Wednesday, January 23, 2019

चार दिवस बॅगी चे, चार दिवस बेल बाॅटमचे

फार वर्षांनी परवा एका रेडिमेडच्या दुकानात "बॅगी पँट" दिसली आणि मी एकदम २५ वर्षे मागे गेलो.
आम्ही शिकत असताना मांड्यांमध्ये अती ढगळ पण पायांपर्यंत निमूळती होत जाणार्‍या बॅगीची फॅशन पुन्हा आली होती. "पुन्हा आली होती" म्हणायच कारण म्हणजे ही फॅशन १९६० च्या दशकात चलनात होती. त्याकाळातील दिलीपकुमार, शम्मी कपूर प्रभृतींनी ही पँट घातलेली पाहून आम्ही भावंडांनी बालपणी "किती ढगळ ?" म्हणून चेष्टा केल्याचेही स्मरत होती. मात्र महाविद्यालयीन जीवनात ह्या पँटस घातल्यावर आपल्या (तत्कालीन) किडकिडीत देहाला जरा भारदस्तपणा येतोय याचा साक्षात्कार झाल्याने की काय या बॅगी पँटस आवडल्या होत्या.
त्या पॅंटसना "बॅगी" हे नामाभिधान प्राप्त होण्याचे कारण म्हणजे त्याच्या खिशांमध्ये एखाद्या बॅगेसारखी अनंत वस्तू सामावून घेण्याची क्षमता असावी असे मला प्रामाणिकपणे वाटायचे. आमच्या किडकिडीत देहाने या पॅंटस घालून वावरण्यामध्ये एकच धोका होता तो म्हणजे एखाद्या पहाडावर, मोकळ्या पठारावर अती हवेच्या ठिकाणी आपण गेलो तर जोरदार वाहणारी हवा पॅंटमध्ये शिरून अपथ्रस्ट फ़ोर्सने आपण हवेत तरंगायला लागू की काय ? अशी आम्हाला कायम भिती वाटत राहिलीय.



१९९० च्या दशकात शाहरूखनेही ही फ़ॅशन पुन्हा आणण्याचा प्रयत्न केल्याचे स्मरते. आताही या पँटस तयार मिळण्याची तशी सोय असेल तर अशा हवेशीर, सुटसुटीत आणि आरामदायक पँटस पुन्हा घालायला आवडतीलही.
परवाच महानायकाचा "दोस्ताना" बघत होतो. १९७० च्या दशकातल्या बेलबाॅटम घालून बच्चनसाहेबच इतके बेंगरूळ ध्यान दिसत होते की आम्ही हसायलाच लागलो. बाकी कंबरेत, मांड्यांमध्ये अत्यंत अडचणीच्या आणि चालताना पायाने रस्ता झाडू शकतील अशा पँटस त्याकाळी भारतात लोकप्रिय तरी कशा झाल्यात ? कोण जाणे. १९७० चा काळ हा "सर्वशक्तीमान" अमेरिकेचे प्रचंड आकर्षण असण्याचा होता. (आताही आहे म्हणा. पण १९७० च्या दशकाची तोड त्याला नाही.) म्हणून तिथल्या हिप्पी संस्कृतीची बेल बाॅटम आपण तशीच्या तशी स्वीकारली. मध्ये २००० च्या आसपास या बेलबाॅटमची सख्खी धाकटी बहीण "बूटकट" या नावाने चंचूप्रवेश करू पहात होती पण तिची फारशी डाळ शिजली नाही.


आताही स्त्रियांच्या पोषाखात पलाझो का प्लाझो म्हणून जे काही येतय ते बेलबाॅटमचे सावत्र भावंड असल्यासारखेच आहे. बघूया त्याची किती सद्दी राहते ते.

तात्पर्य काय ? चार दिवस बॅगी चे, चार दिवस बेल बाॅटमचे. पण खुद्द भारतीय सिनेसृष्टीचे महानायक, बच्चनसाहेब, जी घातल्यावर अगदी गचाळ दिसायचे ती बेलबाॅटम पुन्हा येणे नाही. आली तरी घालणे नाही.

Tuesday, January 22, 2019

चित्रपट वेडाचे दिवस.

बहुतेक सगळ्यांच्याच आयुष्यात कॉलेजचे दिवस फ़िल्लमवेडाचे दिवस असतात. किन्हीकरांकडे तर हे नाटक सिनेमांचे वेड परंपरागत आहे. माझे वडील, काका यांचे फ़िल्लमवेडाचे एकेक इरसाल किस्से ऐकूनच आम्ही मोठे झालो.

