Showing posts with label चिंतन. Show all posts
Showing posts with label चिंतन. Show all posts

Friday, August 7, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ३८ जरासंधाचा पराभव आणि कालयवनाचा वध

भगवान श्रीकृष्णांनी कंसाचा वध केल्यानंतर कंसाच्या दोन्हीही पत्नी, अस्ति आणि प्राप्ती, सूडाने पेटून आपल्या पित्याकडे मगध राज्यात निघून गेल्यात. त्यांनी आपल्या पित्याला, जरासंधाला, श्रीकृष्णाचा प्रतिशोध घेण्याची विनंती केली. सूडाने पेटलेल्या जरासंधाने तेवीस अक्षोहिणी सेना गोळा केली आणि मथुरेवर तो चाल करून आला. मथुरेच्या बाहेर आलेली त्याची सेना म्हणजे एखाद्या समुद्राला उधाण आल्यासारखी मथुरेतल्या सगळ्यांना भासू लागली.


श्रीकृष्णांनी विचार केला. एकट्या जरासंधाला मारून टाकून काय फ़ायदा आहे. जगात इतरत्र सुद्ध आपल्या दैवी संस्कृतीचे शत्रू टपून बसलेले आहेत. त्या सगळ्यांनाच मला नष्ट करायचे आहे. त्या सगळ्यांना नष्ट करण्यासाठी त्यांचा शोध मला घ्यावा लागेल आणि त्यात माझी पुष्कळच शक्ती खर्च होईल. त्यापेक्षा जरासंधाच्या सैन्याचा नाश करावा आणि त्याला जिवंत सोडून द्यावा. म्हणजे सूडाने पेटलेला तो पुढच्या वेळी अधिकाधिक सैन्य गोळा करेल आणि पुन्हा युद्धासाठी माझ्यासमोर येईल. दरवेळी त्याचे सैन्य नष्ट करत गेलोत तर या भूमीवरील दुष्टांचा भार कमी होईल. जरासंध आपल्याला हा दुष्टांचा भार कमी करण्यासाठी दरवेळी मदतच करेल.


हा सुप्त हेतू मनात ठेऊन श्रीकृष्ण आणि बलरामांनी जरासंधाच्या सगळ्या सेनेचा नाश केला आणि विकल अवस्थेतल्या त्याला परत मगध देशात जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. सूडाने पेटलेल्या जरासंधाने पुन्हा एकदा दुष्टांची सेना गोळा केली आणि पुन्हा मथुरेवर स्वारी केली. यावेळीही श्रीकृष्ण आणि बलरामांनी त्याची सगळी सेना नष्ट करून पृथ्वीवरील दुष्टांचा भार आणखी थोडा हलका केला आणि जरासंधाला अपमानित करून हाकलून दिले. असे सतरा वेळेला घडले.



अठराव्या वेळी जरासंध पुन्हा चाल करून येणार असल्याची वार्ता कळताच श्रीकृष्ण आणि बलराम युद्धाला तयार झाले तेव्हढ्य़ात कालयवन नावाचा म्लेंछ राक्षस आपल्या तीन कोटी सैन्यासह मथुरेला वेढा घालणार असल्याची वार्ता श्रीकृष्णाला कळली. एकाच वेळी जरासंध आणि कालयवन यांच्याशी लढण्यात आपली भरपूर शक्ती खर्च होईल आणि मथुरेची बरीच हानी होईल हे त्याने ओळखले. आणि पश्चिम समुद्रात एका तटबंदीच्या आत एक नवीन अभेद्य नगरी वसविण्य़ाचे ठरविले. त्या कार्यात श्रीकृष्णाला स्वर्गातल्या देवादिकांचे खूप सहाय्य झाले. समुद्राकाठी भगवंताची अप्रतिम सुंदर आणि नगररचनेचा अत्यद्भूत आविष्कार असलेली द्वारका नगरी उभी राहिली. आपल्या कुटुंबियांना आणि काही नगरवासियांना द्वारकेला वसवून भगवान श्रीकृष्ण कालयवनाच्या वेढ्यातून मथुरेतून मागील द्वाराने हातात शस्त्र न घेता बाहेर पडले. मथुरेतल्या प्रजाजनांसाठी त्यांनी मथुरेत बलरामदादांना त्यांच्या रक्षणासाठी ठेवले.


आपल्या वेढ्यातून श्रीकृष्ण बाहेर पडून पळताहेत म्हटल्यावर कालयवनाला फ़ार राग आला. त्याने श्रीकृष्णाचा पाठलाग सुरू केला. त्यांना असे पळून जाण्याबद्दल तो वेडेवाकडे बोलू लागला. पण भगवंतांनी त्याच्याशी वाद घालण्यात वेळ न घालवता त्याने दिलेली "रणछोड्" ही पदवी बिरूदासारखी मिरवली. पळता पळता श्रीकृष्ण एका गुहेत शिरले. त्या अत्यंत प्राचीन गुहेत एक व्यक्ती फ़ार तपांपासून निद्रा घेत होती. श्रीकृष्णांनी आपला शेला त्या व्यक्तीच्या अंगावर पांघरूण म्हणून घातला आणि स्वतः आणखी खोल गुहेत लपलेत.


श्रीकृष्णांचा पाठलाग करीत आलेला कालयवन सुद्धा त्या गुहेत शिरला आणि श्रीकृष्णांचा शेला पांघरून निजलेली ती व्यक्ती पाहताच तो श्रीकृष्णच असला पाहिजे असा निश्चय करू कालयवनाने त्या व्यक्तीवर लत्त्ताप्रहार केला आणि त्या व्यक्तीला तिच्या अनंत वर्षांच्या निद्रेतून उठविले.


