Showing posts with label MSRTC Fans. Show all posts
Showing posts with label MSRTC Fans. Show all posts

Thursday, August 6, 2026

सांगोल्यातले नागपूरकर

२०१२ च्या ऑगस्ट महिन्यात सांगोला जिल्हा सोलापूर इथे प्राध्यापकी करायला गेलो आणि सवयीनुसार आठवडाभरातच तिथल्या बसस्टॅण्डवर एक चक्कर झालीच. पश्चिम महाराष्ट्रातल्या काहीकाही डेपोंना मध्यवर्ती कार्यशाळा नागपूरने बांधलेल्या टाटा बसेस फ़ार मोठ्या प्रमाणात मिळालेल्या आहेत. सहजी नागपूर कार्यशाळेने बांधलेल्या बसेस विदर्भाच्या डेपोंच्या मागणीतच संपतात. विदर्भातल्या काही काही डेपोंच्या पूर्ततेसाठी दापोडी कार्यशाळेने किंवा चिकलठाणा (छत्रपती संभाजीनगर) कार्यशाळेने बांधलेल्या बसेस मागवाव्या लागतात पण पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातल्या काही डेपोंना मात्र नागपूर कार्यशाळेच्या टाटा बसेस सातत्याने मिळतात. सांगोला डेपो हा त्यातलाच एक.



ही बस जुनी आहे. मी फ़ोटो काढला तेव्हा या बसचे आयुष्य साधारण १० वर्षांचे असेल. तरीही पण सांगोला आगारातल्या कार्यशाळेने किंवा सोलापूर विभागीय कार्यशाळेने या बसला जागोजागी जी डागडुजी केलेली होती त्यावरून ही बस आहे त्यापेक्षा अधिक म्हातारी भासत होती. आपल्या महाराष्ट्रात बसेसचा ताफ़ा साधारण १२ वर्षांच्या त्यांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त केला जातो. त्याप्रमाणे ही बस पुढल्या १ - २ वर्षात सेवेतून निवृत्त होणार होतीच पण एकेकाळी देखण्या असलेल्या या बसचे हे रूपडे मनावर आघात करून जात होते हे मात्र निश्चित.


MH 40 / 9709


TATA 1510 Cummins


BS II


मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर येथे बांधलेली टाटा बस.


सो. सांगोला आगार. 


सांगोला आगार, सोलापूर विभाग


- प्रत्येक एस. टी. बसला आणि रेल्वेला मानवी रूपात बघणारा आणि त्यांच्या प्रगाढ प्रेमात असणारा, बस आणि रेल्वे फ़ॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Tuesday, June 23, 2026

आठवणीतल्या एस. टी. - साधी दिसली तरी अगदी स्पेशल असणारी आपली एस. टी.

१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत आपल्या महाराष्ट्र एस. टी. ला लाल रंगासोबत पिवळ्या रंगाचा असा गोलाकार वाढत जाणारा आणि बसच्या चाकांवर संपणारा पट्टा असायचा. या प्रकाशचित्रातला बसला जसा पांढरा पट्टा आहे ना तसाच पण पिवळ्या रंगातला. १९९० च्या दशकात आपल्या एस. टी. ने पुन्हा आपल्या काही बसेसवर तसाच प्रयोग करून बघितला होता पण तो अल्पजिवी ठरला होता.






या बसचे वैशिष्ट्य म्हणजे ही बस १९७० च्या दशकातली आहे. खरेतर हे प्रकाशचित्र घेतले तेव्हा या बसचे वय ४६ वर्षे होते. आणि इतकी वर्षे एखादी बस सेवेत ठेवत नाहीत. पण ह्या बसमध्ये वेळोवेळी बदल करून करून तिच्या एंजिनामध्ये वारंवार मॉडिफ़िकेशन करून ही बस आपल्या एस. टी. ने वापरात ठेवलेली आहे. खरेतर ही बस TATA 1210 D मॉडेलची. या मॉडेलचे समोरचे काऊल असे असायचे. 

टाटा 1210 D मॉडेलचे समोरचे काऊल

मूळ  टाटा 1210 D मॉडेलला टाटा 1210 E मॉडेलचे काऊल लावलेली बस.


पण एस. टी. ने त्या काऊलमध्ये बदल करून तिला TATA 1210 E मॉडेलचे काऊल बसविलेले होते. ड्रायव्हर साहेबांसमोरची विंडशिल्ड सुद्धा बदलून नव्या प्रकारची लावलेली होती. 


आधुनिक बांधणीच्या बसेसनुसार एस. टी. ने या बसला टपावर दोन्ही बाजूला छोटे लाईटस दिलेले होते. अर्थात मूळ गाडीला असे लाईटस असणे शक्यच नव्हते. तेव्हा ती पद्धतच नव्हती. 


पण या गाडीचे मूळ टेल लाईटस मात्र तसेच्या तसेच ठेवलेले होते. इतक्या बदलांमध्ये तेव्हढीच आपली मूळ गाडीची आठवण कारण TATA 1210 D  आणि सुरूवातीच्या काळातल्या TATA 1210 E मॉडेल्सना छोटेसेच टेल लाईटस असायचेत.









मोठ्ठे, धब्बाडे टेल लाईटस साधारण १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात बसेसमध्ये आलेत. तोवर असे छोटेसेच टेल लाईटस. त्या जुन्या टेल लाईटसमध्ये टेल लाईट, ब्रेक लाईट आणि इंडिकेटर लाईट असायचेत. आजच्यासारखे रिव्हर्स मूव्हमेंट लाईटस नसायचेत. तितकी वाहतूक नव्हती त्यामुळे तशी तितकीशी गरज भासत नसेल. यातल्या इंडिकेटर लाईटसचा तरी किती वापर त्याकाळी होत असेल याबद्दल मला शंकाच आहे. वळायचे असले तर ड्रायव्हर साहेब आपला हात खिडकीबाहेर काढून तसा इशारा करायचेत किंवा त्यांच्या बाजूला एक लोखंडी इंडिकेटर आर्म असायचा. तो तसा इंडिकेटर आर्म मी १९९० च्या दशकात मुंबईत बेस्ट बसेसमध्ये बघितलेला आहे.


