Monday, January 4, 2021

नागपुरात Hop On - Hop Off (Ho-Ho) बसेसची आवश्यकता : एक विचार

 नागपूर शहरातली वाहतूक हा गेल्या ३५ वर्षांपासूनच्या माझ्या चिंतनाचा आणि गेल्या २० वर्षांपासूनचा माझ्या चिंतेचा विषय आहे. बालपणापासून शाळेत जाताना बसचा वापर करणारा मी, त्या काळीही वृत्तपत्रांमधून बससेवेसाठी काही सूचना पाठवीत असे. सार्वजनिक वाहतूक खूप बेभरवशाची, उद्दाम आणि वक्तशीर नसल्यामुळेच नागपुरात वैयक्तिक वापराच्या खाजगी दुचाकी आणि आजकाल चारचाकींना पर्याय नाही अशी स्थिती उदभवली आहे. 


जास्तीत जास्त खाजगी गाड्यांचा वापर म्हणजे पार्किंगचा मोठ्ठा प्रश्न, प्रदूषणाचा प्रश्न आणि एकंदरच रस्त्यांवर ट्रॅफ़िक जाम सारख्या समस्या. मुंबईसारख्या शहरातली अत्यंत भरवशाची लोकल आणि बेस्ट सेवा अनुभवल्यावर तर नागपूरच्या सेवेतील त्रुटी अधिकच प्रकर्षाने जाणवायला लागल्यात. मुंबईत, नवी मुंबईत, ठाण्यात जर बससेवा लोकांना केंद्रबिंदू मानून चालवल्या जाऊ शकतात तर नागपुरात ही गंगा उलटी वाहण्याचे कारण काय ? हा एक मोठ्ठा यक्षप्रश्नच आहे. पूर्वी नागपुरात शहर बस सेवा एस. टी. महामंडळाकडे होती. महामंडळ ती सेवा द्यायला अपुरे पडायला लागले म्हणून २००९ च्या आसपास नागपूर महनगर पालिकेने खाजगी कंत्राटदारांच्या मदतीने स्वतःची शहर बस सेवा नागपुरात सुरू केली. पण महानगरपालिकेच्या बससेवेबाबत नियोजनशून्य कारभारामुळे कालचा गोंधळ बरा होता अशी अवस्था झाली. महानगरपालिकेच्या परिवहन समितीवरच्या सदस्यांना वाहतुकीची आखणी आणि नियोजन हा एका शास्त्रीय अभ्यासाचा विषय आहे आणि नागपुरात त्यासाठी भरपूर प्रशिक्षित तज्ञ अभियंता मंडळी आहेत याचा पत्ताच नाही. तज्ञांचा सल्ला घेऊन अधिकाधिक सुखकर, भरवशाची आणि परवडण्याजोगी सेवा अजूनही नागपूर शहरात पुरवल्या जाऊ शकते. अजूनही उशीर झालेला नाही पण आता लक्ष दिले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी अवस्था आहे. 






नागपुरात मेट्रो हळूहळू वाढते आहे. पण मेट्रोला पूरक सेवा जर एका विशिष्ट नियोजनाने विकसित झाल्या नाहीत तर मात्र नागपूर मेट्रो ही केवळ "जॉय राईड"च बनून राहील ही भविष्यातली भीषण वास्तवता आहे.


सीताबर्डी हा नागपूरचा मध्यवर्ती व्यापारी भाग. नगर नियोजनात Central Business District (C.B.D.) ची संकल्पना आहे. तसा इतवारी भागही CBD मध्येच गणला जाईल. (नवी मुंबईत मात्र बेलापूरला CBD म्हणण्याचे नेमके काय कारण आहे ? हे मला तिथे १२ वर्षे राहूनही समजले नव्हते. कदाचित शहर वसवताना तिथे मध्यवर्ती व्यापारी भाग वसविण्याचा बेत असावा पण आता तो पूर्ण भाग शासकीय कार्यालयांमुळे आणि निवासी भागामुळे CBD संकल्पनेला विसंगत असा झाला आहे.) आज सीताबर्डी आणि लगतच्या रामदासपेठ, धंतोली भागात वाहतुकीची मोठ्ठी समस्या निर्माण झालेली आहे. नागपूरकरांच्या मूळ सुशेगाद स्वभावामुळे नागपूरकर मंडळी त्या समस्येशी जुळवून घेताहेत खरे पण हे फ़ार दिवस चालणार नाही आणि या समस्येकडे लवकर लक्ष दिले नाही तर समस्येचा स्फ़ोट उग्र रूप धारण करेल हे नक्की.


