शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड.
महाविद्यालयीन वार्षिक स्नेहसंमेलन, १९९२.
आमच्या महाविद्यालयात कुठलेही वार्षिक स्नेहसंमेलन चांगले ३ दिवस चालायचे. पहिल्या दिवशी सकाळी विविध स्पर्धा आणि संध्याकाळी कुठल्या तरी दिग्गज साहित्यिक, विचारवंताकडून उदघाटन. आम्ही प्राचार्य शिवाजीराव भोसले (मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू), प्रा. शं. ना. नवलगुंदकर (पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू), द. मा. मिरासदार यांच्यासारख्या दिग्गजांचे विचार आमच्या स्नेहसंमेलनातल्या उदघाटनाच्या प्रसंगी ऐकलेले आहे. त्याचदिवशी रात्री महाविद्यालयातल्या मुलांचेच तीन अंकी नाटक सादर होत असे. पहिल्या वर्षी सुधीर मुतालीक, अनुपमा देशपांडे, पराग लपालीकर, प्रज्ञा बेणारे, हेरंब अभ्यंकर, श्रीराम कुलकर्णी यांनी गाजवलेले वसंत सबनीसांचे "सौजन्याची ऐशीतैशी", दुस-या वर्षात आम्ही भाग घेतलेले वसंत कानेटकर लिखित "प्रेमाच्या गावा जावे" तिस-या वर्षात प्रवीण काळोखेने दिग्दर्शित केलेले आणि सुधीर घळसासी, रश्मी कुलकर्णी अभिनित आचार्य अत्र्यांचे "प्रेमाची बेडी" तर आमच्या अंतिम वर्षात आम्ही अभिनय केलेले आणि उत्तरोत्तर तुफ़ान रंगत गेलेले "तीन चोक तेरा" अशी एकापेक्षा एक नाटके सादर होताना पाहिली.
स्नेहसंमेलनाच्या दुस-या दिवशी सकाळी रोझ डे, टाय डे, साडी डे साजरे व्हायचे. संध्याकाळी चार एकांकिका सादर व्हायच्यात. ज्या अभिनेत्यांची, अभिनेत्रींची तीन अंकी नाटकातली निवड थोडक्यात हुकली ती सर्व मंडळी हिरीरीने खूप छान एकांकिका बसवायची. सुंदर सादरीकरण व्हायचे. मुले तीन अंकीचा आणि एकांकिकांचाही रसिकतेने आस्वाद घ्यायचीत.
स्नेहसंमेलनाच्या तिस-या दिवशी सकाळी ट्रॅडिशनल डे साजरा व्हायचा. आणि संध्याकाळी "व्हेरायटी एंटरटेनमेंट" म्हणून गाणी, नाच, नकलांचा विविधरंगी कार्यक्रम साजरा व्हायचा. संजय मोतलिंग, प्रफ़ुल्ल देशपांडे, जितेंद्र पतंगे, सतीश तानवडे अशी प्रत्येक वर्गातली गाण्यातली "बाप" मंडळी एकापेक्षा एक सुरेल गाणी सादर करायची. भरपूर वन्स मोअर मिळवायचीत.
१९९२ च्या "ट्रॅडिशनल डे" ची च गोष्ट. यावर्षी नक्की काय पोषाख करावा ? या विचारात आम्ही सगळी मित्रमंडळी होतो. अचानक माझ्या डोक्यात कल्पना चमकली. तेव्हा चाणक्य सिरीयल दूरदर्शनवर अगदी जोरात सुरू होती. आम्ही आमच्या महाविद्यालयीन परिसरात रहात असलेल्या आमच्या शिक्षकांच्या घराकडे धाव घेतली. त्यावर्षी आम्ही तृतीय वर्षात होतो. दोन वर्षात आपापल्या अभ्यासाने आणि नाटक, नकला, गाणी, क्वीझ, उत्स्फ़ूर्त वक्तृत्व या सगळ्या क्षेत्रांमधल्या आमच्या मुशाफ़िरीने आम्ही शिक्षक वर्गात आणि विद्यार्थ्यांमध्येही चांगलेच परिचयाचे झालेलो होतो. शिक्षकांच्या घरून आम्ही धोतर मिळवलेत. वर उघड्या अंगाने महाविद्यालयात जाणे हे चांगले दिसले नसले म्हणून सगळ्यांनी आपापली शाल उत्तरीय म्हणून पांघरली. (आम्ही सगळे अगदी सिंगल हड्डी होतो. उघड्या अंगाने आमचे सिक्स पॅक ऍब्स दिसले नसते उलट आमच्या छातीच्या पिंज-यातली एकेका बाजूची ६ - ६ हाडे मात्र दिसली असती म्हणून हे शालीखाली अंग दडवणे.)
- आर्य चाणक्याचे शिष्य, शारंगरव राम
No comments:
Post a Comment