Friday, November 19, 2021

सुरक्षा यंत्रणांच्या अनास्थेचा एक अनुभव.

 १७ मे २००६. श्रीवैष्णोदेवीचे दर्शन आटोपून आम्ही कट-यावरून जम्मूतावीला परतलो होतो. (जम्मू ते कटरा हा मजेशीर प्रवास इथे वाचा.) वाटेत जम्मूतल्या श्री रघुनाथ मंदिराचे दर्शन घेऊन, जेवणे वगैरे आटोपून रात्री ११.०० च्या गाडीसाठी अंमळ लवकरच म्हणजे रात्री ९.०० वाजताच जम्मू स्टेशनच्या फ़लाट क्र. १ वर आम्ही मुक्काम ठोकला. आमचा १४ जणांचा मोठठा ग्रुप होता. सामानसुमान भरपूर होते. त्यामुळे ऐनवेळी धावपळ करत गाडीत बसण्यापेक्षा लवकर स्टेशन गाठून तिथे गाडीची वाट बघत बसणे केव्हाही श्रेयस्कर होते.


आमच्या सहलीतले पुढले ठिकाण होते ते म्हणजे हरिद्वार आणि ऋषीकेश. जम्मूवरून सुटणा-या आणि हरिद्वारपर्यंतच जाणा-या हेमकुंट एक्सप्रेसची आम्हा सगळ्यांची कन्फ़र्म्ड तिकीटे होती. आमच्या गाडीच्या रेकची कोच पोझिशन इंडिकेटरवर दाखवत होते. आम्ही आमच्या कोचच्या इंडिकेटरजवळ होतो. फ़लाटावर गाडी लागण्याची वाट बघत आम्ही गोलाकार मंडलात बसलो प्रत्येकाने आपापले सामानसुमान स्वतःच्या आसपास असेल असेच ठेवले होते. गाडीचा रेक रात्री १०.३० ला फ़लाटावर लागेल या अपेक्षेने आम्ही थोडे सैलावलो होतो.


त्यापूर्वी दोन वर्षे आधी, २००४ मध्ये, जम्मू स्टेशनवर आणि रघुनाथ मंदिरावर अतिरेकी हल्ला झालेला होता. रघुनाथ मंदिरात त्या हल्ल्याच्या खुणा दिसत होत्या आणि रघुनाथ मंदिरात आणि जम्मू स्टेशनवरही खूप जबरदस्त सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली दिसत होती. या सगळ्या दहशतीच्या वातावरणाशी आम्ही अनभिज्ञ असल्याने ती सुरक्षा व्यवस्था पाहून आम्ही सगळेच बुजल्यासारखे झालेलो होतो. जम्मू स्टेशनच्या फ़लाटावर तर दर १० मीटरवर वाळूच्या पोत्यांची पुरूषभर उंचीची एक बॅरीकेड रचून त्याआड एक हेल्मेट घातलेला बंदुकधारी सुरक्षारक्षक तिथे तैनात होता. ही सगळी शस्त्रसज्जता, "इथे कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकते" ही आम्हा सगळ्यांच्या मनातली भिती, आमची गाडी लागण्याची उत्सुकता वाढवीत होते. कधी एकदा आमची गाडी लागतेय ? आणि आम्ही इथून सुखरूप रवाना होतोय ? असे आम्हा सगळ्यांनाच झालेले होते.


आणि अचानक ...


आमच्या सामानसुमानाजवळ एक प्लॅस्टिकचे पोते आणि त्याच्या आत पाईपसदृश काही सामान असल्याचे आमच्या लक्षात आले. आमच्यापैकी कुणाचेही ते सामान नव्हते. आसपास असलेल्या प्रवाशांनाही विचारले पण त्यांच्यापैकीही कुणाचे ते सामान नव्हते. आजवर घडलेल्या अनेक दहशतवादी घटना डोळ्यांसमोर येऊ लागल्यात. त्या सामानात काय काय असू शकतं याची जंत्रीच आम्हा सगळ्यांच्या मनात येऊन गेली. मग मी आणि माझा मामेभाऊ त्याविषयी माहिती द्यायला निघालो. वाटेत जवळच असलेल्या वाळूच्या बॅरीकेडआड असलेल्या जवानाकडे चौकशी केली तेव्हा त्याने स्टेशनवरच्या मुख्य सुरक्षा अधिका-याकडे जाण्यास सांगितले.


स्टेशन फ़लाटावर स्टेशन मास्तर ऑफ़िसशेजारीच हे मुख्य सुरक्षा अधिका-याचे कार्यालय होते. आत स्वतः तुंदिलतनू आणि सुस्त साहेब आणि हिंदी सिनेमात दाखवतात त्यासारखे त्यांचे दोन तीन चमचे असिस्टंट निवांत गप्पा मारीत होते. रात्रीचे ९.३०, ९.४५ झाले असावेत.


