नागपूर ते पुणे या अत्यंत महत्वाच्या आणि प्रवाशांच्या वर्दळीच्या मार्गावर कोव्हिडपूर्वी कुठलेकुठले पर्याय उपलब्ध होते ते आपण बघूयात म्हणजे आता झिरो बेस्ड टाईम टेबलमध्ये रेल्वेला काय काय करता आले असते हे आपल्याला बघता येईल.
१. गोंदिया - कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस. (खरेतर या नावाविषयी मला पहिल्यापासून आक्षेप आहे. तामिळनाडू एक्सप्रेस चेन्नई - नवी दिल्ली, केरळ एक्सप्रेस तिरूवनंतपुरम - नवी दिल्ली, तेलंगणा एक्सप्रेस हैद्राबाद - नवी दिल्ली तर मग महाराष्ट्र एक्सप्रेस मुंबई - नवी दिल्ली असायला हवी होती. पण महाराष्ट्रातल्या बोटचेप्या राजकीय नेत्यांमुळे ही गाडी महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात धावते आणि ते ही कुठल्याही प्राधान्याशिवाय. ब-याच ठिकाणी ही गाडी फ़ास्ट पॅसेंजरसारखीच धावते.)
२. हावडा - पुणे आझाद हिंद एक्सप्रेस.
३. नागपूरवरून संध्याकाळी ६.३० च्या वेळेस निघणा-या नागपूर - पुणे एक्सप्रेस (आठवड्यातून ३ दिवस), नागपूर - पुणे गरीब रथ (आठवड्यातून ३ दिवस) आणि बिलासपूर - पुणे एक्सप्रेस (आठवड्यातला उरलेला दिवस).
४. अजनी - पुणे आणि नागपूर - पुणे अशा दोन वेगवेगळ्या दिवशी धावणा-या पण एकच रेक असणा-या दोन हमसफ़र एक्सप्रेस. या दोन्ही हमसफ़र एक्सप्रेस अत्यंत चुकीच्या वेळेवर नागपूर ते पुणे प्रवास करतात. नागपूर - पुणे हमसफ़र दुपारी ३ वाजता नागपूरवरून निघते तर अजनी - पुणे हमसफ़र संध्याकाळी ७.५० ला अजनीवरून निघते.
५. अजनी - पुणे ए. सी. एक्सप्रेस (आठवड्यातून एकदा). ही गाडीही अत्यंत गैरसोयीच्या वेळी नागपूर ते पुणे हा प्रवास करते. संध्याकाळी ७.५० ला नागपूरवरून निघून दुस-या दिवशी ११ वाजता पुण्यात पोहोचणे ही ऑफ़िसवाल्यांसाठी अत्यंत गैरसोयीची वेळ आहे. या गाडीची कथा आणि भ्रमण अत्यंत रोचक आहे. नागपूर ते नवी दिल्ली ही दुरांतो देते म्हणून ममताबाई २०११ च्या बजेटनंतर लोकसभेत बोलल्यात. पण नागपूरच्या तत्कालीन खासदारांना विकासाशी काहीच देणेघेणे नसल्याने ही गाडी अस्तित्वात आली नाही. मग खूप आरडाओरडा झाल्यावर आठवड्यातून एक दिवस ही गाडी नागपूर ते अमृतसर सुरू झाली. ती पण दुरांतो नाही तर संपूर्ण ए. सी. कोचेस असलेली सुपर एक्सप्रेस. ही गाडी नागपूर - अमृतसर - नागपूर - पुणे - अमरावती - पुणे - नागपूर - अमृतसर हा प्रवास एका आठवड्याच्या आवर्तनाने करीत असते.
६. हावडा - पुणे दुरांतो. ही गाडीही नागपूरवरून रात्री ११ वाजता निघून दुस-या दिवशी दुपारी पुण्याला पोहोचते. म्हणजे ऑफ़िसवाल्यांना तशी गैरसोयीचीच. शिवाय हावड्यावरून येत असल्याने नागपूरकरांसाठी फ़ारसा कोटा नाही.
आता झिरो बेस्ड टाईम टेबलमध्ये काय करायला हवे होते हे बघूयात.
