अनेक योगी, सत्पुरूष अनंत जन्मे त्या भगवंताची निस्वार्थ, निस्पृह भक्ती करीत असतानाही तो भगवंत त्यांना दर्शन देत नाही, अशी अनेक उदाहरणे आपण वाचतो, ऐकतो आणि भाग्यवान असू तर अशा सदभक्तांचा सहवासही आपल्याला मिळतो.
मनात विचार येतो की हा त्या हजारो वर्षे तपश्चर्या, उपासना करणार्या योग्यांवर अन्याय नव्हे का ?
आणि एका मराठी गाण्यात याचे उत्तर सापडले.
"स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केव्हा."
त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी केलेल्या हजारो वर्षांच्या तपाचीच एव्हढी आवड निर्माण होते की ते तप, ती उपासना संपून गेल्यावर होणार्या भगवंतप्राप्तीचा आनंद दुय्यम वाटायला लागतो.
श्रीगुरूचरित्राची पोथी संपत आल्यानंतर, ७ व्या दिवशीच्या पारायणात, महाराजांच्या शैलगमन यात्राप्रसंगाचे वर्णन वाचताना घशात आवंढा अडकतो. पोथी संपूच नये असे वाटत राहते.
श्रीगजाननविजय ग्रंथाचा १९ वा अध्याय वाचतानाही श्रीगजानन महाराजांनी त्यांचे शिष्य श्री. बाळाभाऊंना केलेला अध्यात्माचा उपदेश आणि त्यांचे देहविसर्जन वाचतानाही असेच अष्टभाव शरीरात दाटतात आणि तो ग्रंथ पुन्हा अविरत वाचत रहावा ही प्रबळ इच्छा होते.
मला वाटते की ग्रंथवाचनात इतके एकरूप होणे, अशा प्रकारे भावना उचंबळून येणेच या ग्रंथवाचनाची फलश्रुती आहे. यापलिकडे जे मिळेल ते सगळे लौकिक जगातले मिळेल पण आता जे मिळाले ते अलौकिक असे आहे.
साध्य साधण्यासाठी केलेल्या साधनाचीच एव्हढी भुरळ पडावी की साध्याकडे दुर्लक्ष व्हावे. पण नंतर लक्षात येते की साध्य तर तो भगवंत आहेच पण त्याहीपेक्षा जास्त तो साधनात आहे. आणि म्हणून हजारो वर्षांच्या, अनेक जन्मांच्या तपाच्या फळाची योगी सत्पुरूषांना आस उरत नाहीत. त्यांना साधनातच त्या साध्याची प्राप्ती झाली असते आणि अविरत साधनातच त्यांना भगवंताची प्राप्ती अविरत होत असते.
म्हणून श्री ब्रम्हचैतन्य महाराज आपल्या भक्तांसाठी जो उपदेश नेहमी करतात की "नाम हे साधन म्हणून इतक्या आत्मीयतेने करा की नाम हेच साध्य झाले पाहिजे. मला जन्मात जर काही साधायचे असेल तर ते नामच अशी भक्ताची दृढ भावना झाली पाहिजे." या वाक्याचा अर्थ कळतो.
अवधूत चिंतन श्रीगुरूदेव दत्त.
- आजचे स्वानुभवात्मक चिंतन : राम प्रकाश किन्हीकर (१७०२२०२१)
No comments:
Post a Comment