Thursday, September 29, 2016

असाही एक जीवनानुभव

भाजी खरेदी करणे हा माझ्या आयुष्यातला अगदी आनंदाचा प्रसंग असतो. तसा मी "खादाड" कॅटेगरीत मोडत असल्याने त्यात माझा स्वार्थही असतोच. पण भाजीबाजारात प्रवेश केल्यानंतर अनेक भाजीविक्रेत्यांकडे ही हारीने मांडून ठेवलेली ताजी भाजी, त्यांचे प्रसन्न अवतार, त्यांच्या रंग, रूप, गुणांमधली विविधता मला अगदी मोहवून टाकते. नागपूरला असताना मी जरी मनीषनगर, त्रिमूर्तीनगर ला रहात असलो तरी दर शनिवारी, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी पार राजविलास टॉकिजजवळच्या महाल बाजारातूनच आवर्जून भाजी आणत असे. चंद्रपूरला असताना गोल बाजारातून भाजी आणणे म्हणजेही आनंदाचा प्रसंगच. काही काही ठिकाणांशी आपले गोत्र जुळलेले असतात मग त्यांच्या शिवाय दुसरा पर्याय कितीही चांगला असला तरी आपल्याला आवडत नाही.

सांगोल्याला गेल्यानंतर तर आणखी आनंदाची गोष्ट. दर रविवारी तिथे जवळपासच्या खेड्यांतून आणलेल्या ताज्या भाजीचा आठवडी बाजार भरायचा. मस्त "फ़ार्म फ़्रेश" भाजी. वा ! ही भाजी खूप चविष्टही असायची. दर रविवारी सकाळी बाजारातून भाजी आणणे हा सगळ्या घरासाठी एकूणच आनंदसोहळा असे.



शिरपूरला दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. कार्यबाहुल्यामुळे सकाळी बाजारात जाणे होत नाही आणि संध्याकाळी गेलो की बाजार संपण्याच्या तयारीत असतो त्यामुळे आठवडी बाजाराची मजा अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे मग नेहेमीच्या एक दोन विक्रेत्यांकडूनच नेहेमी भाजी खरेदी होते. त्यातलाच एक अनुभव.

मला स्वतःला भाजी खरेदी करताना खूप घासाघीस करायला आवडत नाही. एखादी गोष्ट खूप महाग वाटत असेल तर ती त्या आठवड्यात खरेदी करायची नाही पण मला त्या आठवड्यात ती गोष्ट खायला हवीच म्हणून मी घासाघीस करत बसत नाही. मी भाजी घेत असताना इतर गि-हाईकांचे संवाद साधारणतः अश्याप्रमाणे ऐकले आहेत.

गि.: अहो, हे  XXXXXX  कसे दिले ?
दु.:    XXX   ला पावकिलो.
गि.: सोनंच विकताय जणू !   XXXXX  ला (साधारणतः अर्ध्या किंमतीत) द्या.
दु.: नाही हो. तेव्हढी तर खरेदीच नाही.
गि.: मग द्या XXXXX    ला. (आता मूळ सांगितलेल्या भावाच्या पाऊणपट किंमत.)
दु.: बरं. (वजन करायला घेतो.)

वजनातही या गि-हाइकाच समाधान होत नाही. " अहो काय एव्हढं काटेकोर मोजताय ? सोनं मोजताय का ? राहू द्या तो टोमॅटो (किंवा बटाटा किंवा वांग ) जास्तीचा. काय बुवा तुम्ही ! " असला संवाद कानावर पडतोच.

 मला नेहेमी प्रश्न पडतो की एखादा टोमॅटो जास्तीचा मिळवून ही गि-हाईक मंडळी काय सुख मिळवत असतील ? खरंतर सोन्याची किंमत कितीही वाढ्ली तरी सणासुदीला सोनाराच्या दुकानांसमोर, पेढ्यांवर निमूटपणे उभे राहून ही मंडळी अव्वाच्या सव्वा भावात सोने खरेदी हूं की चूं न उच्चारता करीत असतील. मग त्यात सोनार किती लुबाडतोय याचा विचार न करता. हीच मंडळी थोड्या जास्त व्याजाच्या आमिषापायी आपली जन्मभराची पूंजी एखाद्या पॉंन्झी कंपनीत अत्यंत आकर्षक स्कीम्स मध्ये गुंतवतात. आणि व्याजाला भुलून मुद्दलाला मुकतात.



