तसा विचार केला तर मानवी जीवनात मृत्यू हेच एक अंतिम आणि संपूर्ण सत्य उरते. आपण आपल्या जन्मापासून इतर अनेक आपापली सत्ये "मृत्यू" या एकाच सत्याभोवती रचित जात असतो. कधी त्याच्या भीतीने तर कधी त्यामुळेच त्याला ताठपणे सामोरे कसे जावे ? याचा विचार करताना. आणखी खोल विचार करताना लक्षात येत की आपल्या आयुष्यातले इतर तीन पुरुषार्थ "धर्म, अर्थ आणि काम" हे सुध्दा आपण अखेरचा जो पुरुषार्थ "मोक्ष" कसा साधला जाईल याच्या विचारातच करीत असतो. मृत्यू म्हणजेच खरेतर मोक्ष नाही. या जगतातल्या सगळ्या सगळ्या भौतिक गोष्टींमधली आपले सगळे ममत्व संपले आणि आपण आपल्या जीवनासकट जगातल्या सगळ्या गोष्टींकडे साक्षीभावाने जगायला शिकलो की मोक्षच. याउलट जीवन संपून गेले तरी या जगातल्या भौतिक गोष्टींमधली आपली तृष्णा संपलीच नाही तर तो मोक्ष नव्हे. पण या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांनाच मृत्यूचे जवळून दर्शन झाल्यावरच जाणवतात हे ही तितकेच सत्य आहे. म्हणून सुरूवातीलाच प्रतिपादन केले की मृत्यू हेच आपल्या सगळ्यांच्या जीवनातले एक अंतिम सत्य असते आणि आपण सगळेच आपले संपूर्ण जीवन याच एका सत्याच्या जाणिवेत जगत असतो.
No comments:
Post a Comment