कारंजा (लाड) हे परम पूजनीय श्रीनृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांचे जन्मस्थान. जन्मानंतर ८ व्या वर्षी महाराजांची मुंज इथेच झाली आणि त्यांनी आयुष्याच्या सुरूवातीची एकूण ११ वर्षे इथे सलग वास्तव्य केले असा उल्लेख आहे. किन्हीकरांचेही हेच मूळ गाव.
Saturday, December 31, 2022
समृद्धी महामार्गावरची पहिली सफ़र : नागपूर - कारंजा - नागपूर
Friday, November 4, 2022
देवाचिये द्वारी - ११८
विठ्ठल सोयरा सज्जन सांगातीं I विठ्ठल हा चित्ती बैसलासे II
विठ्ठलें हे अंग व्यापिली हे काया I विठ्ठल हे छाया माझी मज II
बैसला विठ्ठल जिव्हेंचिया माथा I न वदे अन्यथा आन दुजे II
सकळ इंद्रियां मन हे प्रधान I तेंही करी ध्यान विठोबाचे II
तुका म्हणे या हो विठ्ठलासी आतां I न यें विसंबतां माझे मज II
श्रीतुकोबांना विठ्ठल परमात्म्याची इतकी ओढ लागलेली आहे की आता ते त्यांचे त्यांनाही अनावर झाले आहेत. विठ्ठलाने भेट द्यावी आणि आपल्या मनात कायमचे रहावे अशी आळवणी श्रीतुकोबा त्या विठ्ठलाला करताहेत.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(कार्तिक शुद्ध एकादशी / प्रबोधिनी एकादशी शके १९४४ , दिनांक ४/११/२०२२)
आषाढी एकादशी शके १९४४ दिनांक १० जुलै २०२२ रोजी लिहायला सुरूवात केलेले हे सदर आज श्रीसदगुरूंच्या आणि सकल संतांच्या कृपेने पूर्णत्वास जात आहे याचा मला विशेष आनंद होतो आहे. हे सदर लिहीताना प्रत्येक अभंगातून, ओवीतून मला जी अनुभूती झाली ती मी सहज सरळपणे आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मुळात मी फ़ार विद्वान, अभ्यासक वगैरे नाहीच त्यामुळे फ़ारसे विद्वत्तापूर्ण विवेचन लिहावे हा हेतू नव्हताच. ब-याच वेळा असे जाणवले की अरे संतांनी स्वतःच इतक्या सोप्या भाषेत, सर्वांना समजेल असे दृष्टांत देऊन अध्यात्म आपल्यासाठी अत्यंत सोपा करून मांडलेला आहे त्यात आपण आपल्या विवेचनाची काय अधिक भर घालावी ?
माझ्या जीवनाला एक शिस्त लागावी, चातुर्मास हा लिखाणाचा संकल्प पूर्ण व्हावा ही त्या पांडुरंगाचीच इच्छा होती हे मी मनापासून मानतो आणि आपली तात्पुरती रजा घेतो.
सध्या तरी नववर्षापासून एक असाच वेगळा लिखाण संकल्प घेण्याचे योजिले आहे. तर नववर्षात नवोन्मेषाने, नव्या लेखनासह भेटूच.
- आपण सर्वांचा प्रेमांकित, राम.