आताशा फ़ेसबुक आणि तत्सम सोशल मेडीयावर पण "रस्त्यावरच्या विक्रेत्यांशी घासाघीस करू नका ." छापाच्या पोस्टस फ़िरताहेत. आता हे तत्व आम्ही फ़ार पूर्वीपासून अंमलात आणत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. पण त्या अभिमानाला तडा देणा-या एक दोन घटना अलिकडल्या काळात घडल्यात आणि एक जीवनानुभव मिळाला.

आजवर नागपूरला काय किंवा सांगोल्यात काय, आम्ही ज्या वाहनाने भाजी आणायला जात असू ते वाहन बाजारात नेण्याची सोयच नसायची. आता शिरपूरला आठवडी बाजार वगैरे असा नसल्याने मुख्य रस्त्यावरच्या एक दोन विक्रेत्यांकडूनच आम्ही भाजी घेतो. बर तो रस्ता ही चांगला रूंद वगैरे असल्याने कार त्या दुकानासमोरच उभी करू शकतो आणि तशी ती करतोही. 

भाजीवाल्याकडे आम्ही अजिबात भाव करीत नाही पण त्याच वेळी तीच भाजी भाजीवाला / ली आमच्या या स्वभावाचा अनुभव आल्याने की काय, इतर गि-हाइकांपेक्षा आम्हाला जास्त भाव सांगत असल्याचे आमच्या लक्षात आले. तसे आम्ही त्यांना तोंडावर रंगे हाथ पकडलेही आणि लक्षात आणून दिले. (इतर गि-हाइक भाव विचारताना आम्ही जर तीच भाजी घेत असू तर आम्हाला जास्त भाव सांगितलेला असल्याने दुस-या गि-हाईकाला खुणेने थोडे थांब म्हणून सांगणे किंवा खुणेनेच खरा भाव सांगणे वगैरे, वगैरे.) गरजू किंवा अत्यंत घासाघीस करणा-या गि-हाईकांसाठी त्यांनी घासाघीस केल्यावर भाव कमी करण्याला आमचा कसलाही आक्षेप नव्हता आणि नसेलही पण आम्ही घासाघीस करीत नाही म्हणून मुद्दाम आम्हाला भाव वाढवून सांगणे म्हणजे आम्हाला "घासाघीस न करण्याबाबत" बावळट ठरवणेच होते हे आमच्या लक्षात आले.

नागर जीवनातून ग्रामीण जीवनात गेल्यानंतर जे अनंत जीवनानुभव मिळालेत, धडे आम्ही शिकतोत, त्यातलाच एक.




Wednesday, September 28, 2016

प्रबंध सरळी दे रे राम...

प्रबंध म्हटल्यावर आपल्याला अनेक विद्यापीठीय विद्वान आठवतात. त्यांचे शोध प्रबंध. त्यातली ती विद्वत्तापूर्ण भाषा. आणि सर्वसामान्यांचा त्यांच्याबद्दलचा "आपल्याला त्यांच्या विषयातल तर काही कळत नाही बुवा ." हा कबुलीवजा आदर. जेव्हढं क्लिष्ट, गंभीर तेव्हढं काहीतरी विद्वत्तापूर्ण अशी आपली समजूत झालेली आहे की काय न कळे. 

पण पृथ्वीतलावरचा आजवरचा सर्वात हुशार माणूस काय म्हणतोय ते पण आपण लक्षात घेतल पाहिजे. अहो आपल्याला जर तो विषय नीट समजला तर आणि तरच तो आपण दुस-याला नीट समजावून देऊ शकू ना ?