माझ्या माहितीप्रमाणे ही बस मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी इथे बांधल्या गेलेली होती. हिची प्रवासी सेवा वर्षे संपल्यानंतर  मग मध्यवर्ती कार्यशाळा नागपूरने या बसमध्ये बरेच बदल केलेत. दापोडीवाले आपल्या बसेसना पुढच्या बाजूला एक वैशिष्ट्यपूर्ण गोलाकार असा डोम द्यायचेत. त्या डोममध्ये बसचा मार्गफ़लक असायचा. चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर कार्यशाळा ही दापोडीनंतर सुरू झाली पण त्यांनी दापोडीवाल्यांच्या डोम आकाराऐवजी समोर चपटा आकार द्यायला सुरूवात केली आणि नागपूरच्या कार्यशाळेने दापोडीचा कित्ता गिरवण्याऐवजी चिकलठाणा वाल्यांचाच कित्ता गिरवीत चपट्या आकाराचे दर्शनी भाग आपापल्या गाड्यांना द्यायला सुरूवात केली होती.


ही बस एस. टी. ने आपल्या विभागीय कार्यांसाठी विशेष तयार करून जपलेली होती. आणि म्हणूनच साधी दिसत असली तरी ही बस अगदी खास, अगदी विशेष होती. 

 


MHO 5483 


TATA 1210 D


मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी ने बांधलेली साधी बस. मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर येथे पुनर्बांधणी झालेली बस.


नागपूर विभागीय कार्यशाळेच्या तैनातीत असलेली मालवाहक बस.


@ खडकी हनुमान मंदीर


११/ ६ / २०१६. 


Wednesday, June 17, 2026

"त्रिज" बस.

दोनवेळा जन्म झालेल्या माणसाला "द्विज" असे म्हणतात. मौंजीबंधनाचा संस्कार एखाद्या बालकावर झाल्यानंतर तो पूर्वीचे अवखळ बाल्य त्यागून विद्यार्थीदशेतल्या गांभीर्यपूर्ण आणि विद्वत्तेच्या जगात नवा जन्म घेतो म्हणून मौंजीबंधनानंतर तो "द्विज."

आजकालच्या युगात ही संज्ञा लागू नाही. मौंजीबंधनानंतर गायत्रीची धड एक माळसुध्दा न करणार्‍यांना "द्विज" म्हणून संबोधायला जीभ रेटत नाही. मुळात मौंजीबंधन हा एक "संस्कार" आहे हेच आपण विसरलोय. आपण सार्‍यांनीच तो एक समारंभ करून टाकलाय.


याला काही सन्माननीय अपवाद आहेत. बहुतांशी महाराष्ट्राबाहेरच. इंदूरला याच महिन्यात दरवर्षी एक अत्यंत आगळावेगळा आणि अत्यंत समाजोपयोगी असा साधा आणि नेटका समारंभ तिथली मराठी मंडळी करीत असतात, महाराष्ट्रात असे एकटे दुकटे प्रयत्न होत असतात. पण आजकालच्या जगात एकूणच "द्विज" विरळा.

मुद्दा तो नाहीच. दोनवेळा जन्म झालेला "द्विज" मग तीनवेळा जन्म झालेल्या आमच्या या एस टी ला "त्रिज" का म्हणू नये ? हा सवाल आहे

.


साधारण १२ - १३ वर्षांपूर्वी आपल्या एस टी ने आपल्या ताफ्यातल्या निम आराम "हिरकणी" बसेस बाहेरून रेडिमेड बांधून घेण्याचा निर्णय घेतला होता. गोव्याचे ए.सी.जी.एल. (Automobile Corporation of Goa Limited) आणि पनवेलच्या अॅण्टोनी गॅरेज इथे या निम आराम बसेस बांधल्या गेल्यात.


गोव्यात बांधलेल्या बसेस आपल्या एस टी ने सिंधुदुर्ग विभागात (MH -07/ C 7XXX आणि MH 07 / C 9XXX) अशा सिरिजमध्ये पासिंग केल्यात तर अॅण्टोनी गॅरेजमध्ये बांधलेल्या बसेस रायगडच्या (MH 06 / S 8XXX) सिरीजमध्ये पासिंग केल्यात.


हा या बसचा पहिला जन्म.

  

निम आराम म्हणून ५ - ६ वर्षे सेवा दिल्यानंतर एस टी च्या नियमानुसार या बसचे रूपांतर साध्या परिवर्तन बसमध्ये झाले. एस टी च्या विभागीय कार्यशाळांनी किंवा क्वचितप्रसंगी मध्यवर्ती कार्यशाळांनी या निम आराम बसचे रूपांतर साध्या परिवर्तन बसमध्ये केले. हा या बसचा दुसरा जन्म.


मधल्या काळात एस टी ने आपला सगळा ताफा अॅल्युमिनीयम मध्ये न बांधता पोलादामध्ये (Mild Steel) बांधण्याचे ठरवले, तेव्हा मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर ने या बसचे रूपांतर पोलादी बसमध्ये केले. हा या बसचा तिसरा जन्म.

म्हणून ही बस "त्रिज" झाली की नाही ? बिचारी आता आपल्या आयुष्याचे अखेरचे उरलेले काही महिने मोजतेय आणि अजूनही प्रवाशांच्या सेवेत तत्पर आहे.


MH 06 / S 8085

TATA 1510 Cummins.

BS III

Originally built by Antony Garage Panvel.

Re body built by मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर.

समुद्रपूर साधारण सेवा वर्धा.

 (मार्गे तरोडा - सेवाग्राम)

२ X २ परिवर्तन बस.

एकूण आसने ४४.

व. वर्धा आगार

वर्धा आगार, वर्धा विभाग


- बसेसना माणसांसारखेच समजून त्यांच्याबाबत व्युत्पत्ती सुचणारा एक बसप्रेमी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर

Monday, June 1, 2026

आठवणीतल्या एस. टी. - एक साधीशीच आपली एस. टी.

आजवर मी इथे आणि अनेक समाजमाध्यमांवर माझ्या लाडक्या एस. टी. बसेसचे अनेक वैशिष्ट्यपूर्ण फ़ोटो टाकलेत. पण ह्या एका साध्या एस. टी. बसचा फ़ोटो फ़क्त एकदाच आणि एकाच समाज माध्यमावर टाकला. मला एकदम पुलंच्या असा मी असामी मधले त्या बेंबट्या जोश्याचे दिगंबर काकाच आठवले.


"की राजहंसाचे चालणे, जगी झालीया शहाणे

म्हणूनी काय कवणे, चालूची नये ?"


