Sunday, May 17, 2020

राजधानी एक्सप्रेस

प्रस्तावना इथे वाचा.


"द बर्निंग ट्रेन" सिनेमा बघितलाय ? आमच्या बालपणी नागपूरला गणेशपेठ बसस्टॅण्ड चौकात त्या सिनेमाचे मोठ्ठे पोस्टर लागले होते. रेल्वेविषयी बालपणापासून खूप कुतुहल, आवड असल्याने वडीलांच्या सायकलवरून तिथून जाताना ते पोस्टर दिसेनासे होईस्तोवर आम्ही त्याकडे डोळे फ़ाडफ़ाडून बघत असू. हिंदी चित्रपटाचे आमचे तत्कालीन ज्ञान अमिताभ बच्चन आणि हेमामालिनी यांच्यापुरतेच मर्यादित असल्याने पोस्टरवरची फ़क्त हेमामालिनी आम्ही ओळखत असू. (बरीच वर्षे माझा विनोद खन्ना आणि विनोद मेहरा यांच्यात घोटाळा व्हायचा.)

सांगायची गोष्ट म्हणजे त्या पोस्टरवर माझ्या आयुष्यातली पहिली राजधानी एक्सप्रेसची ओळख झाली.

१७ मे १९७२ रोजी मुंबईवरून नवी दिल्ली स्टेशनकडे राजधानी एक्सप्रेसने कूच केले आणि मुंबई - दिल्ली प्रवासाचा एक वेगळा अध्याय सुरू झाला. तत्पूर्वी मुंबई - दिल्ली वेगवान प्रवास म्हणजे फ़्रंटियर मेल (एकेकाळी बॅलार्ड पियरच्या स्टेशना पासून थेट अफ़गाणिस्थानच्या सीमेवरील पेशावर पर्यंत जाणारी. नंतर बॅलार्ड पियर स्टेशन ते चर्चगेट मार्ग उखडून टाकल्यानंतर, फ़ाळणी नंतर मुंबई सेंट्रल ते अमृतसर अशी झालेली आणि १९८० च्या दशकात सुवर्ण मंदीर मेल असे नामकरण झालेली) आणि मुंबई - दिल्ली आरामदायक प्रवास म्हणजे डीलक्स एक्सप्रेस (वातानुकूल प्रथम वर्ग आणि वातानुकूल खुर्ची यान असलेली. लाल आणि क्रीम रंगातल्या डब्ब्यांची, नंतर दिल्ली वरून कालका / अमृतसर असा मार्ग वाढवलेली आणि मुंबईत वांद्रे टर्मिनसलाच थांबवण्यात येणारी आजकालची पश्चिम एक्सप्रेस) असे समीकरण होते. १७ मे नंतर आरामदायी प्रवास आणि वेगवान प्रवास दोन्हीही एकाच गाडीने साध्य व्हायला लागला. मुंबई राजधानी एक्सप्रेस.

मुंबईवरून दिवसभराची कामे उरकून संध्याकाळी ४.३० ला निघा आणि दुस-या दिवशी नवी दिल्लीत कामे सुरू होण्यापूर्वी सकाळी ९ च्या सुमारास पोहोचा. परतीच्या प्रवासातही तेच. त्यामुळे अतिशय सोयीच्या वेळेची, शिवाय संपूर्ण वातानुकुलीत डब्ब्यांची, आतमध्ये जेवणखाण्यापासून अतिशय उत्तम सोयीसुविधा असणारी ही सेवा लोकप्रिय झाली नसती तरच नवल होते. आरामदायी प्रवास आणि तो सुद्धा वेगवान. (फ़्रंटियर मेल मुंबई - दिल्ली प्रवासाला अजूनही २२ तास घेते आणि मुंबई - फ़िरोजपूर जनता एक्सप्रेस आणि वांद्रे - डेहराडून एक्सप्रेस तब्बल ३० तास.)

खरेतर राजधानी एक्सप्रेस ही संकल्पना या अगोदर तीन वर्षांपूर्वीच भारतीय रेल्वेत आलेली होती. ३ जून १९६९ रोजी नवी दिल्ली ते हावडा या मार्गावर राजधानी एक्सप्रेसची सुरूवात झालेली होती. कलकत्ता ही भारताची ब्रिटीशकालीन राजधानी १९११ पर्यंत होती. त्यामुळे जुन्या आणि नव्या राजधानीच्या गावांना जोडणारी गाडी म्हणून राजधानी एक्सप्रेस हे नाव दिले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मग या गाडीला मिळालेल्या उत्त्म प्रतिसादामुळे देशातल्या सगळ्याच राज्यांच्या राजधान्या देशाच्या राजधानीशी जोडू असाही विचार समोर आला असण्याची शक्यता आहे. म्हणून मग देशाच्या राजकीय राजधानीला देशाच्या आर्थिक राजधानीशी जोडणारी ही गाडी तीन वर्षांनी सुरू झाली.

गंमत म्हणजे १९७२ ते १९९२ या काळात फ़क्त मुंबई राजधानी आणि हावडा राजधानी या दोनच प्रतिष्ठेच्या गाड्या भारतीय रेल्वेने चालू ठेवल्या होत्या. दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जन्मशताब्दीनिमित्त १९८९ सालात नवी दिल्ली ते ग्वाल्हेर अशी शताब्दी एक्सप्रेस सुरू केली होती. (नंतर लगेच ती गाडी झाशी आणि थोड्याच कालावधीत भोपाळपर्य्ंत वाढवल्या गेली.) पण १९७२ नंतर नवीन राजधानी एक्सप्रेस गाडी यायला १९९२ साल उजाडले.

आणि नवीन राजधानी गाडी आली ती सुद्धा मुंबई - राजधानीचीच धाकटी बहीण. ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस. १९४२ मध्ये झालेल्या ऑगस्ट क्रांती आंदोलनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात ही गाडी आली पण हिचा आब पहिल्यापासूनच आपल्या थोरल्या बहिणीपेक्षा कमी ठेवण्यात आला. ही गाडी नवी दिल्ली पर्य़ंत जात नाही. हजरत निजामुद्दीन स्टेशनपर्यंतच जाते. दोन्हीकडून वेळही मुंबई राजधानीच्या मागे. थोरली १३८६ किमी अंतर एकूण ६ थांबे घेत १५ तास ३५ मिनीटांमध्ये कापते तर धाकटी १३७८ किमी १७ तास २० मिनीटांमध्ये कापते आणि ते ही तब्बल १२ थांबे घेत. पहिल्यापासूनच धाकटीला थोडे कमी महत्व देण्यात आले. मुंबई राजधानीत तिकीट मिळाले नाही तर मग इतर कुठल्या पर्यायांपेक्षा ही गाडी उत्तम म्हणूनच ही गाडी आजही लोकांच्या पसंतीला उतरते आहे.

मग १९९२ मध्येच बंगलोर राजधानी, १९९३ मध्ये चेन्नई आणि तिरूवनंतपुरम राजधानी, १९९४ मध्ये जम्मूतावी राजधानी आणि पाटणा राजधानी अशा राजधानी एक्सप्रेस गाड्या सुरू व्हायला लागल्यात आणि आजघडीला देशातली सगळी राज्य राजधानीची शहरे दिल्लीशी राजधानी एक्सप्रेसने जोडली गेलेली आहेत. 

अपवाद भरपूर आहेत.

मध्य प्रदेश (तिथे भोपाळ - दिल्ली शताब्दी एक्सप्रेस आहे) 

उत्तर प्रदेश (तिथेही लखनऊ - दिल्ली सुवर्ण शताब्दी एक्सप्रेस आहे.) 

पंजाब + हरियाणा (इथे चंडिगड - दिल्ली शताब्दी एक्सप्रेस आहे) 

राजस्थान (इथेही जयपूर - दिल्ली शताब्दी एक्सप्रेस आहे.)