१९९४ मध्ये यू. पी. एस. सी. परीक्षेसाठी मी मराठी वाड.मय हा विषय ऑप्शन म्हणून घेतला होता. आपल्याला मराठी साहित्यात गती आहे हा माझा आत्मविश्वास वि. ल. भावे कृत "मराठी साहित्याचा इतिहास" आणि मराठी सौंदर्यशास्त्रावरची पुस्तके वाचायला घेतल्यावर पार लयाला गेला.  परिणाम असा झाला की मराठी लिटरेचर आम्हालाच नीट कळलं नाही. त्यामुळे आमचे आय. ए. एस. चे स्वप्न भंगलेच. (फ़ायदा हाच झाला की त्यानंतर पु. लं. च "मराठी वाड.मयाचा गाळीव इतिहास" वाचताना त्यातले नेमके पंचेस कुणाला आणि कुठे मारलेत ते कळून घेऊ शकलो. आणि "भिंत पिवळी पडली" हे एक सौंदर्यवाचक विधान या लेखातले टोमणे नव्याने समजलेत.)

सुदैवाने मला माझ्या पदवी, (Dr. J. G. Muley) पदव्युत्त्अर (एम. टेक.) (Dr. Y. S. Golait)  आणि आचार्य पदवी (पी. एच. डी.) (Dr. R. A. Hegde and Dr. Jigisha Vashi) शिक्षणातही जे मार्गदर्शक लाभलेत त्यांचाही आइनस्टाईनच्या या विधानावर ठाम विश्वास होता आणि आहे. त्यामुळे माझा प्रबंध, मी नक्की काय काम करतोय ? हे सोप्या भाषेत मी सगळ्यांना सांगू शकतो. पण त्याचा तोटा असा होतो की बहुतांशी मित्रमंडळी, शेजारी, नातेवाईक यांचा माझ्या संशोधनावर विश्वासच बसत नाही. "ह्या ! संशोधन इतकं सोपं कसं असेल ?" हा प्रश्न त्यांच्या चेहे-यावर मला वाचता येतो. अर्थात त्यामागचे माझे श्रम, माझे अप्लीकेशन्स माझ्या मार्गदर्शकांना माहिती आहे म्हणून बरय. त्यांना त्याविषयी शंका नाही.

आज समाजात वावरताना विद्वत्तेची झूल पांघरलेली अनेक मंडळी आपल्याला दिसतात. साधा सोपा विषय खूप कठीण करून सांगणे, वेळ भरपूर असतानाही खूप व्यस्त आहोत असे भासवणे अशा मंडळींचा सुकाळू आजकाल सर्वच क्षेत्रात वाढला आहे. सोप काहीतरी मांडणे, दुस-याला वेळ देणे या गोष्टी म्हणजे आपल्या समाजात आजकाल माणूस विद्वान नसल्याचे आणि रिकामटेकडा असल्याचे लक्षण होत चाललेय. समर्थांची उक्ती आपण खरच विसरत चाललोय.

समर्थांनी रामरायाकडे मागणे मागताना " प्रबंध सरळी दे रे राम " का मागितल असेल ? याचा खोल विचार करताना आपल्याला लक्षात येईल की समाजहितासाठी सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत आणि शैलीत आपले प्रतिपादन आवश्यक आहे. आणि विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातही आपला शोध खरोखर सर्वसामान्यांच्या उपयोगात आणायचा असेल तर तो सोपा असणे आवश्यक आहे. खोट्या प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांपायी आपण हे विसरत चाललोय का ?

Tuesday, September 27, 2016

एक वेगळ्या वाटेवरचा प्रवास आणि अनुभव

१९ आॅॅगस्ट २०००. शनिवार. सकाळचे ७ वाजताहेत. कल्याण स्टेशनवरून आईला गीतांजली एक्सप्रेसमध्ये बसवून दिलय. आता मोकळा वेळ. कॉलेजला आज सुट्टी आहे. (शनिवार रविवार सुट्ट्या. अहाहा ! गेले ते दिन गेले.) आत्ता घरी, पवईला, जाऊन काय करायच हा मोठ्ठा प्रश्न आहे. कारण मला सुट्टी असली तरी पार्टनर्सना नाही. ते आपापल्या ऑफ़िसांमध्ये गेलेले असणार आणि आज अर्धा दिवस कामकाज असल तरी दुपारी ४ शिवाय परतणार नाहीत. सगळ्या लोकल्स आता मुंबईच्या दिशेने गर्दी ओसंडून वाहताहेत आणि एव्हढ्या गर्दीत मुद्दाम घरी जाऊन  करणार तरी काय ? हा प्रश्नच आहे.

अचानक लक्षात येतय की इथूनच जवळ माळशेज असल्याच आपण वाचलय. जाऊन बघूयात. एकटाच ? हो. त्याला काय हरकत आहे. सगळ्या मित्र मंडळींच कधी जमेल काही सांगता येत नाही. आता तस खास काम पण नाही. जाऊन हे "माळशेज माळशेज " म्हणजे तरी नक्की काय ? बघूनच येऊयात. त्यावेळी जवळ मोबाईल इत्यादी साधने नव्हतीच. त्यामुळे कुणाला कळवण्याचा वगैरे प्रश्नच नव्हता. खिसा चाचपून पाहिला. कल्याण ते कांजूरमार्ग रिटर्न तिकीट होतेच. शिवाय वर १०० ची नोटही. मग काय जमतय आपल आज माळशेज.



लगोलग मी स्टेशन सोडून कल्याण रेल्वे स्टेशनसमोरच असलेल्या बस स्टॅंडकडे जातोय. साधारण कल्याण - नगर मार्गावर माळशेज असल्याची माहिती असल्याने नगर फ़लाटाकडे जातोय तर तिथे एक बस अगदी निघण्याच्या तयारीत. कंडक्टर काकांना " काका, बस माळशेज ला जाइल नं ? " हा प्रश्न विचारून आम्ही आत. (पत्ता विचारणे, ही बस नेमकी आपल्या गंतव्य स्थळी जाणार की नाही याबद्दल खात्री करून घेण्यासाठी विचारणे यात आपण कधी लाजत नाही. नंतरच्या होणा-या तोट्यांपेक्षा सुरूवातीला थोडे बावळट ठरलो तरी हरकत नाही.)

बस सुरू झालीय. आजवर कधीही न केलेल्या मार्गावरून प्रवास करीत असल्याने प्रवासाची उत्सुकता आहेच. खिडकीची जागा मिळाली नसली तरी जमेल तेव्हढे बाहेर बघून निसर्गाचा आस्वाद घेणे सुरू आहे. आजवर माझी समजूत ही की मुरबाड हे वाडा, मोखाडा बाजूला असावे. पण आमच्या मार्गावर मुरबाड येतय. "इतका सुंदर आणि रमणीय निसर्ग मुंबईच्या इतका जवळ आणि आजवर आपल्याला माहितीच नाही." या जाणीवेने मन जरा खंतावतेय.


(Photo courtesy : www.mygola.com) 

साधारणतः २ तासांच्या प्रवासानंतर माळशेज घाटाला सुरूवात झालीय. मुरबाडनंतर खिडकीची जागा मिळाल्याने आता निसर्गाच सौंदर्यपान मनसोक्त सुरू आहे. कधी थोडासा तर कधी चांगला जोराचा पाऊस लागतोय. वाटेत धबधबे रस्त्यावर आणि रस्त्यावरून जाणा-या वाहनांवर कोसळतायत. घाटात धुकं धुकं. वा दिल खुष.

साधारणतः अर्धा तास घाट चढल्यानंतर गाडी घाटमाथ्यावर येतेय आणि कंडक्टर काका आवाज देतायत "चला, माळशेज वाले उतरून घ्या." बस थांबतेय आणि उतरणारा मी एकटाच. आजूबाजूला घनदाट धुके. माळशेजविषयी मी जे काही ऐकल, वाचल त्यावरून माळशेज म्हणजे खंडाळा लोणावळा माथेरान सारखे हिल स्टेशन असावे अशी माझी समजूत. तिथे जरा ब-यापैकी हॉटेल्स, गेलाबाजार टप-या असतील. एखाद्या टपरीवर मस्त चहा भजी हाणू, थोडी भटकंती करू आणि दुपारी परतू असा माझा बेत. 

पण तिथे सकाळी साडेनऊच्या सुमारास आसपास दाट धुके आणि मी. तिसरं कुणीही नाही. आजवर बघितलेल्या हिंदी इंग्रजी सिनेमांतले धुक्याचे सीन्स आठवायला लागले आणि आतल्या आत पंढरी घाबरायला लागली. थोड इकडे तिकडे फ़िरल्यावर एक माणूस दिसला. त्याच्या जवळ विचारपूस केल्यानंतर त्याने एम. टी. डी. सी. चा रस्ता दाखवला. रस्ता म्हणजे काय ? धुक्यात एकीकडे बोट करून "सरळ जावा" असा सल्ला दिला आणि आमची स्वारी त्या अज्ञात दिशेने निघाली.

