Showing posts with label पंढरीची वारी. Show all posts
Showing posts with label पंढरीची वारी. Show all posts

Tuesday, June 24, 2025

आनंदवारी

"चला बाई, ओलांडला आपन दिवे घाट. काय भारी वाटतय ना या वारीत येऊन !"


"आपल्या महाराजांचा रथ, त्याच्या संगटच्या भजनी दिंड्या, मध्ये मध्ये होणारी रिंगनं, त्यात आपन सगळे खेळत असलेल्या फ़ुगड्या, ते घोड्या्चं रिंगन, किती भारी !"


"मुक्या जनावरालाबी येवडी शिस्त ! हा महाराजांचाच चिमित्कार बाई."


"या सगळ्या चालन्यात आणि या व्यापात रात् कशी होते आणि दररोज मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन आपण आपली पिठलं भाकरीची वाढलेली शिदोरी कशी संपवतो ? ते कळतच नाही बाई. मुक्कामाच्या जागी जमिनीवरच, कांबळं अंथरून आणि एखादी गोधडी, जुनेरं पांघरून केव्हा आन कशी निवांत झोप लागते ? हे बी कळतच नाही बाई."


"घरी का बर नसेल येत आशी झोप ? आणि घरी का बर नसेल लागत अशी भूक ? घरी तर छान बेडरूममध्ये मऊमऊ गाद्या. दुलया आहेत. मस्त येसी लावून घेतलाय मालकांनी."


"घरी छान मळा आहे. ताजा भाजीपाला येतो. मळ्यात राबनारी गडीमाणसं हायेत खरी पन आपल्यालाबी त्यांच्या मागे कमी बघावं लागतय का ? रोज तशी घरात, मळयात धावपळ होतेच बाई. तरीबी घरी भूक लागतच नाही. इथं मात्र अशी भूक लागते की बाई आनखी भाकरी वा्डा म्हनायला लाज वाटते. पण आजूबाजूच्या मैतरणीबी तशाच खातायत आणि इथे कुणीबी तुमच्या खान्याकडे लक्ष देत नाहीत म्हटल्यावर आपणबी पोटभर जेवतोय. संकोच न करता. अशी भूक घरी कधी लागेल बरं ?"


"घरी गुदस्त साली सून बी आलीया. माजं पोरगं चांगलं हाय. शेतकी कालिजात शिकलं सवरलं आन घरचीच शेती, मळा चांगला करतुया की आता. सूनबी शेजारच्या गावातली, तशी लांबच्या भावकीतलीच, गरीबाघरची पोर. चांगली हाय. अगदी पोटच्या पोरीसारकी समदं करती माजं आन माज्या धन्याचबी."


"पुन्य लागतं बाई अशा संसाराला. माजं धनी आनि माजे सासू सासरे दोनीबी वारकरी. मीच थोड्या सुदारक घरातनं आले. माज्या बा ला आनि आई ला बी आसं द्येवाधर्माचं खूप नवतं. या घरात मला देताना आमच्या आत्यानं, मावशाईनं मला खूप सांगितलं व्हतं ’बाई, वारकरी घरात जातीया. संबाळून वाग गं. रूढी, परंपरा जमवून घे गं बाई.’ पन मला त कंदीच असं काई येगळ वाटलं नाई बाई या घरात वागताना. माजी सासू आन माजे मामंजी कंदीच मला ’रूकमाई’ शिवाय हाक मारले नाईत. खूप प्रेम, आदर दिला म्हाता-यानं आन म्हातारीनं बी."


"दोन वर्षामागं सासू गेली, एकादशीला. सकाळी उटून न्हाली, धुली आन म्हाता-याच्या सोबत सकाळी चा पिता पिता म्हाता-याच्याच अंगावर मान टाकून कशीशीच करू लागली बाई. मंग म्हाता-यानं शांतपनं तिच्याकडून राम नाम म्हनून घेतलं बाई. राम नामातच म्हातारीचा श्वास गेला. म्हातारा तशातही आनंदी जाला. ५२ वर्साचा संसार जाला हुता पन म्हाता-यान आनंदान निरोप दिला सासूला. ’भाग्यवान होती बा’ म्हनत राईला. म्हातारीला आगीच्या हवाली करताना एकदाच डोळ्यात पानी तरारलं 

म्हाता-याच्या पन नंतर कंदीबी नाई."