Thursday, November 3, 2022
देवाचिये द्वारी - ११७
सकळांच्या पाया माझी विनवणी I मस्तक चरणीं ठेवीतसे II
अहो वक्ते श्रोते सकळही जन I बरें पारखून बांधा गाठी II
फ़ोडिले भांडार धन्याचा हा माल I मी तंव हमाल भारवाही II
तुका म्हणे चाली झाली चहूं देशीं I उतरला कसीं खरा माल II
सर्व मनुष्यमात्रांनी ब-या वाईटाची पारख करून खरे अध्यात्म आपल्या आचरणात आणले पाहिजे असे श्रीतुकोबांना कळकळीने वाटते.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(कार्तिक शुद्ध दशमी शके १९४४ , दिनांक ३/११/२०२२)
Wednesday, November 2, 2022
देवाचिये द्वारी - ११६
आशाबद्ध वक्ता I धाक श्रोतियाच्या चित्ता II
गातो तेही नाही ठावे I तोंड वासी काही द्यावे II
झाले लोभाचे मांजर I पोट भरे दारोदार II
वाया गेले ते भजन I उभयतां लोभी मन II
बहिरें मुके एके ठायीं I तैसें झालें तयां दोहीं II
माप आणि गोणी I तुका म्हणे रिती दोन्ही II
धन आणि मानाविषयी आशाबद्ध असलेला वक्ता आणि हा आता आपल्याला काही मागणार तर नाही या भितीने घाबरलेले श्रोते म्हणजे मुक्याने परमार्थ सांगितला आणि बहि-याने तो ऐकला असे श्रीतुकोबांचे प्रतिपादन आहे.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(कार्तिक शुद्ध नवमी शके १९४४ , दिनांक २/११/२०२२)
Tuesday, November 1, 2022
देवाचिये द्वारी - ११५
मुखी बोले ब्रह्मज्ञान I मनी धन आणि मान II
ऐसियाची करिता सेवा I काय सुख होय जीवा II
पोटासाठी संत I झाले कलीत बहुत II
विरळा ऐसा कोणी I तुका त्यासि लोटांगणी II
कलियुगात आपल्या मनात धन आणि मानाविषयी लालसा बाळगून संतत्वाचे सोंग आणणा-यांची मांदियाळी झालेली आहे हे श्रीतुकोबांनी फ़ार वर्षांपूर्वी ओळखले होते. जो कुणी विरळा मनुष्य़मात्र असा नसेल त्याला मी प्रणाम करतो असे श्रीतुकोबा म्हणताहेत.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(कार्तिक शुद्ध अष्टमी शके १९४४ , दिनांक १/११/२०२२)
Monday, October 31, 2022
देवाचिये द्वारी - ११४
नष्टासी नष्ट योजावे I वाचाळासी वाचाळ आणावे I
आपणावरी विकल्पाचे गोवे I पडोंच नेदी II
कांटीने कांटी झाडावी I झाडावी परी ते कळों नेदावी I
कळकटेपणची पदवी I असो द्यावी II
न कळता करी कार्य जें ते I ते काम तत्काळचि होते I
गचगचेत पडतां तें I चमत्कारे नव्हे II
समाजात मोठे कार्य करताना दुष्ट दुर्जन लोकांचे मन वळवून, त्यांना संपूर्ण नष्ट न करता आपल्यासोबत बाळगावे आणि दुस-या दुष्टांशी लढताना त्यांचा वापर करावा. आपल्या कार्याचा फ़ार गवगवा करू नये आणि आपण मात्र बाह्य वेषाने साधे, क्वचित गबाळे असावे म्हणजे कुणाला आपल्या महान कार्याचा फ़ार मागमूस लागू देऊ नये असे श्रीसमर्थांचे आग्रही प्रतिपादन आहे.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(कार्तिक शुद्ध सप्तमी शके १९४४ , दिनांक ३१/१०/२०२२)
Sunday, October 30, 2022
देवाचिये द्वारी - ११३
ज्यासी उपाधी आवरेना I तेणे उपाधी वाढवावीना I
सावचित्त करूनिया मना I समाधाने असावे II
लोक बहुत कष्टी जाला I आपणहि अत्यंत त्रासला I
वेर्थचि केला गल्बला I कायसासी II