नागपूर किंवा एकूणच विदर्भातली तरूणाई पुण्याच्या आय. टी. उद्योगात फ़ार मोठ्या प्रमाणात आहे. या मुलामुलींना नागपूरवरून संध्याकाळी ५.३० किंवा ६.३० ला निघून दुस-या दिवशी सकाळी ८.३० ते ९.०० पर्यंत पुण्यात पोहोचून आपापल्या ऑफ़िसेसच्या सोयीच्या वेळेची गाडी हवी आहे. ती गाडी वातानुकुलीत असावी. गाडीच्या आत मोबाईल व लॅपटॉप चार्जर्स, वाय फ़ाय या आजच्या युगातल्या आवश्यक सेवा असाव्यात. आणि गाडीचे तिकीट खाजगी बसेसच्या तिकीटांशी स्पर्धात्मक (म्हणजे सध्याच्या दरानुसार साधारण १२०० ते १३०० रूपये) असावे. हमसफ़र चे रेक्स या कामासाठी अगदी आदर्श आहेत.
२० कोचेसचा हमसफ़र रेक एकावेळी १६०० प्रवासी वाहून नेऊ शकतो. ही गाडी नागपूरवरून दररोज संध्याकाळी ५.४५ ला निघून साधारण १२ तासात कल्याणला पोहोचली. (विदर्भ एक्सप्रेस विदर्भात बहुतांशी ठिकाणी थांबा घेऊन नागपूर ते कल्याण हा प्रवास १२ तासांच्या आत आजही करते.) तर सकाळी ५.४५ ला कल्याण, ६.३० वाजता पनवेल, ७.३० वाजता कर्जत, ८.०० वाजता लोणावळा घेत घेत सकाळी ८.४५ च्या सुमारास चिंचवडला येऊ शकेल. पुण्यातली आय़. टी क्षेत्रातली मंडळी इथेच आपला प्रवास संपवून आपापल्या ऑफ़िसेसना जाऊ शकतील. इतर लेकुरवाळ्या मंडळींना घेऊन ही गाडी ९.१५ च्या आसपास पुणे स्टेशन गाठू शकेल.परतीच्या प्रवासातही पुण्यावरून दररोज संध्याकाळी ६.०० ला निघून नागपूरला दुस-या दिवशी सकाळी ९.३० पर्यंत ही गाडी येऊ शकेल.
या गाडीमुळे नवी मुंबई - पनवेल - कल्याण - डोंबिवली येथे राहणा-या वैदर्भियांना एक नवी गाडी उपलब्ध होईल. नागपूरवरून नगर- दौंडला रेल्वेने जाणारे जे काही थोडे प्रवासी आहेत त्यांना महाराष्ट्र एक्सप्रेसचा पर्याय उपलब्ध राहीलच. आणि येवला - कोपरगाव - नगर वरून रेल्वेने कुणी पुण्याला जात असेल यावर माझा अजिबातच विश्वास नाही. तसा डेटा रेल्वेकडे उपलब्ध असेलच. त्यावरूनही हा निर्णय घेता येईल. मनमाड - दौंड या एकमार्गी आणि म्हणून वेळखाऊ मार्गापेक्षा कल्याण - पनवेल हा मार्ग रेल्वेच्या वेगाच्या दृष्टीने सोयीचा ठरेल. शिवाय पुण्याला जाताना इगतपुरीलाचा या गाडीच्या मागे एखादे जादा एंजिन लावले तर ते एंजिन कर्जतला घाट चढण्यासाठी बॅंकर्स लावण्याचा वेळ वाचवू शकेल. हे जादा एंजिन अप प्रवासात लोणावळ्याला काढून ठेवता येईल आणि परतीच्या (पुणे - नागपूर) प्रवासात लोणावळ्याला लावून इगतपुरीला काढता येईल. म्हणजे या प्रवासातही कसा-याला बॅंकर्स लावण्याचा वेळ वाचू शकेल. पुश - पुल पद्धतीमुळे गाडीचा वेग वाढेल आणि थांब्यांचा वेळ कमी झाल्यामुळे खोळंबाही टळेल. सध्या ही पद्धत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नवी दिल्ली जाणा-या २२२२१ / २२२२२ राजधानीसाठी अतिशय यशस्वीरित्या वापरली जातेय.
