Sunday, October 3, 2021

नवरात्रीला नवरूपे तू ...

आता पुढल्या दोन तीन दिवसात नवरात्र सुरू होतय. गेल्या १० -१२ वर्षांपासून नऊ दिवसांचे नऊ रंग आणि महिलांचे त्या त्या रंगांचे परिधान असा ट्रेण्ड आपल्या महाराष्ट्रात चांगलाच रूजलाय. मार्केटिंगचे हे नवे खूळ म्हणून याचा विरोधही होतोय. मी पण केलेला होता. पण मग महिलावर्गाची नवनवे पोषाख परिधान करण्याची, नटण्या मुरडण्याचे हौस त्यानिमित्ताने होतेय. कपाटातल्या, ट्रंकेतल्या जुन्या साड्यांना एखाद्या विशिष्ट रंगाच्या निमित्ताने बाहेरची हवा मिळते ह्या गोष्टी बघितल्यानंतर विरोधाची धार मावळली. त्या समस्त भगिनींच्या शरीरावर कुठलाही रंग का असेना, त्यांच्या मनातला भक्तिरंग जोवर लख्ख आणि चमकता आहे तोवर काळजी नाही असे मी माझ्या मनाला बजावले आणि टीका थांबवली.

दरवर्षी शारदीय (आश्विन नवरात्र) किंवा चैत्र नवरात्र आले की माझ्या मनात मात्र देवीच्या नवरूपांची दाटी होऊ लागते. आजवर त्या जगन्मायेने मायेच्या ममतेने माझा सांभाळ केले असल्याचे दाखले डोळ्यांसमोर तरळू लागतात. ती जर आपल्या पाठीशी उभी नसती तर आपले अनाथपण किती भीषण झाले असते याची नुसती कल्पनाही काळजाचा थरकाप उडवते. आपल्या लेकरांचे सहस्र अपराध पाठीशी घालून तिने आपल्यावर किती माया केली आहे याची जाणीव डोळे पाणावते.


माहूरची रेणुका म्हणजे किन्हीकरांचे कुलदैवतच, दरवर्षी एक दोन वेळा दर्शनाला सहज जाणे होतेच. माहूरला मंदिरात गेल्यावर अगदी आपल्या घरी गेल्याचीच माझी भावना होते. तिथे दर्शन वगैरे घेऊन आई रेणुकेच्या गाभा-या समोरील सभामंडडपात निवांतपणे स्तोत्रे वगैरे आळवत बसल्यावर समोर आईची प्रसन्न मूर्ती दिसत राहते. आपले वडील, आजोबा, पणजोबा आणि त्यापूर्वीच्या कितीतरी पिढ्या हिच्याच पदराच्या छायेखाली वाढल्यात, अनंत पिढ्यांपासून आपल्याला मार्गदर्शन करण्याचे काम आईने केलेले आहे या भावनेने ओजस्वी स्तोत्र म्हणत असतानाही आपसूकच डोळ्यांना अश्रूधारा लागतात आणि त्या तिच्या चरणी रूजू होतातही. गड चढताना अधीर झालेली पावले परतीचा निरोप घेताना जडावतात. वारंवार गडाकडे पाहून "आई, पुन्हा बोलाव बाई." ही विनवणी माहूरपासून नागपूर रस्त्यावरच एक २० किमी अंतरावरचा घाट ओलांडून गड दिसेनासा होईपर्यंत मनात सुरू असते.


तुळजाभवानीचे दर्शनही मी अनेकवेळा घेतलेय. सोलापूर जिल्ह्यात सांगोल्याला रहायला गेल्यानंतर मात्र दर्शनाचे योग वारंवार आलेत. भवानीचे मंदीर, त्याभोवतालची तटबंदी वगैरे पाहून आणि छत्रपती शिवाजी महाराजांशी भवानीआईचे ऐतिहासिक नाते पाहून आपण एखाद्या प्रजाहितदक्ष सम्राज्ञीला भेट द्यायला निघालोय की काय ? अशी भावना मनात येते. इथे आईसाहेबांची शिस्त कडक आहे. त्या शिस्तीत वावरून आपले गा-हाणे त्यांच्यासमोर मांडतोय अशी भावना होते. अर्थात आईसाहेब त्रैलोक्यसम्राज्ञी असल्याने भक्ताची मनातली कुठलीही इच्छा अपूर्ण ठेवत नाहीत याची मनोमन खात्री असतेच.


कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन मी सप्टेंबर १९८९ ला घेतले होते आणि कराडला ४ वर्षे शिकायला असल्याने त्या चार वर्षात आणि नंतरही जेव्हाजेव्हा आठवण होईल तेव्हातेव्हा घेतले. अंबाबाईच्या मंदिरात मला कायम पुल आठवतात. देव जर माणसांशी बोलायला लागलेत तर कसे बोलतील यात त्यांनी लिहून ठेवलेय की अंबाबाई म्हंणेल, "का आलयसा ? समदी लेक्रबाळं ठीक हायेत न्हवं ?" बस्स. मला देवी तश्शीच दिसते. सगळ्या जगासाठी ती जगन्माता महालक्ष्मी वगैरे असली तरी मला ती समस्त भक्तांची आणि त्यांच्या कुटुंबांच्या योगक्षेमाची सदैव काळजी घेणारी घरातली अत्यंत प्रेमळ अशी आजी वाटते. मी १९८९ मध्ये पहिल्यांदा तिच्या दर्शनाला गेलो त्यावेळी आणि त्यानंतर आजतागायत दरवेळी त्या दर्शनबारीतून तिच्या सभामंडपात गेलो की शरीराला एक अवर्णनीय गारवा जाणवतो आणि नंतर जाणवत की आपलं मनही नुसते तिच्या दर्शनबारीत शांत झाले आहे. तिच्याकडे मागण्यासाठी भरपूर लौकिक जगतातल्या मागण्या असतात पण तिच्यासमोर गेलो की तिच्या प्रेमळपणापुढे सगळ्या मागण्यांचा विसर पडतो. ती सुद्धा मनोमन आपले मागणे जाणते आणि पुरेही करते. 


वणी गडावरील सप्तशृंगी आईच्या दर्शनाचा योग माझ्या आयुष्यात खूप उशीरा आला. पण आम्ही धुळे जिल्ह्यात शिरपूर मुक्कामी असताना मग मात्र दरवर्षी दर्शनाचा योग येत गेला. घरातल्या छोट्या भावंडांचे रक्षण करण्याचे जबाबदारी एखाद्या मोठ्या बहिणीवर असावी आणि तिने छोट्या भावंडांचा सांभाळ करताना मोठ्या आवेशाने त्यांच्याविरूद्ध असलेल्या शत्रूंशी भांडावे अशी ही देवी मला कायम भासत आलेली आहे. आजही माझ्यावरील कुठल्याही संकटाच्या वेळी या माझ्या अष्टादशभुज बहिणीला माझी पहिली हाक जाते आणि ती पण जगात सर्वत्र माझ्या अभिमानाने माझ्या कैवारासाठी धावून येते ही माझी प्रचिती आहे.


चंद्रपूर माझे जन्मगाव आणि आता माझी सासुरवाडीही चंद्रपूरचीच. त्यामुळे चंद्रपूर म्हणजे माझे दुसरे निवासस्थानच. बालपणी चंद्रपूरला, आजोळी महिनोन्महिने आम्ही रहायचोत. आजही चंद्रपूरला गेलो आणि तिथले ग्रामदैवत असलेल्या महाकाली देवीचे दर्शन घेतले नाही असे क्वचितच होत असेल. भक्तांविषयीच्या कळवळ्याने सर्वसामान्य भक्तांना अगदी आपल्यापर्यंत प्रवेश देणारी, आपल्या चरणांना स्पर्श करू देणारी ही मूर्ती पूर्ण जगात कुठेच नसेल. समस्त स्त्रीवर्गही आईसाहेबांची ओटी थेट भरता येत असल्याने अत्यंत आनंदाने आणि जिव्हाळ्याने इथे येतो. भक्तांचे अहित करणा-यांसाठी प्रत्यक्ष महाकालीचे रौद्र रूप धारण करणारी ही देवी मात्र मला कायम प्रेमळ रूपातच दर्शन देती झालेली आहे. मी दिवसातल्या सगळ्या प्रहरांमध्ये दर्शन केल्याने प्रत्येक प्रहरातले वेगवेग्ळे रूप मला अनुभवायला मिळालेले आहे. सकाळी बालिका, दुपारी तरूणी, संध्याकाळी प्रौढा तर रात्रीच्या वेळी वृद्धा स्वरूपात मला दर्शन दिलेली ही अत्यंत प्रेमळ माता आहे. संतकवी दासगणू महाराजांनी श्रीगजाननविजय ग्रंथात लिहील्याप्रमाणे "वाघिण इतरा भयंकर, परंतु तिचे जे का असते पोर, ते तिच्याच अंगावर, निर्भयपणे क्रीडा करी" इतरांसाठी प्रत्यक्ष काली असलेली ही देवी माझ्यासाठी मात्र माझ्या कन्येचे, भगिनीचे, मावशीचे, आजीचे रूप घेऊन मला भेटते.


दक्षिण भारताच्या आमच्या प्रवासात मदुरैला मीनाक्षी अम्मांचे एकदाच दर्शन झाले पण ते दर्शन जन्मोजन्मीची ओढ लावून गेले. आम्ही दर्शनबारीतून दर्शनाला गेलो तेव्हा संध्याकाळ उलटून गेली होती. त्या विशाल मंदीर परिसरात एका अनामिक ओढीने आम्ही निघालो होतो. मीनाक्षी अम्मांचा गाभारा समोर बघितल्यानंतर मात्र खरोखर आमचे देहभान हरवले होते. दक्षिण भारतीय मंदीरांमध्ये असलेल्या समयांच्या प्रकाशात (विजेवर चालणा-या कुठल्याही दिव्यांच्या कृत्रिम प्रकाशाशिवाय) सुंदर फ़ुलांच्या हार गज-यात नटलेली अम्माची मूर्ती स्वयंप्रकाशित होत होती. अम्मांच्या त्या काळ्या पाषाणाच्या विग्रहातून स्वयंप्रकाश बाहेर पडत असल्याचा हा अनुभव अनंत जन्मांचे दृष्टीचे पारणे फ़ेडणारा होता. आपण कोण आहोत ?, कुठे आहोत ? या सगळ्या लौकिक बाबींचा घटकाभर विसर पाडणारे ते अलौकिक दर्शन. २००८ नंतर मी अम्मांना अनंत वेळा दर्शनाला बोलावण्याची आणि तसेच दर्शन पुन्हा देण्याची प्रार्थना शेकडो वेळा केलेली असेल. आजही मनात ठसावलेले ते अम्मांचे दर्शन. क्षणभर चक्षू मिटले तरी अंतर्चक्षूंना जाणवणारा तो दिव्य प्रकाश, ती दिव्य प्रभा. केवळ अवर्णनीय.


अगदी तसेच दर्शन आम्हाला तिरूपतीला पदमावती देवीने दिलेले होते. तिरूमला गडावर तिरूपती बालाजींचे दर्शन आम्ही आटोपले. "दर्शन बारीत सगळ्यात शेवटच्या मंडपात गेल्यानंतर लक्ष सरळ बालाजीकडे ठेव. आजुबाजुच्या सोन्या-रूप्याच्या खांबांकडे, ऐश्वर्यसंपन्न मंडपाकडे लक्ष जाऊ देऊ नकोस. ते सगळे नंतरही बघायला मिळेल." हा माझ्या मामेभावाचा सल्ला मी मानला होता आणि शेवटच्या दर्शनमंडपात गेल्याबरोबर दृष्टी सरळ त्या जगन्नियंत्याकडे लावली होती. मनसोक्त दर्शन झाले आणि त्याच्याही शरीरातून निघत असलेल्या दिव्य प्रभेच्या दर्शनाने आम्ही तृप्त झालो होतो. त्याच्या इतर वैभवाचे मनसोक्त दर्शन नंतर प्रदक्षिणेच्या वेळी झाले. त्यानंतर तिरूपती गावात येऊन पदमावती देवीच्या दर्शनाला जाताना आपण त्या जगन्नियंत्याच्या पत्नीला भेटायला चाललो आहोत याचे दडपण मनात होते. पण सत्ययुगातला आपला साधेपणाचा धर्म या सीतामैय्याने कलियुगातही आपल्या भक्तांसाठी जपलाय हे जाणवले. एखाद्या करोडपती माणसाची प्रेमळ बायको असेच पदमावतीचे रूप मी अनुभवले. आणि आपण हिच्याकडे हक्काने हट्ट करू शकतो. आपल्या सगळ्या भक्तांच्या सकल कामना तृप्तीसाठीच देवीने पुन्हा कलियुगात रामरायांसोबत जन्म घेतलाय याची मनोमन प्रचिती आली.


