आम्हा अभियांत्रिकी शिक्षकांना इतर विद्याशाखांमधील शिक्षकांसारखे शिक्षणशास्त्र स्नातक (B. Ed.) किंवा शिक्षणशास्त्र पारंगत (M. Ed.) या पदव्या मिळवण्याची अट नसते. तरीही आमच्यापैकी बहुतेक जण स्वतःला पूर्णपणे जोखूनच या क्षेत्रात आलेले असतात. आपल्याला इतरांना शिकवायला जमते ही भावना मनात पक्की झाली की आमच्यापैकी बहुतेक या क्षेत्रात स्वतःच्या आवडीनेच येतात. आणि एकदा शिक्षणक्षेत्रात आलेली ही मंडळी क्वचितच बाहेरच्या उद्योगक्षेत्रातल्या जास्त पगारांच्या प्रलोभनाला बळी पडून उद्योगक्षेत्राचा मार्ग निवडतात.
शिक्षणक्षेत्रात १४ वर्षे रमल्यावर २००९ मध्ये अचानकच Infosys आणि Indo - Us Collaboration for Engineering Education (IUCEE) यांच्या संयुक्त विद्यमाने Infosys च्या म्हैसूर कॅम्पस येथे तीन दिवसांचे एक शिबीर आयोजित केलेले होते. अमेरिकेतल्या North Carolina State University चे Dr. Richard Felder आणि Dr. Ribecca Grant हे जोडपे तिथे आम्हाला Effective Engineering Teaching शिकवायला येणार होते. अभियांत्रिकी क्षेत्रात "शिकवायचे कसे ?" हे शिकण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. म्हैसूरमधले या शिबीरातले ३ दिवस एक शिक्षक म्हणून मला खूप समृद्ध करणारे ठरले. आज इतक्या वर्षांनीही त्या दोघांनी वर्गात शिकवताना दिलेल्या टिप्स आणि त्यांच्या नोटस मी जपून ठेवलेल्या आहेत आणि दरवर्षी त्यांचे मनन, चिंतन करून त्यातली कुठली पद्धत यावर्षी मुलांना शिकवताना वापरता येईल याचे नियोजनही मी करीत असतोच.
आमच्या कुटुंबाची ती म्हैसूर सहल आणि त्यातल्या शिबीरबाह्य गमतीजमती हा एका निराळ्या आणि विस्तृत लेखाचा विषय आहे. पण त्या शिबीरानंतर एक शिक्षक म्हणून मी खूप बदललो, समृद्ध झालो हे माझे मलाच जाणवले.
त्यानंतर पुन्हा मध्ये १४ वर्षे गेलीत. २०२३ मध्ये IIT Madras च्या National Programme on Technology Enhanced Learning मधे Effective Engineering Teaching in Practice या चार आठवड्याच्या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली. दर आठवड्याला त्या त्या आठवड्यात शिकवलेल्या भागावर गृहपाठ सोडविणे आणि चार आठवड्याच्या अभ्यासक्रमानंतर तीन तासांची परीक्षा अशा दिव्यातून पार पाडून आम्ही त्यात प्रावीण्य (Elite Class) मिळवले. या प्रावीण्यापेक्षाही हा अभ्यासक्रम शिकताना जी मजा आली त्यात जास्त मजा आली. "Destination is important but the journey is to be enjoyed more." हे तत्व यावर्षी नव्याने अनुभवायला मिळाले.
- २८ वर्षे अध्यापन क्षेत्रात असूनही दररोज नवनवे शिकणारा एक जिज्ञासू विद्यार्थी, बालक राम प्रकाश किन्हीकर.