कराडला असताना कराडच्या चारच टॉकिज मध्ये आम्ही मित्रांनी खूप धमाल केली. भरपूर सिनेमे पाहिलेत. एकदा कॉलेजचे इलेक्शन आमचे पॅनेल हरल्यावर, हॉस्टेलला दुस-या पॅनेलची मुले राडा घालायला येणार याची कुणकुण लागताच, सगळे गावात पसार झालो होतो आणि एका दिवसात एकापाठोपाठ एक असे चार सिनेमे पाहिलेत. सगळे सिनेमे बघून रात्री बारा, साडेबाराला गावातून हॉस्टेलला चालत जाताना (शेवटची बस गावातून कॉलेज परिसराकडे रात्री अकरा वाजता असायची. त्यानंतर सेकंड शो पाहून परत जायच असेल तर विनोबा ट्रॅवल्सच्या ११ नंबरच्या बसशिवाय पर्याय नसायचा.) डोक पार भंजाळल होत्याचे स्मरते.

ही फ़िल्लमगिरी नंतरही काही वर्षे चालली. मुंबईत नोकरीनिमित्त आल्यानंतर त्यात नाटकांचीही भर पडली. सगळ्या गोष्टींचा हिशेब ठेवण्याची सवय असल्याने नाटक चित्रपटांचाही हिशेब ठेवला गेला.




लग्नानंतर, अपत्यप्राप्तीनंतर मग हा चित्रपट,नाटक बघण्याचा आवेग मंदावला. कौटुंबिक जबाबदा-या महत्वाच्या ठरू लागल्यात. पण गंमत बघा. लग्नापूर्वीचा हे चित्रपट, नाटक बघण्याचा विषय निघाला की , "लग्नानंतर बरा तुझा हा आवेग ओसरला रे ! तसही तुला आमच्यासोबत सिनेमा, नाटकाला येण्याचा कंटाळाच येतो" असे टोमणे सुपत्नी, सुकन्येकडून कडून ऐकायला मिळतात. "निमूटपणे सोसावे हेच बरे" हे नेमस्त धोरण मी अवलंबतो आणि पुढे जातो.

आमचे काही मित्र, गुरूबंधू, गुरूभगिनी मात्र चाळीशी (काही जण साठीतही) हे चित्रपटप्रेम जोपासताना दिसले की त्यांचे कौतुक करावेसे वाटते. क्वचित हेवाही वाटतो. नवीन चित्रपट लागला रे लागला की त्याचा भलाबुरा रिपोर्ट येण्याआधी टॉकीजमध्ये जाऊन बघण्याला एक अचाट धाडस आणि अफ़ाट शक्ती लागते हे मी मानत आलेलो आहे. आणि ती शक्ती माझ्यात नाही याचीही प्रांजळ कबुली देण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही.

आज सहज जुने संदर्भ चाळताना १९९५, १९९६ आणि १९९७ च्या फ़ाईल्स मिळाल्यात. इतके सिनेमे मी बघत होतो आणि एक शब्दात त्याचे विच्छेदन करत होतो हे पाहून माझी मलाच मजा वाटली. मी पुन्हा भूतकाळात गेलो. त्या काळात नागपूर-औरंगाबाद-सातारा-कराड ते थेट गडकरी रंगमंदीर, ठाणे आणि शिवाजी मंदीर, दादर पर्यंत थिएटर्स मी पालथी घातलीत पाहून मीच अचंभित झालो. 



(बाय द वे. २०१९ मध्ये दर महिन्यात कुटुंबासह एकतरी चित्रपट टॉकीजमध्ये जाऊन बघण्याचा संकल्प सोडलाय, बरका. जानेवारीत "भाई" पाहून संकल्प पालनाला सुरूवात केलीय. फ़ेब्रुवारीत "भाई - भाग २" बघणारच आहोत. त्यानंतरच्या  त्या त्या महिन्यात निर्णय घ्यायचा ठरवलेय.)

बाकी या " Book My Show " ने चित्रपट बघण्याची सोय झाली तरी चित्रपटाची झिंग घालवली अस माझ स्पष्ट मत आहे. चित्रपट बघायला जाण्याचा बेत ठरला की मग जवळच्या टॉकीजकडे मोर्चा वळवायचा. "तिकीटे संपली तर नसतील ?, खूप गर्दी तर नसेल ? ब्लॅकने तर तिकीटे घ्यावी लागणार नाहीत ?" ह्या हुरहुरीत टॉकीजपर्यंतचे अंतर कापायचे. तिथे तिकीटांसाठी रांगेच्या पिंज-यात उभे रहायचे. त्या पिंज-यांमध्ये उभे असताना "आपण चित्रपट बघण्याचा जणू गुन्हा करतोय म्हणून गुन्ह्याआधीच जेल भोगावी लागतेय" असे फ़ीलींग यायचे, आईशप्पथ. 

त्यातून आपला नंबर आला की जेमतेम हात जाईल अशा आकाराच्या खिडकीतून (आतला "सद’गृहस्थ कधीच दिसत नसे. पण आतला गृहस्थ फ़ारसा प्रेक्षणीय पण असेल असे वाटले नाही.) पैसे आत सरकवून "चार बाल्कनी" किंवा "चार रिझर्व" अशी फ़र्माईश करत ती अतिशय पातळ रंगीबेरंगी तिकीटे फ़डकवत (प्रत्येक वर्गासाठी तिकीटाचा रंग वेगळा असे. डोअरकीपरला सहज जावे म्हणून.) लोकसभेचे तिकीट मिळवल्यागत विजयी चेहेरा करून रांगेतून बाहेर पडण्यामध्ये काय थ्रिल होत ? ते आजच्या पीढीला कळणार नाही. परवा त्या डोअरकीपर इसमाने मोबाईलवर तिकीट पाहून आत सोडले तेव्हा माझा खूप हिरमोड झाला, तुम्हाला सांगतो.



थिएटर मध्ये शिरल्यावर त्याच्या काचांमध्ये  लावलेल्या आज बघणार असलेल्या चित्रपटांची किंवा क्वचित "आगामी आकर्षण" असलेल्या चित्रपटांची जाहिरात पाहिली नाही, तर मुख्य चित्रपट बघू देत नाहीत अशी आमच्या काही काही मित्रमंडळींची ठाम समजूत होती. त्यात ते लाल भडक रंगातले "गमन" चे चमकणारे बोर्डस. प्रत्येक दारासमोर ठेवलेली अग्नीशमन यंत्रे. (ती कधी वापरून तरी बघत असतील का ? की ठेवल्याठेवल्या तशीच खराब होत असतील ? हा आम्हाला पडणारा नेहेमीचा प्रश्न.) त्यात थोड्या थोड्या अंतरावर वाळू भरून ठेवलेल्या बादल्या. ही वाळू म्हणे आग लागल्यावर आगीवर मारायला उपयोगात आणायची असते. त्यात पिंकबहाद्दरांनी मारलेल्या पानाच्या पिंका पाहून बरेच वर्षे माझी समजूत या बादल्या म्हणजे "या थुंकसंप्रदायी लोकांसाठी थुंकण्याची उत्तम सोय" असावी असाच होता.

सिनेमा बघण्याचे पूर्ण पैसे वसूल करायचे म्हणजे अगदी सुरूवातीला "विको वज्रदंती" जाहिरात किंवा "फ़िल्म्स डिव्हीजन की भेट" पाहिलाच पाहिजे हा आमचा दंडक असायचा. मग मस्त मूड बनायला सुरूवात व्हायची. चित्रपटाचे सर्टिफ़िकेट पडद्यावर झळकले की बहुतेक सगळे जाणकार "सिनेमा किती रीलचा ?" हा तपशील पटकन पाहून घ्यायचे. मला बरेच वर्षे हा तपशील नेमका कुठे असतो ? ते शोधायला लागली. आणि गंमत बघा, आता आता ते कौशल्य अंगी येत होते तेव्हढयात हा तपशील सर्टिफ़िकेटवरून गायबच झाला. आजकाल डिजीटल सिनेमांमध्ये या सर्टिफ़ेकेटसवर सरळ चित्रपटाची लांबी मिनीटांमध्येच लिहीतात राव. छे ! सगळी मजा घालवली. १८ - १९ रीलचा सिनेमा म्हणजे तीन तास की साडेतीन तास यावर दुस-या दिवशी मित्रमंडळींमध्ये चर्चा करण्यातली मजाच गेली. मग "कोणत्या थिएटरमध्ये सिनेमा कापतात ? कुठे पूर्ण दाखवतात ? पहिल्या आठवड्यात पूर्ण दाखवतात मग हळूहळू कापायला लागतात" वगैरे ख-याखोट्या गोष्टींवर गप्पा रंगायच्या. चित्रपटाची खुमारी वाढायची.

इंटरव्हलमध्ये बाहेर पडून थिएटरमधल्या कॅण्टीनचा आलुबोंडा, समोसा खाल्ला नाही तर उरलेला सिनेमा बघायला मिळत नाही अशी काहीशी आमच्या पीढीची बालपणी समजूत होती. त्यामुळे तो गरमागरम समोसा आणि त्यावर एखादा कप चहा असा आमचा बेत असे. काही शौकिन लोक पानपट्टीपण खायचे आणि थिएटरला लाल कार्पेट अंथरल्यासारखे सर्वत्र लाल रंगाचा शिडकावा करून ठेवायचे. पण चित्रपट बघून बाहेर पडल्यावर बहुतांशी लोकांचे डोके का दुखायचे ? हा एक वैद्यकशास्त्रातला गूढ प्रश्नच होता. अजूनही तो सुटलेला नाही आणि आता तशी थिएटर्सच इतिहासजमा झाल्याने तो प्रश्न तसाच अनुत्तरीत, काळाच्या पडद्याआड जाईल यात शंका नाही.

काळ बदलला. जुनी थिएटर्स इतिहासजमा झालीत. नागपुरातली नरसिंग टॉकिज जमीनदोस्त झाली आणि आमच्या बालपणाच्या खूप आठवणीही तिच्याबरोबर गाडल्या गेल्यात. एकेक जुनी थिएटर्स आपले शेवटले दिवस मोजताना पाहिली की मुंबईतली ट्राम बंद झाल्यावर ख-या मुंबईकरांना काय यातना झाल्या असतील याची थोडी कल्पना येते. अरे, सगळ्याच गोष्टी उपयुक्ततेच्या पातळीवर थोडीच तोलायच्या असतात ? पण शहरातल्या मोक्याच्या जागांना सोन्याचा भाव आला मग "या म्हाता-या टॉकिज हव्यात त्या कशाला ?" ही व्यावहारिक भावना मूळ धरू लागली. तसही व्यवहारापुढे भावनेचा पराभवच होतो हा इतिहास होता, वर्तमान आहे आणि भविष्यही राहील. असो, "कालाय तस्मै नमः" म्हणायच आणि पुढे चालायच.

टॉकिज कितीही बदलली, कितीही पॉश वगैरे झाली, तरी फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो बघण्याचे आकर्षण असणारे चित्रपटवेडे जोपर्यंत आहेत आणि त्यांच्या हृदयात चित्रपटाचे प्रेम तेच आहे तोपर्यंत या व्यवसायाला मरण नाही. लोकांना स्वप्न विकण्याचा आणि स्वतःचे पैसे खर्च करून दोनतीन तास ती स्वप्ने विकत घेण्याचा हा व्यवसाय चिरायुच होईल. मग काथ्याच्या बोचणा-या खुर्चीवर बसून ही स्वप्ने बघतोय की साडेतीनशे चारशे रूपये खर्चून कापसासारख्या अलगद रिक्लायनर सीटसवर बसून स्वप्ने बघतोय याला महत्व नाही.

Sunday, January 13, 2019

गम्पीश : पाकशास्त्रातला माझा एक प्रयोग. Gampeesh : An IIT (Indo - Italian - Tibetan) culinary experiment.

पूर्वपीठीका: गेल्या पाच एक वर्षात माझी स्वयंपाकघरात मुशाफ़िरी सुरू आहे. रविवारी संध्याकाळी मी जणू स्वयंपाकघराचा ताबाच घेतो (आणि सुपत्नीसाठी दुस-या दिवशी आवराआवरीची डोकेदुखी करून ठेवतो.) त्यात आजकाल "Living Foods" चॅनेल भरपूर बघतो. (सिनेमांमध्ये सन ऑफ़ सथ्यमूर्थी, बिझीनेसमॅन -२, येवाडू" वगैरे डब्ड आणि डम्ब सिनेमे बघण्याची इच्छाच नसते. मग आपोआपच चॅनेल बदलताना  "Living Foods" लावल्या जात आणि नवनवीन कल्पना मिळतात.)

आज सकाळीच "Living Foods" वर एक डिश पाहिली आणि मनात एका संपूर्ण नव्या प्रयोगाची रूपरेखा तयार झाली. मागे एक तिबेटीयन डिश "थंपून" करून पाहिली होती आणि फ़क्कड जमलीही होती. मग या नवीन गंमतीशीर डिश च नाव काय ठेवावे हा विचार सुरू झाला. "गंपून" ठेवावे की काय ? असा विचार करता करता "गम्पीश" हे नामकरण पण सुपत्नीच्या सल्ल्याने झाले.

तस आम्हा नवरा बायकोला अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थच भावतात. "भरीत - भाकरी, गोळा - भात, पुरणपोळी, श्रीखंड - पुरी" असले बेत असले की आम्हाला कोण आनंद होतो. पण घरातली पुढली पिढी त्यात फ़ारशी रमत नाही. त्यांना इटालियन, कॉंटिलेंटल, चायनीज जेवण अधेमध्ये हव असत. त्यामुळे त्यांनाही कस खुश करायच ? हा ही विचार या डिशच्या नियोजनामागे होताच.

तर आपल्या सर्वांसमोर सादर आहे,
 माझ्या कल्पनेतली, माझी स्वतःची डिश : गम्पीश.
पूर्वतयारी : कणीक : एक वाटीभर पिठाची, बारीक चिरलेले दोन मध्यम आकाराचे कांदे, बारीक चिरलेले दोन छोटे टॉमेटो, बारीक चिरलेली एखादी ढोबळी मिरची, वाटीभर ताजे वाटाणे, भिजवून वाटलेली मोहरी (थोडे चवीपुरते मीठ आणि तिखट घालून मोहरी वाटून घेतलेली), बाजारात मिळतात तसे पिज्झा आणि पास्ता सॉस, पास्ता अल्फ़्रेडो.






कृती :
१. कणीक थोडी जाडसर लाटून पोळी करावी. 


२. त्या पोळीवर भिजवून वाटलेली मोहरी सारखी पसरावी. बाजारात तयार मस्टर्ड सॉस मिळतो तो वापरला तरी चालेल.



३. त्यावर पिज्झा आणि पास्ता सॉस, पास्ता अल्फ़्रेडो पसरावेत.




४. या पोळीवर बारीक चिरलेले कांदे, टॉमेटो, ताजे वाटाणे आणि ढोबळी मिरचीचे मिश्रण पसरावे.



५. पोळीची गुंडाळी करून आडवे तीन ते चार काप करावेत.



६. इडलीपात्रात थोडे तेल लावून हे गम्पीश दहा मिनीटे वाफ़वून घ्यावे.









७. गरमागरम गम्पीश टॉमेटो सॉससोबत खायला द्यावेत. 


टीप : मायक्रोव्हेव ओव्हन असल्यास हे गम्पीश न वाफ़वता भाजूनही घेता येतील. गरमागरम खायला मज्जा येते.



Tuesday, January 8, 2019

भाई : एक समृद्ध चित्रपटानुभव.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर "भाई" चित्रपट येणार म्हटल्यावर खूप उत्सुकता वाढली होती. ४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला पण आमचा मुहुर्त आज लागला. चित्रपट संपवून बाहेर येताना एक विलक्षण अनुभव नागपूरच्या "के सरा सरा" चित्रपटगृहात आला त्यानेच कळले की हा चित्रपट जनतेच्या किती मनात घुसून राहिलाय तो. चित्रपटात असे दृश्य आहे की कुमारजी, वसंतराव आणि भीमसेन जोशींच्या अचानक झालेल्या एकत्र मैफ़ेलीत भाई पेटी वाजवताहेत आणि सुनीताबाई व चंपूताई गाणे ऐकताहेत आणि गाण्याचे सूर पार्श्वभूमीत असतानाच भाईंची भूमिका करणारा सागर देशमुख पडद्यावर येऊन चित्रपटाचा पुढला भाग ८ फ़ेब्रूवारीला येणार असल्याचे सूचित करतो आणि रूढार्थाने चित्रपट संपतो. 