ज्या साधकाला आपण केलेल्या कार्याची उपाधी कशी आवरावी ? हे कळत नाही त्याने उपाधी वाढवूच नये असे श्रीसमर्थांना वाटते. अशी उपाधी न आवरता येता वाढवली तर लोकही कष्ती होतील आणि साधकही त्रासून जाईल आणि मुख्य कार्य मागे पडेल.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(कार्तिक शुद्ध षष्ठी शके १९४४ , दिनांक ३०/१०/२०२२)
Saturday, October 29, 2022
देवाचिये द्वारी - ११२
अभ्यासे प्रगट व्हावे I नाही तरी झाकोन असावे I
प्रगट होऊन नासावे I हे बरें नव्हें II
मंद हळुहळु चालतो I चपळ कैसा आटोपतो I
अरबी फ़िरवणारा तो I कैसा असावा II
हे धकाधकीची कामें I तिक्षण बुद्धीची वर्मे I
भोळ्या भावार्थे संभ्रमे I कैसे घडे II
या जगात विशेष मोठे काम करू इच्छिणा-या साधकाने स्वतःची तशी पूर्ण तयारी करायला हवी. मोठे काम करण्यासाठी मोठा अभ्यास हवा, अनेक गुणसमुच्चय अंगी हवा, तीक्ष्ण बुद्धी हवी. सर्वसामान्य भाविकांच्या भोळ्याभाबड्या स्वभावाने हे मोठे कार्य घडणार नाही असे श्रीसमर्थांना वाटते.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(कार्तिक शुद्ध चतुर्थी / पंचमी, पांडवपंचमी शके १९४४ , दिनांक २९/१०/२०२२)
Friday, October 28, 2022
देवाचिये द्वारी - १११
राखावी बहुतांची अंतरे I भाग्य येते तदनंतरे I
ऐसी हें विवेकाची उत्तरे I ऐकणार नाही II
कांही नेमकेंपण आपुलें I बहुत जनासी कळों आलें I
तेंचि मनुष्य मान्य जालें I भूमंडळी II
याकारणें अवगुण त्यागावे I उत्तम गुण समजोन घ्यावे I
तेणे मनासारिखे फ़ावें I सकळ कांही II
आपले काही वेगळेपण, नेमकेपण जगाच्या लक्षात आल्याशिवाय जग आपल्याला मान्यता देणार नाही. यासाठी सर्वसामान्य साधकांनी अवगुण टाकून देऊन सदगुण अंगी बाणवून खूप लोकांना प्रिय होण्यासाठी विवेकाने प्रयत्न केले पाहिजेत असे श्रीसमर्थांना वाटते.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(कार्तिक शुद्ध तृतीया शके १९४४ , दिनांक २८/१०/२०२२)
Thursday, October 27, 2022
देवाचिये द्वारी - ११०
करंट्यास आळस आवडे I यत्न कदापी नावडे I
त्याची वासना वावडे I अधर्मी सदा II
जनासी मीत्री करीना I कठीण शब्द बोले नाना I
मूर्खपणे आवरेना I कोणीयेकासी II
कोणीयेकास विश्वास नाही I कोणीयेकासीं सख्य नाही I
विद्यावैभव काहींच नाही I उगाचि ताठा II
ग्रंथराज श्रीमददासबोधाच्या करंटलक्षण नामक समासात श्रीसमर्थांनी करंट्या मनुष्यांची लक्षणे सांगितलेली आहेत. जो विचाराने, विवेकाने आणि संयमित वागत नाही त्यात सगळी करंटेपणाची लक्षणे आपल्याला दिसून येतील.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(कार्तिक शुद्ध द्वितीया शके १९४४ , दिनांक २७/१०/२०२२)
Wednesday, October 26, 2022
देवाचिये द्वारी - १०९
हेत समजोन उत्तर देणे I दुस-याचे जीवीचे समजणे I
मुख्य चातुर्याची लक्षणे I तें हें ऐसी II
जगामध्ये जगमित्र I जिव्हेपासी आहे सूत्र I
कोठेतरी सत्पात्र I शोधून काढावे II
कथा होती तेथे जावे I दुरी दीनासारखे बैसावे I
तेथील सकळ हरद्र घ्यावे I अंतर्यामी II
चतुर मनुष्यांनी दुस-या व्यक्तीचे अंतर जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे दुस-या व्यक्तीचे हेतू लक्षात येतील. जगात सर्वांशी मैत्रीने वागण्याचे सूत्र मनुष्यमात्रांच्या जिभेत आहे. गोड, मधूर, दुस-यांच्या मनाला न दुखावणारे बोलण्याने माणसे जोडली जातील .