सध्याच्या महाराष्ट्र एक्सप्रेसला मनमाड - कोपरगाव - येवला - बेलापूर - अहमदनगर मार्गाने दौंडपर्यंत नेता येईल. आणि दौंडनंतर पुणे - जेजुरी - नीरा मार्गे सातारा - कराड न करता सरळ कुर्डुवाडीला नेता येईल. एकेकाळी या गाडीला गोंदिया ते सोलापूर प्रवासासाठी एक शयनयान कोच लागायचा. पण या गाडीला २४ कोचेस लावून त्यातले १२ कोचेस कोल्हापूरला आणि १२ कोचेस सोलापूरला नेता येतील. आणि कोल्हापूरपर्यंतचा वेळ वाचवता येईल. अहमदनगर ते सातारा, दौंड ते निरा, जेजुरी जाणारे प्रवासी किती आहेत याचा अभ्यास करून हा निर्णय घेता येईल.
आझाद हिंद , हावडा - पुणे दुरांतो या गाड्यांचे वेळापत्रक थोडे बदलून (हावड्यावरून सकाळी निघून नागपूरला रात्री आणि पुण्याला दुस-या दिवशी दुपारी नेण्यात आली तरी काही हरकत नाही.) नागपूर ते पुणे, अमरावती ते पुणे आणि बल्लारपूर ते पुणे या गाड्यांना पुण्यात पोहोचण्यासाठी महत्वाचा (सकाळी ७.३० ते ९.३०) वेळ मोकळा ठेवला जायला हवा.
सध्या अमरावती ते पुणे ही अकोला - पूर्णा - परभणी - लातूर रोड - लातूर - कुर्डुवाडी अशा लांबच्या मार्गाने जाणारी एक एक्सप्रेस गाडी आहे. तिला रद्द करून दररोज अकोला - भुसावळ - मनमाड - कोपरगाव - अहमदनगर - दौंड मार्गे पुण्याला जाणारी एक चांगली गाडी सुरू करता येईल. (अमरावती संध्याकाळी ६.०० वाजता आणि पुणे सकाळी ६.०० वाजता) तसेच सध्या काजीपेठ - पुणे अशी उगाचच काजीपेठपर्यंत वाढवलेली एक एक्सप्रेस सुरू आहे. बल्लारशाहलाच व्यवस्थित रेक मेंटेनन्सच्या सोयी करून ही गाडी बल्लारशाह - पुणे अशी करता येईल. (बल्लारशाह दुपारी ४.३० वाजता, पुणे दुस-या दिवशी सकाळी ८.३० वाजता)
या गाड्यांचे थांबे आणि जागांचे कोटा ठरवितानाही थोडासा कॉमन सेन्स वापरणे जरूर आहे. बल्लारशाह - पुणे गाडीला पूर्णपणे जनरल कोटा बल्लारशाह ते वर्धा पर्यंतच आणि वर्धेनंतरचे थांबेही मर्यादित. नागपूर ते पुणे हमसफ़रला जनरल कोटा चांदूररेल्वेपर्यंतच आणि वर्धा ते अमरावती पर्यंतचे थांबेही बल्लारशाह - पुणे गाडीशी वाटून घेतलेले. म्हणजे बल्लारशाह - पुणे गाडी जर वर्धेनंतर पुलगावला थांबणार असेल तर नागपूर - पुणे हमसफ़र गाडी पुलगावला न थांबता वर्धेवरून सरळ धामणगावला थांबायला हवी. मग बल्लारशाह - पुणे गाडीही पुलगावनंतर धामणगावला न थांबता सरळ चांदूर रेल्वेला थांबवायला हवी. तशीच मग नागपूर - पुणे हमसफ़रही धामणगावनंतर चांदूरचा थांबा टाळून सरळ बडने-याला न्यायला हवी.एकाच थांब्यावरून १५ - १५ मिनिटांच्या अंतराने १००० - १२०० किमी दूर जायला गाड्या उपलब्ध असण्याची सध्याची व्यवस्था मोडकळीस आणण्याची हिंमत रेल्वेने या पुनर्रचनेच्या निमित्तने दाखवायला हवी.
रेल्वे असा विचार करून नवी आखणी करतेय की आपले १५० वर्षांपासूनचे जुनेच ctrl c + ctrl v चे धोरण पुढे सुरू ठेवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
- रेल्वेविषयी आणि प्रवाशांविषयीही कळकळ असलेला रेल्वेफॅन राम प्रकाश किन्हीकर
Nice ideas
ReplyDelete