ही ज्ञानदेवांची ओवी आपल्या कीर्तनात सांगणारे ते दिगंबर काका. त्याच धर्तीवर मला आज जाणवले की खूप सुंदर सुंदर आणि एकेक वैशिष्ट्यपूर्ण बसेसचे फ़ोटो मी आजवर टाकले हे जरी खरे असले तरी कधीकधी एखाद्या साध्याच बसचा फ़ोटो सुद्धा टाकला पाहिजे आणि तिच्यावर काही लिहीले गेले पाहिजे.



आणि २००८ साली काढलेल्या या फ़ोटोला आज अगदी ॲंटिक व्हॅल्यु आहे. साधारण १९९३ - १९९४ च्या आसपास आपल्या एस. टी. चे प्रवासी चढ उतार करण्याचे दार एस. टी. च्या मागल्या बाजूकडून पुढल्या बाजूला आले. आणि मला आठवतय़ आपल्या एस. टी. च्या मध्यवर्ती कार्यशाळा नागपूरने बांधलेल्या MH -31 / W 9251 या बसपासून बसच्या खिडक्यांचाही पॅटर्न बदलला. त्यापूर्वी जवळपास ४० वर्षांपासून चालत आलेला वरखाली होणारा खिडक्यांचा पॅटर्न जाऊन आता पुढे मागे होणा-या सरकत्या खिडक्यांचा पॅटर्न आलेला होता. 


तशीच ही आपली एक साधी बस. नागपूर जलद हिंगणघाट. बसच्या मार्गफ़लकावर फ़क्त "हिंगणघाट" असेच जरी लिहीलेले असले तरी ती नागपूर जलद हिंगणघाट बस आहे हे आम्हा बसप्रेमी मंडळींना चांगलेच ठाऊक असायचे. काहीकाही डेपो मॅनेजर्स लोकांना असा मार्गफ़लकाचा पॅटर्न मध्येच बदलावा वाटे आणि तसा ते बदलत असत. पूर्ण मार्गफ़लक लिहीण्यापेक्षा फ़क्त गंतव्यस्थानाचाच उल्लेख त्या मार्गफ़लकावर मोठ्या अक्षरांमध्ये केलेला असे. त्यातलाच हा मार्गफ़लक.


वर्धा विभागातल्या हिंगणघाट डेपोची ही बस. वर्धा विभागाचे तत्कालीन व्यवच्छेदक लक्षण म्हणजे बसच्या काळ्या ग्रीलला पिवळी बॉर्डर. भंडारा विभागातल्या बसेसना ही बॉर्डर पांढ-या रंगातली असायची. चंद्रपूर विभागातल्या बसेसचे हे ग्रील्स हिरव्या रंगातले असायचेत तर यवतमाळ विभाग हे ग्रील्स आकाशी निळ्या रंगाने रंगवायचा. दूरवरूनच बस ओळखू यायची.


या बसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चालक केबिनवर असलेल्या टपाला लावलेला प्रेशर हॉर्नचा भोपू. त्याकाळी टाटा किंवा लेलॅण्ड कंपन्यांनी त्यांच्या बसेससोबत दिलेले मूळ हॉर्नस थोड्याच दिवसात निकामी व्हायचेत. (किंवा केले जायचेत) मग त्यांना सगळ्यांना ते साधे पोंगे मिळत असत. फ़ार थोड्या आणि अगदी स्पेशल बसेसना प्रेशर हॉर्नस असायचेत. किंबहुना प्रेशर हॉर्न बसला असणे हे म्हणजे ती बस त्या डेपोची अगदी लाडकी बस असल्याचे लक्षण होते. 


ही बस सुद्धा सुरूवातीला हिंगणघाट डेपोत आली तेव्हा पहिले काही महिने त्या डेपोच्या प्रतिष्ठित मार्गावर (हिंगणघाट जलद शेगाव) धावली असेल. म्हणून तिला असा प्रेशर हॉर्न मिळाला असेल. काहीकाही डेपोंची आपल्या डेपोंना आलेल्या नव्या गाड्या एका विशिष्ट मार्गावरच पाठवण्याची रीत असते. चंद्रपूर डेपोच्या नवीन बसेस कायम चंद्रपूर जलद शिर्डी, चंद्रपूर सुपर नागपूर किंवा चंद्रपूर जलद शेगाव मार्गावर पाठवल्या जायच्यात. सावनेर, चांदूरबाजार, परतवाडा, मोर्शी या आणि अशा अनेक डेपोंची ही अशीच त-हा. तुमच्या आसपास असलेल्या डेपोंची अशी काही व्यवस्था असेल तर नक्की कळवा.


तर अशी ही त्याकाळी अगदी साधी आणि आता एक ॲंटिक व्हॅल्यु प्राप्त झालेली साधीसुधी बस.


MH - 31 / AP 9687 (चार सलग अंक उलटसुलट क्रमाने या आकड्यात आहेत. हे या बसचे आणखी एक वैशिष्ट्य.)


TATA 1512 Cummins


मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर ने बांधलेली साधी बस.


3 x 2 आसनव्यवस्था. एकूण ५४ आसने. 


नागपूर जलद हिंगणघाट (मार्गे बुटीबोरी - जांब)


हिंगणघाट आगार, वर्धा विभाग.


एकूण अंतर ७५ किलोमीटर्स.



@ जांब बस स्थानक


१८ / ५ / २००८. सकाळी ९.३० वाजता.


Friday, May 29, 2026

आठवणीतल्या एस. टी. - परभणी डेपोची लालपरी: एका राहून गेलेल्या प्रवासाची खंत.

खरेतर नागपूर - परभणी हा मार्ग आम्ही आमच्या बालपणापासून बघत आलेलो आहोत. परभणी ते नागपूर असा दिवसभर प्रवास करून रात्री नागपूर बसस्थानकावर आराम करणारी ही बस. सकाळी पुन्हा ८.१५ ला नागपूरवरून परतीसाठी निघते. हा मार्ग आणि तिचे हे वेळापत्रक फ़ार जुने आहे. 


