Friday, March 31, 2023

करूणाष्टक - १०

 


तुजविण मज तैंसे जाहलें देवराया ।


विलग विषमकाळीं तूटली सर्व माया ॥


सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं ।


वमकवमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं ॥ १० ॥


हे रामराया, तुझ्याविना माझ्या जीवनात तहानलेल्या चातक पक्षासारखी अवस्था झालेली आहे. तू माझे सर्वस्व आहेस, स्वामी आहेस, सखा आहेस. या विश्वाच्या मायेत गुंतविणारे इतर विषय मी पूर्णपणे त्यागिलेले आहेत.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )


करूणाष्टक - ९

 


जननिजनकमाया लेंकरूं काय जाणे ।


पय न लगत मूखीं हाणिता वत्स नेणे ॥


जळधरकण आशा लागली चातकासी ।


हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥ ९ ॥


हे रामराया, तू माझा जनक आहेस, माझी जननी आहेस पण जनक जननीची ही माया मुले जाणीत नाहीत. एखादेवेळी छोट्या बाळाला आई दूध पाजीत असताना त्याच्या पोटात दूध जात नसेल तर ते आईला लाथही मारते पण त्याचे आई वाईट वाटून घेत नाही. त्यामुळे तू आम्हाला इतके दिले पण आम्हाला त्याची जाणीव नाही हे तुझ्या लक्षात आले तरी तू आमच्यावरची माया कमी करू नकोस. हे प्रभो, तुझ्या कृपारूपी एखाद्या थेंबाचीही मज चातकाला तहान लागलेली आहे.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो इथे )

Thursday, March 30, 2023

करूणाष्टक - ८

 


सबळ जनक माझा राम लावण्यकोटी ।


म्हणवुनि मज पोटीं लागली आस मोठी ॥


दिवस गणित बोटीं ठेवूनि प्राण कंठीं ।


अवचट मज भेटी होत घालीन मीठी ॥ ८ ॥


माझा पिता राम हा अत्यंत बलवान आणि सुंदर आहे म्हणून त्याला भेटण्याची मोठीच आस मला लागलेली आहे. इतकी आस की ही भेट कधी होईल याची मी कंठात प्राण आणून रोज मोजणी करतो आहे. मला जर तो राम भेटला तर मी त्याला प्रेमाने मिठी मारेन इतकी अनावर वाट मी त्याची बघतो आहे.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


(या श्लोकाचा व्हिडीयो इथे

Tuesday, March 28, 2023

नागपूर ते पुणे रेल्वे प्रवास : आजकाल झालेला एक चिंतनाचा विषय.

नागपूर ते पुणे रेल्वे प्रवाशांना या दिवाळीपासून मध्य रेल्वेच्या काही तुघलकी आणि मनमानी निर्णयांचा फ़टका बसतो आहे. अधिकारी वर्गातर्फ़े मनमानीपणे घेण्यात येणा-या या एकंदर निर्णय प्रक्रियेचीच सखोल चौकशी व्हायला हवी ही सर्वसामान्य प्रवाशांची मागणी आहे. त्यासंबंधीचाच हा पॉडकास्ट.


- एक प्रवासी पक्षी आणि एक सजग नागरिक राम प्रकाश किन्हीकर


(व्हिडीयोची लिंक इथे)






करूणाष्टक - ७


तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी ।


शिणत शिणत पोटीं लागली आस तुझी ॥


झडकरि झड घालीं धांव पंचानना रे ।


तुजविण मज नेती जंबुकी वासना रे ॥ ७ ॥


हे रामा तुझ्याविना माझी ही करूणा कोण ऐकेल रे ? मला अगदी मनापासून तुझी आस लागलेली आहे. हे नरसिंहा तू लवकर धाव घे कारण तू इथे नसता मला या कोल्हारूपी वासना ओढून अधोगतीला नेत आहेत.


- प्रा. राम किन्हीकर



 ( या श्लोकाचा व्हिडीयो  इथे )

Monday, March 27, 2023

करूणाष्टक - ६

 

जळत ह्रदय माझें जन्म कोट्यानुकोटी ।


मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं ॥


तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू ।


षड्‌रिपुकुळ माझें तोडि याचा समंधू ॥ ६ ॥


हे रामराया, माझे हृदय (या जगरहाटीत अडकल्याने) कोट्यानुकोटी वर्षे जळते आहे, अशांत आहे. त्यावर तू आपल्या करूणेचा वर्षाव कर. हे करूणेचा सागर असलेल्या, रामा माझी तळमळ तू निवारण कर आणि गेली अनेक जन्मे माझ्यासोबत माझ्या आप्तांसारखे असलेले हे कामक्रोधादि सहा शत्रू यांचा माझा संबंध आता तोड.


- प्रा. राम किन्हीकर


( या श्लोकाचा व्हिडीयो  इथे )


उषःकाल होता होता...

 विदर्भ एक्सप्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोडले तेव्हा भुरभुरत्या पावसाला सुरूवात झाली होती. वीणाताईंनी सुटकेचा मोठ्ठा निःश्वास सोडला खूप मोकळं मोकळं वाटत होतं. त्यांनी त्याच मूडमध्ये खिडकीबाहेर बघायला सुरूवात केली. मुंबई गोदीतल्या अजस्त्र क्रेन्स, नुकत्याच होऊन गेलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी खास प्रकारची रोषणाई केलेल्या रेल्वेमार्गालगतच्या गगनचुंबी इमारती, सोनेरी प्रकाशाने त्या मोहमयी नगरीला सुवर्णसाज चढवून अधिकच मोहक बनविणारे ते रस्त्यांवरचे सोनेरी दिवे या सगळ्या झगमगाटात वीणाताईंच्या दृष्टीला पडल्यात त्या रेल्वेमार्गालगतच्या काळोख्या झोपड्या. स्वातंत्र्याच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा चाललेला जल्लोष जणू त्यांच्यासाठी नव्हताच. कमालीचे दैन्य, दुःख, आपदा तिथे एकवटून राहिल्या होत्या आणि उरलेल्या जगाला त्याची साधी दखलही घ्यावीशी वाटत नव्हती.

"कुठे स्वातंत्र्य ? कुणा स्वातंत्र्य ?" ही ओळ ताईंच्या मनात आली. अंधा-या रूळमार्गांवरचे सांधे पकडून गाडीने आता आपला नेमका मार्ग अवलंबलेला होता. गाडीच्या वेगाबरोबरच ताईंच्या विचारांचाही वेग वाढत होता. "वयाच्या ७५ व्या वर्षी आपण पहिल्यांदा मुंबईत येतो काय ? आणि वयाला झेपत नसतानाही सकाळी येऊन संध्याकाळी परत निघालो काय ?" त्यांना स्वतःचच आश्चर्य वाटलं. तशी आपली राहण्याची व्यवस्था दिनेश नं आमदार निवासात केली होती. दोन दिवस आपल्या सगळ्यांसाठी सरकारी मेजवान्या, सरकारी इतमामात मुंबई दर्शन वगैरे कार्यक्रमांची रेलचेलही होती. पण आपण अचानकच परत फ़िरलो. एकदम तडकाफ़डकी निर्णय घेतला आणि तो अंमलात आणलासुद्धा. आपण एकदम ५० -५५ वर्षे लहान झालोत का ? गाडीचा वेग मंदावल्याने त्यांची विचाश्रृंखला तुटली. बहुधा दादर स्टेशन आलं असावं.

गाडी हलली आणि बारकीबारकी उपनगरीय स्टेशन्स मागे टाकताना गाडीने आता ब-यापैकी वेग घेतला होता. थंड हवेच्या झोतामुळे म्हणा की गेल्या अठ्ठेचाळीस तासांमधील मानसिक, शारिरीक थकव्यामुळे म्हणा वीणाताईंचे डोळे जडावले होते. मिटलेल्या डोळ्यांसमोरून भूतकाळ भराभर पुढे सरकत होता.

