेप्रमाणेच प्रथम दिसलेली हैद्राबाद-अकलूज बस. अकलूजवाले या मार्गावर स्पीड-लॉक नसलेली गाडी पाठवतात असे ऐकून आहे
.

एक जुनी, रिकंडीशन केलेली बस.


आंध्र प्रदेश परिवहनने मला कायम आश्चर्यचकित केलेले आहे. एकेकाळी महाराष्ट्र एस. टी. महामंडळापेक्षा बरेच मागासलेले असलेले हे महामंडळ आज गाड्यांच्या संख्येच्या आणि वैविध्याच्या बाबतीत भारतात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्र राज्य परिवहनाने यावर जरूर विचारमंथन केले पाहिजे. आंध्र प्रदेश परिवहनची एक्सप्रेस बस.


कर्नाटक राज्याची साधी बस. कर्नाटकने मार्गांच्या बाबतीत महाराष्ट्रात खूप आतवर घुसखोरी केलेली आहे. औरंगाबाद, दिग्रस पर्यंत कर्नाटकच्या बसेस पहायला मिळतात आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात मात्र महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यांच्याच जास्त सेवा दिसतात.


ग्रीलला पिवळा रंग हे नांदेड विभागाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. नांदेड विभागाची सुंदरी.


हैद्राबाद-मुंबई बस. साधी परिवर्तन सेवा आणि त्यातल्या त्यात जुनी बस. मुंबई डेपोची, हेडक्वार्टरची ही बस.


कर्नाटकात प्रवेश करताना मोठ्ठा आणि भव्य दिव्य असा नाका लागला. आम्हाला काही तपासणींना सामोरे जावे लागले नाही पण ट्रक्सना मात्र थांबवून तपासत होते.


कर्नाटकात प्रवेश केल्याबरोबर रस्त्याची हालत बदलली. खूप गुळगुळीत आणि छान रस्ता झाला आणि हे स्वागत कर्नाटकने मनापासून केले आहे हे जाणवले.


बसवकल्य़ाण फ़ाट्याआधी गुजरात हॊटेल म्हणून दुरूनच एक छान हॊटेल दिसले. नुकतेच जेवण झालेले होते. चहापण पिण्याचा मूड नव्हता म्हणून थांबलो नाही आणि ५ च मिनीटांत राष्ट्रीय महामार्ग सोडून बसवकल्याण कडे वळलो. महात्मा बसवेश्वरांची ही कर्मभूमी. राष्ट्रीय महामार्गावरच स्वागतासाठी ही सुंदर कमान उभी केलेली आहे.
आता यापुढचा प्रवास अनोळखी प्रदेशात आणि अनोळखी भाषेत होणार होता. वारंवार थांबून आम्ही योग्य रस्ता विचारत विचारत चाललो होतो पण खेड्यापाड्यांमध्येही खूप छान मदत आम्हाला मिळाली. कुणीही चुकीचा रस्ता सांगून गंडविण्याचा प्रयत्नही केला नाही. तोडक्या मोडक्या हिंदीत तर कधी हावभावांनी संवाद साधला गेला आणि ग्रामीण कर्नाटक असो की ग्रामीण तेलंगणा, रस्ते छान होते. 
कर्नाटक राज्य मार्ग परिवहनची "सुवर्ण कर्नाटक सारिगे."


बसवकल्याण ते हुलसूर सुंदर रस्ता.


बसवकल्याण नंतर हुलसूर गावाच्या शोधात निघालो. तिथून उजवीकडे वळून भालकी गाठायचे होते. मुक्कामाचे ठिकाण तर महत्वाचे आहेच पण असल्या रस्त्यांची मजा लुटत जाता यायला पाहिजे. प्रवास म्हणजे केवळ "क्ष" ठिकाणाहून "ज्ञ" ठिकाणापर्यंत कापलेले अंतर नव्हे तर अशी काही ठिकाणे प्रवासाला वेगळाच फ़्लेवर दिवून जातात.


भालकी कडे जाताना कर्नाटकाच्या ग्रामीण भागात चालणा-या काही खाजगी तर काही सरकारी बसेस दिसल्या. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मात्र सर्वत्र बकाल अशा जीप्स आणि टाटा एस चालताना दिसतात. 