नागपूर आणि पुणे विभाग हे टाटा बसेसचे माहेरघर तर कोकण, खान्देश आणि मराठवाडा विभाग हे लेलॅण्ड बसेसचे माहेर हे समीकरण फ़ार जुने आहे. टाटा बसेस या मैदानी प्रदेशात पळायला उत्तम असतात तर लेलॅण्ड बसेस म्हणजे घाटांच्या राण्या अशी समजूत होती. त्याकाळी या कंपन्यांच्या वेगवेगळ्या एंजिनांची ताकद, त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे कदाचित हे समीकरण बरोबर असेलही. पण आता गेल्या काही वर्षात समान उत्सर्जन मानके (Uniform Emission Standards) आणि एकूणच जागतिकीकरणाच्या रेट्यात टाटा आणि अशोक लेलॅण्ड या दोन्हीही गाड्या जवळपास सारख्याच ताकदीच्या आणि दर्जाच्या झालेल्या आहेत त्यामुळे आता आता हे गृहीतक थोडे विस्कटलेले आहे. अशोक लेलॅण्ड ने विजयवाडा येथे बांधलेल्या नवीन "लालपरी" बसेस आता महाराष्ट्राच्या सर्वच विभागात दिसतात. तसेच टाटा बसेस सुद्धा मराठवाड्यात आणि कोकणात सर्वच डेपोंमध्ये यायला लागलेल्या आहेत. 


आमच्या बालपणी आमच्या मावशीच्या गावी, यवतमाळला, उन्हाळ्याच्या सुटीत, दिवाळीच्या सुटीत जायचे असले की आम्हाला या लेलॅण्ड बसेसने जावेसे वाटे. नागपूर बस स्थानकावर लेलॅण्ड बसेस दिसण्याचे प्रसंग विरळा. छत्रपती संभाजीनगर आगाराची आणि  छत्रपती संभाजीनगर वरून आलेली छत्रपती संभाजीनगर - नागपूर ही निम आराम (एशियाड) बस फ़ार थोडा वेळ नागपूर बस स्थानकावर दिसत असे. कारण सकाळी ९.०० च्या सुमारास नागपूरला आलेली ही बस फ़ार वेळ इथे न रमता लगेच सकाळी ९.३० वाजता आपल्या परतीच्या प्रवासाला निघत असे. हिचे दर्शन नागपूरला फ़क्त अर्धा ते पाऊण तास होत असे.


नागपूरला त्याकाळी दिसणारी दुसरी लेलॅण्ड गाडी म्हणजे किनवट आगाराची किनवट - नागपूर ही बस. ही बस दुपारी १ ते  १.३० च्या सुमाराला नागपूरला येत असे आणि दुपारची वामकुक्षी आटोपून संध्याकाळी ४.३० ला आपल्या परतीच्या प्रवासाला निघत असे. आज जवळपास ४० - ४५ वर्षांनी सुद्धा या बसचे हेच वेळापत्रक कायम आहे. वर्धा - यवतमाळ - आर्णी - माहूर मार्गे जाणा-या या बसने आम्ही फ़क्त एकदाच नागपूर ते यवतमाळ हा प्रवास केलेला होता. या गंमतीदार कौटुंबिक प्रवासाची चित्तरकथा मी लवकरच इथे लिहीन. पण लेलॅण्डच्या बसेसने प्रवास करण्याचे प्रसंग आम्हा वैदर्भिय मुलांच्या आयुष्यात एकूण विरळा. 



परभणी आगाराचा क्रू ही बस घेऊन नागपूरला येतो. रात्री ही बस आणि तिच्यासोबत आलेला क्रू नागपूरला मुक्काम करतो. क्रू बहुधा बसमध्येच पथारी टाकून झोपलेला आम्ही बघितलेला आहे. चालक केबिनच्या मागे प्रवासाच्या विरूद्ध दिशेला तोंड असलेला जो लांब बाक असायचा त्याला एक साखळी असायची. रेल्वेतल्या मिडल बर्थसारखी ती साखळी ओढून पाठ टेकवण्याचे कुशन बर्थसारखे खिडकीला बांधता येत असे. हा एक बर्थ आणि प्रवासी बसायला असलेला लांबलचक पण एक फ़िक्स्ड बर्थ. म्हणजे चालक आणि वाहक यांच्यासाठी बसमध्ये झोपायला दोन बर्थस तयार होत असत. अशा प्रकारे लांब पल्ल्याच्या गाड्यांसोबत गेलेला क्रू आपला आराम बसमध्येच करताना आम्ही ब-याच उदाहरणांमधून बघितलेले आहे. गोंदिया सुपर चंद्रपूर गाडीचा गोंदिया डेपोचा क्रू संध्याकाळी चंद्रपूरला पोहोचल्यानंतर दुस-या दिवशी सकाळी ८.१५ पर्यंत अशाच पद्धतीने बसमध्ये आराम करताना चंद्रपूर बसस्थानकावर आम्ही नेहेमीच बघत असू.


या बसने नागपूर ते यवतमाळ प्रवास करण्याचे आमचे स्वप्न अजूनही स्वप्नच राहिलेले आहे. आज मावशी आणि तिचे यजमान यवतमाळला नाहीत, त्यांचे घरही नाही, किंबहुना मावशी आणि तिचे यजमान आज या जगातच नाहीत. मग यवतमाळला त्या बालपणच्या ओढीने कुणाकडे जाणार ? या बसने आमचा प्रवास हुकला तो हुकलाच. 


पण आजही ही बस याच वेळाप्रत्रकावर नागपूर ते परभणी हा प्रवास करते आहे हे मला माझ्या घर ते महाविद्यालय या रोजच्या प्रवासात दिसते. परभणी डेपो गेली १० वर्षे तरी या मार्गावर आपली भंगार बस पाठवतो आहे ही माझी या डेपोकडे तक्रार आहे. अरे इतक्या दूरच्या पल्ल्यावर आपली चांगली बस द्यायची ना ! हे प्रकाशचित्र काढले तेव्हा ही बस त्याकाळी ब-यापैकी नवी म्हणूनच गणली जायची. 



MH - 20 / D गॅंगमधला हा आणखी एक मेंबर. आपल्या महाराष्ट्र एस. टी. त MH - 20 / D गॅंग प्रसिद्ध आहे. कारण MH - 20 / D 0001 ते MH - 20 / D 9999 पर्यंत सगळे नंबर्स फ़क्त आपल्या महाराष्ट्र एस. टी. लाच मिळालेले आहेत. असे उदाहरण कुठेही नाही. 


