Sunday, January 21, 2018

श्री तुकोबांची गाथा - ४

श्री तुकाराम महाराजांसारख्या संतांचे त्यांच्या आराध्य दैवताशी कायम एक प्रेमाचे भांडण चालत आलेले आहे. म्हणूनच एका अभंगात "मागणे ते एक, तुजपाशी आहे, देशी तरी पाहे, पांडुरंगा " म्हणणारे श्री तुकोबा या अभंगात काय म्हणतात ते बघुयात.


आम्ही मागो ऐसे, नाही तुजपाशी,  जरी तू भीतोसी, पांडुरंगा II
पाहे विचारूनी, आहे तुज ठावे, आम्ही धालो नावे, तुझ्या एका II
ऋद्धी सिद्धी तुझे, भव्य भांडवल, हे तो आम्हा फ़ोल, भक्तीपुढे II
तुका म्हणे जाऊ, वैकुंठा चालत, बैसोनी निवांत, सुख भोगू II

"पांडुरंग आपल्याला का बरे भेटत नाही ?" असा विचार श्री तुकोबांनी केल्यानंतर कदाचित पांडुरंगाला हा भक्त त्याची सर्व सिद्धी मागून घेईल, त्याला वैकुंठपद मिळावे यासाठी हट्ट करील अशी भीती वाटत असावी असे श्री तुकोबांना वाटले आणि त्यातून पांडुरंगापासून विभक्त नसलेल्या एका भक्ताचे हे लटके भांडण उत्पन्न झाले. श्री तुकोबा म्हणतात की "बा, पांडुरंगा तू भीऊ नकोस कारण तू देऊ शकणा-या गोष्टींपैकी काही आम्हाला नकोच आहे." आपण सगळेच पांडुरंगाजवळ आपल्या सांसारिक अशाश्वत सुखाची सतत मागणी करत असतो आणि तो सुद्धा ती मोठया आनंदाने पुरवत असतो. अहो, त्रैलोक्याचा स्वामी असलेल्या, ऋद्धी आणि सिद्धी ज्याचा घरी पाणी भरताहेत अशा त्या पांडुरंगाला सर्वसामान्य भक्तांच्या सांसारिक अडचणी दूर करण्यास अशक्य असे ते काय आहे ? पण संतश्रेष्ठ तुकोबा त्याच्याकडे ह्या क्षुद्र गोष्टी मागतच नाहीयेत आणि त्याला अशक्य असे ते मागताहेत. ते भगवंताच्या नामाचे प्रेम मागताहेत. "तैसे तुज ठावे, नाही तुझे नाम, आम्हीच ते, प्रेम सुख जाणो" या अभंगातही त्यांनी हाच विचार मांडलाय. देवाचे, परमेश्वराचे नामस्मरण करण्यातली गोडी देवाला कशी ठाऊक असणार ? ती गोडी ख-या भक्तालाच. 

ऋद्धी आणि सिद्धी प्राप्त झाल्यानंतर त्यातून मिळणा-या गोष्टी या सगळ्या तात्पुरत्या अशाश्वत असतात. पण ख-या भक्तीचे ज्ञान झाले, ख-या भक्तीचे भान आले की त्या शाश्वत सुखापुढे या सगळ्या ऋद्धी आणि सिद्धी तुच्छ वाटू लागतात. खरा भक्त हा परमेश्वराकडे त्याचे प्रेम आणि भक्तीच मागत असतो. 

परम पूजनीय बापुराव महाराजांनीही त्यांच्या चरित्रात अशा क्षुद्र सिद्धींचा आणि चमत्कारांचा निषेधच केलेला आपल्याला दिसतो. "जेथे वसे द्वैत, तेथे वसे चमत्कार". ज्याठिकाणी भक्त आणि परमेश्वर वेगळा असेल तेथेच त्या भक्ताला चमत्कारांची प्रचिती घ्यावीशी वाटते आणि येते. पण एकदा भक्त आणि परमेश्वर एकमेकांमध्ये पूर्णपणे विरघळून गेलेत की एकनाथ महाराजांसारखा "तुज मज नाही भेद, केला सहज विनोद" असा अनुभव येतो आणि ज्ञानोबा माऊलींसारखा "पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे " आणि "क्षेमालागी जीव उतावीळ माझा पण क्षेम देऊ गेले तव मी ची मी एकली" असा थरारक अद्वैताचा अनुभव येतो. परम पूजनीय बापुराव महाराज त्यांच्या भक्तांना नेहमी सांगत " नका भुलू चमत्कारासी, रत असावे नामस्मरणासी. देवाचे मज दर्शन व्हावे, हे सुद्धा प्रलोभन नसावे " इतकी उत्कट परमेश्वराप्रती एकात्मतेची भावना साधकाला, भक्ताला साधता आली पाहिजे.

एकदा हे अद्वैत भक्ताच्या अनुभवाला आलं की त्याच्या हृदयात प्रत्यक्ष वैकुंठच अवतरल्याची प्रचिती त्याला येईल हे निश्चित. मग त्याला विठ्ठलाने विमान वगैरे पाठवून वैकुंठात बोलावून घ्यावे ही आशा तरी कशी असणार ? म्हणूनच श्री तुकोबा श्रीविठ्ठलाला ठणकावून सांगताहेत की बा विठ्ठला, तुझ्या त्या विमानाची वगैरे आम्हाला गरज नाही. आम्ही आमच्या हृदयातल्या वैकुंठरूपी सुखाचा एकाच ठायी बसून निवांत आस्वाद घेत राहू. 

केव्हढी ही नामाप्रती निष्ठा ! आणि केव्हढा हा आपल्या भक्तीच्या सामर्थ्यावरचा विश्वास !

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
जय तुकोबा माऊली.

प्रा. राम प्रकाश किन्हीकर  (२१०१२०१८)  


No comments:

Post a Comment