आत्ताच घाट चढून आलेलो असल्याने मी ज्या दिशेकडे धुक्यातून जातोय त्या दिशेला दरी आहे हे मला नक्की माहिती होत. मग आता किती पावलांवर दरी असेल ? वाट दाखवणारी व्यक्ती खरंच माणूस असेल ? की एखादा चकवा ? शंकांच मनात थैमान.

घनदाट धुके. अगदी १० फ़ुटांवरचे दिसत नाहीये. अंदाजा अंदाजाने मी पुढे जातोय. पुढे एकदम एक भकास घरवजा बिल्डींग दिसतेय. आत एक मिणमिणता टेंभा पेटलेला दिसतोय. मनुष्यमात्रांची कुठलीही खूण नाही. आत जाण्याची आपली तर हिंमतच नाही. त्या घराला कसाबसा वळसा घालून आणखी पुढे सरकतोय. मग ते एम. टी. डी. सी. च हॉटेल दिसतय. भांड्यात जीव पडतोय.

आत फ़ार गर्दी नाही. रेस्टॉरंट मध्ये जाऊन मेन्यू कार्ड चाळतोय तो धक्काच. साधे कांदेपोहे ३० रूपयांना ? चहा १० रूपयांना. (१९९९ मध्ये हा दर खूप जास्त होता.) माझ्याजवळ वट्ट ७८ रूपये आणि परतीच कल्याणपासूनच तिकीट आहे. चहापोहे शक्यच नाहीत. अशा वातावरणात फ़क्त चहा पितोय. आणि आल्यापावली परत.

परतताना धुकं जरी तेव्हढंच असलं तरी भीती थोडी कमी झालेली आहे. झपझप चालत पुन्हा हायवेवर येतोय. माळशेजच म्हणाव तस सौंदर्य जरी बघायला मिळालं नाही तरी " Destination is important but journey towards the destination is more beautiful and should be enjoyed. " या उक्तीवर विश्वास असल्याने तिथपर्यंतचा प्रवासही खूप एंजॉय केला.

अर्धा तास परतीच्या बसची वाट बघतोय. सकाळचे जवळपास साडेदहा वाजताहेत. कल्याणकडे जाणा-या बसेस नाहीत, ट्रक नाहीत, टेम्पो नाहीत. मुरबाडकडून एक दुचाकी येतेय. त्याला थांबवून चौकशी केल्यावर समजतय की घाटात एका तीव्र वळणावर एक ट्रेलर अडकलाय आणि त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झालीय. वाहतुक सुरळीत व्हायला किमान ३-४ तास नक्की जातील.


 Courtesy : holidayiq.com

त्या एकाकी जागेवर शांत ४ तास उभे राहून बसची वाट बघण्यापेक्षा घाटातून जमेल तेव्हढं अंतर कापत चालत जाण्याचा विचार पक्का होतोय. तेव्हढाच घाट आपल्याला जवळून अनुभवता येईल. निसर्ग खुणावत होताच. मग आम्ही निघालोच. मध्ये एखादी गाडी वगैरे मिळालीच तर लिफ़्ट मागून उतरू घाट. आत्ता तर चालायला सुरूवात करूचयात. चराति चरतो भगः. (मोक्याच्या वेळी स्वतःच्या समर्थनासाठी अशी सुभाषित सुचणे  यासारखं दुसरं सुख नाही, तुम्हाला सांगतो.) 

एक सर येतेय. आता भिजायचच हा विचार पक्का आहे त्यामुळे खिशातलं पैशांच पाकीट प्लॅस्टीकमध्ये टाकून निर्धास्त झालोय आणि सचैल भिजतोय. (मोबाईल तेव्हा नव्हता हा केव्हढा मोठ्ठा फ़ायदा होता नाही ? नाहीतर त्याचीच काळजी लागून राहिली असती आणि मनमुराद आनंद उपभोगता आला नसता.) मस्त पावसात भिजत उतरतोय. मधेच तो माळशेजमधला बोगदा लागतोय. अजूनही दोन्ही बाजूंनी वाहनांचे चिन्ह नाही. रस्त्यावर आडोशाला थांबलेली काही तुरळक स्थानिक वाटसरू मंडळी आणि मी एक भटका मुसाफ़िर. वा ! अवर्णनीय आनंद.