परभणी विभागाची एकदम साधी अशी स्टाईल. ग्रीलला कुठलाही विशेष रंग नाही, समोरच्या बंपरला, खिडक्यांना विशेष असा कुठलाही रंग नाही. साधी सरळ "ठेविले अनंते तैसेची रहावे" ही वृत्ती. त्यामुळे चिकलठाणा कार्यशाळेने ज्या अवस्थेत बस दिली त्याच अवस्थेतली ही बस. याच्या बाजूला उभी असलेली टाटा बस म्हणजे त्याकाळी झालेल्या नाशिक कुंभमेळ्यासाठी आपल्या दापोडी कार्यशाळेने बांधलेली विशेष कुंभमेळा रंगसंगतीची (पांढरा आणि आकाशी) बस.


नागपूर बस स्थानक


१८ / ५ / २००८. सकाळी ८.०० वाजता.


Tuesday, May 26, 2026

आठवणीतल्या एस. टी. - कोच शेअरींग करणारी बस.

एक एस. टी. प्रेमी म्हणून बसेसवर माझे नितांत प्रेम आहे, अगदी बालपणापासूनच. त्यामानाने हातात कॅमेरा आयुष्यात बराच उशीरा आला. पण आल्यानंतर माझ्या लाडक्या एस. टी. ची जी जी प्रकाशचित्रे मी काढून ठेवलेली आहेत ती इतक्या वर्षांनंतर आज एक अनमोल ठेवा बनून राहिलेली आहेत.


अशीच एक एस. टी. आपल्या भारतीय रेल्वेत रेक शेअरींग हा प्रकार प्रचलित आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, सह्याद्री एक्सप्रेस आणि सेवाग्राम एक्सप्रेस या एकमेकींचे रेक्स वापरायच्यात. तसेच गोवा एक्सप्रेस आणि दक्षिण एक्सप्रेस या सुद्धा एकमेकींचे रेक्स वापरायच्यात. तसाच बसचे कोच शेअरींगचा प्रयोग आपल्या महाराष्ट्र एस. टी. ने साधारण २००६ ते २००८ मध्ये केल्याचे स्मरते.



लातूर विभागातल्या औसा डेपोची गाडी नागपूर - चंद्रपूर - एटापल्ली मार्गावर ? आश्चर्य वाटले ना ? लातूर ते नागपूर ही रातराणी सकाळी सकाळी नागपूरला पोहोचल्यानंतर दिवसभर नागपूर बस स्थानकात पडून असायची आणि रात्री पुन्हा नागपूर ते लातूर ही रातराणी सेवा म्हणून परत जायची. तसेच लातूर ते अहेरी या रातराणी सेवेचे व्हायचे. लातूरवरून अहेरीला आलेली बस दिवसभर अहेरी बसस्थानकात नुसती पडून रहायची.


म्हणून आपल्या एस. टी. ने संसाधनांचे, कोचेसचे योग्य ते व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्याद्वारे आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सकाळी नागपूरला आलेल्या एस. टी. च्या या कोचला नागपूर ते एटापल्ली (पुढे अहेरी) आणि सकाळी अहेरीला आलेल्या कोचला अहेरी ते नागपूर अशी एक फ़ेरी करायला सुरूवात केली. जी चालक वाहक जोडी ही गाडी घेऊन नागपूरला / अहेरीला आलेले आहेत त्यांचा दिवसभर आराम व्हायचा आणि मधल्या या नागपूर ते एटापल्ली व अहेरी ते नागपूर ही फ़े-यांचे संचालन अहेरी डेपोच्या चालक वाहक जोडी्कडे असे.


म्हणजे लातूर ते नागपूर-- नागपूर ते एटापल्ली-- एटापल्ली ते अहेरी-- अहेरी ते लातूर आणि उलट बाजूने लातूर ते अहेरी-- अहेरी ते नागपूर-- नागपूर ते लातूर असा दोन रात्रींचा आणि एका दिवसाचा प्रवास करून त्या त्या बसेस परत आपल्या मूळ डेपोत परतत असत. संसाधनांचा महत्तम वापर होत असे.


या बसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चिकलठाणा (छत्रपती संभाजीनगर) मध्यवर्ती कार्यशाळेने बांधलेल्या फ़ार कमी टाटा बसेसपैकी एक बस. या मार्गावर औसा डेपोची लेलॅण्ड बसपण आम्ही बघितलेली आहे. पण हे प्रकाशचित्र काढले त्यादिवशी औसा डेपोने आपली टाटा बस या मार्गावर धाडली होती.


MH - 20 / D गॅंगमधला हा आणखी एक मेंबर. आपल्या महाराष्ट्र एस. टी. त MH - 20 / D गॅंग प्रसिद्ध आहे. कारण MH - 20 / D 0001 ते MH - 20 / D 9999 पर्यंत सगळे नंबर्स फ़क्त आपल्या महाराष्ट्र एस. टी. लाच मिळालेले आहेत. असे उदाहरण कुठेही नाही. 


लातूर डेपोची निळ्या रंगाने बसेसची ग्रील रंगवण्याची टिपीकल पद्धत आणि नागपूर सुपर चंद्रपूर - एटापल्ली हा बसवरचा वैशिष्ट्यपूर्ण मार्गफ़लक. आजकाल "सुपर" हा शब्द आपल्या एस. टी. च्या शब्दकोशातून जणू नाहीसाच झालेला आहे. सगळ्या बसेस फ़क्त जलद असतात. अति जलद (सुपर) शब्द आता अतिशय दुर्मिळ झालात.


नागपूर बस स्थानक

१८ / ५ / २००८. सकाळी ८.०० वाजता. 


Tuesday, October 28, 2025

जुळल्या सगळ्या त्या आठवणी : N 9456

 बालपणी चंद्रपूरला जाण्यासाठी आपल्या महाराष्ट्र एस. टी. च्या तीन प्रकारच्या बसेस होत्या.

सुपर (अती जलद) : या बसेस फ़क्त जांबचा थांबा घ्यायच्यात आणि नागपूर ते चंद्रपूर हे १५३ किलोमीटर अंतर ३ तास ते ३ तास २० मिनीटांत पार करायच्यात. या बसेसचा मार्गफ़लक पांढ-या पार्श्वभूमीवर लाल, केशरी अक्षरे आणि असे तिरप्या स्टाईलमध्ये हिरव्या अक्षरांमध्ये सुपर लिहीलेले असे असायचे. सुपर एक्सप्रेस बसेसबाबत आठवणींचा व्हिडीयो इथे.



