Showing posts with label Central Workshop Dapodi. Show all posts
Showing posts with label Central Workshop Dapodi. Show all posts

Tuesday, June 23, 2026

आठवणीतल्या एस. टी. - साधी दिसली तरी अगदी स्पेशल असणारी आपली एस. टी.

१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत आपल्या महाराष्ट्र एस. टी. ला लाल रंगासोबत पिवळ्या रंगाचा असा गोलाकार वाढत जाणारा आणि बसच्या चाकांवर संपणारा पट्टा असायचा. या प्रकाशचित्रातला बसला जसा पांढरा पट्टा आहे ना तसाच पण पिवळ्या रंगातला. १९९० च्या दशकात आपल्या एस. टी. ने पुन्हा आपल्या काही बसेसवर तसाच प्रयोग करून बघितला होता पण तो अल्पजिवी ठरला होता.






या बसचे वैशिष्ट्य म्हणजे ही बस १९७० च्या दशकातली आहे. खरेतर हे प्रकाशचित्र घेतले तेव्हा या बसचे वय ४६ वर्षे होते. आणि इतकी वर्षे एखादी बस सेवेत ठेवत नाहीत. पण ह्या बसमध्ये वेळोवेळी बदल करून करून तिच्या एंजिनामध्ये वारंवार मॉडिफ़िकेशन करून ही बस आपल्या एस. टी. ने वापरात ठेवलेली आहे. खरेतर ही बस TATA 1210 D मॉडेलची. या मॉडेलचे समोरचे काऊल असे असायचे. 

टाटा 1210 D मॉडेलचे समोरचे काऊल

मूळ  टाटा 1210 D मॉडेलला टाटा 1210 E मॉडेलचे काऊल लावलेली बस.


पण एस. टी. ने त्या काऊलमध्ये बदल करून तिला TATA 1210 E मॉडेलचे काऊल बसविलेले होते. ड्रायव्हर साहेबांसमोरची विंडशिल्ड सुद्धा बदलून नव्या प्रकारची लावलेली होती. 


आधुनिक बांधणीच्या बसेसनुसार एस. टी. ने या बसला टपावर दोन्ही बाजूला छोटे लाईटस दिलेले होते. अर्थात मूळ गाडीला असे लाईटस असणे शक्यच नव्हते. तेव्हा ती पद्धतच नव्हती. 


पण या गाडीचे मूळ टेल लाईटस मात्र तसेच्या तसेच ठेवलेले होते. इतक्या बदलांमध्ये तेव्हढीच आपली मूळ गाडीची आठवण कारण TATA 1210 D  आणि सुरूवातीच्या काळातल्या TATA 1210 E मॉडेल्सना छोटेसेच टेल लाईटस असायचेत.









मोठ्ठे, धब्बाडे टेल लाईटस साधारण १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात बसेसमध्ये आलेत. तोवर असे छोटेसेच टेल लाईटस. त्या जुन्या टेल लाईटसमध्ये टेल लाईट, ब्रेक लाईट आणि इंडिकेटर लाईट असायचेत. आजच्यासारखे रिव्हर्स मूव्हमेंट लाईटस नसायचेत. तितकी वाहतूक नव्हती त्यामुळे तशी तितकीशी गरज भासत नसेल. यातल्या इंडिकेटर लाईटसचा तरी किती वापर त्याकाळी होत असेल याबद्दल मला शंकाच आहे. वळायचे असले तर ड्रायव्हर साहेब आपला हात खिडकीबाहेर काढून तसा इशारा करायचेत किंवा त्यांच्या बाजूला एक लोखंडी इंडिकेटर आर्म असायचा. तो तसा इंडिकेटर आर्म मी १९९० च्या दशकात मुंबईत बेस्ट बसेसमध्ये बघितलेला आहे.


माझ्या माहितीप्रमाणे ही बस मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी इथे बांधल्या गेलेली होती. हिची प्रवासी सेवा वर्षे संपल्यानंतर  मग मध्यवर्ती कार्यशाळा नागपूरने या बसमध्ये बरेच बदल केलेत. दापोडीवाले आपल्या बसेसना पुढच्या बाजूला एक वैशिष्ट्यपूर्ण गोलाकार असा डोम द्यायचेत. त्या डोममध्ये बसचा मार्गफ़लक असायचा. चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर कार्यशाळा ही दापोडीनंतर सुरू झाली पण त्यांनी दापोडीवाल्यांच्या डोम आकाराऐवजी समोर चपटा आकार द्यायला सुरूवात केली आणि नागपूरच्या कार्यशाळेने दापोडीचा कित्ता गिरवण्याऐवजी चिकलठाणा वाल्यांचाच कित्ता गिरवीत चपट्या आकाराचे दर्शनी भाग आपापल्या गाड्यांना द्यायला सुरूवात केली होती.