हिमाचल प्रदेश (कालका - दिल्ली शताब्दी एक्सप्रेस आहे. कालका जरी हरिय़ाणात असले तरी सिमल्याला रेल्वेने जाण्यासाठी कालका हे एकमेव ठिकाण आहे. कालका हे हिमाचल प्रदेशाचे ’रेलहेड’ समजले जाते.)

उत्तराखंड (इथे काठगोदाम - दिल्ली शताब्दी एक्सप्रेस आहे.)

आणि

आंध्रप्रदेश. (खरेतर जुन्या एकीकृत आंध्र प्रदेशात हजरत निजामुद्दीन - सिकंदराबाद राजधानी एक्सप्रेस होती. पण तेलंगण आणि आंध्र वेगळे झाल्याने आंध्र प्रदेश साठी वेगळी राजधानी दिल्याच गेली नाही. नवी - दिल्ली ते विशाखापट्टण (मार्गे विजयवाडा : आंध प्रदेशची नवी राजधानी) अशी एक राजधानी सारखी संपूर्ण वातानुकुलीत गाडी आहे खरी, पण तिला राजधानी दर्जा नाही. ती नुसतीच आंध्र प्रदेश ए.सी. एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध आहे.

काहीकाही राज्ये खूप उदार आहेत. राज्याच्या राजधानीपासून देशाच्या राजधानीला जोडणारी त्या त्या राज्याची राजधानी एक्सप्रेस त्यांनी आपल्याच राज्यातल्या दुस-या ठिकाणांपर्यंत वाढवली आहे. छत्तीसगढ राज्याचे लाडके ठिकाण म्हणजे बिलासपूर. म्हणून रायपूर राजधानी असली तरी ही राजधानी बिलासपूरपर्यंत आहे. आसामची राजधानी जरी दिसपूर (गौहत्ती) असली तरी आसाम राजधानी थेट दिब्रुगड पर्यंत जाते. 

मुंबई आणि कलकत्त्यासाठी दिल्लीवरून तीन तीन राजधानी गाड्या आहेत. मुंबई राजधानी, ऑगस्ट क्रांती राजधानी आणि नुकतीच २०१९ मध्ये मध्य रेल्वेच्या मार्गावरून सुरू झालेली हजरत निजामुद्दीन - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई राजधानी. (ही गाडी मध्य रेल्वेवरच्या सर्वांची पट्टराणी आहे. नवीन कोचेस, उत्कृष्ट मेंटेनन्स आणि पुश पुल योजनेत पुढे व मागे अशी दोन एंजिने घेऊन धावणारी ही गाडी १५३५ किमी अंतर फ़क्त ६ थांबे घेऊन १७ तास ५५ मिनीटांत पूर्ण करते.)  

कलकत्त्यासाठीही गयामार्गे धावणारी हावडा राजधानी, पाटण्यामार्गे धावणारी हावडा राजधानी आणि सियालदाह राजधानी (मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मध्य रेल्वेचे आणि मुंबई सेंट्रल हे पश्चिम रेल्वेचे अशी दोन ठिकाणे आहेत तशी कलकत्त्यातही हावडा हे दक्षिण पूर्व रेल्वेचे आणि सियालदाह हे पूर्व रेल्वेचे अशी दोन वेगवेगळ्या विभागांची दोन वेगवेगळी ठिकाणे आहेत.) अशा तीन राजधानी गाड्या आहेत.

राजधानी एक्सप्रेसमध्ये तुमच्या चहा पाण्यापासून ते जेवणापर्यंत सगळ्या सोयी या तिकीटांच्या रकमेतच अंतर्भूत असायच्यात. (काही ठिकाणी तक्रारी आल्याने हल्ली आरक्षण करताना तुम्हाला हे गाडीतले जेवण नको असल्यास तेव्हढा भार तिकीटांच्या रकमेतून कमी होतो असे ऐकलेय.) सुरूवातीला राजधानी चॅनेल म्युझिक असायचे. ड्रायव्हर आणि गार्ड साहेब प्रवाशांच्या विरंगुळ्यासाठी त्यातून संगीत प्रसारीत करायचेत. पुढले स्टेशन कुठले याचीही उदघोषणा त्यातून व्हायची. काही राजधानी गाड्यांमध्ये वाचनालय पण असायचे. प्रवाशांचा प्रवास सुखद आणि सुखकर व्हावा म्हणून रेल्वे या सोयी द्यायची. पुढे पुढे बदलत्या काळानुसार हे चॅनेल म्युझिक आणि वाचनालय बंद पडले. बरीच वर्षे राजधानीचे तिकीट हे विमानाच्या तिकीटासारखे वैशिष्ट्यपूर्ण होते. संगणकीकरणाने सब घोडे बारा टक्के न्याय आणला आणि सगळी तिकीटे सारखीच निरस झालीत.

पहिल्यापहिल्यांदा राजधानीला वातानुकुलीत प्रथम वर्ग आणि वातानुकुलीत खुर्ची यान अशा दोनच प्रकारची व्यवस्था होती. नंतर ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यात द्विस्तरीय वातानुकूल शयनयान (सेकंड एसी) आणि ९० च्या दशकाच्या सुरूवातीला त्रिस्तरीय वातानुकूल शयनयान (थर्ड एसी) डबे लागायला सुरूवात झाली. शताब्दी एक्सप्रेस आल्यानंतर राजधानी गाड्यांमधून वातानुकूल खुर्ची यानांनी काढता पाय घेतला. आज राजधानी गाड्यांमध्ये प्रथम वर्ग वातानुकूल (फ़र्स्ट एसी), द्विस्तरीय वातानुकूल शयनयान (सेकंड एसी), त्रिस्तरीय वातानुकूल शयनयान (थर्ड एसी) आणि वातानुकूल भोजन निर्माण यान (पेंट्री कार) अशी व्यवस्था असते. सुरूवातीला आणि शेवटी जनरेटर यान असतात. ज्यातला एक थोडा भाग गार्डांसाठी ब्रेक व्हॅन म्हणूनही वापरला जातो. आजकाल नवीन (Head On Generator) टाईपची WAP 7 / WAP 5  एंजिने आल्याने डीझेल वापरून रेल्वेतल्या बोगींसाठी वीज निर्मिती करण्याची गरज उरली नाही. गाडीवर असलेल्या विद्युत तारांमधून एंजिनाद्वारेच पूर्ण कोचेसना विद्युत आणि वातानुकुलन यंत्रणेला लागणारी वीज पुरवण्याचे तंत्रज्ञान गेल्या ७ -८ वर्षात आलेले आहे. हळूहळू त्याचा वापरही वाढतो आहे.

पूर्वी आपल्याकडे Integral Coach Factory, चेन्नई, किंवा Rail Coach factory, कपूरथळा इथे बनलेले कोचेस असायचेत तेव्हा राजधानी एक्सप्रेस गाड्यांना लाल पिवळ्या रंगातली एक विशिष्ट रंगसंगती असायची. आता LHB ( Linke Hauffmann Bousch) ्या जर्मन टेक्नॉलॉजीने बनविलेले कोचेस येत आहेत. सगळे एकाच रंगसंगतीतले. लाल आणि राखाडी. बरे हेच कोचेस याच रंगसंगतीत बाकी गाड्यांनाही असतात त्यामुळे राजधानी एक्सप्रेसचा वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगतीचा अभिमान आता पार लयाला गेला आहे. आम्ही रेल्वे फ़ॅन्स मधून मधून अशी वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगतीची मागणी करीत असतो पण रेल्वेवाले ती मागणी मनावर घेत नाहीत.


वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगतीतले ICF राजधानी कोच.


  Common रंगसंगतीतले LHB कोच.



पूर्वी अशी ही Generator Car आवश्यक असायची.


 आता नवीन प्रकारच्या एंजिनांमुळे थेट वीज डब्ब्य़ांना मिळते आणि डीझेल वाचते.