९ ऑगस्ट १९४२. गांधीजींचा "चले जाव" आणि "करेंगे या मरेंगे" हा संदेश घराघरात पोहोचला होता. चिमूरच्या बाबासाहेब इनामदारांच्या वाड्यावर गुप्त खलबतं चाललेली. बाबासाहेब गावातल्या प्रतिष्ठित मंडळींबरोबर पुढल्या लढ्याची आखणी करीत बसलेले. त्यात आपला पोरसवदा वाटणारा थोरला भाऊ सुद्धा. मधल्या त्या कोठीघरात कुणालाही प्रवेश नाही. फ़क्त आपली आई तेव्हढी मधनंमधनं आत जाऊन काय हवं, नको ते बघतेय. आपण मात्र त्या खोलीच्या दाराबाहेर घुटमळत काही विचार कानी पडतोय का ? हा कानोसा घेत. मधेच एखादा विचार एव्हढा आवडायचा की जुलुमी गो-या सरकारविरूद्ध मुठी आवळल्या जायच्यात, नेत्रात अंगार फ़ुलायचेत आणि स्वातंत्र्ययुद्धाच्या कल्पनेने अंगावर रोमांच उभे रहायचेत. स्वयश, स्वार्थ यापेक्षाही विभिन्न गोष्टींमुळे रोमांचित होण्याचाच तो काळ होता.

दुस-या दिवशी स्थानिक कचेरीवर भव्य मोर्चा निघालेला. मोर्चाचे नेतृत्व आपले बाबा, आपला दादा आणि कालची इतर मंडळी करताहेत. त्यावेळी नेतृत्वासाठी, श्रेय उपटण्यासाठी लठ्ठालठ्ठी नव्हती तर जुलुमाचा विरोध करण्यासाठी हिरीरी होती. अपेक्षेप्रमाणेच पोलीसांनी लाठ्या, काठ्या बंदुका घेऊन मोर्चा कचेरीसमोरच अडवलेला. पोलीस सर्वांना परत जाण्याचं आवाहन करताहेत इतक्यात "वंदेमातरम" चा सामूहिक जयघोष निनादतो आणि हातात तिरंगी झेंडा घेतलेला दादा मुसंडी मारत पुढे शिरतो. त्याच्या नजरेत फ़क्त ते कचेरीवरचे ’युनियन जॅक’ चे ब्रिटीश जुलुमी राजवटीचे चिन्ह. तिथे त्याला तिरंगा फ़डकावायचाय. तो पुढे पुढे सरकत असतानाच सोजीरांच्या बंदुकीतून सणसणत आलेली गोळी त्याचा वेध घेते आणि लाठीमार व बेधुंद गोळीबाराला सुरूवात होते. आपण आई, बाबांना न सांगता मोर्चात आलेलो होतो. दादाच्या हातातला तिरंगा आता दुस-याच कुणीतरी हाती घेतलेला. त्याला गोळी लागल्यावर तिस-याच कुणीतरी तो सांभाळलेला.

कुठूनतरी आपल्याही पायात बळ येतंय. अंगात शक्ती संचारतेय. आपणही मुसंडी मारत त्या गर्दीत शिरतोय. तिरंगा मोठ्या प्रयत्नाने आपण आपल्या हाती घेतोय. तोवर मोर्चा कचेरीच्या आणखी जवळ गेलेला. भराभर खिडक्यांवरून धडपडत, कौलांना ठेचकाळत आपण कचेरीच्या छतावर जातोय आणि क्षणार्धात तिथला युनियन जॅक उखडून तिरंगा तिथे बसवतोय. कर्तव्यपूर्तीच्या आनंदात असतानाच एक गोळी आपल्या डाव्या हातात बसतेय आणि आपली शुद्ध हरवतेय.

"ए चॅ गरम" खिडकीपाशीच कुणीतरी विक्रेता जोरात ओरडल्याने खिडकीवर डोके टेकवून झोपलेल्या वीणाताईंना एकदम जाग आली. गाडी कल्याण स्टेशनवर थांबलेली होती. कल्याणला तर तो डबा गर्दीने अगदी ठेचून भरला गेला. पण त्या गर्दीचा, माणसांचा वैताग येण्याऐवजी वीणाताईंना दया आली. खरं म्हणजे हा लग्नसराईचा, सुट्ट्यांचा मौसम नाही. तरीही एव्हढी गर्दी या डब्यात ? या स्टेशनात चढणारे लोक कसेबसे चढलेत बिचारे पण पुढल्या स्टेशनवरून बसणा-यांचे काय ? आणि आत्ता हे हाल तर ऐन गर्दीच्या दिवसात काय हाल होत असतील ? त्यांनी आपसूकच थोडे सरकून कडेवर मूल घेतलेल्या एका आदिवासी स्त्री ला स्वतःच्या शेजारी बसण्यास खुणावले. आत्तापर्यंत त्यांच्या शेजारी बसलेला दुस-या स्त्रीच्या चेहे-यावरचा त्रासिक भाव आणि तिने मुरडलेले नाक वीणाताईंच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही. ती आदिवासी स्त्री मात्र दोन बाकड्यांमधल्या मोकळ्या जागेत फ़तकल मारून खालीच बसली आणि स्वतःच्या पदराने मांडीवरच्या तान्हुल्याला आणि स्वतःलाही वारा घालू लागली.

गाडी कल्याणवरून हलली आणि एवढ्या गर्दीतही मंडळींना थोडं स्थैर्य आलं. वीणाताई मात्र अजूनही अस्वस्थ. स्वतःच्याच विचारात हरवलेल्या. 


चांगली दोन वर्षे आपल्याला तुरूंगात काढावी लागली होती. ब्रिटीश सत्तेविरूद्ध राजद्रोहाचा आरोप आपल्यावर होता. मधे बाबा गेल्यानंतर आपली पॅरोलवर सुटका झाली होती. आपल्या तरूण मुलाच्या, दादाच्या, मृत्यूचा धसका घेत आपले बाबा हळूहळू खंगत गेले होते. त्यातच तुरूंगातल्या हालअपेष्टांची, निकृष्ट जेवणाची भर पडली होती. त्यांची प्रकृती हाताबाहेर गेली तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण बाबांची जीवनयात्रा संपलीच. घरी आता फ़क्त आपण आणि आईच उरलेलो होतो.


तुरूंगातून सुटल्यानंतर मात्र आपण चळवळीत फ़ारसा भाग घेतला नाही. स्वातंत्र्याचा मार्ग दृष्टीपथात येतच होता. गोरं सरकार हळूहळू माघार घेत होतं. पण देश सोडून जाताना फ़ाळणीच विष देशाच्या मुखी देऊन, देशाच्या हृदयाय कायमची एक जखम करून गोरे निघून गेले होते. किती विषण्णता आली होती आपल्याला तेव्हा ?

गावात परतल्यानंतर हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्याला स्पष्ट व्हायला लागल्या होत्या. आपल्या घरी येणारे झुंबरशेठ लखनमल तुरूंगात गेल्यानंतर पोलीसांची माफ़ी मागून मोकळे झाले होते. लवकर सुटल्यानंतर गावात परतून त्यांनी प्राप्त परिस्थितीचा पुरेपूर फ़ायदा घेतला होता. गावातले बहुतेक कर्ते पुरूष तुरूंगात असल्याचा फ़ायदा घेत झुंबरशेठानं सरकारी मदतीने गावातल्या गोरगरीबांच्या चांगल्या कसदार जमिनी घशात घालायला सुरूवात केली होती. आपल्या आईशीही गोड बोलून, फ़सवून सात एकरांची धानाची जमीन त्याने लाटली होती. अनेकांना धाकदपटशा दाखवत, क्वचित गोड बोलून कार्य साधत तो मोठा जमीनदार झाला होता आणि साधारण १९५० च्या सुमाराला सर्व जमिनी लठ्ठ किंमतीला विकून तो आणि त्याचे कुटुंब नागपूरला कायमचे स्थायिक व्हायला निघून गेले होते.