मी आणि माझ्या मामेभावाने मोठ्या काळजीने त्या बेवारस पोत्यासंबंधी माहिती त्यांना दिली. माहिती ऐकत असताना ते अत्यंत अनिच्छेने ती ऐकताहेत हे त्यांच्या मुद्रेवरून आम्हाला कळत होते. आमची माहिती सांगून झाल्यावर त्यांचे उत्तर ऐकून आम्ही सर्दच झालो. आम्ही त्या बेवारस पडलेल्या संशयास्पद पोत्याविषयी माहिती दिल्यावर ते म्हणाले, "यहॉ लेके आओ" 


"क्काय ?" आम्हा दोघांच्याही तोंडातून एकदम आश्चर्योदगार निघाला. आमची अपेक्षा अशी होती की इतकी महत्वाची माहिती त्यांना दिल्यावर त्यांनी जलद हालचाल करून त्यांचे आणखी सुरक्षारक्षक फ़लाटावर पाठवायला हवे होते. पण हे साहेब ढिम्म होते.


"लेके आव" त्या दोनशे पाऊंडाच्या देहातून पुन्हा आवाज आला.


"अरे ऐसे कैसे लेके आऍ ? अंदर कुछ गड्बड सामान होगा तो ? आप अपने लोग वहॉ भेजिये ना ?" 


"यहा लेके आओ. बादमें देखते है" ते आपल्या आग्रहावर ठाम होते. त्या बथ्थड माथ्याशी आता चर्चा करणे म्हणजे आपला अमूल्य वेळ घालवणे हे आता आमच्या दोघांच्याही लक्षात आले. जाताजाता माझ्या मावसभावाने अगदी मार्मिक व-हाडी कॉमेंट टाकली. तो म्हणाला, "आत्ता आम्हाले समजलं बे इथे बॉम्बस्फ़ोट कशे होतेत ते ? येक नंबर गलंग हाये लेको तुमी." 


आम्ही विनाविलंब फ़लाटावर धाव घेतली. सुरक्षा रक्षकांच्या असल्या अनास्थेबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यापेक्षा आपली सुरक्षा आपण स्वतःच करूयात या विचाराने आम्ही सगळे जण त्या पोत्यापासून शक्य तितके दूर जाण्याच्या प्रयत्नांना लागलो. गाडीच्या शेवटी लागणार असलेल्या आमच्या कोचपासून अगदी दूर एंजिनाकडे आम्ही धाव घेतली. १० दिवसांच्या प्रवासासाठी भरपूर सामानसुमान घेऊन निघालेले आम्ही सगळे प्रवासी मंडळी, सोबत माझे मामा आणि सौ. मामी हे ज्येष्ठ नागरिक. त्यांना इतक्या लांब फ़लाटावर रात्री सामानसुमासकट चालावे लागणे हा कष्टप्रद अनुभव होता.


हळूहळू फ़लाटावरच्या प्रवासी मंडळींमध्ये ही बातमी पसरली. कुणीही त्या पोत्याच्या आसपास १५ - २० मीटरच्या परिसरात थांबायला तयार नव्हते. पण सुरक्षा व्यवस्था ढिम्म होती. कुणालाही त्या बेवारस पोत्याची दखल घ्यावीशी वाटेना.


त्या गडबडीतच आमची गाडी रात्री १०.४५ च्या आसपास फ़लाटावर लागली. पुन्हा एंजिनापासून आमच्या डब्यापर्यंत आमचा कष्टप्रद प्रवास झाला. डब्यात बसल्यावरही फ़लाटावरचे ते बेवारस पोते आम्हाला दिसत होते. गाडी लवकरात लवकर इथून हलावी अशी प्रार्थना आम्ही आत बसल्याबसल्या करीत होतो. परिस्थितीत आता थोडी सुधारणा एव्हढीच झालेली होती ती म्हणजे फ़लाटावर त्या बेवारस वस्तूच्या मालकाच्या शोधाविषयी उदघोषणा सुरू होती. फ़क्त उदघोषणाच हं. सुरक्षा व्यवस्थेतले कुणी तिथे येऊन तिथल्या स्थितीचा आढावा वगैरे घेणे या गोष्टीला अजूनही सुरूवात झालेली नव्हती. स्टेशनात येताना स्टेशनबाहेर बॉम्ब शोधक पथकाची गाडी आम्हाला दृष्टीस पडली होती पण त्यांना अजूनही फ़लाटावर पाचारण करण्यात आलेले नव्हते.


आमची गाडी जम्मूतावी स्टेशनवरून १६ मिनिटे उशीरा, रात्री ११.१६ ला निघाली आणि आमच्यापैकी प्रत्येकाने सुटकेचा नि:श्वास सोडला. तत्पूर्वी आमच्या कोचमधल्या केवळ आमच्याच नव्हे तर इतर सगळ्या बर्थसखाली आम्ही बघून घेऊन, अशीच एखादी बेवारस वस्तू तिथे नसल्याची खात्री करून घेतली होती. दुस-या दिवशी वर्तमानपत्रात काही अप्रिय घटनेची बातमी वगैरे आली नाही म्हणजे त्या पोत्यात तशी काही दहशतवादी वस्तू नसावी पण त्याबाबत तिथल्या सुरक्षा यंत्रणांचा गलथानपणा आम्हाला चिंताक्रांत करून गेला हे निश्चित.


इतक्या संवेदनशील जागी, सुरक्षा यंत्रणांच्या इतक्या पराकोटीच्या अनास्थेचा हा अनुभव आम्हा सगळ्यांच्या मनात पंधरा वर्षांनंतरही घर करून राहिला हे नक्की.


- राष्ट्राच्या सुरक्षेविषयी आणि राष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेविषयी अत्यंत आग्रही असलेला सामान्य नागरिक, राम प्रकाश किन्हीकर.


No comments:

Post a Comment