ही बस एस. टी. ने आपल्या विभागीय कार्यांसाठी विशेष तयार करून जपलेली होती. आणि म्हणूनच साधी दिसत असली तरी ही बस अगदी खास, अगदी विशेष होती. 

 


MHO 5483 


TATA 1210 D


मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी ने बांधलेली साधी बस. मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर येथे पुनर्बांधणी झालेली बस.


नागपूर विभागीय कार्यशाळेच्या तैनातीत असलेली मालवाहक बस.


@ खडकी हनुमान मंदीर


११/ ६ / २०१६. 


Sunday, March 1, 2026

चला देवदर्शनाला, पर्यटनाला

पणजी गोवा पूर्णपणे पर्यटनस्थळ आहे. गणपतीपुळे सुद्धा काही मंडळींसाठी पर्यटन स्थळ असेल पण माझ्यासाठी हे एक धार्मिक स्थळ आहे. इथला गणपती लोभसवाणा आहे. अगदी पहिल्या दर्शनात आपलेसे करणारा आहे.


आपली महाराष्ट्र एस. टी. प्रवाशांना देवदर्शनासाठी आणि पर्यटनासाठी नेण्यास कायम सज्ज असते.



पणजी निम आराम गणपतीपुळे

मार्गे म्हापसा - पत्रादेवी - सावंतवाडी - कणकवली - राजापूर

MH - 12 / EF 6344

TATA 1510 Cummins, BS II bus

मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी यांनी बांधलेली निम आराम बस.

सिं. सावंतवाडी आगार.

काहीही म्हणा. या निम आराम गाड्यांची शान काही वेगळीच होती.

सावंतवाडी आगार हे मुख्यतः अशोक लेलॅण्ड गाड्यांचे म्हणून ओळखले जाते. त्यात त्यांच्या ताफ़्यात ही टाटाची सुंदरी फ़ार दुर्मिळ होती. म्हणूनच हे प्रकाशचित्र एक विशेष महत्व राखून आहे. 

गणपतीपुळे बस पार्किंग

20/02/2009


Thursday, January 1, 2026

आपल्या एस. टी. ची डिलक्स सेवा

आमच्या बालपणी जेव्हा जेव्हा आम्ही एस. टी. चा प्रवास करायचोत तेव्हा तेव्हा आम्हाला बसमधले आरक्षण करावे लागत असे. मग तो प्रवास नागपूर ते चंद्रपूर किंवा नागपूर ते यवतमाळ असा तीन तासांचाच का असेना. खाजगी बसेसचा उदय होण्यापूर्वीचा तो काळ. त्यामुळे प्रवासासाठी या मार्गांवर दर अर्ध्या तासाला बस असली तरी प्रवाशांची गर्दी कायमच असायची. त्यामुळे आगाऊ आरक्षण करून जाण्याशिवाय पर्याय नव्हता.


त्या आरक्षित तिकीटांच्या मागील बाजूला आरक्षित तिकीटांसंबंधी विविध नियम छापलेले असत. त्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) आराम गाड्यांचा आणि वातानुकुलित गाड्यांचा उल्लेख होता. आरक्षण रद्द करण्याविषयीच्या नियमांमध्ये हा उल्लेख येई. 



आम्ही वैदर्भिय मुलांनी साधी, जलद, अति जलद आणि १९८२ नंतरच्या काळात निम आराम एव्हढ्याच प्रकारच्या गाड्या बघितलेल्या होत्या. त्यामुळे या आराम, वातानुकुलित, शयनयान वगैरे गाड्यांविषयी, त्यांच्या आसनव्यवस्थेविषयी, त्यांच्या एकंदर दिसण्याविषयी आमच्या मनात अपार कुतुहल असे. आमची मावशी कोकणात राहून आल्याने अशा प्रकारच्या गाड्या तिने बघितलेल्या होत्या. त्याकाळच्या सावंतवाडी - मुंबई या शयनयान गाडीचे किंवा कोकणमार्गे जाणा-या मुंबई - महाबळेश्वर वातानुकुलित बसगाडीचे  वर्णन आम्ही तिच्याकडूनच ऐकले होते. मग या प्रकारच्या गाड्यांविषयीचे आमचे कुतुहल आम्ही तिला अनेक प्रश्न विचारून शमवून घेत असू. पण शेवटी शब्दांनी केलेले वर्णन ते शब्दांनी केलेले वर्णनच. त्याला दृकश्राव्यतेची जोड थोडीच येणार ? या प्रकारच्या गाड्यांच्या दर्शनाची आमची भूक अपुरीच राहिली.