आपण मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आदिवासींमध्ये काम करायला सुरूवात केली होती. त्यांच्या दुःखाची जाणीव, त्यांचे अज्ञान, अंधश्रद्धा, त्यांच्याविषयी तथाकथित सुजाण समाजाची अनास्था या सर्व गोष्टी टोकदारपणे आपल्या मनाला भिडल्या होत्या. घरी आईने मात्र आपल्यामागे लग्नाची भुणभुण लावली होती. पंचक्रोशीतल्या एकदोन नातेवाईकांकडे तिने मुले सुचवण्यासंबंधी सांगूनही पाहिले होते. पण आपल्याला ती रूढ वाट चोखाळायचीच नव्हती. आत्ता ५० वर्षांनंतर स्त्रिया थोड्याफ़ार हक्काने, अधिकारवाणीने बोलू शकताहेत. पण त्याकाळी ती सोय होती ? माझी स्वप्नं, माझी ध्येयं काही निराळीच होती. आईनंही मग ५ , ६ वर्षे वाट पाहिली आणि मग कंटाळून तो नाद सोडला.


आदिवासींमध्ये काम करायला सुरूवात केल्यानंतर आपण इतके गुंतून गेलो की क्वचितच बाह्य जगाची आठवण यायची. स्वयंपूर्ण असलेल्या त्यांच्या जीवनात बाह्य मदतीचे संदर्भ क्वचितच यायचेत आणि आपला समाज या उपेक्षित असलेल्या घटकाची किती अधिक उपेक्षा करू शकतो याचा प्रत्यय यायचा. आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही भामरागडला जाण्यासाठी चंद्रपूरवरून बारमाही रस्ता नाही. काही वर्षांपूर्वी हा रस्ता व्हावा म्हणून आपण आमदार, खासदारांपासून तहसिलदारांपर्यंत सगळ्यांना भेटलो होतो आणि वाटाण्याच्या अक्षता लावून परतलो होतो. चंद्रपूरच्या परप्रांतीय आणि काळा इंग्रजच असलेल्या कलेक्टरनं तर अतिशय तुच्छतापूर्वक शब्दात आपला अपमान केला होता.  वीणाताईंची गाडीतल्या प्रवासात विचारतंद्री लागलेली होती.

आदिवासींना माणूस म्हणून जगण्याचा हक्कच नाही ? त्यांच्या अंधश्रद्धा, वाईट चालीरीती यांच्याबाबत वातानुकूलीत खोलीत बसून, सर्वेक्षण, चर्चा, लेख लिहून काम भागणार आहे ? त्या अंधश्रद्धा निवारण्यासाठीची माणुसकी आपण कधी जागवणार ? दरवर्षी हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला आल्यानंतर एखाद्या शनिवार - रविवारी "श्रमपरिहारार्थ" ताडोब्याला येणा-या एखाद्या मंत्र्याच्या एका दिवसाच्या खर्चात एखाद्या ’अडलेल्या’ आदिवासी स्त्रीला तत्परतेने चंद्रपूर - नागपूरला मोठ्या दवाखान्यात हलवता येऊ शकेल अशी रूग्णवाहिका विकत घेता येईल पण लक्षात कोण घेतो ? पन्नास वर्षात लोकशाहीची, इथल्या ख-या राजाची, मतदार राजाची घसरलेली पत वीणाताईंनी हताशपणे बघितलेली होती.


पण त्यासोबतच शिक्षण प्रसाराचे विधायक कार्य त्यांनी सोडलेले नव्हते. भामरागडमध्ये ताई शिक्षक होत्या, सुईण होत्या, डॉक्टर होत्या, आई होत्या नेत्या होत्या. इंग्रज सरकारविरूद्ध लढताना त्यांनी त्यांनी दाखवलेली लढाऊ जिद्दच आता निश्चयी जिद्द बनून त्यांना मार्ग दाखवत होती. आपल्याच समाजाच्या एका घटकाविषयीचे संपूर्ण समाजाचे औदासिन्य त्यांना अस्वस्थ करून जायचं पण तेवढ्यापुरतच. पुन्हा नव्या जिद्दीने त्या आपल्या कार्याला जुंपून घ्यायच्यात.

या पन्नास वर्षात सरकारतर्फ़े आलेले अनेक मानसन्मान त्यांनी नाकारले होते. "स्वातंत्र्य संग्राम सैनिक" म्हणून मिळणा-या सर्व सवलती ताठ मानेने आणि कणखरपणे नाकारल्या होत्या. प्रत्येक नवी सवलत त्यांना जाहीर झाल्याचं पत्र आलं की त्या उलटटपाली पत्र पाठवायच्यात. मुख्यमंत्र्यांपासून मामलेदारांपर्यंतच्या त्या पत्रात आदिवासींच्या उपेक्षेची कथा आणि व्यथा असायची. सोबतच आदिवासींना माणूस म्हणून जगण्यासाठी मूलभूत सोयीसवलतींची मागणी त्या पत्रात केलेली असायची.


आणि त्या दिवशी दिनेश धोंडी गोंडाचे पत्र आले. दिनेश आपला विद्यार्थी. कॉलेजला शिकण्यासाठी म्हणून आपणच त्याला नागपूरला पाठवले. त्याच्या कुशाग्र बुद्धीमुळे पोरगा चक्क आय. ए. एस. झाला. पोरातली चमक पाहून मुख्यमंत्र्यांनी त्याला "Officer on Special Duty" म्हणून थेट त्यांच्या हाताखाली नेमून टाकला होता. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा मुंबईत जंगी सत्कार होता. दिनूनं लिहीलं होतं "ताई, तुम्ही मुंबईला नक्की या. सध्याचे मुख्यमंत्री फ़ार चांगले आहेत. तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटा. पण ताई एकदा तरी तुमचा गौरव होताना मला बघायचय. ताई आतातरी नाही म्हणू नका. तुम्हाला माझी आण आहे, बघा."


दिनूच्या अकृत्रिम पत्रातल्या आणेपेक्षाही आपल्या विभागतली काही कामे थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून काही ठोस करता आले तर बघावे म्हणून ताई मुंबईला गेल्या होत्या. दिनेशला "येते" म्हणून कळवल्यावर त्याने चंद्रपूर ते मुंबई अशी ए सी ची दोन रिटर्न तिकीटे पाठवून दिली होती. त्या वातानुकुलीत शयनयानातून मुंबईपर्यंत जाताना ताईंचा जीव अगदी गुदमरून गेला होता. तोंडाची कुलुपं न उघडणारी ती परीटघडीची माणसं, त्यांचे ते एकमेकांकडे बघताना टाकलेले अकारण हिणकस दृष्टीक्षेप यामुळे मऊ सुखशय्येवरही वीणाताईंना झोप कशी ती आली नव्हती.

मुंबईत आल्याआल्या त्यांना न्यायला अगदी सरकारी मोटार सज्ज होती. आमदार निवासातल्या त्यांच्यासाठीच्या राखीव खोल्यांमध्ये थोडी विश्रांती होतेय न होतेय तोच राजभवनावरील सत्कार समारंभासाठी तयार राहण्याची वर्दी घेऊन दिनेश स्वतः ताईंना भेटायला आला होता. मुख्यमंत्र्यांची उद्याची वेळ आपल्याला चर्चेसाठी मिळाली असल्याचा संदेशही त्याने आणला होता. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी फ़क्त १० मिनीटांचा वेळ दिलेला बघून वीणाताई हिरमुसल्या ख-या, पण त्यांच्या वेळेची निकड समजून दहा मिनीटांमध्ये त्यांच्यासमोर मांडण्याच्या मुद्द्यांची त्या मनातल्या मनात उजळणी करू लागल्यात.


राजभवनावरील भव्य हिरवळीवर सुंदर असा सभामंडप टाकलेला होता. त्या मंडपात स्वातंत्र्य संग्राम सैनिकांसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था होती. शासनाचे बडेबडे अधिकारी आणि मंत्रीगण या व्यवस्थेकडे जातीने लक्ष देऊन होते. इतक्यात वीणाताईंच सहजच समोरच्या रांगेत लक्ष गेलं. त्यांच्या कपाळावरची शीर तडतडली, डोळ्यात अंगार फ़ुलला, पन्नास वर्षांपूर्वी वळल्या होत्या तशाच मुठी पुन्हा वळल्यात. व्यासपीठावर मुख्यमंत्री, राज्यपाल आदि मान्यवरांची वाट बघत असलेल्या दिनेशला त्यांनी जवळ बोलावून घेतले.

