Saturday, September 14, 2024

ब्युफ़े: माझा कायमचाच एक पंगा

एकेकाळी लग्नात ५०० - ५०० पाहुण्यांच्या पंगती उठताना पाहिल्याने, क्वचित काही पंगतीत वाढायला मिळाल्यानेही आधुनिक प्रणालीतले ब्युफ़े जेवण मला अजिबात आवडत नाही. पंगतींबाबतचे माझे लेख आणि भूमिका या लेखांमध्ये मी यापूर्वीही मांडलेली आहे.


पण आजकाल ब्युफ़े हा प्रकार केवळ लग्न समारंभांपुरता मर्यादित न राहता तो गणपती - महालक्ष्म्यांचे जेवण यातही आलेला आहे. आजकाल तेरवी आणि श्राध्दांचे जेवणही ब्युफ़े व्हायला लागले हे पाहून हसावे की रडावे हेच कळेना. अरे ब्युफ़े म्हणजे स्वरूची भोजन. श्राध्दाचे, तेरवीचे जेवण करण्यात कुणाची बरे रूची असते ? फ़क्त ब्राह्मण - सवाष्ण पंगतीत (काही काही ठिकाणी ह्या पंगतीही खाली मांडी घालून वगैरे न बसवता चक्क डायनिंग टेबल वर बसवतात. खाली मांडी घालून ताटा - पाटावर बसणे केवळ वृद्धांनाच नव्हे तर चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेल्या तरूणांनाही कठीण होत चालल्याचे पाहून काळजी वाटते. 


शौच विसर्जनासाठी असलेली आपली पारंपारिक भारतीय पद्धती सोडून आपण सर्वत्र कमोड पद्धत स्वीकारल्याचे हे परिणाम. आपल्या भारतीय पद्धतीत शौचकुपातल्या, इतर मंडळी वापरत असलेल्या भागाला, आपल्या पावलांसारख्या थोड्या कठीण आणि सहजासहजी इन्फ़ेक्शन न होणा-या भागाचा स्पर्श होत असतो. पण कमोडमध्ये मात्र इतर मंडळींनी वापरलेल्या भागाशी आपल्या मांड्यांचा स्पर्श होत असतो. पावलांपेक्षा मांड्या नाजूक असतात. त्यांच्याद्वारे इतरांचा संसर्ग आपल्याकडे पावलांच्या स्पर्शापेक्षा जास्त जलद व सुलभ पसरू शकतो. मग आरोग्याला चांगले ते काय ? याचा विचार आपण करायलाच पाहिजे. आज पाश्चात्य जगत भारतीय पद्धतीच्या उकीडवे बसून शौचविसर्जन कसे करता येईल याचा विचार गांभीर्याने करत आहे आणि आपण मात्र अंधानुकरण करीत आपली पद्धत त्यागून ती अत्यंत अनारोग्यदायक पद्धत अवलंबिली आहे. या सवयींमुळे तिशी - चाळिशीतल्या आजच्या पिढीला खाली बसले तर सहजासहजी उठता येत नाही आणि उठलेत तर बसता येत नाही असे सत्तरी - ऐंशीतले म्हातारपण आलेले आहे.


हे विषयांतर झाले हे मला मान्य आहे पण विषय पूर्णपणे मांडण्यासाठी हे आनुषंगिक आहे हे सुद्धा तितकेच खरे आहे.


मी माझ्यापुरते तरी ब्युफ़ेत जेवण घेणे सोडलेले आहे. लग्न समारंभात मी फ़क्त अक्षता टाकून निघतो. लग्न समारंभाचे बहुतेक यजमान आपापल्या तालात असतात त्यामुळे तुम्ही जेवले की नाही याची फ़िकीर कुणालाच नसते. त्यातून कुणी यजमान दारावर असलेच आणि आपण बाहेर निघताना त्यांनी "काय जेवलात की नाही व्यवस्थित ?" असा प्रश्न विचारलाच तर "वा, पनीर छान होतं हं तुमच्याकडचं. कोण होतं कॅटरर ?" असा प्रश्न टाकून द्यावा. त्यामुळे यजमान खुश होतातच. महाराष्ट्रीय लग्नांमधे एकवेळ वधू किंवा वर नसला तरी चालेल पण पनीर बटर मसाला (किंवा तत्सम कुठलीही) डिश असलीच पाहिजे हा दंडक कुठल्या पुराणांमधून आलाय याचा मी शोध घेतोय.