1512 टाटा कमिन्स. बी. एस. 3 इमिशन स्टॅण्डर्डस ची बस. २०११.

एक्सप्रेस (जलद) : या बसेस जांब बरोबर वरोरा, भद्रावती (आणि काहीकाही बसेस डिफ़ेन्स, भद्रावती) पण थांबा घ्यायच्यात. नागपूर ते चंद्रपूर या १५३ किलोमीटर प्रवासासाठी या प्रकारच्या बसेस ३ तास ३० मिनीटे ते ४ तास असा वेळ घ्यायच्यात. अर्थात हा वेळ या मार्गात लागणारी खापरी, बुटीबोरी, ब्राह्मणी, (एक्सप्रेस बसेससाठी) वरोरा, ताडाळी आणि (क्वचितच) डिफ़ेन्स, भद्रावती इथली रेल्वे फ़ाटके मोकळी मिळताहेत की बंद मिळताहेत आणि बंद मिळालीत तर किती खोळंबा होतोय या बाबींवर पण अवलंबून होता.

या बसेसचा मार्गफ़लक पांढ-या पार्श्वभूमीवर लाल रंगातली अक्षरे असा असायचा.



नागपूर सुपर राजुरा. राजुरा आगार, चंद्रपूर विभाग. २०१० - ११ या वर्षात मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर ने बांधलेली २३३ वी नवीन टाटा बस.

साधारण सेवा (ऑर्डिनरी) : या बसेस चंद्रपूरला दोन मार्गे जायच्यात. पहिला मार्ग हा धोपट मार्ग. त्यात त्या बुटीबोरी, जांब, खांबाडा, व्होल्टास फ़ॅक्टरी, आनंदवन, वरोरा, भद्रावती, ताडाळी, पडोली असे अनेक थांबे घेत नागपूर ते चंद्रपूर हे १५३ किलोमीटर अंतर ४ तास ते ४ तास ३० मिनीटांत पार करायच्यात. या गाड्यांमध्ये आगाऊ आरक्षण करून बसण्याची सोय नव्हती.

आणखी एक मार्ग म्हणजे नागपूर ते चंद्रपूर जुना रस्ता. उमरेड, भिवापूर, नागभीड, सिंदेवाही, मूल मार्गे. या मार्गाने नागपूर ते चंद्रपूर हे अंतर २०० किलोमीटर्स पडत असे. त्यासाठी या बसेसना तब्बल ५ तास लागत असत. 

प्रवासासाठी आमची पसंदी कायम सुपर बसेसना असे. अगदीच नाईलाज झाला, कधी आरक्षणे मिळालीच नाहीत तरच मग जलद बस. पण साधारण सेवा बसेसनी आम्ही या मार्गावर कधीही प्रवास केला नाही.

१९९० च्या दशकात खाजगी बसेसची सेवा सुरू झाली आणि एस. टी. बसेसचे एकूणच ग्लॅमर ओसरले. रिझर्वेशन करून जाणे वगैरे प्रकार इतिहासजमा झालेत. स्पर्धेत आपली एस. टी. खूप मागे पडली. मग सुपर, जलद, ऑर्डिनरी हे प्रकार जणू विस्मृतीच्या कप्प्यातच गेलेत.




साधारण १४ वर्षांपूर्वी नागपूरच्या हिंगणा मध्यवर्ती कार्यशाळेत बनलेली ही बस आणि या बसवरचा सुपर हा बोर्ड दिसला आणि गाण्यांच्या ओळीच आठवल्यात.

स्वर आले दुरूनी

जुळल्या सगळ्या त्या (सुपर बसच्या, बालपणाच्या) आठवणी.

- बसप्रेमी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


Tuesday, October 21, 2025

सध्या इंटरनेटवर अत्यंत व्हायरल झालेला मी काढलेला एक फ़ोटो.

१९९९ मध्ये मी काढलेला हा फ़ोटो सध्या इंटरनेटवर फ़ार व्हायरल झालेला आहे. खूपशा ग्रूप्समधून हा फ़ोटो महाराष्ट्र एस. टी. च्या जुन्या बांधणीच्या बसचा फ़ोटो म्हणून फ़िरतो आहे. गोष्ट खरी आहे. महाराष्ट्र एस. टी. च्या साध्या बसचे हे डिझाईन जवळपास चार दशके तरी तसेच होते.



हा फ़ोटो मी कोडॅक के. बी 10 या कॅमे-याने काढलेला आहे आणि नंतर त्याला स्कॅन करून डिजीटल रूपात बदललेला आहे. या फ़ोटोची प्रिंट आणि त्याचे निगेटिव्हज माझ्याकडे आहे. जुन्या काळी (साधारण २००८ - २०११ पर्यंत) फ़ोटोवर कॉपीराईट कसा टाकायचा ? याबद्दल मी अनभिज्ञ होतो आणि म्हणूनच १५ वर्षांपूर्वी हा फ़ोटो माझ्या फ़्लिकर अकाऊंटवर मी टाकला. तिथेही त्या फ़ोटोला जवळपास २४०० व्ह्यूज आलेले आहेत आणि एस. टी. मधल्या जाणका-यांच्या कॉमेंटसही.


मुंबईला दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापन करताना दरवर्षी आमच्या विद्यार्थ्यांच्या SURVEYING या विषयाचा कॅम्प म्हणून आम्ही सेंट झेव्हियर्स व्हिला, खंडाळा इथे आठवडाभर मुक्कामी असायचोत. या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणाजवळच पुणे - मुंबई (जुन्या, NH 4) या महामार्गाचा बसथांबा होता. ज्यांनी जुन्या NH 4 ने मुंबई - पुणे - मुंबई प्रवास केलाय त्यांना ठाऊक असेल की खंडाळा गावातून मुंबई - पुणे व पुणे मुंबई हे दोन मार्ग वेगळे व्हायचेत. 


त्याच पुणे - मुंबई महामार्गावर जुन्या NH 4  वरील खंडाळा बोगद्याच्या अगदी वर हा राजमाची पॉइंट होता. इथे एक छोटेसे उद्यान सुद्धा होते. त्या उद्यानालगतच आपल्या महाराष्ट्र एस. टी. चा हा एक ब्रेक टेस्टिंग पॉइंट होता. आपल्या महाराष्ट्र एस. टी. ची एक शेड होती. त्यात काही अधिकारी, बदली चालक, काही तंत्रज्ञ वगैरे मंडळी बसलेली असायचीत. या ठिकाणी थांबणे हे सर्वच्या सर्व बसेसना अनिवार्य होते.