"दिनेश, हे गृहस्थ कोण आहेत ?" आवाजात संयम आणण्याचा प्रयत्न करीत त्यांनी समोरच्या रांगेत बसलेल्या एका गृहस्थांकडे अंगुलीनिर्देश केला. 


"ताई ते नागपूरचे झुंबरशेठ लखनमल." दिनेशने सहज उत्तर दिले.


"दिनेश, त्यांचा स्वातंत्र्यलढ्यातला इतिहास तुला ठाऊक आहे ?" ताईंचा आवाज त्यांच्याही नकळत करडा झाला होता. "ब्रिटीश सरकारला फ़ितूर होऊन आपल्याच देशबांधवांना नागवणा-या माणसाला आज हे मानाचं पान ?"


"ताई, प्लीज. अहो ते बडं प्रस्थ आहे. त्यांचा मुलगा आज आमदार आहे. प्लीज हळू." ताईंचा संताप आवरण्यासाठी दिनेश बिचारा पराकाष्ठा करीत होता.


"माझ्या लेखी तो फ़क्त एक गद्दार आहे आणि अशा गद्दारांचा सत्कार ज्या व्यासपीठावरून होतो तिथून मला सत्कार स्वीकारायचा नाही." कुणालाही कळण्याआधी ताई झपाझप चालू लागल्यात. सभामंडपातल्या इतर निमंत्रितांना, वृत्तपत्र प्रतिनिधींना मात्र रागावून परतत असलेली एक वृद्धा स्वातंत्र्यसैनिक आणि तिची असहाय्यपणे विनवणी करीत असलेले मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव हेच दृश्य दिसत होते.

वीणाताईंना पुन्हा जाग आली. गाडी धिम्या गतीने कसा-याचा घाट चढत होती. बाहेर सर्वत्र अंधाराचे साम्राज्य होते. नाही म्हणायला सिग्नलचे हिरवे तांबडे दिवे आणि घाटातून जाणा-या मोटारींचे दिवे त्या अंधाराला छेद देऊन जात होते. त्या विलक्षण विषण्ण झाल्यात. स्वातंत्र्याच्या पहाटे किती लोभसवाणी स्वप्नं आपल्या डोळ्यात होती ! आज त्या बहुतेकांचा चक्काचूर झाल्याचे बघणे आपल्या नशिबात आलेय. सिंधूपासून कावेरीपर्यंतच्या भागात्ले स्वातंत्र्यसैनिक लढले ते काय केवळ राजकीय स्वार्थापोटी ? नद्यांचे पाणीवाटप झगडे आणण्यासाठी ? चंद्रपूरच्या तुरूंगात शेजारच्या कोठडीत माझ्यासारखीच राजकीय बंदी असलेली शकीला बानू. पठ्ठीला संपूर्ण वंदेमातरम पाठ होतं आणि रोज उठल्याबरोबर आणि झोपण्यापूर्वी ती ते उच्चरवात म्हणायची सुद्धा. त्यात कधी तिचा ’मजहब’ आडवा आला नव्हता. त्यावेळी एकच मजहब होता "आझादी" आज संपूर्ण वंदेमातरमची नेमकी कडवी किती ? हे सुद्धा तरूणांना माहिती नाही मग केवळ राजकीय स्वार्थापोटी "आम्ही वंदेमातरम म्हणणार नाही. ते आमच्या धर्माविरूद्ध आहे." असे म्हणणा-या निर्लज्ज पुढा-यांना कोण आवरणार ? हे सगळं ऐकण्यासाठी का शकीला ’वंदेमातरम’ म्हणून तुरूंगात आली होती ? हे दिवस दिसण्यासाठीच का आपल्या दादाने आणि त्याच्यासारख्या असंख्यांनी आपल्या छाताडावर गोळ्या झेलल्या होत्या ? स्वातंत्र्याचा उषःकाल होण्यापूर्वीच क्षुद्र स्वार्थाचा अंधार भारत वर्षाला व्यापून पुन्हा दशांगुळे उरला होता.

वीणाताईंच्या पायापाशी बसलेल्या त्या स्त्रीच्या तान्हुल्याने रडायला सुरूवात केली होती. त्याची आई त्याचे रडे थांबवण्याचे सगळे उपाय करून थकली होती. त्याला कदाचित तहान लागली असावी.  वीणाताईंनी खांद्यावरच्या शबनम बॅगमधून वॉटरबॅग काढून त्याच्या आईला दिली. तिनं त्या तान्हुल्याला त्यातलं थोडं थोडं पाणी पाजायला सुरूवात केली. त्याचं रडं थांबलं. त्या बाईच्या चेह-याकडे बघताना तिलाही भूक लागली असावी असं वीणाताईंना जाणवलं. त्यांनी घरून आणलेला चिवडा पिशवीतून काढला, तिच्यासमोर धरला. आढेवेढे घेत अखेर ती तो चिवडा खाऊ लागली. वीणाताईही तिला सामील झाल्यात. एव्हाना तो तान्हुला आपल्या आईच्या मांडीत शांत झोपी गेला होता.

त्या काळ्याबेंद्र्या चेह-यात वीणाताईंना आशेचा किरण दिसू लागला. त्या मुंबईला यायला निघाल्यावर त्यांच्या निरोप घेताना तोंडे सुकून गेलेले मारत्या, लख्या, वेंक्या, भुंज्या ही पोरे त्यांच्या डोळ्यासमोर दोसू लागलीत. "अरे, फ़क्त दोन तीन दिवसात मी परत येतेय, कायमची तिथे जात नाही." हे त्यांना समजावून सांगता सांगता त्यांची झालेली पुरेवाट त्यांना आठवली. किती आशेने ती मुले आपल्याकडे बघत होती, नाही ? त्यांच्यासाठी आता आपण आपलं आयुष्य पुन्हा नव्या जोमानं जगायचं, नव्याने उभारायचं. स्वातंत्र्याच्या उषेला आजजरी हे स्वार्थाचं ग्रहण लागलेलं आहे तरी उद्याची आशा मात्र जिवंत ठेवायलाच हवी आहे हे त्यांचा मनानं पक्कं घेतलं.

बाबांना नमस्कार करताना ते नेहमी "शतायुषी भव" असा आशिर्वाद द्यायचेत. वीणाताई तेव्हा गमतीने म्हणायच्यात सुद्धा "एवढं आयुष्य काय करायचय बाबा ? पन्नास वर्षे पुरेत." आता मात्र त्यांना वाटलं की बाबांचा हा आशिर्वाद खरा ठरायला हवा. आपण पंचाहत्तरी तर गाठलीच आहे. आयुष्याची मशाल जाळण्यासाठी अजून पंचवीस वर्षे मिळतील. त्या कालावधीत पुन्हा नव्या जोमानं काम करू आणि संपताना आणखी एकाला त्याचं आयुष्य मशालीसारखं करण्याची स्फ़ूर्ती देऊन जाऊ. वीणाताईंचा थकवा आता पार पळाला होता. बाहेरच्या भयाण अंधारातून त्या भविष्यातल्या कार्यांचे वेध घेत दूर अनंतात बघत होत्या. विदर्भ एक्सप्रेस मात्र भरधाव नागपूरकडे धावत होती.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर.


(ही कथा दै. तरूण भारत नागपूरच्या आसमंत पुरवणीत रविवार दिनांक ३० ऑगस्ट १९९८ रोजी प्रकाशित झालेली आहे.)




या कथेसाठीचे हे चित्र तरूण भारत नागपूरमधील तत्कालीन कलाकार श्री हेमंतजी मानमोडे यांनी तयार करून दिले त्याबद्दल त्यांचे आभार.