लग्न समारंभांचे ठीक आहे पण आजकाल गणपती - महालक्ष्म्यांच्या जेवणातही ब्युफ़ेत जेवण्याची वेळ येते. अशावेळी आपण ब्युफ़ेत न जेवण्याची आपली तत्वे दाखवलीत तर "हा लेकाचा प्रसादाचा इन्कार करून देवाचा अपमान करतोय" अशी भावना यजमानांसकट इतर पाहुणे मंडळींची होते. वास्तविक प्रसादाचे, श्राद्धाचे जेवण असे ब्युफ़ेत मांडून आपण देवाचा, त्या दिवंगत व्यक्तीचा अपमान करतोय हे यजमानांनी लक्षात घेतले पाहिजे आणि प्रसाद असा उभ्या उभ्या, चालता चालता भक्षण करून आपण "उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म" या समर्थ उक्तीचा अवमान करतोय हे पाहुण्यांच्या लक्षात यायला हवे. पण आपल्यापेक्षा समोरचा माणूस जास्त दोषी ठरविण्याच्या आजकालच्या युगाला अनुसरून आपणच दोषी ठरतो.


बरे आपल्यासाठी एखाद्या यजमानांनी त्यांच्या गृहस्वामिनीला पंगतीत पान मांडण्याची विनंती केलीच तर मला एकदम "तुझे आहे तुजपाशी"त आचार्यांच्या तोंडी असलेले मोठ्ठे स्वगत आठवते.


" परवा एका घरी उतरलो असताना त्या घरात आतमध्ये चाललेला नवराबायकोचा संवाद कानी पड्ला. बायको नव-याला म्हणत होती ’त्याला हातसडीचाच तांदूळ खायचा असेल तर स्वतःसोबत बांधून आणत जा म्हणावं’ आजवर आमच्या या व्रतामुळे आम्ही किती मायमाऊल्यांचे शिव्याशाप घेतले असतील कुणास ठाऊक ?" 


आणि मी एकदम सावध होतो. आपल्या आचरणामुळे असा कुणाला त्रास होणार असेल तर नको बाबा, या विचाराने आजकाल मी गणपती महालक्ष्म्यांच्याही प्रसादाला जाणे टाळतो. संतांच्या घरचा प्रसाद अगदी मागून खाल्ला पाहिजे या संतवचनांवर विश्वास ठेऊन गुरूघरी, इतर संतपुरूषांकडे मात्र ब्युफ़े असला तरी प्रसाद आवर्जून घेतो पण सर्वसामान्य प्रापंचिकांच्या घरी मात्र नाही.


तसेही आजकाल "प्रसाद" म्हणावा अशी पाकसिद्धी, त्यामागची शुद्ध भावना आणि त्यासाठी वर्षभर लागणारे धार्मिक आचरण (पूर्वजांची श्राद्धे, पक्ष, पंचमहायज्ञ) सर्वत्रच लोप पावत चालले आहेत. केवळ कुळाचाराचा भंग होऊन देव कोपू नये या भावनेने सगळे धार्मिक कुळाचार केले जात आहेत. (सन्माननीय अपवाद वगळता) प्रेमाने, भावनेने एखादे कृत्य करून देवाचे सान्निध्य मिळवावे ही शुद्ध भावनाच लोप पावलेली आहे. मग अशा ठिकाणी गेले काय किंवा न गेले काय फ़रक पडत नाही ही भावना ठेऊन मी जाणे टाळतो.


- हा लेख ब-याच आप्त स्वकीय, सुहृद मंडळींना आवडणार नाही हे माहिती असूनही, "ब्युफ़े सोयीचा पडतो हो, ते वाढण्याचं काम कोण करत बसणार ?" वगैरे युक्तीवाद या लेखावर येणार हे माहिती असूनही 

"सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता" 

या श्रीतुकोबांच्या उक्तीवर विश्वास ठेऊन, समाज चुकीच्या गोष्टींकडे जात असेल तर त्यावर शाब्दिक का होईना, प्रहार करणारा  आणि असे ब-याच जणांशी पंगे घेणारा प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.




No comments:

Post a Comment