या ठिकाणी थांबून सर्व चालक मंडळी त्या शेडमध्ये जायचीत. तिथे त्यांनी अंमली पदार्थ सेवन केले आहेत की नाही याची ब्रेथ ॲनालायझरद्वारे चाचणी व्हायची. गाडी संपूर्णपणे थांबल्यामुळे गाडीचीही चाचणी व्हायची. कारण या राजमाची पॉइंटनंतर अमृतांजन पुलापर्यंत जुन्या पुणे - मुंबई घाटाला एक तीव्र उतारांची आणि शार्प वळणांची अशी साखळीच होती. त्यामुळे या ठिकाणी चालकाची आणि वाहनाची तपासणी अत्यावश्यकच होती.


ही तळेगाव डेपोची बस लोणावळा - राजमाची - लोणावळा अशी सर्वसामान्य (ऑर्डिनरी) सेवा घेऊन लोणावळ्यातील पर्यटकांना राजमाची उद्यानापर्यंत आणून थोडावेळ थांबून परत जायची. अशाच एका संध्याकाळी काढलेला त्या बसचा हा फ़ोटो. त्या काळी प्रत्येक विभाग हा आपापल्या बसचे दर्शनी भागातील ग्रील्स आणि काहीवेळा खिडक्यासुद्धा वेगवेगळ्या रंगांनी रंगवीत असत. पुणे विभाग आपल्या बसेसना तेव्हा असा गुलाबी रंग ग्रील्सना आणि खिडक्यांना देत असे. ग्रील्सभोवती पांढरी बॉर्डर ही पण पुणे विभागाचीच खासियत होती.


मध्यवर्ती कार्यशाळा दापोडीने बांधलेली ही टाटा बस आज महाराष्ट्र एस. टी. च्या बसबांधणीतले एक मानचिन्ह झालेले पाहून माझ्यातला बसफ़ॅन खरोखर आनंदित होतो.


आपल्याला आठवतात का आपापल्या विभागातल्या जुन्या बसेसच्या ग्रील्सचे आणि खिडक्यांचे रंग ?


उदाहरणार्थ


1. चंद्रपूर विभाग समोरच्या बफ़रला काळ्या बॉर्डरमध्ये छोटासा पिवळा पट्टा मारयचेत. ग्रिल व खिडक्या हिरव्या रंगाच्या असायच्यात.

2. यवतमाळ विभागातल्या बसेसचे ग्रिल्स आणि खिड्क्या आकाशी निळ्या रंगाच्या असायचेत.

3. अकोला विभागातल्या बसेसच्या काळ्या ग्रिल्सभोवती अशीच एक पांढरी बॉर्डर असायची.

4. अहिल्यानगर व जळगाव विभागातल्या बसेसची ग्रिल्स निळ्या रंगांची असायचीत.

5. सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा काही काळ अशी गुलाबी रंगाची ग्रिल्स असायचीत नंतर मग काळपट चंदेरी (Steel Grey) रंगांच्या ग्रिल्स असायच्यात.

6. नांदेड विभागाच्या बसेस तर पिवळ्या धमक ग्रिल्ससाठी प्रसिद्ध होत्या.


कळवा आणखी काही रंग जे कदाचित आज माझ्या आणि काही बसफ़ॅन्सच्या विस्मृतीत गेलेले असतील. तुमच्या उत्तरांमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.


- एक अत्यंत जुना बसफ़ॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


Wednesday, July 2, 2025

एखादी बस दिसल्यानंतरचे विचारांचे काहूर

 विश्राम बेडेकरांच्या "रणांगण" कादंबरीतले एक पात्र कुठल्याही वेळी नुसताच विविध रेल्वेगाड्या त्या त्या वेळी कुठे असतील असा विचार करीत असे. "आता दुपारचे ४ वाजलेत. म्हणजे मुंबई मेल आता नागपुरातून निघालेली असेल, हावडा मेल रायपूर स्टेशनातून हावड्याकडे रवाना झाली असेल..." वगैरे. "रणांगण" कादंबरी आम्हाला UPSC Civil Services च्या मुख्य परीक्षेत मराठी साहित्य या विषयाच्या अभ्यासात होती. "रणांगण" सोबतच मराठी साहित्यातले सौंदर्यशास्त्र नावाचा एक अत्यंत कुरूप विषय (ज्याची पुलंनी "भिंत पिवळी पडलीः एक सौंदर्यवाचक विधान या लेखात भरपूर खिल्ली उडविली होती.), अनेक विरोधाभासी आणि विनोदी विधानांनी भरलेला वि. ल. भावे कृत मराठी वाङमयाचा इतिहास (ज्याची पुलंनी "मराठी वाङमयाचा गाळीव इतिहास" लिहून येथेच्छ टर उडविली होती.) हे ही अभ्यासाला होते. या विषयांतले आता फारसे आठवत नसले तरी याच दोन विषयांनी मुख्य परीक्षेत आमचा त्रिफळा उडवल्याचे मात्र ठळक स्मरते. चुकीचे वैकल्पिक विषय घेतल्याने देश एका चांगल्या I. A. S. अधिकार्याला मुकला हे मात्र खरंय.


"रणांगण" मधल्या त्या पात्रासारखीच काहीशी सवय मलासुध्दा आहे. प्रवासात पुढून येणारी एखादी एस. टी. दिसल्यानंतर ही आपल्या प्रस्थान स्थानावरून किती वाजता निघालेली असली पाहिजे ? याचे हिशेब माझ्या मनातल्या मनात सुरू होतात.

आता हीच बस बघा. नागपूर जलद जळगाव. उन्हाळी जादा शेड्युल.




