३० जून २००९.
Wednesday, June 30, 2021
खाणा-याने खात जावे...
Saturday, June 19, 2021
Lets celebrate small bundles of joys.
तसेही नागपूर हे हिरवेगार शहर आहे. आणि त्यातही आमचे महाविद्यालय शहरापासून १५ किमी दूर, एका टेकडीवर आहे.
Saturday, June 12, 2021
शिरा पुराण
आमच्या बालपणी शिरा बशीतूनच खाण्यासाठी पुढ्यात यायचा हो. स्टेनलेस स्टीलच्या ताटलीतून शिरा खाणे म्हणजे एखादा पदार्थ नुसताच पोटात ढकलल्यासारखा वाटतो. म्हणूनच
१९९५ मध्ये मुंबईतल्या उडपी हाॅटेलमध्ये शिरा असा स्टेनलेस स्टीलच्या प्लेटमधून खाताना माझ्या अंगावर निळा एप्रन वगैरे आलाय की काय अशी माझी भावना सतत होत होती. बाकी उडपी हाॅटेलमधला "केशरी शिरा" म्हणजे जिलेबीचा रंग घातलेला शिरा. इतका केशरी रंग अस्स्सल केशर घालून शिर्याला आणायला त्या उडप्याला काश्मीरातून आठवड्याच्या आठवड्याला ट्रकभर केशर मागवावे लागेल आणि त्याचे दिवाळे निघेल.
साधारण बशीभर शिर्यात एखादा बेदाणा आणि अर्धाच काजूचा तुकडा त्याची लज्जत वाढवतात. बचकभर बेदाणे आणि भरपूर काजू म्हणजे अन्नू मलिकचा भरपूर वाद्यमेळ असलेला वाद्यवृंद. पोट भरेल पण मजा नाही.
याउलट प्रमाणात काजू बेदाणे प्रमाणात घातलेला शिरा म्हणजे तानपुरा, संवादिनी आणि तबल्याच्या संगतीने वसंतराव देशपांड्यांनी जमवलेली मैफिल. मन तृप्त होईलच होईल.
बरे, इतक्या एकाच बशीभर शिर्यावर खाणे आटोपावे. आणखी शिरा खाण्याची इच्छा असतानाच शिरा खाणे थांबवले म्हणजे पुढच्या वेळेची शिरा खाण्याची आस कायम असते. हा मनभरून खाण्याचा पदार्थ, पोटभरून नव्हे हे कायम लक्षात ठेवावे. "स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केव्हा" या गाण्यातला भाव लक्षात ठेवावा आणि "विरहात चिंब भिजूनी, प्रीति फुलोनि यावी" असा विरह शिर्याचा आणि आपला झाला असेल तरच तो चविष्ट लागतो हे ही लक्षात ठेवावे. दर आठवड्यात एकदा शिरा खात असणे म्हणजे नुसते उदरभरण. एकूण पावसाळ्यात चारपाचदा आणि वर्षभरात आणखी चारपाचदा शिरा खाल्ला तरच ही प्रीत फुलून येते. (स्वतःकडल्या आणि इतरांकडल्या सत्यनारायणातला प्रसादाचा शिरा यात धरायचा नाही. ते वेगळे. हा शिरा म्हणजे हृदयस्थ आत्मनारायणाला खुश करण्यासाठी गृहलक्ष्मीने केलेला शिरा.)
रोजच्या खाण्यातल्या लोणच्याची (याठिकाणी लिंबाचे लोणचे सर्वोत्तम. मग इतरांचा क्रमांक) अनोखी चव अनुभवायची असेल तर लोणच्याची एखादीच फोड शिर्यासोबत बशीत असावी. सोबत दीड ते दोन मिलीलीटर त्याच लोणच्याचा खार. अशावेळी प्रत्यक्ष भगवंत जरी पुढे उभे राहिलेत तरी "देवा हा शिरा पहिल्यांदा संपवतो आणि मग मुक्तिविषयी वगैरे बोलू." अशी भक्ताची भावना झालीच पाहिजे.
शिरा कणकेचा श्रेष्ठ की रव्याचा या विषयांवरून गृहिणींचे एक मिनी महायुध्दही संभवू शकते. पण साखरेऐवजी गूळ घालून केलेल्या शिर्याला तोड नाही. ६ वर्षांपूर्वी मुंबई - आग्रा महामार्गावर मालेगावनजिकच्या साई कार ढाब्यावर एके दिवशी सकाळी नाश्त्यात खाल्लेल्या गुळाच्या शिर्याची चव नुसतीच माझ्या जिभेवर आहे असे नाही तर त्या चवीने आपले फुटप्रिंट थेट माझ्या मेंदूत तयार केलेले आहे. या जन्मात काय, पुढल्या कित्येक जन्मात ती अप्रतिम चव मी विसरू शकत नाही.
शिरा खाण्यासाठी चिनीमातीच्या बशीसोबत मात्र चकाकता, स्टेनलेस स्टीलचा चमचाच हवा. इतर वेळी उदरभरणासाठी पाच बोटांचा उपयोग कितीही उपयुक्त असला तरी त्या चमच्याची आणि बशीची सुंदर किणकिण कानावर पडली की शिरा पंचेंद्रिये तृप्त करून जातो. हो, नाहीतर कानांना त्याचा आस्वाद कसा मिळणार होता ना ?
आणि एक सांगू का. त्या चमचा आणि बशीच्या किणकिणीवरून आपल्या नारायणाला अजून अर्धी बशी शिरा दिला तर चालेल हे जिला ओळखता येत ना, ती खरी गृहलक्ष्मी. त्यांचा संसार रवा आणि साखरेसारखा एकजीव होऊन शिर्यासारखा खमंग झालाय हे ओळखावे.
- शिर्यातला गोड बेदाणा, राम किन्हीकर.
इतर लेखांसारखाच हा लेखही माझ्या नावाशिवाय (कधीकधी कुठल्यातरी भलत्याच उपटसुंभ नावाने) बर्याच व्हाॅटसॅप ग्रूप्समधून माझ्यापर्यंत येईल याची खात्री बाळगू का ?