१९९५ मध्ये मुंबईला प्राध्यापकी करायला गेलो आणि मग आपल्या एस. टी. च्या डिलक्स, वातानुकुलित वगैरे दर्जाच्या बसगाड्यांचे प्रत्यक्ष दर्शन होऊ लागले. आमच्यातला बसफ़ॅनची उत्सुकता शमल्यामुळे तो सुखावला. अर्थात तोवर एस. टी. ने आपल्या शयनयान दर्जाच्या गाड्या बंद केलेल्या होत्या. 


हा असाच एक मी काढलेला आणि त्यानंतर अनेकांनी आपापल्या फ़ेसबुक वॉलवर, ग्रुप्सवर (कधी माझ्या नावानिशी तर कधी नावाशिवाय) चिकटवलेला फ़ोटो. हा फोटो माझ्यासाठी केवळ एक छायाचित्र नाही; तो एका संपूर्ण काळाची आठवण आहे. तो क्षण मी स्वतःच्या कॅमे-यातून टिपला आणि पुढे अनेकांनी तो आपापल्या पद्धतीने जपला. आज मागे वळून पाहताना, माझ्या छायाचित्रसंग्रहातील हा एक अत्यंत मौलिक आणि सर्वोत्तम क्लिक असल्याची जाणीव अधिक ठळकपणे होते.


ही आपल्या एस. टी. च्या सेवेतली डिलक्स बस आहे. या बसेसनी दादर - पुणे किंवा परळ – पुणे मार्गावर दीर्घकाळ वर्चस्व गाजविले होते..


१९८२ च्या नवी दिल्ली एशियाडसाठी तयार केलेल्या निम आराम (एशियाड) बसेसनी जवळजवळ ९० च्या दशकाच्या मध्यापर्यंत मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातल्या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी सेमी लक्झरी (म्हणजेच आशियाड / आताचे ब्रॅंडनेम "हिरकणी") सेवा यशस्वीपणे दिल्याल्यानंतर, आपल्या एस. टी. ने २ x २ आसनरचनेच्या अशा डिलक्स लक्झरी बसेस सुरू केल्या. या बसेस यांच्या पूर्वसुरीसारख्या (एशियाड बसेससारख्याच) दादर -पुणे / परळ – पुणे मार्गावर दर १५ मिनिटांच्या अंतराने धावू लागल्या.


या बसेस आपल्या एस. टी. च्या मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी आणि मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा (छत्रपती संभाजीनगर)  येथील कार्यशाळांमध्ये तयार करण्यात आल्या होत्या. एस. टी. च्या मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर येथे एकही बस तयार करण्यात आलेली नव्हती आणि विदर्भ विभागात या प्रकारच्या बसेसची एकही फेरी (शेड्युल) नियोजित करण्यात आलेली नव्हती.


पुणे स्टेशन – दादर


MH 20 / D 3375


अशोक लेलँड चित्ता मॉडेल


मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा (छत्रपती संभाजीनगर)  येथे बांधलेली.


२ x २ आसन व्यवस्था असलेली लक्झरी बस. उंच पाठ असलेली आसने, कापडी (फॅब्रिक) अपहोल्स्ट्री आणि प्रत्येक खिडकीजवळ बसवलेले पंखे अशी सुविधा या बसमध्ये होती.


एकूण आसनसंख्या ४३ (४२ प्रवासी + १ कंडक्टरसाठी केबिनमध्ये आसन).


मुं. परळ डेपो (मुंबई विभाग परळ आगार)


सर्व टाटा डिलक्स बसेस पुणे विभागातील स्वारगेट किंवा शिवाजीनगर आगारांना ठेवण्यात आल्या होत्या, तर सर्व अशोक लेलँड डिलक्स बसेस मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला नेहरू नगर आगारांना देण्यात आल्या होत्या.


हा फोटो फेब्रुवारी १९९९ मध्ये राजमाची पॉइंट येथील ब्रेक टेस्टिंग स्टॉपवर काढलेला आहे. या राजमाची पॉईंटनंतर पुण्याहून मुंबईकडे येणा-या रस्त्यावर खंडाळा घाटातला सगळ्यात तीव्र उतार आणि अत्यंत तीव्र वळणांचा रस्ता होता. त्यामुळे या ठिकाणी पुणे ते मुंबई जाणा-या सर्व बसेसना थांबवून बसेसची आणि चालकाच्या अवस्थेची चाचणी होत असे. तिथे जवळच एस. टी. चे एक छोटेखानी शेडवजा ऑफ़िस होते. तिथे एस. टी. ची अधिकारी मंडळी, गरज भासली तर बदली चालक आणि बसेसची तंत्रज्ञ मंडळी बसलेली असत. घाट सुरू होण्यापूर्वी घाटातून उतरणा-या प्रत्येक बसची संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच बस पुढे रवाना व्हायची.