Sunday, March 26, 2023

करूणाष्टक - ५

 


चपळपण मनाचें मोडितां मोडवेना ।


सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥


घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा ।


म्हणवुनि करूणा हे बोलतो दीनवाचा ॥ ५ ॥


माझ्या या मनाचे चपळपण मला सोडवता येत नाही. माझ्या मनात माझ्या नातलगांविषयी असलेली ही माया मला तोडून टाकता येत नाही. माझ्या मनाचा निश्चय हा शाश्वत रूपाने कधीच टिकत नाही, तो कायम बदलत असतो, बिघडत असतो. म्हणून हे रामा, मी तुझ्याकडे करूणेचे हे दान मागतो आहे. 


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


(या श्लोकाचा व्हिडीयो इथे


Saturday, March 25, 2023

करूणाष्टक - ४

 

तनु-मन-धन माझें राघवा रूप तुझें ।


तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें ॥


प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी ।


अचल भजनलीला लागली आस तूझी ॥ ४ ॥


हे रामराया, माझे शरीर, मन आणि संपत्ती ही सगळी तुझीच रूपे आहेत रे. तुझ्याविना हे सारे जग मला एखाद्या ओझ्याप्रमाणे वाटते आहे. रामा, माझी बुद्धी ही तू जगातील इतर जनांच्या बुद्धीप्रमाणे शरीर, मन आणि संपत्तीलाच सर्वस्व समजणारी अशी करू नकोस. मला तुझ्या अचल अशा भजनाची आस लागलेली असू दे.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


(या श्लोकाचा व्हिडीयो इथे


Friday, March 24, 2023

करूणाष्टक - ३

 


विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं ।


तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं ॥


रघुकुळटिळका रे हीत माझें करावें ।


दुरित दुरि हरावें सस्वरूपीं भरावें ॥ ३ ॥


या जगात जे इंद्रियजन्य विषय आहेत त्यांच्यापासून मिळालेल्या सुखांमुळे मनुष्याला खरे सुख कधीही लाभणार नाही. हे रामा, तुझ्याविना इतर सगळी सुखे अगदी खोटी आहेत. हे रामा माझे हित जर तुला करायचे असेल तर एव्हढेच कर हे इंद्रियगो्चर विषयांचे दुरित तू हरण कर आणि मला तुझ्या सत स्वरूपात सामील करून घे.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


(या श्लोकाचा व्हिडीयो इथे )


Thursday, March 23, 2023

पश्चिम महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा एका वैदर्भिय माणसाला मिळालेला पहिला धक्का.

 १९८९ मध्ये कराडला पाऊल ठेवताक्षणी आम्हा वैदर्भियांना पहिला सांस्कृतिक धक्का जो बसला, त्याची एक गंमतीशीर आठवण.

- हृदयाने वैदर्भिय पण वागण्याबोलण्यात संपूर्ण महाराष्ट्रीय असलेला, रामभाऊ.
(लिंक इथे)



करूणाष्टक - २

 


भजनरहित रामा सर्वही जन्म गेला ।


स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥


रघुपति मति माझी आपुलीशी करावी ।


सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥ २ ॥


हे रामराया, तुझ्या भजनाशिवाय हा सगळा माझा जन्म चालला आहे. तुझे भजन, गुणगान करण्यापेक्षाही माझे कुटुंबिय नातेवाईक, माझी धनसंपदा याचाच स्वार्थी विचार मी आजवर केला. हे रघुपती, माझे मन तू आपलेसे कर (आपल्याकडे ओढून घे) ज्यायोगे मी या सकळ स्वार्थी गोष्टींचा त्याग करून फ़क्त तुझ्याच प्राप्तीचा विचार करेन.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


(या श्लोकाचा व्हिडीयो इथे)


Wednesday, March 22, 2023

करूणाष्टक - १

 



अनुदिनिं अनुतापें तापलो रामराया ।

परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥

अचपळ मन माझें नावरे आवरीता ।

तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥


हे रामराया, रोजरोजच्या त्याच त्याच तापांनी मी त्रासून गेलेलो आहे. हे दीनदयाळा, तुला या साधकाची करूणा येऊ दे आणि ते ताप देणारी मोह माया तू निरसन कर. हे रामा, माझे अत्यंत चंचल मन मला आवरता आवरत नाही तेव्हा तू लवकर धाव घे. (कारण ही मोह माया तुझ्याच अधीन असल्याने तू येताक्षणी तिचे निरसन होईल. इथे समर्थ वर्णन करीत असलेले ताप हे साधकाला आलेले मोह मायारूप त्रास आहेत. साधनेपासून विचलित करू इच्छिणारे अनंत आध्यात्मिक ताप. याठिकाणी श्रीसमर्थ सर्वसामान्यांना होत असलेल्या आधिभौतिक तापांबद्द्ल बोलत नाही आहेत.) 


 - प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(या श्लोकाचा व्हिडीयो इथे)

समय होत बलवान....

माझी मुलगी आणि मी. अगदी तिच्या बालपणापासूनच आम्ही दोघे बापलेक कमी आणि थोरली बहीण - धाकटा भाऊ या नात्यानेच जास्त राहतो. अगदी अजूनही मस्त बरोबरीने भांडतोही.

आमच्याच या नात्याचा प्रवास "समय होत बलवान" या व्हिडीओद्वारे आपल्यासमोर सादर करतोय.
- अजूनही शैशवात असलेला सर्व बाळगोपाळांचा वृध्द बालमित्र, वैभवीराम किन्हीकर.



Saturday, March 11, 2023

मर्मबंधातली ठेव ही...

 माझ्या आयुष्यात ७ फेब्रुवारी, १२ मार्च आणि २ डिसेंबर हे दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. ७ फेब्रुवारीला माझी आणि माझ्या प्रिय पत्नीची लग्ननिश्चिती झाली, १२ मार्चला आमचा वाङनिश्चय झाला आणि २ डिसेंबरला आमचे लग्न झाले. हे तीन दिवस माझ्या मनावर जन्मोजन्मींसाठी कोरल्या गेलले आहेत. जणू हे दिवस म्हणजे मर्मबंधातल्या ठेवीच होऊन राहिलेले आहेत.

७ फेब्रुवारीला लग्ननिश्चिती झाल्यानंतर (त्यासंबंधी सविस्तर कथा इथे आणि इथे) आमच्यात मोजून दोन तीनदा फोनवर बोलणे झाले. त्यावर्षी १४ फेब्रुवारीला तिने मला ग्रीटिंग पाठवले पण सविस्तर पत्र वगैरे लिहीण्याइतका मोकळेपणा नात्यात अजूनही आलेला नव्हता. ते ही साहजिकच होते म्हणा. वैभवी तर स्वभावतःच अत्यंत लाजरीबुजरी आणि मी वरवर कितीही धिटाई दाखवत असलो तरी अशा गोष्टीत पुढाकार घेण्यासाठी कायम शेवटल्या रांगेत पळणारा.

लग्ननिश्चिती झाली. तत्कालीन प्रथेप्रमाणे लग्नसमारंभाविषयी उभय घरांमध्ये देण्याघेण्याच्या बाबी ठरल्यात. अर्थात या बाबींमध्ये माझा सहभाग नव्हताच. मी लग्ननिश्चिती करून मुंबईला नोकरीवर रूजू झालो होतो. पण याबाबतीत माझ्या आकांक्षा मी त्या बोलणीत सहभागी होणार्‍या माझ्या आईला आणि माझ्या मामांना फोनवरून स्पष्टपणे कळवलेल्या होत्या. त्यानुसारच अजिबात काही तणातणी किंवा ताणाताणी न होता लग्नाची बोलणी वगैरे छान पार पडलीत आणि वाङनिश्चय रविवार, १२ मार्च २००० रोजी करण्याचे ठरले.

