Saturday, May 30, 2020

एस. टी. आणि प्रतिष्ठा.

कराडला इंजिनीअरींग करत असताना खूप मित्र जोडलेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागातले. कराडला जाईपर्यंत आमचे क्षेत्र आणि दृष्टीकोन फ़क्त विदर्भापुरताच मर्यादित होता. पण तिथे शिकायला गेल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रव्यापी दृष्टीकोन लाभला. विविध भागातल्या चालीरिती, बोलीभाषा यांचा अगदी जवळून परिचय झाला. अक्षरश: चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळी हुशार ( तितकीच कल्पक आणि वांड) मुले तिथे आलेली होती. एक नवीन सामाजिक अभिरसरण तिथे होत होते आणि आमची सगळ्यांचीच व्यक्तीमत्वे बहुअंगांनी विकसित होत होती.
कराडला गेल्यावरच मला कळले की आपली महाराष्ट्र एस टी विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्ब्यांची वाहतूक मोफ़त करते. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (Govt. College of engineering), शासकीय तंत्रनिकेतन (Govt. Polytechnic) आणि शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (Govt. College of Pharmacy) ही तिन्ही एकाच परिसरात होती. त्यांची वसतीगृहेही एकाजवळ एक अशीच.
सकाळी ९ , ९.३० च्या सुमारास महाविद्यालय परिसराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काही तंत्रनिकेतनची चिल्लीपिली (आमच्या दृष्टीने ती चिल्लीपिल्लीच होती.) बसची वाट बघत असलेली दिसायची. मग शिरवडे भागाकडून एखादी एस. टी. आली की ड्रायव्हर साहेब आपल्या केबिन मधले डबे काढून भराभर त्या मुलांना देत असत. संध्याकाळी परत जाताना तीच बस मुलांचे रिकामे टिफ़ीन्स त्यांच्या त्यांच्या गावाला परत नेत असे.
महाविद्यालयातील मेसचा त्याकाळी येणारा १५० रूपये महिना हा खर्चसुद्धा न परवडणारी मुले त्या काळी होती. त्यांच्या घरून हे डबे येत असत. एस. टी. ही वाहतूक फ़ुकट करी. त्या मुलांना त्या एस. टी. चा किती आधार वाटत असेल, नाही ? त्या काळात ही मुले शिकू शकली आणि स्वबळावर उभी राहू शकली यात एस. टी. चे योगदान आहेच की. आज त्यातील बरीच मुले शासकीय सेवेत कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता आणि एक दोन तर मुख्य अभियंताही आहेत. शिक्षणाची आणि प्रगतीची ही खरी समान संधी होती.
कराड वास्तव्यात मी आणखीही एक गोष्ट बघितली होती की आसपासच्या अगदी छोट्या गावातूनही थेट मुंबईला सेवा असायची.
शामगाव जलद मुंबई
येणपे जलद मुंबई (रातराणी सेवा)
सोनसळ जलद मुंबई परळ
कोकरूड जलद मुंबई (परळ)
या बसेस तर हमखास दिसायच्यात. असा प्रकार विदर्भात नाही. ४०० - ४५० किमी वरच्या छोट्याशा खेड्यातून थेट नागपूरला सेवा आहे असे दिसत नाही.
मेहेकर - नागपूर आहे, पण हिवरे आश्रम - नागपूर नाही.
चंद्रपूर - नागपूर गाड्या चिकार आहेत, पण अन्नु अंतरगाव - नागपूर ही सेवा नाही, असो.
मला वाटते त्या त्या गावात, राजकीयदृष्ट्या एखादी तत्कालीन मोठी व्यक्ती (साखर कारखान्याचे चेअरमन, सहकारी दूध संघाचे अध्यक्ष वगैरे) कधीतरी झाली असावी. आणि त्यांनी आग्रह करून ती मुंबईची थेट बससेवा आपल्या गावापर्यंत करून घेतली असावी.
कराडला आम्हा वैदर्भीय विद्यार्थ्यांना आपापल्या घरी येण्याजाण्यासाठी एकमात्र साधन म्हणजे कोल्हापूर - नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेस. नागपूर ते कराड या १०९५ किमी प्रवासासाठी २५ तास घेणारी ही एकमेव (गैर)सोय. बाकी पुणेकर मित्रांसाठी भरपूर बसेस होत्या. सांगली, सातारा आणि कोल्हापूरची मंडळी तर मनात विचार आला की खांद्याला धोपटी अडकवून घरी जाऊ शकायचीत. नाशिककर विद्यार्थांसाठी थोडी अडचण होती.
नाशिककरांसाठी त्याकाळी कराडवरून दिवसा सांगली - नाशिक, दुपारी बेळगाव - नाशिक आणि रात्री मिरज - नाशिक व कोल्हापूर - सटाणा या मोजक्या चारच बसेस होत्या. नगरकरांसाठी सकाळी इचलकरंजी - अहमदनगर ही महाराष्ट्राची आणि दुपारी हुबळी - कोपरगाव ही कर्नाटक राज्य परिवहनची सेवा होती. (इचलकरंजी - अहमदनगर ही अक्षरे महाराष्ट्र एस. टी. च्या मार्गफ़लकावर लिहीली जाणारी सर्वात जास्त अक्षरे होती. आजही त्याला तोड नाही.) पण नगरकर मंडळी पुण्यापर्यंत जाऊन पुढे नगरसाठी स्वतंत्र बस घेणारी होती. क्वचितच कुणी थेट बसची वाट बघायचा.
मुंबईला जाणा-या भरपूर बसेस उपलब्ध असायच्यात. विशेषत: रात्री ८ नंतर. कोल्हापूर कडून, सांगली कडून, कर्नाटकातल्या या सगळ्या बसेसची मुंबईसाठी दाटी असायची. रात्री ९ -१० पर्यंत निघून पहाटे पहाटे मुंबईत दाखल होणा-या या सोयीच्या बसेस.
एकदा अशीच सत्र परीक्षा संपली आणि सगळी मंडळी आपापल्या घरी जायला निघाली. परीक्षा संध्याकाळी संपल्यामुळे आम्हा नागपूरकर मंडळींना दुस-या दिवशी १६.३० ला निघणा-या महाराष्ट्र एक्सप्रेसपर्यंत महाविद्यालयातच थांबणे भाग होते. पण संध्याकाळी आमच्या नाशिककर, मुंबईकर मित्रांना कराड बसस्टॅण्ड पर्यंत सोडून येणे हा आमच्यासाठी आनंदाचा गाभा असायचा.
"संगती संगतो दोष:" या न्यायाने आम्ही काही मित्र आपल्या बसफ़ॅनींगमध्ये सहभागी करून घेतलेले होते. त्यांनाही बसस्टॅण्ड भेट हा आनंदाचा प्रसंग असायचा.
असेच आम्ही संध्याकाळी स्टॅण्डवर आलोत. मुंबईच्या मित्रासाठी येणपे - मुंबई ही रातराणी गाडी फ़लाटावर लागली होती. रिकामीही होती. आम्ही त्याला आग्रह करायला लागलो की तू जा आणि पटकन जागा धर. तो टाळाटाळी करू लागला. ही गाडी शीव ला (मुंबईत तो चुनाभट्टीला रहायचा) थांबणार नाही वगैरे.