"सासू नंतर दोनच महिन्यात सासरा बी गेला. चालता बोलता. घरी सकाळी सकाळी उटला, अंगोळ करून माळ घेऊन देवाम्होरं बसला आन तिथंच गलंडला. माळ हातातच ठेवून गेला म्हातारा, एकादशीलाच. आख्ख गाव लोटलं होत म्हाता-याच्या राखेला. विमान बांदलं लोकाईनं त्याच्यासाटी. मोठाच भाग्यवान म्हातारा. मुला नातवाच्या खांद्यावर गेला आनि मातीत मिसळला.". 


"सासू सासरे असेपावेतो कंदी वारी घडली नाई. त्यांनी बी कंदीच म्हटलं नाई का हे कर आन ते कर म्हनून. गेल्या वर्सी वारीची लय ओढ लागली व्हती बाई माजी मलाच. पन घरी नवीन सून आलती, ती माझ्या पोराचं आन माज्या धन्याचं, घरचं समदं कसं करनं ? काय करनं ? काय की बाई ? अशी माजी मलाच धास्ती होती म्हनून गेल्या वर्सी वारीला न्हाई गेली."


"पन सून चांगली हाये. घर, मळा, शेती समदं चांगलं संबाळतीया. सोताच्या नव-याचं आन आम्हा दोगांचबी चांगलं करतीया. म्हनून या येळी धन्याला आन पोरगा सुनेला इचारून वारीत आलीया."


"इतं आली हाये खरी आन अजूनबी घरचीच याद येतीया. इथं नाव कदी घेऊ ? त्या इट्टलाला मनातलं कदी सांगू ? त्याला सांगाव त्याच्यापाशी काईतरी मागाव अस काईच न्हाई म्हना. काय मागू त्याच्याकडं?"


"ठरलं. त्याच्यापाशी मागू ’बापारे, माज्या सासू सास-याला लाबलं तसच भाग्य आमाला बी लाबू दे. तुजं ध्यान आयुक्षभर ठेव आमच्यात आन तुज्यात आमचबी ध्यान राऊ दे.’ आजून काय मागायच असतया ?"


"वारीत आलो तं मागायचच असतं का त्याच्याकडं ? हा वारीतला आनंद समद्या जीवनात नेहमीच राऊ दे बापा. कुनाशी काई देनं नाई न घेनं नाई. तुज्या ओढीनं पावलं पडतायत बस्स. पायाला काटे बोचतायत का चिखल्या पडतायत काईच परवा न्हाई. बस तुजं दर्सन, तुज्या कळसाचं दर्सन झाल की वाटचाल सरली. मंग चाललेल्या वाटेचा हिशेब कुनी ठेवायचा ? तसच तुज्यामंदी मिळून जायला या देहाची वाटचाल ठीव. मंदी काय सुक दुक आलं त्याचा हिशेब कशाला ठिवायचा ? शेवटच्या टायमाला तूज्यापाशी पोचलो, तुज्यात मिळालो की झाली की देहाची आनंदवारी. मग संसार सुकी आहे का दुखी आहे ? याचा काय फ़रक पडनार बापा ? जीवनाचीच अशी आनंदवारी होऊ दे."


"बोला, पुंडलिक वरदा हारी विठठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सदगुरूनाथ महाराज की जय."



- आपले जीवन हे आनंदवारी व्हावे ही भावना मनात कायम बाळगणारा, भोळा भाविक प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


मंगळवार, २४ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५





Monday, July 7, 2014

आता आवडीचा, पुरवावा सोहळा

" आता आवडीचा, पुरवावा सोहळा
        येउनी गोपाळा, क्षेम देइ "

वारकरी संप्रदायात मोठीच मजा आहे बुवा. मैलोनमैल वारकरी दिंडीतून चालत येत विठठलाला भेटायला येतात पण तो तर अठठावीस युगांपासून कटेवरी कर, विटेवरी पाय ठेवून भक्ताची वाटच बघतो आहे. " भेटीचिया परी, उतावीळ मन " अशी अधीर अवस्था श्री तुकोबारायांची झाली आहे आणि विठठलाचीही अवस्था वेगळी नाहीच. त्यालाही या भक्तवृंदांना मनापासून भेटायचे आहेच. पण विठू सगळ्यांनाच भेटतो का ?