ज्या भागातून आपण चाललोय त्या भागाचा भूगोल, हवामान , शेतजमीन कशी असेल याच मला खूप कुतूहल असत. म्हणून सौ. वैभवीला शेतजमीनीचाही फ़ोटो घ्यायला लावला.
मनात संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासही आठवत होतो. बीदर-भालकी हा एकेकाळचा मराठी बहुल प्रदेश खरंतर महाराष्ट्रातच यायचा होता. सोलापूर मात्र कन्नड बहुल असल्याने कर्नाटकात गेले असते. भालकीवर बेळगावसारखी मराठी छाप आहे काय ते बघू म्हणत गाडी भालकी बाह्य वळण मार्ग न घेता भालकी शहरात घातली. चहा पिण्याची वेळ उलटून चांगली संध्याकाळ झाली होती. पण भालकीने घोर निराशा केली. मराठी छाप गेल्या ६४ वर्षांमध्ये पुसून गेलेली आहे. चहा प्यावा असे हॊटेलही नव्हते. उगाच अर्धा तास वाया गेला.

पण उदगीर गावात शिरल्यावर काही चहलपहल जाणवेनाच. इथे राहण्याची किमान सोय तरी होइल की नाही ? हा प्रश्न मनात रुंजी घालायला लागला. आणि थोड्याच वेळात उदगीरचे खरे दर्शन झाले. तालुक्याच्या मानाने प्रशस्त असे शहर वाटले. भव्य दुकाने, व्यापारी पेठा. नगरपरिषदेची स्वतःची अशी शहर बससेवा असलेली तीनच शहरे मी आत्तापर्यंत पाहिली आहेत. खोपोली, बीड आणि तिसरे उदगीर. (या बाबतीत मात्र मराठवाडा पुढे आहे.) थोडी शोधाशोध केल्यानंतर तालुक्याच्या जागी न शोभण्याइतपत प्रशस्त आणि स्वच्छ सुंदर असे हॊटेल सापडले. मुक्काम ठोकला. गुगल बाबांना विचारले की इथून बासर किती दूर ? त्यांनी उत्तर दिले की फ़क्त १३५ किमी. चला. उद्या सकाळी लवकर लवकर उठून तीन साडेतीन तासात बासरला पोहोचू.

दिनांक १३/०६/२०१४ : 

उदगीर वरून सकाळी निघायच म्हणता म्हणता चक्क ९ वाजलेत निघायला. गुगलबाबांच्या सल्ल्यानुसार आणि स्थानिकांच्या मार्गदर्शनानुसार उदगीर-जळकोट-जांब-मुखेड हा मार्ग घ्यायचे ठरले.
लातूर जिल्ह्यातल्या अशोक लेलॆण्ड च्या एस. टीं. चा समोरचा भाग लातूर विभाग एका विशिष्ट पद्धतीने बनवतो. त्यातलीच ही एक एस.टी.
उदगीरवरून निघालो. एक छोटा घाट उतरलो. रस्ता ब-यापैकी होता. जळकोट मागे टाकून जांबला आलो. इथेच नांदेड-मुखेड-बिलोली-बोधन हा राज्य महामार्ग क्र. २२५ लागला. आता पुढला सगळा प्रवास या मार्गावरूनच करायचा होता. अवधूतने ह्या मार्गाविषयी नकारात्मक बोलून मला थोडे घाबरवले होते. पण या रस्त्याला लागलो आणि एकदम हायसे वाटले. एकदम छान रस्ता. नुकताच पुनर्डांबरीकरण केलेला. बहुधा या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा नुकताच दिला गेलेला असावा. सुरेख रस्ता आणि मुख्य म्हणजे हा ८०-९० किमी च्या प्रवासात केवळ १ टोल लागला आणि रु. ५ फ़क्त टोल भरावा लागला. जांब ते बिलोली हे अंतर झपझप कापल्या गेले. खाण्यापिण्यासाठी या रस्त्यावर ढाबे वगैरे मात्र फ़ारसे दिसले नाहीत. बरे झाले आम्ही आमच्या हॊटेलमधूनच पोटपूजा करून निघालेलो होतो.


