एक काळ होता. संध्याकाळची कातर वेळ खायला उठायची. घरापासून ११०० किलोमीटर दूर राहून शिक्षण घेणारा राम, नागपूरच्या आठवणींनी, घरी असलेल्या आईवडिलांच्या प्रेमळ ओढीने संध्याकाळच्या कातर वेळेस कासाविस व्हायचा. त्याच्यासारखेच त्याचे नाशिकचे, सांगलीचे, कोल्हापूरचे, जळगावचे, अमरावतीचे, अकोल्याचे मित्र सुध्दा तीच अवस्था अनुभवत असतील. कारण बोलून दाखवत नसले तरी ते सगळेच जण हाॅस्टेलच्या रूममध्ये संध्याकाळी रहात नसत. बाहेर पडून कराड शहरात एक फेरफटका मारून ती वेळ टाळण्याचा, मनाची कासाविस अवस्था सुसह्य करण्याचा आम्ही सगळेच प्रयत्न करत असू.
मग अशा कातर वेळी मारव्याचे सूर कानावर पडलेत तर ते नकोसे वाटत असत. आधीच हा राग बिचारा आईबाप नसलेला राग. आरोहात आणि अवरोहातही अत्यंत महत्वाच्याच सुरांचा आधार नसलेला हा राग तसाही मनाला कातर करतो. आईवडिलांपासून खूप दूर राहून शिकणार्या आम्ही, त्या काळच्या संध्याकाळी हा ऐकला असता तरी त्या सुरावटींमुळे आमचे कातर मन अधिकच कातर होऊन आमचे डोळे पाणावलेच असते.
आज आई वडिलांची जीवनातली सावली हरवली. वडिलांची तर माझ्या तारूण्यातच हरवली. त्यानंतर २५ वर्षांनी आईही अनंतात विलीन झाली. जीवन आता आता थोडे कळायला लागलेय असे वाटे वाटे पर्यंत जीवनाने हे धक्के दिलेत. आज गाडीने संध्याकाळी परतत असताना गाडीतल्या स्टिरीयोवर मारवा लागला.
आणि जाणवले की अरे, मारव्या सारखीच तर माझी स्वतःची अवस्था आज झालेली आहे. जीवनातले सगळे महत्वाचे आधार हरवलेले आहेत. स्वतःच्या तुटपुंज्या सुरावटींच्या जोरावरच आता स्वर्ग उभा करायचा आहे. काम कठीण आहे पण नेटाने झुंजून करायचेच आहे. आज मारवा जेवढा मनाला भिडला, समजला आणि आदर्शवत वाटला तेवढा यापूर्वी अनेकदा ऐकूनही वाटला नव्हता हे अंतर्मनाला जाणवले. एखादा राग मनाला भिडतो, भावतो तो असा.
आजकी पूरी शाम, राग मारवा के नाम.
No comments:
Post a Comment