सीताबर्डी आणि आसपासच्या विभागात व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा, हॉस्पिटल्स मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात मोरभवन म्हणजे जणू एक भोज्या असावा आणि त्या भोज्याला शिवल्याशिवाय गत्यंतर नाही या आविर्भावात एस. टी. आणि नागपूर शहर बस सेवेचे आजवरचे नियोजन आहे. नागपूर मेट्रोचे ऑरेंज लाईन (उत्तर दक्षिण कॉरिडॉर) आणि ऍक्वा लाईनचे (पूर्व पश्चिम कॉरिडॉर) इंटरचेंज स्टेशनही सीताबर्डीवरच आहे. त्यात सीताबर्डी ही एक मोठी व्यापारी बाजारपेठ असल्याने व्यापा-यांची आणि सर्वसामान्य खरेदीदारांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असतेच. गाड्यांचा ट्रॅफ़िक जाम, माणसांना चालायला जागा नाही, प्रदूषण आणि गोंधळ यामुळे येथे जाणे नकोसे होऊन जाते. या भागातल्या हॉस्पिटल्समध्ये राहणा-या रूग्णांची आणि त्यांच्यासोबतच्या नातेवाईकांची अवस्था बिकट होते. शहराच्या एकूणच अवस्थेवर ताण पडतो.



नागपुर शहर बस ताफ़्यात आता बॅटरीवर चालणा-या प्रदूषणविरहित बसेसची भर पडलेली आहे. आता गरज आहे ती सीताबर्डीसारख्या मध्यवर्ती भागात "शून्य प्रदूषण विभाग" म्हणून विकसित करण्याची. खालील नकाशात दाखवल्याप्रमाणे सीताबर्डी, धंतोली, रामदासपेठ हा विभाग सर्व बाजूनी बंद करून इथे फ़क्त बॅटरीवर चालणा-या शून्य प्रदूषण वाहनांना परवानगी देण्याची इथे गरज आहे. व्यापा-यांच्या मालवाहतुकीसाठी बॅटरीवर चालणा-या रिक्षा आणि प्रवाशांसाठी या हद्दीच्या सीमेवर प्रवाशांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी वाहनतळ उभारून आत फ़क्त या बॅटरीवर चालणा-या बसेस Hop On - Hop Off (Ho-Ho) या सोयीने चालविल्या गेल्या पाहिजेत. पत्रकार निवासांना लागून असलेल्या "विदर्भ हॉकी असोसिएशन"च्या मैदानावर हॉकीचा सामना झालेला मी गेल्या २० वर्षात तरी बघितलेला नाही. उलट आजुबाजूच्या झोपडपट्टीवाल्यांचे आक्रमण थोपवता थोपवता हे मैदान आक्रसून चालले आहे. ते अधिक आक्रसण्याआधी त्यावर बहुमजली वाहनतळ बांधून होऊ शकेल. तसेच वाहनतळ यशवंत स्टेडियमशेजारी असलेल्या जागेवर आणि बारासिग्नल शेजारी असलेल्या जागांवर बांधून सर्व खाजगी वाहने तिथे थांबवता येतील.



बर्डी CBD प्रभागात सर्वत्र या Hop On Hop Off (Ho-Ho) यंत्रणेअंतर्गत शून्य प्रदूषण करणा-या बसेस चालविल्या गेल्या पाहिजेत. या बसेसना कुठूनही कुठेही प्रवास करण्याचे एका विशिष्ट कालावधीसाठी (३ ते ४ तास) एक निश्चित तिकीट असावे. ते तिकीट खाजगी गाड्या पार्किंगच्या जागी आणि बसमध्येही वाहकाकडे मिळावे. पार्किंगच्या जागांपासून निघून संपूर्ण सीताबर्डी - धंतोली -  रामदासपेठ परिसरात या बसेसने उलटसुलट फ़े-या सतत मारत असाव्यात आणि प्रवाशांना एकदाच तिकीट काढून, बसच्या नियत थांब्यावरून, त्यांच्या सोयीनुसार, कुठूनही कुठेही जाण्याची (त्या ३ ते ४ तासांमध्ये) परवानगी असावी.


यामुळे

१. सीताबर्डी भागातला ट्रॅफ़िकचा गोंधळ कमी होईल.

२. प्रदूषण पातळी खूप कमी होईल.

३. सार्वजनिक वाहनांच्या उपयोगाकडे लोकांचा कल वाढेल.

४. मेट्रो जादा प्रवासी आकृष्ट करेल. (सीताबर्डीपर्यंत जाऊन तिथे बाहेर आपली दुचाकी / चारचाकी गाडी पार्क करून बसमध्ये फ़िरणे कुणाला जिवावर येत असेल तो / ती सरळ आपल्या घरापासून मेट्रोने सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन गाठेल आणि तिथले काम / खरेदी वगैरे आटोपून परत मेट्रोने आपल्या घरी परत येईल.


यापेक्षा अधिक काही आपल्याला सुचत असल्यास कृपया कळवा. तशी एक चळवळच उभी करता येईल.


- सजग आणि पर्यावरणाविषयी कळकळ असलेला प्रवासी पक्षी, राम किन्हीकर.


1 comment:

  1. चळवळी चा भाग होण्यास तयार।

    ReplyDelete