टिपीकल लातूर विभागाची एस. टी.


टिपीकल लातूर विभागाची एस. टी.


मानव विकास मिशन ने महाराष्ट्र एस.टी.ला काही बसेस शाळेत जाणा-या मुलींसाठी ने आण करण्यासाठी दिल्या आहेत. एस.टी. या बसेस आपल्या नियमीत मार्गांसाठीही ब-याचदा वापरते.


बिलोली नंतर "बासर कडे" हा बोर्ड दिसला म्हणून आम्ही गावातून तिकडे वळलो. आणि आत्तापर्यंतच्या छान प्रवासाला सुरंग लागला. अत्यंत खराब रस्ता. धर्माबाद नंतर आम्ही गोदावरी नदी पार करून तिच्या उत्तर तीरावर आलो. (देशस्थ असल्याने "गोदावर्याः उत्तरे तीरे की दक्षिणे तीरे ? हे भान सतत जागृत रहाते. आपली पुरातन संस्कृती याच दोन तीरांवर उदयाला येउन वाढली याची जाणीव या नदीबद्द्ल कृतज्ञता वाढवते.) धर्माबाद ते बासर या १६ किमीच्या प्रवासाला जवळपास तासभर लागला.


आंध्र प्रदेशात (आता तेलंगणा) शिरताना दिसलेली आंध्र प्रदेश परिवहनची "पल्ले वेलुगू" (ग्रामीण सेवा बस).


ह्या पाटीनंतर तर ८-९ किमीचा रस्ता खूपच खराब होता.


आंध्रातले टिपीकल पिवळे ऎटोरिक्शा.


बासरमध्ये शिरल्या शिरल्या आंध्र प्रदेश परिवहनच्या खूप बसेसने आमचे स्वागत केले. त्यातली हे एक वैशिष्ट्यपूर्ण बस. आंध्रातल्या सगळ्या बसेस बहुतेक झेड सिरीजच्या असतात पण ही पहिलीच टी.ए. सिरीजची बस बासर ला बघितली.

बासरमध्ये रहाण्यासाठी खूप लॊज टाइप व्यवस्था आहेत. टिपीकल. अगदी मूलभूत सोयी सुविधा तिथे असतात. एक दोन (आर्य वैश्य समाज, तिरुपती देवस्थान वगैरे) चांगल्या धर्मशाळाही आहेत. जेवणाची मात्र आपली थोडी पंचाइतच होते. संस्थानाच्या आवारात ज्ञान सरस्वती संस्थानाचे एक उपहारगृह आहे पण तिथे कायमच गर्दी असते. मंदीराच्या अगदी समोर एक गायत्री खानावळ म्हणून आहे. आम्हाला पोहोचायला दुपारचे १२.३० झालेले होते. त्यामुळे आम्ही तिकडे मोर्चा वळवला. तिथेही गर्दी होतीच पण आम्हाला बसायला एक टेबल कसेबसे मिळाले. पण जेवण घश्याखाली उतरेना. आजुबाजूला अत्यंत अस्वच्छता होती आणि त्यात एकेक घास अक्षरशः पोटात ढकलावा लागत होता. कसेबसे जेवण आटोपले आणि हात धुवायला गेलो. तिथे तर ओकारीच येइल एव्हढा गचाळपणा होता. बासर गावातले एकमेव हॊटेल असल्याचा हा मालक गैरफ़ायदा उचलत होता हे जाणवले. लोकांना पर्याय नव्हता म्हणून, नाहीतर हे हॊटेल केव्हाच ओस पडायला हवे होते. अर्धपोटीच निघालोत. मंदीरातील दर्शन दुपारी १२ ते २ बंद असल्याची माहिती मिळाली. मग संध्याकाळीच दर्शन घेण्याचे ठरवले.