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(कार्तिक शुद्ध प्रतिपदा / द्वितीया, बलीप्रतिपदा / भाऊबीज शके १९४४ , दिनांक २६/१०/२०२२)
Tuesday, October 25, 2022
देवाचिये द्वारी - १०८
ऐसा ग्रंथ जपोनी ल्याहावा I प्राणीमात्रांस उपजे हेंवा I
ऐसा पुरूष तो पहावा I म्हणती लोक II
काया बहुत कष्टवावी I उत्कट कीर्ती उरवावी I
चटक लावूनी सोडावी I कांही येक II
ग्रंथलेखन कसे करावे, समास किती सोडावा याबद्दल श्रीमददासबोधाच्या १९ व्या दशकाच्या पहिल्या समासात श्रीसमर्थांनी मार्गदर्शन केलेले आहे. इतका सुंदर ग्रंथ लिहावा की सगळ्या लोकांना त्या ग्रंथकर्त्याला भेटण्याची ओढ लागायला हवी असे श्रीसमर्थांना वाटते. समजात काही विशेष काम करू इच्छिणा-या मनुष्यमात्रांनी आपले शरीर कष्टवून आपल्या इहलोकातून प्रयाणानंतरही आपली कीर्ती कायम राहील असे कार्य करून जावे.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन अमावास्या शके १९४४ , दिनांक २५/१०/२०२२)
Monday, October 24, 2022
देवाचिये द्वारी - १०७
जनाचा लालची स्वभाव I आरंभीच म्हणती देव I
म्हणिजे मला काही देव I ऐसी वासना II
कष्टेवीण फ़ळ नाही I कष्टेवीण राज्य नाही I
केल्यावीण होत नाही I साध्य जनी II
मेळविती तितुके भक्षिती I ते कठीण काळी मरोन जाती I
दीर्घ सूचनेनें वर्तती I तेंचि भले II
श्रीसमर्थांनी सर्वसामान्य नाणसांना जीवनात आणि अध्यात्मात कुठेही अकर्मण्यता सांगितलेली नाही. सर्वसामान्य माणसांनी दीर्घ दृष्टीने विचार करून थोडी तरी बचत करीत जावी म्हणजे ती त्यांच्या कठीण काळात ती कामाला येईल हा स्पष्ट उपदेश आजकालचे अर्थशास्त्रज्ञ करतात तो उपदेश श्रीसमर्थांनी चारशे वर्षांपूर्वीच आपल्याला श्रीमददासबोधातून करून ठेवलेला आहे.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन कृष्ण चतुर्दशी / आश्विन अमावास्या, नरकचतुर्दशी / लक्ष्मीपूजन शके १९४४ , दिनांक २४/१०/२०२२)
Sunday, October 23, 2022
देवाचिये द्वारी - १०६
नाना वस्त्रे नाना भूषणें I येणें शरीर श्रृंघारणें I
विवेके विचारे राजकारणें I अंतर श्रृंघारिजे II
शरीर सुंदर सतेज I वस्त्रे भूषणें केले सज्ज I
अंतरी नस्तां चातुर्यबीज I कदापि शोभा न पर्व II
वरवर अनेक वस्त्रे, अलंकार वगैरे घालून मनुष्यमात्रांना कदापीही शोभा येणार नाही तर प्रत्येक मनुष्याने आपले अंतर विवेकाने, विचारांनी सजवून आपण स्वतःला आतून सुंदर आणि चतुर केले पाहिजे असा श्रीसमर्थांचा आग्रह आहे.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन कृष्ण त्रयोदशी, धनत्रयोदशी शके १९४४ , दिनांक २३/१०/२०२२)
Saturday, October 22, 2022
देवाचिये द्वारी - १०५
शुध सोने पाहोन घ्यावे I कसी
लावून तावावे I
श्रवणमनने जाणावे I प्रत्ययासी
II
जे प्रचितीस आले खरें I तेंचि
घ्यावे अत्यादरें I
अनुभवेवीण जे उत्तरें I ते
फ़लकटें जाणावी II
पिंडी नित्यानित्य विवेक I
ब्रह्मांडी सारासार अनेक I
सकळ शोधूनिया येंक I सार घ्यावें
II
साधकांनी अध्यात्मात काय किंवा