माझ्या आयुष्यातला पहिला राजधानी प्रवास हा २००४ मध्ये झाला. नागपूरवरून बिलासपूर राजधानीने आम्ही १५ जणांनी कौटुंबिक तीर्थयात्रा / सहलीसाठी नवी दिल्लीचा पडाव गाठण्यास राजधानीने प्रवास केला होता. तो प्रवास खूप आवडला आणि नंतर २००८ मध्ये चेन्नई राजधानीने आणि २००९ मध्ये बंगलोर राजधानीने अनुक्रमे चेन्नई ते नागपूर आणि बंगलोर ते नागपूर हा प्रवास प्रथम वर्ग वातानुकुलीत दर्जाने केला होता आणि आपली हौस फ़िटवून घेतली होती. भारतीय रेल्वेत असलेल्या तत्कालीन सर्वोच्च दर्जाच्या प्रवासाचे काय वर्णन करावे ! पैसा वसूल अनुभव असे एकाच शब्दात याचे वर्णन करता येईल. Indigo / Go Air सारख्या विमानांची महागडी तिकीटे काढून आत साध्या घोटभर पाण्यालाही महाग असलेल्या प्रवाशांना ही राजेशाही वागणूक नक्कीच सुखावून जाईल.


Grand Welcome in 1 AC.


Welcome flowers and chocolates.


गरमागरम सूप. 




आणि पकोडे.





मेन्यु कार्ड. सगळे प्रवासखर्चातच समाविष्ट.


चहापान. 
रेल्वे या वर्गासाठी चिनीमातीचे कप बशा वापरते. राजधानीतल्याच इतर वर्गांसाठी मात्र कागदी कपांमधून चहा दिला जातो.







 इतका भरपूर नाश्ता ! मग जेवणाची भूक ती काय असणार ?



नाश्त्यानंतर कॉर्न फ़्लेक्स आणि दूध ही प्रथम वर्गाचीच चंगळ आहे. 


जेवणापूर्वी पेंट्री कार मध्ये तयार केलेला ताज्या फ़ळांचा ज्यूस. (टेट्रा पॅकमधला ज्यूस हा इतर वर्गांसाठी.) अरे जरा तरी उसंत द्याल की नाही पोटाला ? सारख तासातासानी तुमच आपल सुरूच.












भरपूर जेवण. प्रथम वर्गासाठी जेवणातल्या पोळ्या ह्या पेंट्री कारमध्ये ताज्या तयार केल्या जातात. इतर वर्गासाठी बेस किचनमध्ये तयार केलेल्या पोळ्या फ़ॉईलमध्ये गुंडाळून येतात. आणि जेवणानंतर आईसक्रीम. नागपूरला पोहोचे पर्यंत आपल्याला डब्ब्याच्या बाहेर काढायला बहुतेक स्ट्रेचर्सच मागवावी लागतील की काय ? ही शंका जेवणानंतर आमच्या मनात बराच काळ होती.

मग करणार ना राजधानी ने प्रवास ? आता या गाड्यांचे ग्लॅमर ओसरले आहे. विशिष्ट रंगसंगती नाही. जेवणाचा दर्जा घसरल्याच्या तक्रारी येताहेत. हिच्या कानामागून आलेल्या आणि तिखट झालेल्या दुरांतो आणि वंदे भारत एक्सप्रेसने हिचे ग्लॅमर खाऊन टाकले की काय ? अशी स्थिती आहे. चालायचेच. चार दिवस राजधानीचे, चार दिवस वंदे भारत एक्सप्रेसचे. 

- राम प्रकाश किन्हीकर.




5 comments:

  1. अप्रतीम लेख (नेहमीप्रमाणेच)

    ReplyDelete
  2. My most favorite is Mumbai Rajdhani...
    Enjoy food and enjoy journey...

    ReplyDelete
  3. Ram Bhau, You are an enthusiast! 👍

    ReplyDelete
  4. नेहमीप्रमाणे अप्रतिम लेख... एकदा तरी राजधानी, दुरांतो, वंदे भारत अश्या गाड्यांमधून प्रथम श्रेणी वर्गातून सहकुटूंब प्रवास करायची ईच्छा आहे.

    ReplyDelete
  5. नेहमीप्रमाणे सुंदर वर्णन आणि लेखन सुद्धा.

    ReplyDelete