चांगल्या रहाण्या खाण्याची सोय बघायला आम्ही गावाबाहेर पडलो. निझामाबाद रस्त्यावर २-३ किमी गेले असू नसू तर हे रिसोर्ट दिसले. बासर सारख्या गावात न शोभणारे. इंद्रप्रस्थ रिसोर्ट हॊटेल. (आंतरजालावर माहिती उपलब्ध आहे.) बाहेरून छान वाटले. आत मोर्चा वळवला तर् इथेच रहाण्याचे नक्की केले. खूपच सुंदर व्यवस्था.सहप्रवासी सौ. वैभवी आणि चि. मृण्मयी. तीन तारांकित निवास व्यवस्था आणि मुख्य म्हणजे छान भोजन व्यवस्थेमुळे खूष.ड्रायव्हरसाहेब. जरा थकलेले. ड्रायव्हिंगमुळे नाही तर खराब रस्त्यांमुळे.


इंद्रप्रस्थ हॊटेल येथील भव्य एन्ट्रन्स लॊबी.


स्वछ सुंदर आणि आरामदायी निवासव्यवस्था. परवडणा-या दरात. (१७०० रूपये एका दिवसासाठी फ़क्त)

संध्याकाळी छान शुचिर्भूत होउन दर्शनासाठी गेलोत. गर्दी अजिबात नव्हती. २०११ मध्ये प.पू. महाराजांच्या घरील सर्व मंडळींबरोबर आम्ही इथे आलो होतो तेव्हाचा अनुभव लक्षात घेऊन ५० रु. दर्शन तिकीट घेण्याकरिता गेलो तेव्हा काउंटर वरच्या भल्या माणसाने सांगितले "गर्दी अजिबात नाही. तसेच लवकर दर्शन होइल."

छान निवांत दर्शन झाले. शुक्रवार संध्याकाळ आणि दर्शन यांचा एक अपूर्व योग माझ्या आयुष्यात आहे. तिरूपती बालाजी चे पहिले दर्शनसुद्धा शुक्रवारी प्रदोषवेळीच झालेले आहे. अत्यंत प्रसन्न चित्ताने जगदंबेचे दर्शन घेतले. स्तवन केले. खूष होउन परतलो.

फ़ोटो काढण्यास मंदीर परिसरात बंदी आहे हे वाचल्यामुळे मोबाइल, कॆमेरा इ. मंदीराच्या लॊकरमध्ये ठेवून दर्शनाला गेलो. मंदीरात मात्र बरीच मंडळी अगदी देवीसमोरसुद्धा मोबाईल वर बोलताना दिसली. हसावे की रडावे हेच कळेना. अरे बाबा, एव्हढेच तुझे काम महत्वाचे आहे तर दर्शनाला का येतोयस ? भगवंतासाठी १० मिनीटे सुद्धा अव्यभिचारी निष्ठा आपल्यामध्ये नसेल तर आपल्यावर त्या भगवंताने कृपा तरी का करावी ? टेक्नॊलॊजी वापरता आली म्हणजे शहाणपण आलेच असे होत नाही., असो. आम्ही तृप्त मनाने परतलो.
रात्री जेवण व आराम छान झाला. पुढल्या वेळी बासरला आल्यानंतर इथेच उतरायचे नक्की केले.

दिनांक १४/०६/२०१४ : 


परतताना बासर-धर्माबाद-बिलोली हा रस्ता घ्यायचा नाही हे ठरले होतेच. त्यामुळे तेलंगणा-कर्नाटक करून राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ ला लागता येईल का ? याचा शोध घेतला तर एक रस्ता मिळाला. परतताना एक ६०-७० किमी जास्त पडत होते पण माझी हरकत नव्हती. एका नवीन प्रदेशातून जायला मिळणार होते. एक नवीन अनुभव गाठी पडणार होता.बासरवरून निघालो तेव्हा सकाळचे ०७.५० झाले होते. रात्रभर पाउस पडून गेल्याचे जाणवत होते. किंबहुना निघतानाही रिमझिम पाउस सुरूच होता. मस्त पावसाळी हवेत निघालो. सौ. वैभवी पावसाळी वातावरणाची क्षणचित्रे टिपण्यास सिद्ध झाली.बासरलाच गोदावरी नदी आम्ही पुन्हा पार करून दक्षिण तीरावर आलोत. पुलावरून टिपलेली माय गोदावरी.


एक वेगळ्याच प्रकारची दगडांची रचना आंध्रात बघायला मिळते. महाराष्ट्राला आपण "दगडांच्या देशा" म्हणतो पण आंध्र हा मला खरा दगडांचा देश वाटतो. त्यातलीच ही एक रचना.