तेलंगणात असलेल्या बासर ब्रम्हेश्वर क्षेत्रातही हीच अनुभूती मला आली. ज्ञानसरस्वतीचे भारतातले हे एकमात्र मंदिर. इतर ठिकाणी देवीला फ़ुले, हार, नारळ अर्पण होत असतील पण इथे पाटी - पेन्सिल, वह्या, पेन्स अर्पण होतात. २०११ मध्ये पहिल्यांदा आम्ही गेलो तेव्हा ज्येष्ठ महिन्यातली शुक्ल एकादशी होती. बासर क्षेत्रातला "अक्षराभ्यासम" चा दिवस. संपूर्ण आंध्र आणि तेलंगणमधून भाविक मंडळी आपापल्या लहानग्यांना शाळेत टाकण्यापूर्वी इथे येऊन देवीसमोर त्यांच्या हस्ते पाटीवर किंवा वहीवर "श्रीगणेशायनमः" लिहून त्यांच्या अक्षर अभ्यासाची सुरूवात करतात. किती छान कल्पना, नाही ? त्यादिवशी बालवाडीच्या प्रेमळ शिक्षिकेच्या रूपात दिसलेली ही देवी नंतरच्या भेटींमधल्या दर्शनात मात्र आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीवर करडी नजर ठेऊन असणा-या आईसारखीच मला दिसली. आपल्या मुलांनी शिकावे, शहाणे होऊन मोठे व्हावे या कळकळीने त्यांच्याकडे लक्ष देणारी आई.


सांगोला मुक्कामी असताना पंढरपूरला अनंत वेळा जाणे झाले. विठठलपंतांचे कधी मुख्य दर्शन तर कधी केवळ मुखदर्शनच झाले पण रूक्मिणीआईचे मात्र दरवेळी मनसोक्त दर्शन झाले. वेळप्रसंगी बाप कठोर होऊ शकतो पण आई ? तिला कायम आपल्या मुलांना पोटाशी घ्यावेच लागते याचा प्रत्यय देणारे हे दर्शन. आश्विन नवरात्रात रेणुकामातेचाही नवरात्रोत्सव पंढरपुरात होत असतो. याप्रसंगी तिच्या चरणी आपली सेवा रूजू करण्यासाठी भारतातले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत पंढरपुरात येत असतात आणि आपली कला रुक्मिणीमातेच्या चरणी रूजू करीत असतात. या काळात सांगोल्याहून आम्ही आवर्जून पंढरपुरात जायचोत. प्रभा अत्रे, राहूल देशपांडे, शौनक अभिषेकी, राजा काळे इत्यादि दिग्गजांना आपली सर्वोत्तम कला इथे सादर करताना पाहणे हा आनंदाचा गाभा असे. चैत्र नवरात्रात पण रुक्मिणीमातेचा उत्सव असतो. माझ्या पत्नीने याप्रसंगी तिची ओटी भरल्याचे कृतकृत्य प्रसंग आम्ही अनुभवले. आपले जगचालक पती भक्तांच्या हाकेत गुंतल्याचे पाहून त्यांच्याकडल्या जगचालनाचा कारभार आपल्या हातात घेणा-या आणि समर्थपणे चालवणा-या अत्यंत कर्तबगार स्त्रीच्या रूपात मी रूक्मिणीमातेला कायम पाहिले आहे आणि वंदन केले आहे.

ही आहे माझी आणि माझ्या कुटुंबियांची नवरात्रीची नवरूपे. त्या भवानीकडे निरनिराळ्या रूपाने बघण्याची. तिच्या विविध रूपांनी स्तिमित होऊन जाण्याची. तिच्याशी मनोमन विविध स्वरूपात जोडत गेलेल्या नात्यांची. एका साध्या भोळ्या, कसल्याही बाह्य उपचारांची गरज न भासणा-या आंतरिक भक्तीची.

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः
नमः प्रकृत्यै भद्रायै, नियताः प्रणताः स्म ताम.

सदानंदीचा उदो अस्तू. बोल भवानी की जय.

- प्रा राम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment