स्वतःच्या सुखाने सुखावण्यापेक्षा, दुसर्याच्या सुखाने आपण दुखावले जायला लागलो की कलियुगाचे विष आपल्यात भिनत चालल्याचा तो पुरावा समजावा व सावध व्हावे.
२१ व्या शतकात सर्व भौतिक सुखसाधने उपलब्ध असताना आपण अशा मानसिक रोगांनी त्रस्त होणार असू तर "२१ व्या शतकात मानसिक आजार हाच सगळ्यात मोठा आजार ठरेल" हे WHO चे भाकित खरे ठरवायला आपण हातभार लावतोय हे लक्षात ठेवा.
पण माझ्याइतकी भौतिक सुखे त्याच्याजवळ तर नाहीत पण तरीही तो सुखी कसा ? हा प्रश्न जर तुम्हाला दुःखात टाकत असेल तर तुमची असूया ही असूयेच्या पातळीवर न राहता मनोविकृतीच्या पातळीवर चालली आहे हे निश्चित समजा. आणि जमेल तर सुधारण्याचा, त्या विकृतीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करा.
सुख हे बाहेर नसतंच मुळी. आपल्या अंतरंगात ते शोधावं लागतं. त्यासाठी स्वतःचा शोध घ्यावा लागतो. आणि माझ्यातला मी मला सापडला, त्याच्या आवडीनिवडी जाणल्यात, त्याच्याविषयी आपण सजग झालोत की लक्षात येईल की यासारखे दुसरे सुखच नाही. मग इतर जगाच्या सुखाने आपण दुःखी होणार नाही. कलीच्या तडाख्यात सापडणार नाही.
सुखी व्हा रे, सगळे खर्या अर्थाने सुखी व्हा आणि जगाला सुखी करा.
"सर्वेपि सुखिनः सन्तु" ही तर आपल्या संस्कृतीने जगाला दिलेली विश्वप्रार्थनाच आहे. तिचे मनन करा आणि खरोखर सुखी रहा.
- सुखी माणसाचा सदरा घालणारा आणि तो सगळ्यांना घालायला देण्यास तयार असलेला सुखी माणूस, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. सायंकालिन चिंतन (०९०९२०२४)
No comments:
Post a Comment