येथे स्पष्ट करावेसे वाटते की हा फोटो डिजिटल कॅमे-याने नव्हे, तर कोडक K-10 या नॉन-डिजिटल कॅमेऱ्याने टिपलेला आहे. तो आधी छापण्यात आला आणि नंतर २००६ मध्ये स्कॅन करून फ्लिकरवर पोस्ट करण्यात आला.


मी, दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ऐरोली, नवी मुंबई येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना, दरवर्षी खंडाळा येथे आयोजित होणाऱ्या सिव्हील इंजीनीअरींग सर्व्हे कॅम्पचा भाग असायचो. खंडाळ्याच्या राजमाची पॉइंटजवळच असलेले सेंट झेवियर्स व्हिला हे आमचे बेस स्टेशन व निवासाची जागा असे. काम सुरू होण्यापूर्वी किंवा दिवसाचे काम संपल्यानंतर आम्हाला छायाचित्रणासाठी भरपूर संधी मिळत असत.


राजमाची पॉइंट हा रेल्वे गाड्या, बोगदे, द्रुतगती महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ यांच्या दृश्यांच्या दृष्टीने अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. माझ्यासारख्या बस आणि रेल्वेप्रेमी व्यक्तीसाठी या सर्व्हे कॅम्पमधला माझा सहभाग हा एक आठवड्याचा खरा आनंदोत्सवच असे.


आता आजच्या युगात नवनव्या प्रकारच्या आराम, वातानुकुलित, शयनयान गाड्या आल्यात ख-या. पण या डिलक्स बसेसची बांधणी आणि एकूणच रस्त्यावर धावत असताना त्यांचा एकंदर रूबाब हा अतुलनीय होता हे मात्र प्रत्येक बसफ़ॅन मान्य करेल.


- बसेस आणि रेल्वेंवर जीव ओवाळून टाकणारा, अशा सुंदरींच्या एका दर्शनासाठी तासन तास वाट बघत उभा असलेला एक बस आणि रेल्वे आशिक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


१ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६

Thursday, December 26, 2024

आपल्या एस. टी. कार्यशाळांना हे का जमू नये ?


या प्रकाशचित्रात डावीकडे वीरा वाहना उद्योग या बंगलोर इथे असलेल्या खाजगी बस बांधणी कंपनीने अशोक लेलँड बससाठी बनवलेला डॅशबोर्ड कन्सोल आहे आणि उजव्या बाजूला आपल्या महाराष्ट्र एस. टी. मधील मध्यवर्ती कार्यशाळेने बनवलेल्या अशोक लेलँड बसचा डॅशबोर्ड कन्सोल आहे.


मला नेहमी आश्चर्य वाटते की या डिझाइनमध्ये असे काय रॉकेट सायन्स आहे की आपल्या एस. टी. ला डॅशबोर्ड कन्सोलचे असे डिझाइन करणे शक्य होत नाही ?


- बाहेरून गाड्या बांधून घेण्यापेक्षा आपल्याच कार्यशाळेतल्या कर्मचा-यांना प्रशिक्षण देऊन, अधिक सक्षम बनवून आपल्या संसाधनांचा अधिकाधिक चांगला वापर करून घेऊ शकतो आणि प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा देऊ शकतो या मताचा बसफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर

Monday, December 16, 2024

महाराष्ट्र एस टी ला हे का जमू नये ?






तेलंगण राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एक्सप्रेस सेवा,

नागपूर जलद आदिलाबाद,

अशोक लेलँड व्हायकिंग माॅडेल.

आदिलाबाद डेपो.

पूर्वीचे आंध्रप्रदेश मार्ग परिवहन आणि आता तेलंगण मार्ग परिवहन च्या बसेसची बांधणी मजबूत वाटते. त्यांच्या बस बाॅडीबिल्डींग मियापूर, हैद्राबाद कार्यशाळेत येथेच या गाड्यांची बांधणी होते. या गुणवत्तेची बांधणी आपल्या महाराष्ट्र मार्ग परिवहनच्या तीनही मध्यवर्ती कार्यशाळेंकडून का होत नाही ? हाच मला कायम प्रश्न पडतो.