संतकवी दासगणू महाराजांनी श्री गजाननविजय या मोठ्या प्रासादिक ग्रंथात लिहून ठेवल्याप्रमाणे " सारखाच भेटे सारख्याशी, पाणीच मिळे पाण्याशी, विजातीय द्रव्याशी, समरसता होणे नसे " विठूमाउलीचे खरे दर्शन कोणाला होइल ? तर जो त्याच्यासारखा असेल त्यालाच.

तो गोपाळ आहे.  गो  म्हणजे गाय आणि गो म्हणजे इंद्रिये ही. गायी पाळण्याचा त्याचा धर्म त्याने मागील युगात पूर्ण केल्यानंतर तो कलियुगात इथे उभा झाला आहे. मग त्याच्या सारखे गोपाळ होणे म्हणजे (आपल्या) इंद्रियांचे पालनकर्ते होणे. इंद्रियांच्या दास्यत्वात राहून त्यांचे पालनकर्ते होता येणार नाही. त्यांच्यावर प्रभूत्व गाजवावे लागेल. आणि असे जे गोपाळ असतील त्यांना भेटण्यासाठी तो अठ्ठावीस युगांपासून वाट पहातो आहे. त्याची ती इच्छा आपण पूर्ण करणार आहोत का ?

वारीचा पूर्ण मार्ग पायदळी तुडविला. अगदी सगळी व्रते पाळलीत. पण मन जर घराच्या, संसाराच्या व्यापातच अडकून पडत असेल तर विठू कसा भेटणार ? " मरताना इच्छा बाकी ठेवून मरण आले तर तो मृत्यू आणि जिवंतपणीच सर्व इच्छांचा लोप केला गेला असेल तर तो मोक्ष असे आमचे साधे तत्वज्ञान आहे. 

" आमच्या वाटण्या झाल्यात ना बाई, पंधरा वर्षांपूर्वी, तेव्हा मी माझी सगळी भांडीकुंडी धाकट्या जावेला देवून टाकलीत. अगदी कशा कश्शाचा मोह बाळगला नाही " हे जर पंधरा वर्षांनंतरही लक्षात राहत असेल तर मग तो त्याग म्हणता येइल का ? भौतिकदृष्ट्या त्याग झाला पण मनात तर ते सगळ अजूनही आहेच ना ? हे सगळे विकार आपल्या कर्माच्या चंद्रभागेत धूवून, आपल्या भावनांचे वाळवंट तुडवून मग विठूला भेटावे. त्याच्यासाठी मग त्याच्या राउळापर्यंत जाण्याची गरज नाही, तोच तुम्हाला भेटायला वाळवंटात येतो की नाही ते बघा. 

ज्ञानोबामाउलींचा " भेट देउ गेले तव मी ची मी एकली " हा अद्वैताचा अनुभव आपल्याला एकदा तरी यायला हवाय ना ? संत एकनाथ महाराजांना प्रत्यक्ष परमेश्वराने सांगितले " तुज मज नाही भेद, केला सहज विनोद ". हे तुमच्या माझ्या बाबतीतही घडायला हवेय ना ? म्हणून त्या दृष्टीने वारीकडे बघायला हवे. केवळ आपल्या वार्षिक धार्मिक वेळापत्रकांत एक अपरिहार्य गोष्ट म्हणून "टिक" करण्याइतपत वारी नसावी. (त्या सगळ्या गोष्टी आपण कार्यालयीन कामकाजात करतोच की.)

आषाढ शुद्ध दशमी शके १९३६

(आभार : प्रा. राम शेवाळकर, श्री बाबामहाराज सातारकर, श्री. विवेकजी घळसासी यांची ऐकलेली प्रवचने.)