आमचा वाङनिश्चय समारंभ चंद्रपूरला देशपांडेंच्या रहात्या घरी,  वाड्यात तर लग्न नागपूरला करण्याचे ठरले होते. किन्हीकरांकडे मी म्हणजे थोरल्या पातीची थोरली पाती. तर देशपांडेंकडेही वैभवी म्हणजे तिच्या बहिणींमधली सगळ्यात मोठी. त्यामुळे दोन्ही घरात फार उत्साह होता. मी १० मार्च रोजीच नागपूर मुक्कामी दाखल झालो. समारंभासाठी चंद्रपूरला जाण्यासाठी निमंत्रितांची यादी करायला लागलो आणि लक्षात आले की माझ्यावर प्रेम करणारी नातेवाईक, सुहृद, मित्रमंडळी इतकी होती की सगळ्यांना चंद्रपूरला समारंभासाठी घेऊन जाण्यासाठी चार ते पाच बसेस कराव्या लागल्या  असत्या. आमच्यासाठी अव्यवहार्य तर होतेच शिवाय वैभवीच्या घरच्यांच्या व्यवस्थापनाची परीक्षा बघण्यासारखे आणि त्यांच्याकडल्या व्यवस्थेवर अकारण असह्य ताण टाकणारे होते. म्हणून मग प्रत्येक कुटुंबातून एक प्रतिनिधी असे आम्ही निश्चित केले आणि तशी निमंत्रणे केलीत.

त्याकाळी नागपूर ते चंद्रपूर प्रवासासाठी "गणराज ट्रॅव्हल्स" ही सर्वोत्कृष्ट सेवा उपलब्ध होती. (त्याविषयीचा एक लेख इथे) त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन १२ तारखेची सकाळची ८ ची नागपूर - चंद्रपूर फेरी आम्ही पूर्णपणे आरक्षित केली. परतीसाठी त्यांचीच संध्याकाळी ६ ची फेरी आरक्षित केली. अशावेळी गणराज वाले त्यांची बस त्या 'पार्टी' च्या घरापर्यंत पाठवीत असत आणि गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवूनही देत असत. फार सोयीची अशी ही सेवा होती.

१२ मार्च उजाडला. मी मनात खूप हरखून गेलेलो होतो. बाहेरगावाहून घरी पाहुणे राहुणे मंडळी आलेलीच होती. सगळ्यांनी भराभर आवरले. ठरल्याप्रमाणे पावणेआठच्या सुमारास गणराज घरासमोर उभी झाली. माझे सदगुरू परम पूजनीय बापुराव महाराज आणि परम पूजनीय मायबाई महाराज यांचे चिरंजीव आणि मला गुरूतुल्य असलेले श्री. बाबाकाका यांच्या हस्ते नारळ वाढवून आम्ही सगळे बसमध्ये बसलोत. बस अगदी वेळेवर निघाली. गंमतीची बाब म्हणजे यावेळीही मी माझ्या आवडत्या आसनावर, ड्रायव्हर केबिनमध्येच बसलेलो होतो. माझ्यासोबत माझा बंधूवर्ग आणि मित्रवर्गपण केबिनमध्येच बसलेला होता. मौजमजेचा, उत्सुकतेचा प्रवास सुरू झाला.




प्रवासात गाणी, अंताक्षरी सगळेच सुरू होते. वाटेत जांब स्थानकावर चहापानासाठी अल्प विश्रांती घेऊन आमचा प्रवास सुरूच होता. ठरल्या वेळेनुसार साधारण सव्वातीन तासांनी, सकाळी ११.१५ ला आम्ही चंद्रपूरला पोहोचलो. पूर्ण बस आम्हीच आरक्षित केलेली असल्याने बस थेट बालाजी वाॅर्डात देशपांडेंच्या घराजवळ पोहोचली.



बसमधून उतरून आम्ही सगळे माझ्या आजोळी जाणार होतो. तिथे थोडावेळ थांबून चहापाणी वगैरे झाले की आम्ही देशपांडेंकडे कार्यक्रमस्थळी दाखल होणार होतो. चंद्रपूरातले माझे आजोळ आणि देशपांडेंचा वाडा अगदी जवळजवळ. मध्ये फक्त १ गल्ली आणि एक घर. बालपणी उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्टयांमध्ये माझा मुक्काम महिनोनमहिने माझ्या आजोळीच असायचा. समवयस्क मामेभावंडे, खूप प्रेम करणारी आजोळची प्रेमळ मंडळी. त्यामुळे मी आजोळी खूप रमत असे. पण इतकी  वर्षे आम्ही दोघे इतक्या जवळ वावरत असूनही आमचा एकमेकांशी कसलाही संपर्क मात्र कधीच आला नाही ही एक अत्यंत आश्चर्याची गोष्ट होती. एकेमकांचा उल्लेखही कधी एकमेकांसमोर झाल्याचे आम्हा दोघांनाही कधीच स्मरत नव्हते. माझ्या काही नातेवाईकांना मात्र माझे आजवरचे वारंवार चंद्रपूरला जाणे आणि वैभवीचे घर माझ्या आजोळच्या इतक्या जवळ असणे यावरून आमचा हा प्रेमविवाह असावा अशी दाट शंका आली होती. ती त्यांनी तशी बोलूनही दाखवली होती पण आतली प्रामाणिक गोष्ट आम्हा दोघांना आणि दोघांच्याही घरच्यांना माहिती होती. 


बसमधून उतरताना कुठेतरी वैभवी आपल्याला घ्यायला आली असेल अशी मनात वेडी आशा होती. ते तसे शक्य नाही, ती  नवरी मुलगी आहे, आज ती तिच्याच तयारीत, घाईत असेल हे डोक्याने स्वीकारले होते पण वेडे मन मात्र तिचीच वाट बघता होते. बसमधून उतरताना V for Victory (or V for Vaibhavi) अशी खूण करत आम्ही सगळे उतरलो. आजोळच्या गल्लीत शिरताना एक नजर देशपांडेंच्या गल्लीकडे गेलीच. ना जाणो चुकूनमाकून वैभवी तिथे आली असली तर ? पण तसे काही झाले नाही. आम्ही सगळे निमूटपणे आजोळच्या वाड्यात दाखल झालोत.


आजोळच्या जवळपास ३०० वर्षे जुन्या वाड्यात माझी वृद्ध आजी, लाडके मामा - मामी, बरोबरीची मामे भावंडे सगळे नागपूरकडच्या वऱ्हाडाची वाट बघत होते. चहापाणी वगैरे झाले आणि देशपांडेंकडे जेवण तयार असल्याची वर्दी घेऊन त्यांच्याकडली मंडळी आलीत. आम्हा सगळ्यांची तयार होण्याची एकच घाई सुरू झाली. जुना वाडा, त्यातले एकुलते एक बाथरूम (न्हाणीघर किंवा अंगधुणे हा त्यासाठी वापरला जात असलेला शब्द.). पन्नासाच्या गणसंख्येच्या आसपास असलेल्या वऱ्हाडी मंडळींसाठी कसे पुरे पडणार ? शेवटी खुद्द नवऱ्या मुलाने एका भांड्यात पाणी घेऊन परसदाराच्या अंगणात आपला मुखचंद्रमा धुतला. आणि प्रवासातले कपडे बदलून त्यातल्यात्यात बरे कपडे लेऊन आम्ही तयार झालो. मेकअप वगैरेंचा प्रश्नच नव्हता. चेहेऱ्याला विको टर्मरिक चोपडले आणि वरून एक पावडरचा (बहुतेक Ponds Dreamflower Talk च) थर फासला की झाले काम.

आजकालची पिढी (अगदी नवरे मुलगे सुद्धा) वाङनिश्चय, लग्न आदी समारंभात किती  नट्टापट्टा करतात हे पाहिले की अतिशय विस्मय वाटतो, हेवाही वाटतो. पण तेव्हा आम्ही उपलब्ध असलेल्या साधनांचाच वापर करून देशपांडेंकडे मांडवात दाखल झालोत.


आता मला इथे आधीच नमूद करायला हवे की बालपणापासून अंघोळ झाली की डोईवर खोबरेल तेल थापल्याशिवाय आम्ही कधीही कुठेही गेलो नाही. केशभूषा करण्याइतके केस कधीच डोईवर नव्हते आणि तेव्हा असे तेल ना लावता भुरकट केसांनी वावरणे आमच्या घरच्या व्यवहारात तरी नामंजूर होते. तसे तेल आजही माझ्या डोक्यावर होतेच. त्या तेलाचा संदर्भ आमच्या लग्नानंतर काही महिन्यांनी आमच्या बोलण्यात आला . आपल्या साक्षगंधाच्या दिवशी तू किती रे तेल चोपडले होते ? या वैभवीच्या चिडवण्याने. "अगं, ती आमची बालपणापासूनची सवय." वगैरे माझ्या सबबी तिने ऐकून घेतल्याचं नाहीत. 