निझामाबाद्पर्यंत असलेला आंध्रातला राज्य महामार्ग. खूप छान स्थितीत असलेल्या या मार्गावरून जायला खूप मजा आली. हवासुद्धा कुंद पावसाळी अशीच होती.


नेहेमीच्या "पल्ले वेलुगू" हून वेगळी असलेली ही बस. बहुतेक खाजगी असावी कारण आंध्रात खाजगी बस भाडेतत्वावर घेउन महामंडळ चालवत असते.


नवी पेठ सोडून निझामाबाद कडे वळल्यावर निझामाबादच्या बाहेरच दिसणारा हा एक विशाल जलाशय. इथे जलक्रिडेची वगैरे सोय आहे. निझामाबादवासियांसाठी हा एक पिकनिक स्पॊट असणार. तिथे तशी पाटीपण आम्हाला दिसली.


निझामाबाद-नवीपेठ-बोधन-नांदेड. निझामाबाद शहरात दिसलेली महाराष्ट्र एस. टी. ची बस.


निझामाबाद शहरात दिसलेला हा एक वैशिष्ट्यपूर्ण ट्रक. स्थानिक मालवाहतुकीसाठी याचा वापर होत असणार. मुद्दाम फोटो काढायला लावला.


आंध्र प्रदेश परिवहनच्या अनेक सेवेंपैकी ही "इंद्र" सेवा. सर्वसामान्यांना परवडणा-या दरात वातानुकूलीत सेवा देणारी ही बस.

आंध्र प्रदेश परिवहनची डिलक्स सेवेची बस. २ बाय २ पुशबॆक सेवा. खूप लोकप्रिय आहे.

निझामाबाद मध्ये पोटपूजा करण्यासाठी चांगले उपहारगृह शोधत निघालो. आमच्या कल्पनेपेक्षाही निजामाबाद छान आणि मोठ्ठे शहर निघाले. फ़क्त उघडी गटारे शहराच्या सौंदर्यात बाधा आणताहेत असे वाटून गेले. इथेही मराठी माणसांचा टक्का बराच आहे पण सगळे आता पक्के तेलंगी झाले आहेत. इथले रोटी-बेटी व्यवहार चंद्रपूर, राजुरा इ. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात होत असतात. आंध्र प्रदेश टुरिझमचे "हरिता" उपहारगृह छान वाटले. स्वच्छता आणि चव वाखाणण्याजोगी होती. पुढच्या मार्गाचा काहीच अंदाज नसल्यामुळे आम्ही भरपूर पोटोबा इथेच करून घेतला. आता अगदी दुपारी चार पर्यंत जेवणासाठी चांगले हॊटेल मिळाले तरी चालू शकत होते. निझामाबादवरून सकाळी ०९.४० ला निघालो. एका नव्या रस्त्याच्या शोधात. विचारत विचारत शहरातून मार्ग काढला आणि निझामाबाद-वर्णी-बांसवाडा राज्य महामार्गाला लागलो.


दगडांची वैशिष्ट्यपूर्ण रचना. अशा रचना जागोजागी दिसतात. पहिल्यांदा उत्साहाने फोटो घेतलेत पण नंतर नंतर कंटाळा येईपर्यंत अशाच दगडरचना दिसत जातात मग उत्साह मावळतो.
हा राज्य महामार्ग उत्तम होता. दोन्ही बाजुंना घनदाट जंगले. अगदी चंद्रपूर-मूल-गडचिरोली रस्त्याची आठवण यावी इतकी घनदाट वने आणि गुळगुळीत रस्ता. वळणावळणांच्या या रत्यावर आम्ही खूप मजा करून घेतली. वाहतूकही फ़ारशी नव्हती.


आंध्र प्रदेशातील (आता तेलंगणातील) खेड्यांमध्ये दिसणारी ही टिपीकल दृष्ये. एखाद्या तेलुगू किंवा तामिळ सिनेमात असावी इतपत छान.


वाटेतल्या निजामसागर नावाच्या छोट्याशा खेडेगावतले हे बसस्थानक. टुमदार. छोटेसे.
येल्लारेड्डी गावातही हा एक छान जलाशय दिसला.