तसेच तेलंगण, आंध्र आणि कर्नाटक राज्य परिवहनचे डेपो ज्या पध्दतीने या बसेसची नियमित देखभाल करतात तसे आपले डेपो का करीत नाही ? हा सुध्दा मला पडलेला आणखी एक  प्रश्न.


Sunday, December 8, 2024

दुर्मिळ ते काही - ९

 यापूर्वीचे लेख


दुर्मिळ ते काही ... (१)


दुर्मिळ ते काही ... (२)


दुर्मिळ ते काही ... (३)


दुर्मिळ ते काही ... (४)


दुर्मिळ ते काही ... (५)


दुर्मिळ ते काही ... (६)


दुर्मिळ ते काही ... (७)


दुर्मिळ ते काही ... (८)


आपल्या महाराष्ट्र एस. टी. ने साधारण २०२० च्या सुमारास BS 4 मानकांमध्ये आपल्या बसचा ताफ़ा आणण्याचे ठरवले. या बसेस बांधण्याचे खूप मोठे कंत्राट एम. जी. या कर्नाटकातल्या कंपनीला दिले. त्यांनी लाल + पांढ-या परिवर्तन बसेस, विठाई बसेस आणि काही शयनयान बसेस आपल्या एस. टी. ला पुरवल्या. बदललेल्या मानकांनुसार या बसेसचे प्रवेश आणि निर्गमन द्वार हे चालक केबिन मधून होते.

आपल्या एस. टी. च्या मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी (पुणे) आणि मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर यांनीही या BS 4 मानकांच्या काही बसेसची बांधणी केली. मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी ने MH - 14 / HG 82XX ते MH - 14 / HG 84XX पर्यंत काही टाटा गाड्या बांधल्यात पण मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर ने MH - 31 / FC 3690, MH - 31 / FC 3691 आणि MH - 40 / BL 4081 या तीनच गाड्या बांधल्यात. त्यातही आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हापासून नागपूर ग्रामीण चे आर. टी. ओ. कार्यालय वेगळे सुरू झालेय (MH - 40 पासिंग) तेव्हापासून हिंगणा कार्यशाळेत तयार झालेल्या गाड्या या MH - 31  पासिंगसाठी न येता MH - 40 पासिंग करतात. पण तरीही MH - 31 / FC 3690, MH - 31 / FC 3691 या दोन गाड्या MH - 31  पासिंग कशा काय करवल्यात ? हाच मोठा प्रश्न आहे. MH - 31 सिरीजमधल्या FC पासिंगच्या याच दोन अतिशय दुर्मिळ गाड्या. या दोन्ही गाड्या चंद्रपूर विभागाला दिल्या गेल्यात. तर MH - 40 / BL 4081 ही गाडी यवतमाळ विभागाला दिली गेली.





या फोटोत सगळ्यात दूर असलेली चिमूर डेपोची (चंद्रपूर विभाग) बस म्हणजे MH - 31 / FC 3690, नागपूर जलद राजुरा. ही बस दुर्मिळ आहे.

मध्ये उभी असलेली बस म्हणजे इमामवाडा डेपोची (नागपूर विभाग) MH - 40 / Y 5619, नागपूर जलद भामरागड. ही बस अजूनही एम. एस. बांधणीसाठी गेलेली नाही. अजूनही जुन्या ॲल्युमिनीयम बांधणीतच आहे. या फोटोतली सगळ्यात जवळची बस म्हणजे खुद्द चंद्रपूर डेपोची (अर्थातच चंद्रपूर विभाग) अकोला जलद चंद्रपूर. ही बस MH - 14 / HG 8242. दापोडी कार्यशाळेने विदर्भात ज्या BS 4 गाड्या दिल्यात त्यातल्या सर्वाधिक गाड्या चंद्रपूर विभागाला दिल्यात. या सगळ्या गाड्या MH - 14 / HG 82XX सिरीजमध्ये होत्या. या गाड्या चंद्रपूर डेपोत आल्या आल्या डेपोने त्यांच्या अत्यंत प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या चंद्रपूर - शेगाव आणि चंद्रपूर - नागपूर मार्गावर या गाड्या पाठवल्या होत्या. या गाड्या अजूनही चांगली सेवा प्रदान करत आहेत.

मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर ने बांधलेल्या फ़क्त तीन गाड्यांमधली MH - 31 / FC सिरीजची एक गाडी या फ़ोटोत. म्हणून दुर्मिळ.

