Wednesday, July 2, 2025

एखादी बस दिसल्यानंतरचे विचारांचे काहूर

 विश्राम बेडेकरांच्या "रणांगण" कादंबरीतले एक पात्र कुठल्याही वेळी नुसताच विविध रेल्वेगाड्या त्या त्या वेळी कुठे असतील असा विचार करीत असे. "आता दुपारचे ४ वाजलेत. म्हणजे मुंबई मेल आता नागपुरातून निघालेली असेल, हावडा मेल रायपूर स्टेशनातून हावड्याकडे रवाना झाली असेल..." वगैरे. "रणांगण" कादंबरी आम्हाला UPSC Civil Services च्या मुख्य परीक्षेत मराठी साहित्य या विषयाच्या अभ्यासात होती. "रणांगण" सोबतच मराठी साहित्यातले सौंदर्यशास्त्र नावाचा एक अत्यंत कुरूप विषय (ज्याची पुलंनी "भिंत पिवळी पडलीः एक सौंदर्यवाचक विधान या लेखात भरपूर खिल्ली उडविली होती.), अनेक विरोधाभासी आणि विनोदी विधानांनी भरलेला वि. ल. भावे कृत मराठी वाङमयाचा इतिहास (ज्याची पुलंनी "मराठी वाङमयाचा गाळीव इतिहास" लिहून येथेच्छ टर उडविली होती.) हे ही अभ्यासाला होते. या विषयांतले आता फारसे आठवत नसले तरी याच दोन विषयांनी मुख्य परीक्षेत आमचा त्रिफळा उडवल्याचे मात्र ठळक स्मरते. चुकीचे वैकल्पिक विषय घेतल्याने देश एका चांगल्या I. A. S. अधिकार्याला मुकला हे मात्र खरंय.


"रणांगण" मधल्या त्या पात्रासारखीच काहीशी सवय मलासुध्दा आहे. प्रवासात पुढून येणारी एखादी एस. टी. दिसल्यानंतर ही आपल्या प्रस्थान स्थानावरून किती वाजता निघालेली असली पाहिजे ? याचे हिशेब माझ्या मनातल्या मनात सुरू होतात.

आता हीच बस बघा. नागपूर जलद जळगाव. उन्हाळी जादा शेड्युल.




ही बस आम्हाला नांदुर्याला दिसली तेव्हा साधारण सकाळचे १०.४५ झाले होते. आम्ही नांदुर्याच्या हनुमंताचे दर्शन घेऊन खामगावकडे परतत होतो. आता ही बस सकाळी १०.४५ ला नांदुरा म्हणजे नागपूरवरून किती वाजता निघालेली असली पाहिजे ? याचे calculations माझ्या डोक्यात लगेच सुरू झालेत. कितीही चांगला रस्ता मिळाला तरी नागपूर ते अकोला प्रवासाला कमीतकमी ५ तास, अकोला ते खामगाव या प्रवासाला कमीतकमी १ तास आणि खामगाव ते नांदुरा अर्धा तास प्रवासाला धरले तरीही ही गाडी नागपूरवरून पहाटे ४.०० ला निघालेली असली पाहिजे. म्हणजे अगदी पहाटपक्षी बसच. (लिंक इथे) नेहमी नागपूरवरून अमरावतीकडे जाणारी पहिली पहाटपक्षी बस म्हणजे पहाटे ५ ची नागपूर - इंदूर बस. ही बस त्या बसआधी एक तास ? अशा अडनिड्या वेळेला नागपूरवरून या बसला किती प्रवासी मिळत असतील ? अनेक प्रश्न मनात रूंजी घालत सुटतात. अगदी "रणांगण" च्या त्या पात्रासारखेच.

नागपूर उन्हाळी जादा जळगाव

मार्गे कोंढाळी - कारंजा (घाडगे) - तळेगाव - तिवसा - गुरूकुंज मोझरी - अमरावती - बडनेरा - मूर्तिजापूर - अकोला - बाळापूर - खामगाव - नांदुरा - मलकापूर - मुक्ताईनगर - दीपनगर - भुसावळ.

MH - 14 / LX 9813

Ashok Leyland Comet Vishwa model

BS VI

Built by Ashok Leyland, Vijaywada plant.

२ बाय २ आसनव्यवस्था. एकूण ४१ आसने.

ज. जळगाव आगार

स्थळः नांदुरा
दिनांकः १४/६/२०२५
वेळः सकाळी १०.४५ वाजता

- एक बस पाहिली की अनेक विचारांचे, calculations चे काहूर मनात येणारा बसफॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

4 comments:

  1. मीना भालेरावJuly 2, 2025 at 10:57 PM

    अप्रतिम चित्र उभं केलंत ! रणांगणातील हॅर्टाचं दुःख एकदम हलकं केल्यासारखं वाटलं. लालपरी हे नावंच इतकं लोभसवाणे आहे न की प्रेमच वाटतं मनभरून ! खूपच छान अनुभव दिलात!

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक आभार, ताई

      Delete
  2. संख्या आणि आकडे यांनी माझ्या डोक्यात विचार चाळीत होतात. गाडी दिसली की तिच्या नंबरचा मुल अंक काढतो. जुने कॅलेंडर दिसले तर त्या वर्षी तेव्हा आपण कुठे होतो याचा विचार येतो. जिने चढताना पत्र्यांचीय संख्या मोजतो. बहुतेक जिने विषम पायर्या वाले निघतात. सगळ्यात मजा वाटते की काही ठिकाणी दोन मजले जोडणारे दोन जिने पायऱ्यांची संख्या वेगळी असते. प्रत्येकास मेंदू ला वेगळा ट्रिगर असावा. सहज डोक्यात आले म्हणून लिहिले

    ReplyDelete
  3. अगदी हेच माझ्या बरोबर होते. कुठल्याही गाडीच्या चार अंकी नंबरांची बेरीज क्षणार्धात करणे, एखादे गाणे ऐकताना त्याच्यातल्या चालीला तसेच ठेवून शब्द उलटपालट करून पाहणे.

    पण या ॲक्टीव्हिटीज मेंदूला अत्यंत ताज्यातवान्या ठेवतात असा अभ्यास मानसशास्त्रज्ञांनी केलेला आहे. त्यामुळे या ॲक्टीव्हिटीज सतत माझ्याही मेंदूत सुरू असतात.

    ReplyDelete