मध्येच थोड्या चुकीमुळे आम्ही रस्ता चुकलोत आणि चांगले १०-१२ किमी पुढे गेल्यानंतर मेढक या गावाचा मार्ग दिसायला लागला. मेढक गाव आम्हाला लागणार नव्हते. मग येल्लारेड्डी गावात विचारपूस केल्यानंतर परत ७ किमी फ़िरून निझामसागर गावात फ़ाटा घेण्याचा सल्ला मिळाला. आम्ही परत फ़िरलोत. आंध्रात फ़िरताना एक गोष्ट मोठी मजेशीर होत होती. इथल्या स्थानिकांना अंतराची नेमकी जाणीव होती. ७ किमी म्हणजे बरोबर ७ किमी. आम्ही हा अनुभव ब-याचदा घेतला. गाडीच्या स्पीडोमीटर मध्ये बघून नेमके तेव्हढे अंतर कापले म्हणजे मार्गदर्शित स्थळ यायचेच यायचे. मजाच.
पुन्हा एक दगडांची वैशिष्ट्यपूर्ण रचना.


आंध्र प्रदेश परिवहनचे भूषण असलेली "सुपर लक्झरी" बस.जाहिराबाद जसेजसे जवळ येत चालले तसा आम्हाला एक अतिविशाल जलाशय दिसला. बराच वेळ तो आमची सोबत करीत होता आणि एक सरळसोट रस्ता. इतका सरळ की कुठेही वळायला तयार नाही. पट्टीने नकाशावर आखल्यासारखा, कंटाळा येईपर्यंत सरळ सोट.
आणि शेवटी आंध्रातल्या ग्रामीण भागाचा सुंदर प्रवास संपून राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ ला आम्ही जाहिराबादला लागलोत. शेवटी शेवटी किलोमीटर किलोमीटर पसरलेल्या आमराया आणि त्यांच्या बाहेरच बसून भरपूर आंबे विकणारी बरीच मंडळी दिसलीत. एका ठिकाणी मोह अनावर होउन थांबलोत. बरेच आंब्यांचे प्रकार तिथे विक्रीला होते. "मेहमुदा" वगैरे आंध्रातील जरा नवीन प्रकार घेतलेत. नेहमीचे "बेलमपल्ली" वगैरे होतेच. 

जाहिराबादला महिंद्राच्या ऒटोमोटिव्ह डिव्हीजनने स्वागत केले. बराच मोठा परिसर आहे महिंद्राचा. खूप आणि खूप प्रकारची नवनवीन वाहनेही दिसलीत. दुपारचे दोन वाजले होते. पुढे बरेच अंतर कापायचे होते म्हणून थांबून फोटो वगैरे काढता आले नाहीत.जाहिराबादनंतर सरळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ च होता. हुमणाबाद ला महाराज माणिकप्रभूंची आठवण आली पण बायपासने निघाल्यामुळे गाव बघता आले नाही. शेवटी बसवकल्याण फ़ाट्यावर दुपारी २.३८ ला आलो आणि सरळ गाडी हॊटेल गुजरातमध्येच घेतली. चांगले जेवण आणि जेवणानंतर पान बिन झाले. मग सरळ सोलापूर गाठण्याच्या उद्देशाने निघालो. एक चांगला आणि ऐनवेळी आखलेला प्रवास संपत आल्याची बोचरी जाणीव होती. पुढच्या लांबवरच्या प्रवासाचे नियोजन गाडीत सुरू झालेले होते.

नळदुर्गला संध्याकाळी पोहोचलो. तिथल्या प्रसिद्ध किल्ल्याचा फोटो गाडीतूनच घेतला.

सोलापूरला खरेदीसाठी जवळपास तासभर थांबून रात्री ९.३० ला सांगोल्याला पोहोचलो. जाताना ४५२ किमी तर येताना थोडे जास्त ५०८ किमी अंतर पडले. 

एखाद्या वेळेस नागपूरला जाताना बासर मार्गेही जावू शकतो असा विचार झाला. (बासर-नागपूर अंतर ३६० किमी)

एक समाधानकारक प्रवास.1 comment: