Monday, August 1, 2016

प्रवचनांचा संस्कार

कराडला अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत (१९८९ ते १९९३) असताना घळसासी कुटुंबियांशी घनिष्ठ संबंध आला. सुबोध माझ्याच वर्गात तर धाकटा सुधीर माझ्याहून छोटा पण आमचे मित्रवर्तुळ जवळपास सारखेच होते. तेव्हा श्री विवेकजी घळसासींबद्द्ल ऐकायला जरी मिळाले (सुबोध आणि सुधीरचे काका. मला वाटत तेव्हा ते दै.  तरूण भारत, सोलापूर चे मुख्य संपादक होते.) तरी एक प्रवचनकार, निरूपणकार म्हणून त्यांना ऐकण्याचा सुयोग २०१० च्या डिसेंबरमध्येच आला. त्यांना ऐकल्यावर मला नक्की काय वाटले याचे वर्णन मी या लेखात केलेले आहेच. पण त्या शब्दात मला माझ्या भावना पूर्णपणे व्यक्त करताच आलेल्या नाहीत. कारण मानवांच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीत बदल घडवून आणणा-यांना शब्दात बांधता येईल पण सर्वसामान्यांच्या आयुष्यात मानसीक स्थित्यंतर घडवून आणण्याचे सगळ्यात कठीण काम करणा-यांना शब्दात बांधता येत नाही.

श्री विवेकजींच्या प्रवचनांनी तरूण वर्ग भारावला जातो आणि बांधला जातो कारण ते तरूणांची भाषा बोलतात. आजच्या युगात रामायण, श्रीमदभागवतासारख्या पुराण ग्रंथांची उपयोजिता शिकवतात. त्यामुळे ते तरूणांना अतिशय भावतात. आमच्या सगळ्या कुटुंबियांवरच त्यांच्या प्रवचनांचा खूप खोल परिणाम झाला. त्यानंतर नागपुरात जेव्हा जेव्हा त्यांची व्याख्याने, प्रवचने होत असत तेव्हा तेव्हा आम्ही सगळेच त्यांना आवर्जून ऐकत असू. माझी कन्या चि. मृण्मयी तर अगदी वयाच्या ६-७ वर्षापासून अगदी एकाग्रतेने त्यांचे प्रवचन, भाषण ऐकत असे.कालचीच गोष्ट. सौभाग्यवतींच्या वाढदिवसानिमित्त काही खरेदी चाललेली होती. ब-याच दिवसांची "शाळेचा बूट बोचतोय" ही कन्यारत्नाची तक्रार होती. तिच्या वाढत्या वयानुसार तिला बूट पटकन छोटे होतात. गेल्या वेळी अगदी फ़ेब्रुवारी महिन्यातच तिचा बूट फ़ाटला म्हणून नवीन बूट घ्यावा लागला होता. अनायासे बूट चपलांच्या दुकानासमोरून जाताना मी मृण्मयीला म्हणालो, "चल तुला शाळेसाठी नवीन बूट घेउयात." तसा तो बूट ३५० - ४०० रूपयांपर्यंत आला असता त्यामुळे खिशाला परवडण्या्जोगा होता. त्यावर तिने जे उत्तर दिल त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणीच आल आणि त्यानंतर मी त्या उत्तराच्या स्त्रोताचा फ़ार विचार केला आणि त्याचा स्त्रोत मला तिने ऐकलेल्या श्री. विवेकजींच्या प्रवचनात सापडला.ती म्हणाली, "बाबा, नको. माझ्या शाळेतल्या ब-याच मैत्रिणींनी गेल्या २-२ वर्षात नवीन बूट घेतलेले नाहीत. त्यांना थोडा बूट बोचला तर त्या त्या ठिकाणची शिवण थोडी उसवून तो तसाच वापरतात. आता मी पण तो प्रयोग करून पाहते. त्या जुने बूट पुरवून पुरवून वापरत असताना मी एकाच वर्षात दोन दोन जोडी बुटं वापरणं योग्य होणार नाही."

श्री विवेकजींनी श्रीमदभागवतात गोपालकाल्याचे निरूपणात "आपापल्या मुलांना शाळेत आपापले डब्बे आपल्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करायला शिकवा म्हणजे गोपालकाला खरा होईल." असे सांगितल्याचे आम्हा सगळ्यांनाच स्मरत होते. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक सगळे भेदभाव विसरून जाऊन जेव्हा आपण ऋग्वेदातल्या प्रार्थनेप्रमाणे एकत्र येऊ, एकत्र जेवू तेव्हाच "परम वैभवम नेतु मे तत स्वराष्ट्रम" हे आपल स्वप्न साकार होईल. हा संस्कार त्यांच्या प्रवचनांनी दिलेला आहे ह्याची जाणीव काल अगदी प्रकर्षाने झाली. मानवी मनांवर सूक्ष्म संस्कारांनी परिवर्तन घडवून आणणे हे सगळ्यात कठीण काम आणि आजच्या या भौतिकतेच्या अती आहारी गेलेल्या युगात श्री विवेकजी ते करतायत. त्यांना शत शत प्रणाम. 


No comments:

Post a Comment