मांडवात प्रवेश करताक्षणी आमच्या वऱ्हाडातल्या प्रत्येकाला वैभवीच्या दर्शनाची आस लागलेली होती. मला तर फारच. पण इतर बऱ्याच जणांनी आतापर्यंत तिचा फक्त फोटोच बघितलेला होता त्यामुळे ती प्रत्यक्ष कशी दिसते ? याचे औत्सुक्य प्रत्येकाच्या मनात होते आणि त्यांच्या चेहेऱ्यावरून ते ओसंडून वाहात होते. आणि सगळ्यांच्या उत्सुक्याची अशी सीमा गाठल्या गेल्यावर माझ्या प्रियतमेचे आगमन झाले. त्यांच्याच वाड्यात कार्यक्रम त्यामुळे तिच्या घरातून निघून ती  मांडवात  दाखल झाली तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या होत्या. रामसारख्या व्यक्तिमत्वाला असेच  सात्विक, सोज्वळ सौंदर्य हवे होते यावर आमच्याकडल्या सगळ्यांचे एकमत झाले. 

दुपारच्या जेवणाला सुरुवात झाली. मध्ये माझी आई आणि आजूबाजूला आम्ही दोघे असे जेवायला बसलोत. मला आता कुठली भूक आणि कुठली तहान ? तिच्या माझ्या जीवनातल्या आगमनाने सगळी भूक तहान मी विसरलेलो होतो. जनरीत म्हणून कसेबसे दोन घास पोटात ढकललेत. वारंवार तिच्याकडेच बघण्याचा अनावर मोह होत होता पण ते चांगले दिसेल का ? या भीडेपोटी मी तो मोह टाळत होतो.



दुपारचे जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे पुन्हा माझ्या आजोळी परतलो. आणि थोड्या वेळाने पुन्हा सगळे तयार होऊन संध्याकाळच्या वाङनिश्चय समारंभासाठी देशपांडेंच्या वाड्यात दाखल झालोत. वाङनिश्चय समारंभ अगदी पारंपारिक आणि धार्मिक पद्धतीप्रमाणे सुरू झाल्या. प्रथम नियोजित वराची पूजा. त्याला नवे कपडे देणे वगैरे. 



नंतर मग वधूपूजेसाठी वैभवीचे मंडपात पुनरागमन झाले त्याक्षणी किन्हीकरांकडल्या सगळ्या मंडळींच्या डोळ्यातले ओसंडून वाहणारे तिच्याविषयीचे कौतुक अभावितपणे केमेऱ्यात कैद झाले होते. माझ्या आजीचे, मावस आजीचे थकलेले  वृद्ध नेत्र तिला ओवाळत होते. तिचे सात्विक सौंदर्य सगळ्यांचेच  मन मोहून घेत होते. "एका लग्नाची गोष्ट" हे नाटक आम्ही आमच्या लग्नानंतर बघितले. त्यातले "ती  परी अस्मानीची." हे गाणे या प्रसंगात अगदी चपखल बसत होते.















या वाङनिश्चय समारंभात वर पूजनामध्ये तिच्या काकाकाकूंनी मला अंगठी घातली आणि वधू पूजेत माझ्या काकाकाकूंनी तिला अंगठी घातली. आजवरच्या अनेक वाङनिश्चय समारंभात वधू आणि वर एकमेकांना अंगठी घालतात हे मी बघितलेले होते. हा प्रसंग आज कधी येईल ? याची मी चातकासारखी वाट बघत होतो. अजूनही तिच्याशी फारसे बोलणे झालेलेच नव्हते. मी माझ्या धाकट्या भावाला सांगून हा एकमेकांना अंगठी प्रदान करण्याचा एक वेगळा प्रसंग त्यांच्याच वाड्यात एका बाजूला घडवून आणला. साक्षीला केवळ दोन्हीकडली तरुण मंडळी. अशा प्रसंगी दोन्ही बाजूंनी थट्टा मस्करी रंगली आणि ती झकास लाजली. अहाहा ! माझे हृदय तिथे अगदी खल्लास. "हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ? हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे." या ओळींची आठवण झाली. फक्त हे दुःख अतिशय सुखद संवेदनेचे दुःख होते. तो क्षण आपल्या आयुष्यात "फ्रीझ " होऊन कायमचा राहावा असा तो एक दुर्मिळ क्षण.







कधीही संपू नये असा वाटणारा तो दिवस संपला. आमच्याकडली नागपूरला परत जाण्यासाठी तयारी करू लागली. मला मात्र तिला भेटण्याची, तिच्याशी बोलण्याची इतकी ओढा लागलेली होती की मी दोन दिवसांनी नागपूरला परतण्याचा माझा निश्चय जाहीर केला. आमच्याकडल्या सगळ्यांनी त्याला हसत हसत मान्यता दिली. आणि माझा चंद्रपूरचा मुक्काम दोन दिवसांनी वाढला.

त्या दिवशी संध्याकाळी देशपांडेंकडून सहज बोलावणे आले. तिला पुन्हा भेटण्याचे निमित्त मला हवेच होते. मी त्यांच्या वाड्यात पुन्हा गेलो. तिथे त्यांच्याकडली सगळी मंडळी जमून थट्टामस्करीचा माहौल होता. मला गाणे म्हणून दाखवण्याचा आग्रह झाला. मी ही लाजत लाजत अतिशय मध्यममार्ग स्वीकारून "गुरू महाराज गुरू" हे भजन सादर केले. तिच्या चेहे-यावर आनंद, कौतुक वगैरे काहीही दिसेना. माझे गाणे तिला आवडले आहे की नाही ? काहीच कळायला मार्ग नव्हता.


ती रात्र मी माझ्या मामांच्या घरी नेहेमीप्रमाणे मामे भावंडांशी गप्पा, मस्करीत काढली. झोप अशी फ़ारशी झालीच नाही. दुस-या दिवसाची मी वाटच बघत होतो. मामांच्या घरून सकाळीच मी तिला तिच्या घरी फ़ोन लावला आणि भीत भीतच विचारले "अगं, मी आज इथे तुझ्यासाठीच थांबलोय. आपण दुपारी भेटूयात का ?" ती पण याचीच वाट बघत होती बहुतेक कारण ती लगेच "हो" म्हणाली. दोघांमधले Ice Breaking कुणी करायचे यासाठीच दोघेही संकोचत होते हे आम्हा दोघांनाही कळले. थोड्या वेळाने आमच्या सासुबाईंचा मला त्यादिवशी दुपारी जेवणाला बोलावण्याचा फ़ोन आला. त्या माऊलीने मला आवडतात म्हणून त्यादिवशी स्वतःच्या शाळेत सुटी घेऊन घरी पुरणपोळीचा घाट घातला होता. 


दुपारी माझ्या आवडत्या पुरणपोळीचे जेवण करून आम्ही दोघे चंद्रपुरातल्या जयंत सिनेमात "कहो ना प्यार है" बघायला गेलो. सिनेमा बघितला कमी आणि मनमुराद गप्पा फ़ार मारल्या. ती अबोल असली तरी गप्पांची तिला ॲलर्जी नाही हे कळले आणि ती मनमोकळी आहे हे ही कळले. तो दिवस म्हणजे आयुष्यातल्या सर्वोत्तम दिवसांपैकी एक दिवस.