मुक्कामाला आलेल्या गाडीसारखी थंड असलेल्या (थोडावेळ थांबून लगेच निघणा-या गाड्यांचा उत्साह वेगळा असतो. ती चहलपहल, तो माहौल सराइत नजरांना ओळखता येतो.) गाडीच्या कंडक्टर साहेबांकडे आम्ही चौकशी केली. ते म्हणाले शीव वरूनच जाते गाडी. नक्की थांबेल. आमचा पुन्हा मित्राला आग्रह आणि त्याचा नकार.
येणपे - मुंबई गाडीच्या शेजारीच ८ वाजता निघणारी कराड - केंद्रबिंदू सेवा - मुंबई ही कराड आगाराची लाडकी गाडी लागली आणि त्यात घुसणा-या गर्दीत आमचा तो मित्र सामील झाला. त्याने जागाही पटकावली. कमी प्रवाशांनिशी ती येणपे - मुंबई गाडी रवानाही झाली.
बस सुटायला वेळ होता. आम्ही आमच्या त्या मित्राच्या खनपटीलाच बसलो. तू येणपे - मुंबई बस का सोडली ? ते सांग. आणि मग तो म्हणाला "खुळे की काय तुम्ही ? येणप्याच्या बसमध्ये मी बसणार काय ? अरे माझी काही इज्जत वगैरे आहे की नाही ?" मग आम्हाला समजले की आमच्या महाविद्यालयासमोरून सकाळी १० च्या सुमारास जाणा-या शामगाव - मुंबई बसमधल्या काही प्रवाशांची आम्ही जरा आमच्यातच चेष्टा केली होती. चेष्टा अशी की बसलेल्या या मंडळीतली खरोखर किती मंडळींनी मुंबईचे तिकीट काढलेय ? कराड, काशिळ, उंब्रज आणि अगदीच डोक्यावरून पाणी म्हणजे सातार. (सातारा नाही बरं का मंडळी, सातार. साता-याला "सातार" असे संबोधल्याखेरीज तुम्ही सातारकर नाहीच.)
ती चेष्टा या मित्राने जरा जास्तच गांभीर्याने घेतलेली दिसत होती. आम्ही मात्र त्याच्या या आविर्भावावर आणि उत्तरावर खो खो हसत सुटलो. त्यानंतर पुढले सत्रभर येणपे बसचा विषय आम्हाला हॉस्टेलमध्ये गप्पांना पुरला होता.
एखाद्या विशिष्ट एस. टी. मार्गालाही प्रतिष्ठा असते किंवा नसते हे तेव्हा पहिल्यांदाच जाणवले. जीवन नावाच्या पोतडीत एका नवीन अनुभवाची भर पडली.

- राम प्रकाश किन्हीकर (24052020)

No comments:

Post a Comment