Monday, July 7, 2014

आता आवडीचा, पुरवावा सोहळा

" आता आवडीचा, पुरवावा सोहळा
        येउनी गोपाळा, क्षेम देइ "

वारकरी संप्रदायात मोठीच मजा आहे बुवा. मैलोनमैल वारकरी दिंडीतून चालत येत विठठलाला भेटायला येतात पण तो तर अठठावीस युगांपासून कटेवरी कर, विटेवरी पाय ठेवून भक्ताची वाटच बघतो आहे. " भेटीचिया परी, उतावीळ मन " अशी अधीर अवस्था श्री तुकोबारायांची झाली आहे आणि विठठलाचीही अवस्था वेगळी नाहीच. त्यालाही या भक्तवृंदांना मनापासून भेटायचे आहेच. पण विठू सगळ्यांनाच भेटतो का ?

संतकवी दासगणू महाराजांनी श्री गजाननविजय या मोठ्या प्रासादिक ग्रंथात लिहून ठेवल्याप्रमाणे " सारखाच भेटे सारख्याशी, पाणीच मिळे पाण्याशी, विजातीय द्रव्याशी, समरसता होणे नसे " विठूमाउलीचे खरे दर्शन कोणाला होइल ? तर जो त्याच्यासारखा असेल त्यालाच.

तो गोपाळ आहे.  गो  म्हणजे गाय आणि गो म्हणजे इंद्रिये ही. गायी पाळण्याचा त्याचा धर्म त्याने मागील युगात पूर्ण केल्यानंतर तो कलियुगात इथे उभा झाला आहे. मग त्याच्या सारखे गोपाळ होणे म्हणजे (आपल्या) इंद्रियांचे पालनकर्ते होणे. इंद्रियांच्या दास्यत्वात राहून त्यांचे पालनकर्ते होता येणार नाही. त्यांच्यावर प्रभूत्व गाजवावे लागेल. आणि असे जे गोपाळ असतील त्यांना भेटण्यासाठी तो अठ्ठावीस युगांपासून वाट पहातो आहे. त्याची ती इच्छा आपण पूर्ण करणार आहोत का ?

वारीचा पूर्ण मार्ग पायदळी तुडविला. अगदी सगळी व्रते पाळलीत. पण मन जर घराच्या, संसाराच्या व्यापातच अडकून पडत असेल तर विठू कसा भेटणार ? " मरताना इच्छा बाकी ठेवून मरण आले तर तो मृत्यू आणि जिवंतपणीच सर्व इच्छांचा लोप केला गेला असेल तर तो मोक्ष असे आमचे साधे तत्वज्ञान आहे. 

" आमच्या वाटण्या झाल्यात ना बाई, पंधरा वर्षांपूर्वी, तेव्हा मी माझी सगळी भांडीकुंडी धाकट्या जावेला देवून टाकलीत. अगदी कशा कश्शाचा मोह बाळगला नाही " हे जर पंधरा वर्षांनंतरही लक्षात राहत असेल तर मग तो त्याग म्हणता येइल का ? भौतिकदृष्ट्या त्याग झाला पण मनात तर ते सगळ अजूनही आहेच ना ? हे सगळे विकार आपल्या कर्माच्या चंद्रभागेत धूवून, आपल्या भावनांचे वाळवंट तुडवून मग विठूला भेटावे. त्याच्यासाठी मग त्याच्या राउळापर्यंत जाण्याची गरज नाही, तोच तुम्हाला भेटायला वाळवंटात येतो की नाही ते बघा. 

ज्ञानोबामाउलींचा " भेट देउ गेले तव मी ची मी एकली " हा अद्वैताचा अनुभव आपल्याला एकदा तरी यायला हवाय ना ? संत एकनाथ महाराजांना प्रत्यक्ष परमेश्वराने सांगितले " तुज मज नाही भेद, केला सहज विनोद ". हे तुमच्या माझ्या बाबतीतही घडायला हवेय ना ? म्हणून त्या दृष्टीने वारीकडे बघायला हवे. केवळ आपल्या वार्षिक धार्मिक वेळापत्रकांत एक अपरिहार्य गोष्ट म्हणून "टिक" करण्याइतपत वारी नसावी. (त्या सगळ्या गोष्टी आपण कार्यालयीन कामकाजात करतोच की.)

आषाढ शुद्ध दशमी शके १९३६

(आभार : प्रा. राम शेवाळकर, श्री बाबामहाराज सातारकर, श्री. विवेकजी घळसासी यांची ऐकलेली प्रवचने.)1 comment:

  1. अगदी सोप्या, सरळ शब्दात मर्म ग्रहण. धन्यवाद.

    ReplyDelete