त्या व्यक्तीने आपल्या अनंत वर्षांच्या निद्रेतून अकारण जागे करणा-या त्या कालयवनाकडे बघितले आणि तिच्या दृष्टीक्षेपानेच कालयवन भस्म होऊन गेला. ती व्यक्ती म्हणजे मुचकुंद राजा होते. देवांचे सेनापती म्हणून बरीच वर्षे दानवांशी युद्धे लढल्यानंतर जेव्हा कार्तिकेयस्वामी देवांचे सेनापती बनलेत तेव्हा सर्व देवगणांनी मुचकुंदाचे आभार मानलेत आणि त्यांना वर मागायला सांगितले. तेव्हा मुचकुंदाने बराच काळ युद्ध करून फ़ार थकल्यामुळे निवांत विश्रांतीसाठी वर मागितला आणि या निद्रेतून जो कुणी मला जागे करेल त्याला एका दृष्टीक्षेपातच त्वरित भस्म करण्याची सिद्धी मागितली. त्या युद्धानंतर मुचकुंद गहन निद्रेत असताना कालयवनाने त्यांना जागे केले आणि तो भस्म झाला.


मुचकुंदाने गुहेत लपलेल्या भगवान श्रीकृष्णांना पाहिले. त्यांच्य अदभूत रूप बघितल्यानंतर तो अचंभित झाला आणि त्याने भगवंतांना त्यांचा परिचय विचारला. भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपला परिचय दिल्यानंतर त्याने भगवंतांची स्तुती केली आणि आपले पूर्वजन्मीचे कर्म आठवलेत. भगवान श्रीकृष्णांनी त्याला वारंवार वर मागण्यास सांगूनही त्याने फ़क्त भगवंतांच्या चरणांचा कायम आश्रय आपल्याला मिळावा हीच इच्छा त्यांच्यापुढे प्रगट केली. भगवंत त्याच्या ख-या भक्तीवर प्रसन्न झालेत आणि त्याला इच्छित वर त्यांनी दिला.



एकाचवेळी अनेक संकटे आलीत तर व्यापक प्रजाहिताचा विचार करून वरवर बघता माघार घेणे पण अंतिम विजयाचीच तयारी करणे हे या कथेतून भगवंतांनी आपल्याला शिकविले आहे. कालयवनाचा समोरासमोर कुणीही पराभव करू शकत नव्हते. त्याला युक्तीप्रयुक्तीने मारण्यासाठी स्वतः "रणछोड" हे लांछन सुद्धा भगवंतांनी बिरूदासारखे मिरविले. कालयवनासोबत वादविवाद घालत बसता, त्याला प्रत्युत्त्तरे देत न बसता बरोबर त्याचा वध केला आणि आपले कार्य साध्य केले. Goal Oriented Strategy म्हणजे आणखी काय असते ? हीच उदाहरणे, हाच आदर्श त्यानंतर ४५०० वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी आणि संताजी घोरपडे, धनाजी जाधवांसारख्या समस्त मराठी सेनानींनी बलाढ्य शत्रूशी लढताना गनिमी काव्याच्या रूपात वापरलेला आपल्याला आढळतो. म्हणूनच यासाठी आपले धर्मग्रंथ, आपली संस्कृती अभ्यासायचे असतात, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आजच्या काळात मी त्यांच्यापासून काय काय कालसुसंगत असे शिकू शकतो याचा विचार करायचा असतो.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण नवमी शके १९४८ दिनांक  ७ / ८ / २०२६


७ ऑगस्ट २०२६ 


Monday, October 28, 2024

मरणाचे स्मरण असावे...

तसा विचार केला तर मानवी जीवनात मृत्यू हेच एक अंतिम आणि संपूर्ण सत्य उरते. आपण आपल्या जन्मापासून इतर अनेक आपापली सत्ये "मृत्यू" या एकाच सत्याभोवती रचित जात असतो. कधी त्याच्या भीतीने तर कधी त्यामुळेच त्याला ताठपणे सामोरे कसे जावे ? याचा विचार करताना. आणखी खोल विचार करताना लक्षात येत की आपल्या आयुष्यातले इतर तीन पुरुषार्थ "धर्म, अर्थ आणि काम" हे सुध्दा आपण अखेरचा जो पुरुषार्थ "मोक्ष" कसा साधला जाईल याच्या विचारातच करीत असतो. मृत्यू म्हणजेच खरेतर मोक्ष नाही. या जगतातल्या सगळ्या सगळ्या भौतिक गोष्टींमधली आपले सगळे ममत्व संपले आणि आपण आपल्या जीवनासकट जगातल्या सगळ्या गोष्टींकडे साक्षीभावाने जगायला शिकलो की मोक्षच. याउलट जीवन संपून गेले तरी या जगातल्या भौतिक गोष्टींमधली आपली तृष्णा संपलीच नाही तर तो मोक्ष नव्हे. पण या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांनाच मृत्यूचे जवळून दर्शन झाल्यावरच जाणवतात हे ही तितकेच सत्य आहे. म्हणून सुरूवातीलाच प्रतिपादन केले की मृत्यू हेच आपल्या सगळ्यांच्या जीवनातले एक अंतिम सत्य असते आणि आपण सगळेच आपले संपूर्ण जीवन याच एका सत्याच्या जाणिवेत जगत असतो.

- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.