Saturday, July 13, 2024

बसफ़ॅनिंग: एक वेगळाच सूक्ष्म पैलू

आमचे बसफ़ॅनिंग आमच्या अगदी बालपणी नागपूर ते चंद्रपूर एस टी प्रवासादरम्यान सुरू झाले. अगदी पहिल्या वर्गात अक्षरओळख नुकतीच झालेली असताना आजोळी चंद्रपूरला जातानाच्या प्रवासात माझ्या वडीलांनी एस. टी. च्या बसगाड्यांवर लिहील्या जाणा-या म. का. दा. (मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी), म. का. चि. (मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा) आणि म. का. ना. (मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर) हे अर्थ उलगडवून दाखवत प्रत्येक बस वेगळी असते ही दृष्टी आम्हाला दिली. मग यवतमाळ विभागातल्या डेपोंच्या बसेसचे फ़िकट निळ्या रंगात रंगवलेले ग्रिल्स, पुढचे बंपर आणि कधीकधी खिडक्यासुद्धा. चंद्रपूर विभागातल्या डेपोंच्या बसेसचे काळपट पिवळ्या ( Yello Ochre) रंगात रंगविलेले ग्रिल्स आणि पुढले बंपर्स, अकोला विभागातल्या डेपोंच्या बसेसना काळ्या ग्रिल्सभोवती दिलेली पांढरी बॉर्डर तर भंडारा विभागासाठी हीच बॉर्डर पिवळ्या रंगात हे बारकावे लक्षात घेऊन त्या त्या विभागाच्या बसेस ओळखणे आणि साधारण वेळ लक्षात घेऊन ती नक्की कुठली बस असेल ? याचा अचूक अंदाज बांधणे यात आम्ही प्रवीण झालो आणि नातेवाईक, मित्रमंडळींमधे भाव खाऊ लागलोत.


पाचव्या वर्गापासून इंग्रजीची तोडओळख झाली आणि मग हळूहळू ज्या बसने जातोय तिचा नंबर, तिचा चेसिस नंबर आदि डिटेल्स जमविण्याचा छंद लागला. मी पाचवीत असताना आम्ही नंदनवन येथे रहायला गेलो आणी महाल विभागात असलेल्या आमच्या  शाळेत जाण्यायेण्यासाठी पाचवीपासून शहर बस सेवेने जाणे येणे होऊ लागले. मग रोजची बसची तिकीटे जमविण्याचा छंद लागला, ती तिकीटेही नुसती जमवायची नाहीत तर तिकीटांच्या मागील मोकळ्या जागेत प्रवासाचा दिनांक, बस नं, प्रवास कुठून कुठे, बस शहर बस सेवेतली कुठल्या नंबरची सेवा होती ? कुठून कुठे जात होती हा सगळा तपशील लिहून ठेवणे सुरू झाले. तदनुषंगाने ही तिकीटे जपून ठेवणे, महिनावार, वर्षवार नीट जतन करून लावून ठेवणे वगैरे कामे आलीच. 






नागपूर आणि परिसरात त्याकाळी टाटा बसेसचेच प्राबल्य होते. शहर बस सेवेतही सगळ्या टाटाच्याच बसेस. त्याकाळी टाटाच्या चेसिस जमशेदपूर आणि पुण्याच्या टेल्को प्लॅंट मध्ये तयार व्हायच्यात. त्या एस. टी. च्या महाराष्ट्रातल्या तीनही कार्यशाळांमध्ये जायच्यात आणि त्यांच्यावर बसबांधणी व्हायची. टेल्कोचा पंतनगरचा प्लॅंट तेव्हा सुरू व्हायचा होता. सगळ्या चेसिस एकतर जमशेदपूर किंवा पुण्यावरून यायच्यात. बाय द वे इतक्या वर्षांनंतरही महाराष्ट्र एस. टी. आपल्या बहुतांशी बसगाड्यांचा ताफ़ा चेसेस मागवूनच आपल्या मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये बांधून घेते. गोव्यातल्या टाटा ए.सी.जी.एल. किंवा हुबळी इथल्या टाटा मार्कोपोलोने बांधलेल्या तयार बसगाड्या घेत नाही.


बसमध्ये बसल्यावर ड्रायव्हर काकांमागे त्याकाळच्या बसेसमध्ये असलेल्या आडव्या बाकड्यावर उलटे (केबिनमधून बसच्या दिशेकडे तोंड करीत) बसून प्रवास करणे हा तर त्याकाळच्या सगळ्याच बाळगोपाळांचा छंद असायचा. आमचाही होता. आम्ही आमच्या शोधक नजरेने बसच्या केबिनमधली एंजिनवरची "मेकर्स प्लेट" पाहून ती चेसिस जमशेदपूरवरून आलीय की पुण्यावरून आलीय हे शोधण्याचाही छंद आमच्या बसफ़ॅनिंगमध्ये सामील झाला. आत केबिनमध्ये तर मूळ चेसिसवर पोपटी किंवा चटणी रंग असायचा पण खाली उतरून चाकांच्या वर असलेल्या फ़ेंडर्सच्या आत थोडे डोकावत ती चेसिस मूळ केशरी रंगाची आहे की पिवळ्या रंगाची हे पण नोंदणे सुरू झाले. मग त्या प्रवासाच्या तिकीटांवर त्या चेसिसच्या मूळ रंगाची नोंदणीही ओघाओघाने आलीच. 