व्यवहारात काय, प्रत्यय आल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचा स्वीकार करू नये. त्यातही नित्य
काय आणि अनित्य काय याचा विचार करून वागावे अशे श्रीसमर्थांचे आग्रही प्रतिपादन आहे.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन कृष्ण द्वादशी / त्रयोदशी,
वसुबारस / धनत्रयोदशी शके १९४४ , दिनांक २२/१०/२०२२)
Friday, October 21, 2022
देवाचिये द्वारी - १०४
अवगुण अवघेचि सांडावे I उत्तम
गुण अभ्यासावे I
प्रबंद पाठ करीत जावे I जाड
अर्थ II
पाठ उदंडचि असावे I सर्वकाळ
उजळीत जावे I
सांगितले गोष्टींचे असावे
I स्मरण अंतरी II
अखंड येकांत सेवावा I ग्रंथमात्र
धांडोळावा I
प्रचित येईल तो घ्यावा I अर्थ
मनी II
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन कृष्ण एकादशी / द्वादशी,
रमा एकादशी / वसुबारस शके १९४४ , दिनांक २१/१०/२०२२)
Thursday, October 20, 2022
देवाचिये द्वारी - १०३
जे आपणांस नव्हे ठावे I तें
जाणतयांस पुसावे I
मनोवेगें तनें फ़िरावें I हें
तों घडेना II
जे चर्मदृष्टीस नव्हे ठावें
I तें ज्ञानदृष्टीनें पाहावें I
ब्रह्मांड विवरोन राहावें
I समाधाने II
वाच्यांश वाचेने बोलावा I न
बोलता लक्ष्यांश जाणावा I
निर्गुण अनुभवास आणावा I गुणाचेनयोगें
II
या जगात वावरताना संसारी मनुष्याने कसे वागावे याचे विवेचन श्रीसमर्थांनी ग्रंथराज श्रीमददासबोधात ठायीठायी केलेले आढळते. आज चारशे वर्षांनंतरही यातली शिकवण आपल्या आचरणात आणण्यासारखी आहे हे या ग्रंथाचे कालातीतत्व आहे.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन कृष्ण दशमी शके १९४४
, दिनांक २०/१०/२०२२)
Wednesday, October 19, 2022
देवाचिये द्वारी - १०२
येक भरे येक रितें I रितें
मागुते भरतें I
भरतेंही रितें होतें I काळांतरी
II
ऐसी हे सृष्टीची चाली I संपत्ती
दुपारची साऊली I
वयेसा तरी निघोन गेली I हळु
हळु II
बाळ तारूण्य आपलें I वृद्ध्याप्य
प्रचितीस आले I
ऐसें जाणोन सार्थक केलें I
पाहिजे कोणी येकें II
या अनित्य सृष्टीचे स्वरूप
कायम बदलत असते. आपले शरीर, आपली संपत्ती हे सगळे दुपारच्या सावलीप्रमाणे अनित्य आणि
नाशिवंत आहे. हे जाणून चिरंतन वस्तूकडे (भगवंताकडे) लक्ष लावून आपण आपल्या जीवनाचे
सार्थक करून घावे असे श्रीसमर्थांना वाटते.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन कृष्ण नवमी शके १९४४
, दिनांक १९/१०/२०२२)
Tuesday, October 18, 2022
देवाचिये द्वारी - १०१
मुळी उदक निवळ असते I नाना
वल्लींमधें जातें I
संगदोषें तैसें होतें I आंब्ल
तिक्षण कडवट II
आत्मा आत्मपणें असतो I देहसंगे
विकारतो I
साभिमाने भरी भरतो I भलतिकडे
II
पुण्यवंता सत्संगती I पापिष्टां
असत्संगती I
गति आणि अवगती I संगतीयोगें
II
मूळ निर्मळ, निःसंग असलेले
पाणी जसे इतर पदार्थांच्या संगतीत आले की त्या त्या पदार्थांचे गुणधर्म आपल्यात सामावून
घेते आणि पाण्याचे स्वरूप तसेच बनत जाते. तसा निर्मळ, निःसंग आत्मा ज्या देहाच्या संगतीत
