Showing posts with label TGSRTC. Show all posts
Showing posts with label TGSRTC. Show all posts

Sunday, June 7, 2026

आठवणीतल्या एस. टी. - आपली लेकुरवाळी तेलंगण राजधानी

नागपूर या महाराष्ट्रातल्या उपराजधानीच्या ठिकाणापासून तत्कालीन आंध्रप्रदेशच्या (सध्याच्या तेलंगणच्या) राजधानीला, हैद्राबादला जोडणारी आपली एस. टी. ची जलद बस. 


हे बस नागपूर बस स्थानकावरून सकाळी ८.०० वाजता सुटत असे. मार्गे जांब - हिंगणघाट - पांढरकवडा - आदिलाबाद - निर्मल ही बस संध्याकाळी ६.०० वाजता हैद्राबादला पोहोचत असे. परतीच्या प्रवासातही ही बस असाच दिवसभराचा प्रवास करून नागपूरला संध्याकाळी पोहोचत असे.


आमच्या बालपणापासून नागपूर ते हैद्राबाद ही आंध्र प्रदेश मार्ग परिवहन महामंडळाची संध्याकाळी ६.०० वाजता निघणारी निम आराम गाडी आणि त्यानंतर आता आता सुपर लक्झरी ही आराम गाडी असायची. इतका लांब प्रवास करणारी आपली साधी गाडी आणि आंध्र प्रदेशची मात्र चकाचक लक्झरी गाडी याचे आम्हाला बालपणी फ़ार वैषम्य वाटे. वाटून जाई की आपल्या एस. टी. ने सुद्धा किमान आपली एशियाड (निम आराम) या मार्गावर सोडावी आणि आंध्र प्रदेश परिवहन ला स्पर्धा म्हणून रात्रभर प्रवास करून सकाळी मुक्कामाच्या जागी पोहोचणारी सोडावी. मधल्या काळात अगदी फ़ार थोड्या महिन्यांसाठी नागपूर आगारात आसनी व्हॉल्वो बसेस आल्या होत्या (ब्रॅंडनेम : शिवनेरी). त्यातली एक बस नागपूर ते हैद्राबाद मार्गावर आपल्या महाराष्ट्र एस. टी. च्या नागपूर डेपोने धाडलीही होती. पण का कोण जाणे ? हा प्रयोग अल्पकाळच टिकला होता. ही आपली शिवनेरी बस नागपूरवरून दुपारी ४.०० वाजता निघत असे आणि हैद्राबादला दुस-या दिवशी पहाटे ४.०० वाजता पोहोचत असे. कदाचित या अडनिड्या वेळांमुळे या मार्गावर या सेवेला फ़ार प्रतिसाद मिळाला नसेल. किंवा आपल्या शिवनेरी चे प्रवासभाडे आंध्र प्रदेश परिवहन सेवा किंवा खाजगी बसेसच्या वातनुकूल शयनयान गाड्यांपेक्षाही फ़ार जास्त होते म्हणून या सेवेला प्रतिसाद लाभला नाही.


आज तेलंगण राज्य परिवहन सेवेच्या दोन बसेस या मार्गावर आहेत. या दोन्हीही बसेस वातानुकूल आसनी + शयनयान या प्रकारच्या आहेत. एक बस नागपूरवरून संध्याकाळी ५.०० वाजता निघते तर तिचीच बहीण तिच्या मागून बरोबर एका तासाने निघते. संध्याकाळी ६.०० वाजताचे आपले टायमिंग आंध्र प्रदेशचे तेलंगण राज्य झाले तरी ही मंडळी सोडायला तयार नाहीत.


पण त्याकाळी सगळे थांबे घेत दिवसभर प्रवास करणा-या, मधल्या मधल्या स्थानकांवरच्या सगळ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी असणा-या आपल्या या तेलंगण राजधानीचा थाट काही औरच होता. त्याकाळातली ही एक नवीन बांधलेली बस नागपूर - २ (सध्याचा गणेशपेठ) डेपो या मार्गावर देत असे.



MH - 31 / 8614 


मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर ने बांधलेल्या MH - 31 / 85XX,  MH - 31 / 86XX आणि  MH - 31 / 87XX  सिरीजच्या सुरूवातीच्या काही बसेसची बांधणी अगदी अप्रतिम होती. MH - 31 / 87XX  सिरीजमध्येच नंतर नंतर 3 x 2 आसनव्यवस्था जाऊन 2 x 2 आसनव्यवस्थेच्या बसेस आल्या होत्या.


TATA 1512 Cummins


मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर ने बांधलेली साधी बस.


3 x 2 आसनव्यवस्था. एकूण ५४ आसने. 


नागपूर जलद हैद्राबाद (मार्गे जांब - हिंगणघाट - पांढरकवडा - आदिलाबाद - निर्मल)


नागपूर - २ आगार (सध्याचे नामकरण गणेशपेठ आगार), नागपूर विभाग.


एकूण अंतर ५०० किलोमीटर्स.



@ जांब बस स्थानक


१८ / ५ / २००८. सकाळी ९.३० वाजता.


Monday, December 16, 2024

महाराष्ट्र एस टी ला हे का जमू नये ?






तेलंगण राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एक्सप्रेस सेवा,

नागपूर जलद आदिलाबाद,

अशोक लेलँड व्हायकिंग माॅडेल.

आदिलाबाद डेपो.

पूर्वीचे आंध्रप्रदेश मार्ग परिवहन आणि आता तेलंगण मार्ग परिवहन च्या बसेसची बांधणी मजबूत वाटते. त्यांच्या बस बाॅडीबिल्डींग मियापूर, हैद्राबाद कार्यशाळेत येथेच या गाड्यांची बांधणी होते. या गुणवत्तेची बांधणी आपल्या महाराष्ट्र मार्ग परिवहनच्या तीनही मध्यवर्ती कार्यशाळेंकडून का होत नाही ? हाच मला कायम प्रश्न पडतो.

तसेच तेलंगण, आंध्र आणि कर्नाटक राज्य परिवहनचे डेपो ज्या पध्दतीने या बसेसची नियमित देखभाल करतात तसे आपले डेपो का करीत नाही ? हा सुध्दा मला पडलेला आणखी एक  प्रश्न.