ही बस आम्हाला नांदुर्याला दिसली तेव्हा साधारण सकाळचे १०.४५ झाले होते. आम्ही नांदुर्याच्या हनुमंताचे दर्शन घेऊन खामगावकडे परतत होतो. आता ही बस सकाळी १०.४५ ला नांदुरा म्हणजे नागपूरवरून किती वाजता निघालेली असली पाहिजे ? याचे calculations माझ्या डोक्यात लगेच सुरू झालेत. कितीही चांगला रस्ता मिळाला तरी नागपूर ते अकोला प्रवासाला कमीतकमी ५ तास, अकोला ते खामगाव या प्रवासाला कमीतकमी १ तास आणि खामगाव ते नांदुरा अर्धा तास प्रवासाला धरले तरीही ही गाडी नागपूरवरून पहाटे ४.०० ला निघालेली असली पाहिजे. म्हणजे अगदी पहाटपक्षी बसच. (लिंक इथे) नेहमी नागपूरवरून अमरावतीकडे जाणारी पहिली पहाटपक्षी बस म्हणजे पहाटे ५ ची नागपूर - इंदूर बस. ही बस त्या बसआधी एक तास ? अशा अडनिड्या वेळेला नागपूरवरून या बसला किती प्रवासी मिळत असतील ? अनेक प्रश्न मनात रूंजी घालत सुटतात. अगदी "रणांगण" च्या त्या पात्रासारखेच.

नागपूर उन्हाळी जादा जळगाव

मार्गे कोंढाळी - कारंजा (घाडगे) - तळेगाव - तिवसा - गुरूकुंज मोझरी - अमरावती - बडनेरा - मूर्तिजापूर - अकोला - बाळापूर - खामगाव - नांदुरा - मलकापूर - मुक्ताईनगर - दीपनगर - भुसावळ.

MH - 14 / LX 9813

Ashok Leyland Comet Vishwa model

BS VI

Built by Ashok Leyland, Vijaywada plant.

२ बाय २ आसनव्यवस्था. एकूण ४१ आसने.

ज. जळगाव आगार

स्थळः नांदुरा
दिनांकः १४/६/२०२५
वेळः सकाळी १०.४५ वाजता

- एक बस पाहिली की अनेक विचारांचे, calculations चे काहूर मनात येणारा बसफॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Saturday, February 1, 2025

व्यक्ति तितक्या प्रकृती आणि तितक्याच प्रतिक्रिया

 

या बसकडे बघितल्यावर वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळ्या प्रकारची प्रतिक्रिया होईल.

आम्हा बसफॅन्सना ही बस पाहिल्यावर
"एकाच या जन्मी जणू फिरूनी नवे जन्मेन मी" ही ओळ आठवेल.

कारण ही बस महाराष्ट्र एस टी च्या मध्यवर्ती कार्यशाळा नागपूरने माईल्ड स्टील मध्ये साधी परिवर्तन बस म्हणून बांधण्याआधी पनवेलच्या अॅण्टोनी गॅरेजने बांधलेली निमआराम बस होती. निमआराम म्हणून तिच्या सेवेची वर्षे संपल्यानंतर नागपूर कार्यशाळेने तिला सध्याचे रूप दिले. एकाच जन्मात ती पुन्हा नव्याने जन्मली.
ब्युटी पार्लर मधले बारकावे जाणणार्या भगिनी वर्गाची प्रतिक्रिया
"अग बाई, तिच्या आयब्रोज *eye brows) किती छान कोरल्यात, न !"

अशी असू शकेल.

तर

विदर्भातल्या इच्चक पोट्ट्यांची प्रतिक्रिया
"अबे ते डिझेल भरल्यावर त्याच झाकण त लावत जा बे. पब्लिकचा माल हाये म्हनून सन्यान काई...ई करतेत ह्ये."
अशीही असू शकेल.
MH - 06 / S 8908
मूळ बांधणीः अॅण्टोनी बस बाॅडी बिल्डर्स, पनवेल. निमआराम बस. २ बाय २.
पुनर्बांधणीः एस. टी. ची मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर. परिवर्तन बस. २ बाय २
अ. रिसोड आगार
रिसोड आगार, अकोला विभाग
शेगाव जलद रिसोड
मार्गेः बाळापूर - अकोला - पातूर - मालेगाव (जहांगीर) - शिरपूर (अंतरिक्ष पारसनाथ)
खरेतर बाळापूर ते पातूर हे सरळ अंतर फक्त ३० - ३५ किलोमीटर्स असताना ही बस अकोला मार्गे जवळपास ५० किलोमीटर्स लांबचा पल्ला घेऊन का जाते ? हे एक कोडेच आहे.
- एकाच वेळी बसफॅन, काकूबाई आणि इच्चक कार्ट्याच्या दृष्टीने विचार करू शकणारा सर्वसामान्य माणूस, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Wednesday, December 25, 2024

Last of the ROMANS.

आपल्या महाराष्ट्र एस. टी. चा बसेसचा ताफा पारंपारिकपणे ॲल्युमिनियममध्ये तयार केलेला असायचा. पण गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी तो ताफ़ा माईल्ड स्टीलमध्ये बांधण्याचा निर्णय घेतला. नव्या सगळ्या बसेस तर माईल्ड स्टीलमध्ये येत आहेत पण जुन्या बसेसचा ताफ़ाही एस. टी. ने माईल्ड स्टीलमध्ये बदलण्याचा सपाटा लावला आहे. या निर्णयामुळे बसेसच्या ताफ्यातील एकूण डिझाइन आणि बांधणीवर परिणाम झाला आहे.


एस. टी. च्या मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूरने बांधलेल्या ॲल्युमिनियम बॉडी बसपैकी ही एक शेवटची बस जी अजून माईल्ड स्टील बॉडी बसमध्ये रुपांतरित व्हायची आहे.







MH - 40 / Y 5619


TATA 1512 कमिन्स 


BS III बस


2 बाय 2 आसनव्यवस्था


एकूण 43 जागा


नागपूर एक्सप्रेस भामरागड


इमामवाडा डेपो, नागपूर विभागाची बस


मार्गे जाम - वरोरा - भद्रावती - चंद्रपूर - बल्लारपूर - कोठारी - आष्टी - गोंडपिपरी - आलापल्ली


एकूण अंतर 250 किमी.


भामरागड हे गडचिरोली जिल्ह्यात वसलेले महाराष्ट्रातील सर्वात दुर्गम गावांपैकी एक आहे. "गाव तेथे एस. टी." हे स्वतःचे ब्रीदवाक्य खरे ठरवण्यासाठी एस. टी.अशा ठिकाणी सेवा सुरू ठेवून दुर्गम ठिकाणीही जनतेची सेवा करण्याच्या आपल्या वचनाला जागते. याचा आम्हा सर्व बसफ़ॅन्सना अभिमान आहे.