येतो त्या देहाचे गुणधर्म त्याला चिकटतात. म्हणून आपली उन्नती करून घ्यायची असेल तर
कायम सत्संगतीच धरावी असा श्रीसमर्थांचा आग्रह आहे.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन कृष्ण अष्टमी / कराष्टमी
शके १९४४ , दिनांक १८/१०/२०२२)
Monday, October 17, 2022
देवाचिये द्वारी - १००
ब्रह्मांडावरून पिंड I अथवा
पिंडावरून ब्रह्मांड I
अधोर्ध पाहातां निवाड I कळों
येतो II
बीज फ़ोडून आणिले मना I तेथे
फ़ळ तों दिसेना I
वाढत वाढत पुढे नाना I फ़ळें
येती II
फ़ळ फ़ोडिता बीज दिसें I बीज
फ़ोडिता फ़ळ नसें I
तैसा विचार असे I पिंडब्रह्मांडी
II
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन कृष्ण सप्तमी / अष्टमी
शके १९४४ , दिनांक १७/१०/२०२२)
Sunday, October 16, 2022
देवाचिये द्वारी - ९९
थोडे बहुत समजले I पोटापुरती
विद्या सिकले I
प्राणी उगाच गर्वे गेले I मी
ज्ञाता म्हणोनी II
धन्य परमेश्वराची करणी I अनुमानेना
अंतःकरणी I
उगीच अहंता पापिणी I वेढा लावी
II
अहंता सांडून विवरणें I कित्येक
देवाचे करणें I
पाहाता मनुष्याचे जिणें I थोडे
आहे II
मनुष्याच्या या छोट्याचा आयुष्यात
मनुष्यमात्राला थोडे जरी ज्ञान झाले तरी त्याचा त्यांना गर्व होतो. परमेश्वराच्या अगाध
करणीसमोर आपले कर्तुत्व अगदी थिटे आहे याचा मनुष्यमात्रांना विसर पडतो आणि अहंकाराने
तो वेढल्या जातो. साधकांनी असे वागू नये असा श्रीसमर्थांचा कळकळीचा उपदेश आहे.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन कृष्ण षष्ठी / सप्तमी
शके १९४४ , दिनांक १६/१०/२०२२)
Saturday, October 15, 2022
एका गिर्यारोहणाच्या स्वप्नाचा अकाली मृत्यू
१९८९ च्या सप्टेंबर महिन्यात कराडला महाविद्यालयीन शिक्षणासाठी जायला निघालो तोपर्यंत आम्हा वैदर्भीय मुलांच्या पाहण्यात टेकडीच्या गणपतीची टेकडी, आदास्याच्या गणपतीची टेकडी हीच ठिकाणे उंच असलेली म्हणून प्रसिद्ध असायचीत. काही काही मुले पचमढीला वगैरे जाऊन आलेली असायचीत. त्यांच्या वर्णनावरून "क्या सातपुडा पर्बत है बे ? यें उंचा, यें उंचा. हिमालय जितनाही होंगा करीब करीब." अशा फ़ोकनाड्या ऐकून आम्ही मनातल्या मनात हिमालयाएव्हढा म्हणजे साधारण सातपुडा किती मोठा असेल ? याची गणिते करीत असू. नागपूरवरून वर्धेकडे जाताना बसमधून, रेल्वेगाडीतून जाताना उजव्याबाजुला दिसणारी कान्होलीबाराची टेकडी आम्हाला पर्वतासारखी वाटे.
तोवर गिर्यारोहणाविषयी आमचे
ज्ञान हे साप्ताहिक लोकप्रभा, किंवा "सकाळ"च्या दिवाळी अंकांमध्ये काहीकाही
गिर्यारोहकांच्या मुलाखती वाचून आलेले म्हणजे फ़क्त पुस्तकी ज्ञान होते. रॉक क्लाईंबिंग,
रॅपलिंग वगैरे शब्द परिचयाचे होते पण त्याकाळी लिखाणात फ़क्त शब्दांची रेलेचेल असायची.
आजसारख्या आकृत्या, छायाचित्रे त्यावेळी उपलब्ध नसत. त्यामुळे आम्हालाही हे ज्ञान फ़क्त
शाब्दिक होते. त्या गिर्यारोहणात वापरली जाणारी साधनसामुग्री कशी असेल ? याचे चित्र
आमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या मताने आपापल्या मनात चितारून ठेवलेले होते.