आमचे लग्न पार अगदी २ डिसेंबर ला ठरले. मधला आठ नऊ महिन्यांचा कालावधी आम्हाला एकमेकांना समजून घ्यायला मिळाला. एकमेकांना आम्ही जवळपास शंभरावर पत्रे या काळात लिहीलीत. (अर्थातच सगळी पत्रे माझ्या आणि तिच्याही संग्रहात जपून ठेवलेली आहेत.) दरवेळी मी मुंबईवरून सुट्ट्यांमध्ये नागपूरला आलो की वैभवीही चंद्रपूरवरून नागपूरला यायची. मग आम्ही खूप भटकायचो. एकमेकांशी खूप बोलायचोत. भविष्याचे खूप नियोजन करायचोत. कधीकधी लांब सुटी असली की मीच चंद्रपूरला जायचो. राहण्याचा प्रश्नच नव्हता. आजोळी रहायचो आणि आम्ही दोघे चंद्रपुरातही खूप भटकायचोत, खूप संवाद साधायचोत. नंतरच्या बावीस वर्षातल्या आमच्या संसारतले आमच्यातले अद्वैत, ऐक्य साधण्यासाठी या कोर्टशिप पिरीयड्चा फ़ार उपयोग झाला. तेव्हा कळला नाही तो पण संसारात मुरल्यावर मात्र दोघांनाही त्या दिवसांच्या या उपकारांची जाणीव झाली.


आम्हा दोघांच्याही हृदयात हे दिवस म्हणजे जन्मोजन्मीच्या मर्मबंधांची ठेव होऊन कायमचे राहिले हे काय वेगळे नमूद करायला पाहिजे ?


- वैभवीच्या स्वभावाचा, सौंदर्याचा आणि साधेपणाचा एक आशिक, राम किन्हीकर.





Friday, March 10, 2023

कवी आणि कविता.

आयुष्यात काव्य खूप उशीरा सामील झाले. बालपणी कविता होत्या पण त्या अभ्यासापुरत्याच. गद्य आणि पद्य म्हणून. पुलं नी लिहील्याप्रमाणे शाळेत "गद्य नाही ते पद्य आणि पद्य नाही ते गद्य." असेच आम्ही गद्य पद्य शिकलो. अभ्यासक्रमातल्या कवितेचा अभ्यास म्हणजे या कवितेवर नेमका कुठला प्रश्न परीक्षेत येईल. कुठले "संदर्भासह स्पष्टीकरण" या कवितेवर येईल ? याचाच सतत विचार. एखाद्या कवितेच्या रसग्रहणापेक्षाही तिच्यावर किती मार्क्स मिळतील ? हाच विचार आम्ही सगळे "मार्क्सवादी" विद्यार्थी कायम करीत आलो. 


अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्यानंतर कवितांचा अभ्यास नव्हता म्हणूनच मग नवनवीन कविता गाण्यांच्या रूपात कानावर पडू लागल्यात. त्यातल्या सुंदर सुरावटींइतकेच शब्दही आवडू लागलेत. इतके सुंदर शब्द कुठल्या कवीने लिहीलेत ? या उत्सुकतेपोटी त्या कवितेचा, कवीचा आणि त्या कविच्या इतरही रचनांचा शोध सुरू झाला. त्यात महाविद्यालयातली समविचारी मित्रमंडळी मिळालीत. चांगल्या कविता ऐकायला, वाचायला मिळू लागल्यात. आपसूकच त्यांचे रसग्रहण होत गेले. कविता कळायला लागली.


याच प्रक्रियेद्वारे मंगेश पाडगावकर मनात ठसलेत. २० - २१ वर्षांचे स्वप्नाळू वय. सकाळी हाॅस्टेलमधून काॅलेजबाहेरच्या टपरीवर चहा पिताना चाललेलो असताना हाॅस्टेलच्या एका खोलीत लागलेल्या सांगली आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रमात


"लाजून हासणे अन

हासून हे पहाणे

मी ओळखून आहे

सारे तुझे बहाणे" 


हे गाणे कानी पडताच आमची पावले तिथेच थबकलीत. पाडगावकरांच्या इतर कवितांचा शोध सुरू झाला. त्यात आमच्या मैत्रिणीच्या (शारदा गाडगीळ - आता शारदा तानवडे) वडिलांचे कोल्हापूरात पुस्तकांचे साक्षात दुकान. पाडगावकरांच्याच "बोलगाणी" सह नवनवीन कवितासंग्रह प्रकाशित झाल्याझाल्या (कधीकधी प्रकाशनपूर्वही) आम्हाला वाचायला मिळू लागलेत.  आम्ही काव्यात रमलोत.


चांगली कविता म्हणजे तरी काय ? माझ्या मते वाचकाला त्याच्या आसपास घडणार्‍या अनंत घटना कवीच्या कल्पनेतून आलेल्या नव्या शब्दांच्या अनुभूतीद्वारे भेटायला येतात. "अरे, ही तर आपलीच अनुभूती. कवीने किती सुंदर शब्दांद्वारे आपल्यापुढे मांडलीय." ही  सर्वसामान्य वाचकांची भावना झाली की कवी जिंकला. असाच माझा एक अनुभव.


असाच एकदा मुंबईवरून कोल्हापूरकडे निघालो होतो. ठाण्यावरून सकाळची कोयना एक्सप्रेस पकडलेली होती. पावसाळी दिवस. एसी चेअर कार. खिडकीची जागा. माझ्यासारख्या एका प्रवासी पक्षाला अजून काय पाहिजे ?


कर्जतनंतर गाडीने बोरघाट चढायला सुरूवात केली. दरी डोंगरांच्या रांगेतून, बोगद्याबोगद्यातून गाडी लोणावळ्याकडे धावत होती. कर्जतपासूनच मी खिडकीला नाक आणि कॅमेरा लावून सरसावून बसलो होतो.


एका बोगद्यातून गाडी बाहेर पडली आणि समोरचे दृश्य पाहून पाडगावकरांचीच एक ओळ अनुभूतीला आली. ठाण्यापासून कर्जतपर्यंत येताना डोक्यावर असलेले ढग आता पायाशी आलेले होते. ढगांच्या छायेतला आमचा आत्तापर्यंतचा प्रवास त्याच ढगांना भेदून आता ढगांवर आरूढ होण्यापर्यंत येऊन पोहोचला होता.  पुढ्यातल्या हिरव्यागार दरीत मस्त पिवळेधम्म ऊन पसरले होते. 



"पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले." या ओळींची याहून उत्तम अनुभूती आणखी कुठे आली असती ? पाडगावकरांना, त्यांच्या अभिव्यक्तीला ताबडतोब सलाम केला.


आता अशीच अनुभूती एखाद्या निळ्याशार तळ्याकाठी, नदीच्या संथ प्रवाहात पावसाच्या हलक्या शिरव्याचे थेंब तळ्याच्या, नदीच्या पाण्यात नाचत असताना 

"निळ्या रेशमी पानांवरती थेंबबावरी नक्षी" या ओळींची घ्यायला मिळेल अशी आस आहे.


तुमच्या माझ्या सर्वसामान्य माणसांच्या मनांना आपल्या अत्यंत प्रभावी अभिव्यक्तिद्वारे साद घालण्याचे आणि स्तिमित करण्याचे सामर्थ्य ज्याच्या कवितेत असते तोच खरा उत्तम कवी, नाही का ?


- उत्तमोत्तम कवींना आदर्श मानणारा एक सर्वसामान्य वाचक, आस्वादक वैभवीराम किन्हीकर.


{शालेय जीवनात विडंबन म्हणून केलेल्या काही (च्या) काही कविता इथे.}

Wednesday, March 8, 2023

एका समृद्ध महाविद्यालयीन जीवनातल्या मजेमजेच्या आणि टारगटपणाच्या आठवणी

 मागे एकदा होळीच्या निमित्ताने महाविद्यालयीन जीवनात केलेल्या एका कवितेची आठवण मी आपल्यासमोर मांडली. 


आठवणींचे काय असते ? एक निघाली की की एकापाठोपाठ एक अशा अनंत निघतच जातात. सगळ्याच सुखद आणि रम्य आठवणी. 


मग आज या आठवणी या व्हिडीओ द्वारे आपल्यासमोर मांडण्याचा विचार मनात आला आणि तो पूर्णत्वास गेला.


- स्मरणरंजनात रमणारा प्रा. राम किन्हीकर.