Sunday, January 7, 2018

श्री तुकोबांची गाथा - २

संतांना लोकांचा, जगताचा हा अकारण कळवळा असतो. आपल्या डोळ्यासमोर आपल्यासारखे अज्ञ, संसारी जन या संसारसागरात बुडताना त्यांना बघवत नाही आणि म्हणून स्वतः हा संसारसागर प्रभूकृपेने तरून पैलतीरावर गेल्यावरसुद्धा ते आपल्यासाठी या सागरात उडी मारतात आणि आपल्याला या सागरातून बाहेर पडण्याच्या सोप्या मार्गाचे मार्गदर्शन करतात. 


"आहे ते" सकळ कृष्णासी अर्पण I  न कळता मन दुजे भावी II
म्हणऊनी पाठी लागतील भूते I  येती गिंवसीत पाच जणे II
ज्याचे त्या वंचले आठव न होता I  दंड या निमित्ताकारणे हा II
तुका म्हणे काळे चेपियला गळा I ’मी मी’ वेळोवेळा करीतसे II

श्रीमदभागवतातल्या व्दादश स्कंधात श्रीमदभागवताची फ़लश्रृती म्हणून जे दिलय त्यात "नैष्कर्मम आविष्कृतम" ही सुद्धा एक फ़लश्रृती आहे. श्रीमदभागवतात आणि श्रीमदभगवदगीतेतही अकर्म अवस्था वर्णन केली आहे. पण अकर्म अवस्था म्हणजे जगात काहीही न करणे नव्हे. तसे राहणे शक्यही नाही. अकर्म अवस्था म्हणजे कर्म करूनही त्यापासून वेगळे राहणे. हे साधायला, जोडायला मोठी साधना लागते, मोठा योग लागतो.

तीच अवस्था आणि तिच्या अभावापोटी भोगावे लागणारे परिणाम श्री तुकोबांनी येथे सोप्या शब्दात कथन करून सांगितलेले आहेत. या भौतिक सृष्टीत "आहे ते" म्हणजे सकळ दृश्यमान ते कर्म एका जगन्नायकाला अनन्य भावाने अर्पण करून राहावे. पण हे न कळता जो जीव "माझे माझे" करतो त्याला त्या कर्मभोगापायी ८४ लक्ष योनींच्या फ़े-यात अडकून वारंवार जन्म आणि वारंवार मरण या चक्रात अडकावे लागते. देह हा पंचमहाभूतांपासून बनलेला आहे आणि ही पाच भूते आपल्याला आपल्या कर्मांमुळे झोंबून वारंवार जन्म आणि मरण या चक्रात अडकवण्याचा प्रयत्न करतात.

ज्याची आठवण करायची, ज्याच्या प्रभावामुळे आपण सगळ्या प्रकारची कर्मे करायला उद्युक्त होतो त्या जगदीशाची उपेक्षा करून जर आपण ही कर्मे आणि दृश्यमान सर्व जग "माझे माझे" म्हणत असतो म्हणून हा वारंवार जन्म मरण फ़े-यात चकरा मारण्याचा दंड या मूलतः मुक्त जीवाला प्राप्त होत असतो. कायम "मी, माझे" करणा-या अशा जीवाला हा सर्वशक्तीमान काळ गळा चेपून त्याची कामे करायला लावतो आणि तो जीव पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात अज्ञानाने अडकत जातो.

"हे माझे नाही, हे सगळे त्याचे" म्हणायला किती सोपे आहे नाही ? आचरणात आणायला तेव्हढेच कठीण. पण जर नित्य जागृत राहून, भगवंताचे भान ठेवून हा विचार अंमलात आणला तर फ़ारसे कठीणही नसावे. एका दिवसात नाही कदाचित साध्य होणार. पण  हळूहळू मनाला , वृत्तीला सवय होईल आणि हे गुह्य आपल्याला सापडेलही. करायची मग या अभ्यासाला आजपासूनच सुरूवात ?

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
जय तुकोबा माऊली.

                                                                                                       - प्रा राम प्रकाश किन्हीकर  (०७०१२०१८)                                                                                                                 


No comments:

Post a Comment