१९९१ मधल्या एका विकेंडला लागून ३ सुट्ट्या आलेल्या होत्या. त्या हिवाळी शनिवारी आम्हा दोघातिघा नागपूरकर मित्रांचा सदाशिवगड सर करण्याचा मनसुबा ठरला. सकाळी लवकर आटोपून आम्ही कॉलेजपासून कॅनॉल स्टॉपवर गेलो आणि तिथून कराडकडून येणा-या कराड - वाघेरी बसने ओगलेवाडीचा थांबा, रेल्वेपूल वगैरे ओलांडून सदाशिवगडाच्या पायथ्याशी उतरलोत. पायथ्याशी असलेल्या गावातून रस्त्याने जाण्याऐवजी स्टेशनकडून दिसणारा पहाड चढून जाऊ या आत्मविश्वासाने आम्ही त्या बाजूने निघालोत. आम्हा तिघांपैकी एकालाही तोवर असे पहाड अशा अनवट वाटांनी चढण्याचा अनुभव नाही. पण तारूण्याचा जोश आणि "पाहू न बे का होते तं ? काय हुईन जास्तीत जास्त ? वर नाई चढू त उतरता त येतेच न बे." ही टिपीकल वैदर्भीय बेफ़िकीरी.
आणखी थोडे पुढे चढल्यावर आम्हाला एक कठीण उभी चढण लागली. आजुबाजूला असलेल्या झुडूपांना धरून एकमेकांच्या सहाय्याने ती कठीण चढण आम्ही मोठ्या कष्टाने चढलो. त्या चढणीवर असलेल्या भुशभुशीत जमिनीमुळे पाऊल टिकणे कठीण झाले होते. सारखी माती घसरत होती. प्रत्येक पाऊल टाकताना त्या मातीविषयी खूप अविश्वास जाणवत असताना आम्ही ती चढण चढलोत खरे पण एकंदर पर्वतारोहणाविषयी आम्हा तिघांचाही आत्मविश्वास डळमळीत व्हायला सुरूवात झालेली होती हे ही तितकेच खरे.
अशा हतबल आणि "संपलं सगळं" या अवस्थेत काही काळ गेला. आमच्यातल्या एकाला एक युक्ती सुचली. "अबे वर जाण्यापेक्षा या माचीवरून आहे त्याच लेव्हलला आजूबाजूला सरकत सरकत जाऊ. कुठूनतरी सोपी चढण सापडेलच नं." इतर काहीही न सुचल्यामुळे आम्हाला तोच मार्ग पटला आणि आम्ही त्या अगदी अरूंद माचीवरून उत्तरेकडे (गावाच्या दिशेने) सरकायला लागलो. पायाखालची जमीन भुसभुशीतच होती पण गाव हळूहळू जवळ करतोय ही भावना प्रबळ होती. आणि जवळपास अर्धा तास असे सावधानतेने सरकत सरकत गेल्यानंतर....
...आम्हाला गडावर जाणा-या पाय-याच गवसल्यात की. वा ! आम्ही तिघांनीही सुटकेचा मोठ्ठा
निःश्वास सोडला आणि भरभर पाय-या चढून गडावरच्या मंदीरात दाखल झालोत. तिथे त्या शंभू
महादेवाचे दर्शन घेऊन राजमार्गाने गडाच्या पायथ्याशी आलोत. त्या माचीवरच्या अर्ध्या
तासाची आठवण येऊन आम्हाला आता हसायला येत होते आणि तेव्हढेच घाबरायला पण होत होते.
खरेच आपण तिथे अडकून पडलो असतो तर ? हा प्रश्न घाबरवणारा आणि हादरवणारा होता.
- साहसी गिर्यारोहक (ए. हो.
इ. अ. = एकेकाळी होण्याची इच्छा असलेला) राम प्रकाश किन्हीकर.
देवाचिये द्वारी - ९८
दिसेल ते नासेल I आणि येईल
ते जाईल I
जे असतचि असेल I तेचि सार
II
सोहं हंसा तत्वमसि I ते ब्रह्म
तू आहेसी I
विचार पाहता स्थिती ऐसी I सहजचि
होते II
जाणतां जाणतां जाणीव जाते
I आपली वृत्ती तद्रूप होते I
आत्मनिवेदन भक्ति ते I ऐसी
आहे II
देह हा नाशिवंत आहे पण आत्मा
अविनाशी आहे म्हणून देहबुद्धी (मी म्हणजे देहच ही बुद्धी) टाळून विचाराने ते अविनाशी
तत्व म्हणजेच मी ही सोहम बुद्धी मनुष्यमात्रांनी बाळगली तर ती खरी आत्मनिवेदन भक्ती
असे श्रीसमर्थांना वाटते.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन कृष्ण षष्ठी शके १९४४
, दिनांक १५/१०/२०२२)