Monday, August 15, 2016

नालेसाठी घोडा....

शालेय जीवनात मराठी भाषेच्या पेपरमध्ये "खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा" असा प्रश्न असायचा. त्यावेळी वाक्प्रचारांचा "वाक्यात" उपयोग केला तरी "जीवनात" उपयोग करण्यासाठी जीवनाला भिडावे लागते हा धडा या आयुष्यानेच दिला.

"नालेसाठी घोडा विकत घेणे" हा मराठी भाषेतला एक जुना वाक्प्रचार. त्याचा प्रत्यय अगदी अलीकडे आला.

सांगोल्यात असताना दोन वर्षांपूर्वी एका रविवार बाजारातून छान ब्लॅंकेटस आणली होती. अगदी स्वस्तात मिळत होती म्हणून जोडीच घेतली. सुंदर रंगीत ब्लॅंकेटस.  आणि छान उबदार गरम होती. 
दोन वर्षे छानपैकी वापरलीत. आता आताशा ही ब्लॅंकेटस अंगावर घेतल्यावर बोचायला लागलीत याची जाणीव व्हायला लागली. मग स्टार हॉटेल्समध्ये असतात तशी सुती मउ मउ कव्हर्स त्यांना असायला हवीत का ? हा विचार घरात सुरू झाला आणि एका शुभदिनी आम्ही उभयता त्या कव्हर्सच्या शोधासाठी बाहेर पडलो.

शिरपूर तसे उद्योगी शहर असल्याने आम्हाला हवी तशी कव्हर्सची कापडं आणि ती शिवून देणारे शिंपीदादा पटकन सापडलेही. पण हा प्रकार आयुष्यात पहिल्यांदाच करत असल्याने त्याला किती कापड लागेल ? एकंदर खर्च किती याचा काहीच अंदाज नव्हता. त्या कापड दुकानदाराने त्या कव्हर्सची किंमत आणि शिंपीदादांनी त्याची शिलाई सांगितल्यावर तर आश्चर्याचा धक्काच आम्हाला बसला. त्या ब्लॅंकेटसच्या खर्चापेक्षा त्या कव्हर्सच्या कापडाचा आणि शिलाईचा खर्च जवळपास ५ पट होता. तेव्हढ्या पैशात छान नवीन ब्लॅंकेटस झाली असती याची जाणीव आम्हाला झाली पण तोवर वेळ निघून गेली होती. दुकानदाराच्या ठाणातून कापड फ़ाटल्या गेले होते. मग काय ? त्याची खरेदी झाली.

काल ह्या खोळी (कव्हर्स) घरी आणल्यात. ब्लॅंकेटसना त्या घालण्या आधी पाण्यातून काढूयात म्हणून पाण्यात घातल्यात. तशी त्यांना खळही फ़ार होती. खळ जाऊन मऊ होतील मग उद्या घालूयात असा विचार झाला. रात्रभर छान पाण्यात त्या भिजवून ठेवल्यात.आज सकाळी पाण्यातून बाहेर काढताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे त्या खोळी भलत्याच जड आहेत. दरवेळी त्या अशा नुसत्या धूता येणार नाहीत. मग हळूच कन्यारत्नाने आणि त्यांच्या आईसाहेबांनी त्यांची वॉशिंग मशीनची मागणी पुढे रेटली. आता आपल्याला इतके जड कपडे धुवायला वॉशिंग मशिन कशी आवश्यक आहे याची वकिली सुरू झाली. २५० रूपयांच्या ब्लॅंकेटस साठी २५००० रूपयांची वॉशिंग मशिन खरेदी करायची म्हटल्यावर "नालेसाठी घोडा विकत घेणे" या वाक्प्रचाराचा प्रत्यय आला.

No comments:

Post a Comment