(Photo courtesy : www.mygola.com)

तंद्रीतच उतरतोय. मध्ये मध्ये असंख्य धबधबे लागतायत. मघाशी बसमध्ये होतो. आता मस्त प्रत्येकाखाली भिजून त्यांचा आनंद घेतोय. किती वेळेला भिजलो आणि किती वेळेला अंगावरचे कपडे जोरदार वा-यांमुळे वाळलेत याचा हिशेब ठेवणे सोडलेय. स्वतःची कंपनी स्वतःला किती एंजॉय करता येते याचा नवीन वस्तूपाठ.

गाड्या मध्येच अडकल्या आहेत हे किती छान झालय न ? नाहीतर मुंबईतल्या अशा पावसाळी सहलीवर निघणा-या, बसेस भरभरून येणा-या आणि आपल्या गोंगाटाने, कर्क्कश्श गाण्यांने आणि दारूकामाने वातावरण बिघडवून टाकणा-या मंडळींचीच गर्दी आज माळशेजमधे असती. आज मी आणि निसर्ग. मध्ये कुणीही नाही. 


(Photo courtesy : www.mygola.com)

मध्येच ते ट्रॅफ़िक जॅम झालेल वळण येतय. मोठ्ठा ट्रेलर वळणावर आडवा फ़सलाय. इकडची वाहतूक इकडे, तिकडची तिकडे. दोन तीन कल्याणकडे जाणा-या बसेसही अडकल्यायत. आतले प्रवासी हताश होऊन वाट बघतायत. तेव्हढा नागर संपर्क सोडला तर मी पुन्हा वाटेने एकटाच घाटपायथ्याकडे वाटचाल करतोय.

शेवटी जवळपास ४ तास पायपीट केल्यानंतर पायथ्याशी असलेल्या सावर्णे गावातल्या, एका धाब्यावर विसावतोय. भूक खूप लागलीय. "चराति चरतो भगः" हे जरी खरं असलं तरी "अती चराति प्रज्वालितो जाठराग्निः" हे पण तेव्हढच खरय. (दुसरं सुभाषित अस्मादिकांच आहे. संस्कृत जाणकारांनी मार्गदर्शन करावे. सध्या आमच्या कन्येचा संस्कृतचा अभ्यास घेण्याच्या निमित्ताने आमचंही संस्कृत भाषेच पुनर्विलोकन सुरू आहे. त्यामुळे सुभाषितात एकाची भर पडली.)

धाबा साधासाच आहे. टिपीकल ट्रकवाल्यांसाठीचा. खाटा वगैरे टाकलेला. त्यातल्याच एका खाटेवर बसतोय आणि काय मजा ! पाय आपोआप हलतायत. आता मी ४ तासांच्या पायपीटीनंतर बसलोय ते माझ्या पायांना माहितीच नाही जणू. ते अजूनही चालतायत. धाबा मालकाला सगळी हकीकत सांगतोय आणि त्याच्या कडून माहिती मिळतेय की मी जवळपास ११ किमी अंतर पायीच उतरलोय. स्वतःच्या वल्लीपणाच कौतुक वाटतय. दोन तंदुरी रोट्या आणि दालफ़्रायवर जेवण भागतय आणि परतीसाठी एक बस घाट उतरून येताना दिसतेय. आनंद !

परत कल्याण आणि लोकलने कांजूर आणि तिथून पवई. घरी परतल्यावर पार्टनर्सना हा प्रकार वर्णन करून सांगतोय. ते अचंभित. " लेका, तू कधी काय करशील याचा नेम नाही बुवा. " अशी टिपीकल मकरंद अनासपुरे स्टाईल दाद.

अगदी अविस्मरणीय. जन्मभरासाठी मर्मबंधातली ठेव होऊन राहिलेला वेगळाच आणि अगदी unplanned प्रवास. आज परमेश्वराच्या अधिक जवळ गेल्याचे जाणवले.