तव्यावरून पानात आलेली पोळी हा सगळ्यांना एकदम आवडणारा पदार्थ असला तरी तो एक खास वैदर्भिय / मराठवाडीय मालगुजारी सरंजामी मनोवृत्तीचा परिपाक आहे हे माझे आजवरचे निरीक्षण आहे. तव्यावरची पोळी सरळ पानात येताना खाणारा 'एकटाच नालोब्या' असेल तर ते अत्यंत सुखावह आहे पण चारपाच जणांना जोराची भूक लागलीय, हे सर्व जण पंक्तित वाट बघत बसलेयत आणि घरातली एकटीच गृहिणी दरवेळी तव्यावरच्या ताज्याताज्या पोळीचे चारपाच तुकडे करून सगळ्यांना वाढतेय, या उपद्व्यापात एकाचीही भूक पूर्ण भागत नाही आणि घरातल्या गृहिणीचाही पिट्टा पडतो तो निराळाच.
मग एकदोन पोळ्यांनंतर एकदोन समजूतदार मेंबर्स मग बाकीच्यांना वाॅक ओव्हर देतात. "होऊ द्या तुमचे निवांत. आम्ही थांबतो." असे म्हणत भुकेलेल्या पोटांनी हात वाळवत ताटावर बसून अक्षरशः ताटकळत राहतात. ही स्थिती आपल्या घरी आलेल्या एखाद्या अतिथी / अभ्यागतावर येणे हे यजमान म्हणून माझ्यासाठी तरी दुःखदायक असते.
त्यात महालक्ष्म्या आणि इतर महत्वाच्या कुळाचारांच्या साठीच्या स्वयंपाकात पुरणपोळीचा बेत असेल, यजमान असा मालगुजारी / सरंजामी थाटाचा असेल आणि वाढणार्या अनेक स्त्रियांमधली एक जरी गृहिणी फक्त "माझा नवरा आणि मुलगा" एवढ्याच ताटांकडे लक्ष देणारी व पंक्तिप्रपंच करणारी असेल तर मात्र पंक्तितल्या इतर अभ्यागतांवर अगदी अनवस्था प्रसंग गुदरतो आणि यजमानाला ओशाळवाणे व्हायला होते. पंगत पूर्ण होण्याचा कालावधी वाढतो तो निराळाच. या ओशाळवाण्या प्रसंगांचा दोनतीन वेळा अनुभव घेतल्यामुळे मी अधिकारवाणीने बोलतोय.
म्हणून "तव्यावरून पानात" ही संकल्पना कितीही गोड वगैरे असली तरी ती खाजगीत, एकास एक राबवण्याची पध्दत आहे. "एक किंवा दोन पुरेत" ही एकेकाळी कुटुंबनियोजनाच्या जाहिरातीची टॅगलाईन होती. ती टॅगलाईन "तव्यावरून पानात" या संकल्पनेसाठीही लागू पडते, ५ - १० लोकांच्या पंक्तिसाठी लागू पडत नाही हे माझे अनेक शोचनीय अनुभवांती बनलेले मत आहे.
श्रीक्षेत्र गाणगापूरला एकदा तिथल्या क्षेत्रोपाध्यांकडे प्रसाद भोजन करण्याचा योग आला होता. नेमके त्यादिवशी त्या उपाध्यांचा मंदिरातल्या प्रत्यक्षात गुरूमूर्तीच्या प्रसादसेवेचा दिवस होता. त्यादिवशी त्यांनी तिथल्या प्रथेविषयी जे सांगितले ते प्रत्येक गृहस्थाश्रमी माणसाने काळजावर कोरून ठेवण्यासारखे आहे.
ते म्हणालेत, " गुरूमहाराजांना पंक्तिप्रपंच अजिबात चालत नाही. गुरूमहाराजांच्या नैवेद्याच्या ताटात जितके पदार्थ असतील तितके सगळे पदार्थ, अगदी मीठ, लिंबू, कोशिंबिरींसकट, सगळ्या अतिथी / अभ्यागतांना वाढल्या जायला हवेत हा स्वतः गुरूमहाराजांचा दंडक आहे. त्यात चूक झालेली गुरूमहाराजांना चालत नाही."
आपणही या गोष्टीचा सूक्ष्मातून विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण भोजनाचे निमंत्रण देऊन आपल्या घरी आणलेला अभ्यागत असो किंवा तिथी न कळवता (पूर्वसूचना न देता) अचानक भोजनासाठी आलेला अतिथी असो, यांच्यासाठी पंक्तिप्रपंच टाळता येणे आपल्यासाठी कठीण असले तरी अशक्य नक्कीच नाही.
मग ही "तव्यातून पानात" संकल्पना कितीही आकर्षक वाटत असली तरी ती खाजगीत आचरण करून सार्वजनिक जीवनात याबाबतीत चांगले दंडक पाळण्याचा आपण निश्चय करून, अतिथी अभ्यागतांना तृप्त करून पाठवणे हे आपल्याला सहज शक्य आहे.
- "तव्यावरून पानात" या व्यर्थ अट्टाहासात फजित पावलेला एक यजमान आणि पंक्तिप्रपंचाचे अनेक कटू अनुभव आलेला एक अभ्यागत, राम.
No comments:
Post a Comment