Sunday, January 28, 2018

श्रीतुकोबांची गाथा - ५
न ये जरी तुज मधुर उत्तर,  दिधला सुस्वर नाही देवे II
नाही तयाविण भुकेला विठ्ठल,  येईल तैसा बोल रामकृष्णा II
देवापाशी मागे आवडीची भक्ति,  विश्वासेशी प्रीति भावबळे II
तुका म्हणे मना सांगतो विचार  ध्ररावा निर्धार दिसें दिस. II

गोड गळा, सुस्वर गायन ही एक ईश्वरी देणगी असते. ती सगळ्यांनाच मिळते असे नाही. म्हणून भक्तांनी मनात खंती होऊ नये हे श्री तुकोबा या अभंगात सुचवताहेत. ते सांगताहेत, "बाबारे, तुला जमेल तसे त्या भगवंताचे, विठ्ठलाचे भजन कर बर." ख-या भक्तीने, भावपूर्ण रीतीने भजन केले की ते श्रोतृवृंदांच्या काळजाला भिडतेच हा तुमचा माझा अनुभव आहे. त्या ठिकाणी त्या गायकाकडे गायनकला किती आहे ? त्याला किंवा तिला स्वरांचे किती ज्ञान आहे ? हे सगळे प्रश्न अप्रस्तुत ठरतात. श्री तुकोबा म्हणताहेत की हेच भावपूर्ण गान त्या विठ्ठलालाही नक्की आवडेल. 

परम पूजनीय बापुराव महाराजांकडे दर गुरूवारी भजनाची परंपरा परम पूजनीय नाना महाराजांनी सुरू केलेली आहे आणि गेली ७० वर्षे ती त्यांच्याच कृपेने अखंड सुरू आहे. मला एकदा आमच्या सदगुरू, परम पूजनीय मायबाई महाराजांनी, गुरूवारच्या दरबारात भजन म्हणण्याची आज्ञा केली. तेव्हा मी त्यांच्याजवळ हीच खंत बोलावून दाखवली होती की मायबाई, मला सुरांच, तालाच, लयीच कसलच ज्ञान नाही. मी कसा म्हणू भजन ? त्यावेळी त्यांनीही हाच उपदेश मला केला होता. त्या म्हणाल्या की इथे तुझा स्वर कोण ऐकतय ? तुझी भक्ती किती आहे ? ते महत्वाचे. म्हण भजन. आणि त्यानंतर मोडक्यातोडक्या सुरात का होईना परम पूजनीय महाराजांकडे भजन म्हणताना मी स्वरांची लाज गुंडाळून गायला शिकलो. 

विठ्ठल हा भावाचा, हृदयातल्या ख-या भक्तीचा भुकेला आहे. त्यामुळे आपल्याला जमेल तशा स्वरात पण भक्तीने त्याचे नाम गात जावे. 

परमेश्वरापाशी काय मागायचे याचाही उपदेश श्री तुकोबा साधकांना करताहेत. "देवा, मला तुझी आवड असू दे. बस इतर काही नको. तुझ्यावर माझा विश्वास कायम ठेव. श्री तुकोबा म्हणताहेत की हा निर्धार तुम्ही दिवसेंदिवस वृद्धींगत करत न्या.

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
जय तुकोबा माऊली.

प्रा. राम प्रकाश किन्हीकर  (२८०१२०१८)  

No comments:

Post a Comment