संगीत वाजत असतानाच काळ्या पडद्यावर श्रेयनामावली सरकत राहते. प्रेक्षकांपैकी एकही उठत नाही. जणू ही मैफ़ील संपूच नये असेच सगळ्यांच्या मनात. शेवटी सगळे संपते मग प्रेक्षागृहात टाळ्या वाजतात आणि जड मनाने प्रेक्षक उठतात. एखाद्या चित्रपटाला असा कर्टन कॉल मिळालेला मी पहिल्यांदा पाहिलय. ही सगळी मंडळी ८ फ़ेब्रूवारीची उत्कंठेने वाट पाहणार हे नक्की. मांजरेकर तुम्ही जिंकलत. हा भाग आणखी दोन तास असता तरी चालल असत. आता पुढचा भाग छान तीन साडेतीन तासांचा येऊ देत. किंवा पुलंच्या विराट साहित्यकार्यासाठी असेच पाच भाग येऊ देत.



या चित्रपटाच सगळ्यात मोठ्ठ बलस्थान म्हणजे याच योग्य कास्टिंग. आजवर मी पुलंच मूळ "वा-यावरची वरात" (व्हीडीओत) पाहिलय. नंतर दिलीप प्रभावळकरांनी केलेल वा-यावरची वरात बघितलय आणि अरूण नलावडेंनी केलेल ही पुलंच्या साहित्यकृतीवरच नाटक बघितलय. पण प्रभावळकरांविषयी पूर्ण आदर बाळगून (नलावडेंविषयी तर काही लिहावसही वाटत नाही. अक्षरश: पाट्या टाकल्या होत्या त्या नाटकात. असह्य होऊन २००३ मध्ये गडकरीला आम्ही नाटक अर्धवट सोडून बाहेर निघालो होतो.) मला म्हणावस वाटत की सागर देशमुखने साकारलेले पुल हे वास्तवाच्या सगळ्यात जवळ जाणारे होते. पेस्तनजींच्याच शब्दात सांगायच म्हणजे "साला काय पुल केलाय ! एकदम हंड्रेड पर्सेंट. खरे पुल पण असे नाहीत." विनोद सोडा पण खरोखर सागर देशमुख तुम्हाला मानाचा मुजरा. तुम्ही किती बारीक अभ्यास केलाय पुलंचा. व्वा ! त्याला तोड नाही.

एखाद्याविषयी पूर्ण माहिती असताना त्याच्या आयुष्यावरच्या चित्रपट लोकांना एव्हढा खिळवून ठेवतो हे पुलंच्या विविधरंगी, बहुआयामी लोभस व्यक्तीमत्वाच जेव्हढ यश तेव्हढच दिग्दर्शकाच आणि कास्टिंग डायरेक्टरच पण. आश्विनी गिरींची "लक्ष्मीबाई देशपांडे" (पुलंची आई), इरावती हर्षेंची "सुनीताबाई" बारीकसारीक हावभावांसकट खुललीय. स्वानंद किरकिरेंचे "कुमार गंधर्व" आणि अजय पुरकरांचे भीमण्णा एकदम जमून गेलेत. वसंतरावही झकास जमून गेलेत. ऋषीकेश जोशींनीही  "रावसाहेब" समजून साकारलेत. पण विद्याधर जोशींनी "अंतू बर्वा" समजून न घेता घाईघाईत सादर केल्याचे वाटून गेलेत. पण पुलंच्या मूळ अंतुबर्वातच एव्हढा दम आहे की विद्याधर जोशी पण चालून गेलेत.

मांजरेकर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. पुलंच्या साहित्याचे शिवधनुष्य पेलेलेत हो. यापूर्वी हे शिवधनुष्य "पुल : अमृतसिद्धी " यात मंगला गोडबोले आणि स.ह देशपांडेंनी पेलले होते. मांजरेकर मराठी जनता तुमची ऋणी आहे. आता "आहे मनोहर तरी" पुन्हा वाचल तर सगळे संदर्भ नव्याने कळतील.




भाई तुम्ही जिवंत असताना तर आम्हाला भारून टाकल होतच पण मृत्यूनंतरही १९ वर्षांनी पुन्हा आमची छोटी छोटी आयुष्य समृद्ध करण्याची ताकदही तुमच्यात आहे याचा आज पुन: प्रत्यय आला. ज्या कोणी तुम्हाला "जीवेत शरद: शतम असा आशिर्वाद दिला असेल त्याचा आशिर्वाद खरा ठरला म्हणायचा. १९१९ ला जन्म घेतलेले तुम्ही हे नश्वर शरीर त्यागून गेलात तरी १०० वर्षांनी आमच्या सगळ्यांमध्ये तुम्ही आहातच की. 

व्वा ! वर्षाची सुरूवात ग्रेट झाली.