अजून एक गोष्ट लक्षात आली की केशरी चेसिस सगळ्या जमशेदपूरच्या असतात तर पिवळ्या रंगाच्या चेसिस पुण्याच्या.



आज आमच्या एका बसफ़ॅन ग्रूपवर ह्या केशरी चेसिसचा फ़ोटो दिसला आणि मन एकदम चाळीस वर्षे मागे गेले.


- बस आणि रेल्वेवर मनापासून प्रेम करणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Tuesday, February 6, 2024

Decoding म.का.दा., म.का.ना., म.का.चि. वगैरे

माझ्या बालपणी आमच्या कुटुंबासह 1977 सालच्या नागपूर ते चंद्रपूर प्रवासादरम्यान माझ्या वडिलांनी मला एस. टी. बस गाड्यांवर लिहीत असलेल्या विविध शॉर्टफ़ॉर्म्सबद्दल सविस्तर सांगितलेले होते. एस. टी. बसच्या पुढल्या बाजूला ती कुठल्या कार्यशाळेत बनली ?, कुठल्या वर्षी बनली ? आणि त्या वर्षी बनलेली ती कितवी बस ? ही सगळी माहिती लिहीलेली असते. ती सगळी माझ्या वडिलांनी मला समजावून सांगितली आणि ती पक्की लक्षात राहिली. त्यानंतर जितके प्रवास घडले त्या त्या प्रवासांमध्ये बसस्टॅण्डवर उभ्या असलेल्या सगळ्या गाड्यांची ही माहिती नोंदवून घेण्याचा छंदच मला लागला.


महाराष्ट्र एस. टी. च्या स्वतःच्या तीन मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. तिथे बसगाड्यांची टाटा किंवा लेलॅण्ड चेसिसवर बांधणी होते. मधल्या काळात काही आयशर बसगाड्यांचीही बांधणी या मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये झालेली होती. म. का. दा. म्हणजे मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी (पुणे), म. का. ना. म्हणजे मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर (हिंगणा) आणि म. का. चि. म्हणजे मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा (औरंगाबाद, सध्याचे छत्रपती संभाजीनगर). 1980 पर्यंत तरी या कार्यशाळेत बनलेल्या गाड्यांवर म. का. चि. असे लिहीलेले असायचे त्यानंतर म. का. चि. ऐवजी म. का. औ. असे लिहीले जायचे. 


नागपूर कार्यशाळेत प्रामुख्याने टाटा बसगाड्या बांधल्या जातात. अगदी अपवाद म्हणून काही लेलॅण्ड गाड्याही नागपूर कार्यशाळेने बांधल्या आहेत आणि एकमेव आयशर बस (MH - 40 / AQ 6454) नागपूर कार्यशाळेने बांधलेली आहे. नागपूर कार्यशाळा सर्वसाधारणपणे 300 ते 350 बसगाड्या वर्षभरात बांधते. या कार्यशाळेने बांधलेल्या बसेस विदर्भात आणि काही पश्चिम महाराष्ट्रातल्या आगारांमध्ये पाठवल्या जातात.


छत्रपती संभाजीनगर कार्यशाळेत प्रामुख्याने लेलॅण्ड गाड्या बांधल्या जातात. अपवाद म्हणून काही टाटा गाड्याही छत्रपती संभाजीनगर इथल्या कार्यशाळेने बांधल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर कार्यशाळेत वर्षभरात साधारण 600 ते 650 बसगाड्या बांधते. या बसेस मराठवाडा, खान्देश आणि कोकणातल्या काही आगारांमध्ये पाठवल्या जातात.


दापोडी कार्यशाळेत मात्र टाटा आणि लेलॅण्ड दोन्हीही गाड्या बांधल्या जातात. ही कार्यशाळा वर्षभरात साधारण 600 टाटा आणि 400 लेलॅण्ड गाड्या बांधते. या कार्यशाळेत बांधलेल्या गाड्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि मराठवाडा अशा सर्वत्र दिल्या जातात. 



मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी इथे 2012 - 13 या वर्षात बांधलेली 387 वी नवी लेलॅण्ड असे इथले डिकोडिंग.



मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर इथे 2011 -12 या वर्षात बांधलेली 225 वी नवी टाटा असे इथले डिकोडिंग.


या कार्यशाळा एखादे वेळी अपघातात सापडलेल्या पण चेसिस चांगली असलेल्या बसच्या जुन्या चेसिसवरची जुनी बॉडी बदलून तिला नवीन बॉडी बसवण्याचेही काम करतात. त्यावेळी न. टा. (नवी टाटा) किंवा न. ले. (नवी लेलॅण्ड) ऐवजी पु. टा. (पुनर्स्थापित टाटा) किंवा पु. ले. (पुनर्स्थापित लेलॅण्ड) असे लिहीले जाते. पण अशा वेळा कमी येतात.


आता मधल्या काळात सगळ्या जुन्या ॲल्युमिनीयम बसबॉडीज बदलून माइल्ड स्टील (पोलादी) बसबॉडीज (Mild Steel एम. एस.) बसविण्याचे काम महामंडळाने सगळ्या कार्यशाळांमध्ये हाती घेतले होते. पण त्या गाड्यांवर असा कुठलाच छाप कुठल्याही कार्यशाळेने उठवला नव्हता. आता नवीन बी. एस. 6 टाईपच्या बसगाड्या बांधायला घेतल्यावर फ़क्त छत्रपती संभाजीनगर कार्यशाळेने असे छाप पुन्हा उठवने सुरू केल्याचे मी बघतोय पण नागपूर आणि दापोडी कार्यशाळांच्या बसेसवर असे छाप मलातरी दिसले नाहीत.


- एस. टी. प्रेमी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Wednesday, June 22, 2022

माल - वाहक

 


MWQ 965
अकोला - पुणे हा जलद रूट गाजविणारी अकोला विभागातली १९८५ ची राणी.
आता नागपूर विभागात "माल - वाहक"
मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी निर्मित मूळ बस.
विभागीय कार्यशाळा, नागपूरने बसचे रूपांतर ट्रकमध्ये केले.

३७ वर्षांनंतरही अजून अविरत सेवा देणारा खराखुरा, सच्चा सेवक.


MWQ 965

TATA 1210
"माल - वाहक" i.e. Goods Carrier by MSRTC. Serving MSRTC for 37 long years.
Originally a bus built by MSRTC's Central Workshop Dapodi, Pune.
It must have been built in 1984-85. Served as a passenger bus in Akola division. It had ruled Akola Express Pune route for number of years.
After the end of its codal life as a bus, Nagpur divisional workshop converted it into a truck. At present it is used for MSRTC's departmental works i.e. carrying remoulded tyres, other goods to and fro departmental workshop at Ganeshpeth and central workshop at Hingna.

Sunday, May 30, 2021

पुणेरी व्यक्ती नागपूरचा लाडका राजा.

"सी बी एस २ का राजा"



MH - 12 / AQ सिरीजची टाटा बस. नागपूर सीबीएस - २ डेपो (सध्याचा वर्धमान नगर डेपो) चा राजा म्हणून.


MSRTC's Central Workshop, Dapodi, Pune is the workshop that builds coaches on TATA as well as Ashok Leyland Chasis, too. Annually, Dapodi workshop builds highest number of coaches as compared to coaches built by Central Workshop, Aurangabad and Central Workshop, Nagpur.
Nagpur and Vidarbha region is purely served by the buses built by Central Workshop, Nagpur. Though they get some additional buses built by Central Workshop, Nagpur.
This bus is from Nagpur CBS 2 depot (Now named as Vardhaman Nagar depot). It is written "सी बी एस २ का राजा". This must be the pet bus in CBS 2 depot in Nagpur division of MSRTC. Every depot has such pet buses that are maintained with extra efforts.
Nagpur - Kondhali ordinary shuttle service. (The one that stops at all the stops)
Total (one way) distance : 48 kms.
MH - 12 / AQ 8751
CBS 2 depot (Nagpur division). Now a days CBS 2 depot is named as Vardhaman Nagar depot.
Nagpur - 1 depot is renamed as Ghat Road depot,
Nagpur - 2 depot is renamed as Ganeshpeth depot,
CBS - 1 depot is renamed as Imamwada depot are the other depots in Nagpur division that are renamed just 4 years ago.
Bus built by MSRTC's Central Workshop, Dapodi, Pune.
TATA 1510 C model.
3 by 2 seating arrangement
Total 54 seats (including 1 conductor)
Nagpur Central Bus Stand. (Ganeshpeth bus stand)
12/01/2009.